अर्थेषु मूढाः खरवद् वहन्ति संस्कृत सुभाषित - sunskrit-subhashit

अर्थेषु मूढाः खरवद् वहन्ति संस्कृत सुभाषित - sunskrit-subhashit

 आजची लोकोक्ती - अर्थेषु मूढाः खरवद् वहन्ति।



यथा खरश्चन्दनभारवाही 

भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य।

एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य 

अर्थेषु मूढाः खरवद् वहन्ति॥

                           - चरकसंहिता.

अर्थ :- जसे चंदन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या गाढवाला ओझे कळते पण चंदन काय आहे ते कळत नाही अगदी तसेच अर्थ समजून न घेता फक्त भारंभार शास्त्रांचा अभ्यास करणाराही त्या गाढवा सारखाच केवळ ओझे वाहत असतो.

टीप:- चंदन वाहून नेणाऱ्या गाढवाला त्या चंदनाचे फक्त वजन जाणवते पण चंदनाचा सुवास, त्याची शिल्पकामासाठीची योग्यता, त्याची परोपकारासाठी झिजण्याची वृत्ती हे चंदनाचे गुण ते गाढव जाणत नाही तसेच शास्त्रांचा खरा अर्थ जाणून घेतल्याशिवाय जे लोक खूप अभ्यास करतात ते गाढवाप्रमाणेच शास्त्रांचे निव्वळ ओझेच वाहतात.

यस्य नास्ती स्वयम् प्रज्ञा, शास्त्रम् तस्य करोती किम्।

ज्याला स्वतःची बुद्धी नाही त्याला शास्त्रातील ज्ञान शिकून काय उपयोग तो फक्त अर्थेषु मूढाः खरवद् वहन्ति या लोकोक्तीनुसार शास्त्रार्थाला,  गाढवाप्रमाणे ओझे समजून चालत रहातो. या लोकोक्तीचा अर्थ समजावून सांगणारी एक बोधकथाच पाहूयात,

तीन शिष्य आपले शिक्षण पूर्ण करून  गुरुंचा आशिर्वाद घेऊन आपल्या गावी परत जाण्यास निघाले. दुपारच्या भुकेच्या वेळी ते एका राजवाडयापाशी पोचले. तेथे वाटसरूंना शेवयांची खीर वाटली जात होती. तिघांनीही द्रोण भरून खीर घेतली आणि सावलीला जाऊन खाण्यास बसले.

खिरीतील लांबच लांब शेवया पाहून त्यांना ’दीर्घसूत्री विनश्यति’ (शब्दशः अर्थ - लांब धागे विनाशकारक असतात.) हे गुरुंनी शिकवलेले वचन आठवले त्यामुळे ती खीर तशीच जमिनीवर ठेऊन ते भुकेल्या पोटी पुढे निघाले. त्यांच्यामागे सावलीत उभ्या असलेल्या गाढवाने ती खीर खाल्ली आणि अधिक कांही खायला मिळेल या आशेने गाढव त्या तिघांच्या मागे मागे जाऊ लागले. पुढे एका अन्नछत्रात घावन मिळाले.

पण त्यावरील छिद्रे पाहाताच त्यांना ’छिद्रेषु अनर्था: बहुली भवन्ति’ (शब्दशः अर्थ - छिद्रांमध्ये खूप अनर्थ,संकटे दडलेली असतात) हे गुरुंनी शिकवलेले वचन आठवले नि त्यांनी ते घावन त्यांच्या मागे आलेल्या गाढवाला खायला घातले. भुकेल्या पोटी पुढे जातांना त्यांना मुख्य रस्त्याला दोन रस्ते फुटलेले आढळले. भुकेने बुद्धि चालेना. कोणत्या रस्त्याने जावे संभ्रम पडला. तोच एक प्रेतयात्रा आली आणि उजव्या रस्त्याला निघाली .

ते पाहून ’महाजनोः येन गतः सः पन्थः’ (शब्दशः अर्थ - मोठया संख्येने लोक अनुसरतात तोच तुमचा रस्ता) हे गुरुजींनी शिकवलेले वचन आठवले नि ते त्यांच्या मागे जात जात गाढवासह स्मशानात पोचले. तेथे खायला काय मिळणार? भुकेने कासावीस झालेल्या त्यांना संकटातून सोडविणारा कोणी बंधू भेटावा असे वाटायला लागले आणि पुन्हा त्यांना गुरुंनी शिकवलेले वचन आठवले.

’राजद्वारे स्मशानेच यः तिष्ठति सः बान्धवः’ (शब्दशः अर्थ - राजवाडयाच्या दारावर आणि स्मशानातही जो आपल्यासोबत असतो तोच आपला खरा बंधू!). ’अरेच्या! हे गाढवच आता आपला खरा बांधव होय. तेच आपले खरे तारणहार!’ असे समजून तिघेही गाढवाच्या गळी पडायला गेले. परंतु अनोळखी माणसांच्या या अनपेक्षित प्रेमाने गाढव गोाधळले आणि त्या तिघांनाही लाथांचा प्रसाद देऊन पळून गेले.

शिकलेल्या ज्ञानाचे फक्त भारवाही होऊ नये त्याचा योग्य अर्थ जाणून व्यवहारात उपयोगही करावा. नाहीतर आपण 'अर्थेषु मूढाः खरवद् वहन्ति' या उक्तीनुसार फक्त भारवाही ठरतो.

संकलन व टीप : अभिजीत काळे, 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post