दिनांक :- 4-5-2022
या ७ गोष्टी मनाला नेहमी सलतात -
नीतिशतकम् सुभाषित रसग्रहण neeti-shatak-subhashits
भर्तृहरी संस्कृत श्लोक
छंद :- पृथ्वी
शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी ।
सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वाकृतेः ॥
प्रभुर्धनपरायणः सततदुर्गतिः सज्जनो।
नृपाङ्गणगतः खलो मनसि सप्त शल्यानि मे ॥
मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित
चंद्राला दिवसां प्रकाश नसणें, ये कामिनीला जरा
पद्मावीण जळें, निरक्षर, मुखीं जो नेटका गोजिरा ॥
दात्याला धनलोभ नित्य, असणें, दारिद्र्य विद्वज्जनीं
दुष्टाचा पगडा महीपतिगृहीं हीं सात शल्यें मनीं ॥
मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे
पृथ्वी
शशीहि दिवसां भुरा; तरुणिचें झडे यौवन
तळे कमलहीन, रूपयुत हाय विद्येविण ॥
धनीच धनलुब्ध, नित्य सुजनांस ये दुर्गति
नृपाघरिंच दुष्ट, सात खुपतात शल्यें हृदीं ॥
किंवा ह्याच श्लोकाचा मराठी अनुवाद शार्दूलविक्रीडित छंदात पुढीलप्रमाणे :-
व्हावा चंद्र भुरा फिकाच दिवसां, स्त्रीचें झडे यौवन
व्हावें पद्मविहीन तें सर, मुखीं सौंदर्य विद्येविण ॥
पैशाचा प्रभुलाच लोभ असणें, थोरां सदा दुःस्थिति
राजाच्या गृहिं दुष्ट, सात मज हीं शल्यें मनीं टोचतीं ॥
अर्थ :- १) दिवसा निस्तेज झालेला चंद्र, २) तारुण्य ओसरलेली सुंदरी, ३) कमळे नष्ट झालेले सरोवर, ४) सौंदर्यपूर्ण मात्र निरक्षर असे मुख, ५) पैशास हपापलेला राजा /मालक, ६) सतत दुर्दैवाचा फेरा लागलेले सज्जन (आणि) ७) राजदरबारी असणारे खलपुरुष, दुष्ट पुरुष ही माझ्या मनातील सात शल्यं होत.
जीवनाचे सार्थक आहे इतरांना सुख देण्यात. इतरांच्या उपयोगी पडण्यात. मात्र जेव्हा हे बलस्थानच कालौघात जर लोप पावले, तर मग अशांच्या अस्तित्वाने आनंदाच्या ऐवजी विशादाचाच अनुभव येतो. अशा काही विशादस्थानांचा येथे विचार केला आहे.
चंद्राचे सौंदर्य फुलते ते रात्री. दिवसाही अनेकदा तो आकाशात असतो, पण त्याजे तेज नाहीसे झालेले असते. असा निस्तेज चंद्रमा अरेरे! बिचारा असाच वाटतो.
एखादी सुंदर स्त्री वृद्धत्वामुळे सौंदर्य गमावते. अशा वेळी लावण्यरहित अशा त्या स्त्रीच्या अस्तित्वाने आनंद कसा होईल? तिचे स्वरूप सध्याच्या आनंदाचा आधार न ठरता, भूतकाळाच्या चिंतनाचा विषय ठरते.
सरोवराचे सौंदर्यस्थळ आहे त्यात फुललेली कमळे. जर तीच लोपली तर नुसता पाण्याचा साठा- नजरेस तो आनंद देत नाही. कारण कमळासोबतच तेथील गुंजारवही जातो. चक्रवाक दम्पतीही नसतात. त्यांचा प्रेमालापही नसतो ना!
सुंदर दिसणारा, पण अज्ञानी माणूस हे मनोद्रावक समीकरण आहे. दिसतो अद्वितीय, पण बोलला की संपले. असे असेल तर काय उपयोग?
पैशामागे लागलेला राजा, सतत गरिबीत राहणारे विद्वान व राजदरबारीचे दुष्ट आपल्या खर्या सत्तेला प्रगट करू शकत नाहीत व पर्यायाने त्या सत्तेचा जनतेस परिपूर्ण लाभ होत नाही.