तारुण्यातच विचारांची जडणघडण होते सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit

तारुण्यातच विचारांची जडणघडण होते सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण 

तारुण्यातच विचारांची जडणघडण होते सुभाषित रसग्रहण - 

sunskrit-subhashit 


भर्तृहरी संस्कृत श्लोक :- 

छंद :- स्रग्धरा 

रागस्यागारमेकं नरकशतमहादुःखसम्प्राप्तिहेतुः

मोहस्योत्पत्तिबीजं जलधरपटलं ज्ञानताराधिपस्य ।

कन्दर्पस्यैकमित्रं प्रकटितविविधस्पष्टदोषप्रबन्धं

लोकेऽस्मिन्न ह्यनर्थव्रजकुलभवनं यौवनादन्यदस्ति ॥

              - श्रृंगारशतक, भर्तृहरी.

मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित

छंद :- मालिनी

स्पृह विषयरतीचें हेतु जे दुर्गतीचें 

घनपटल असे जें ज्ञानताराधिपाचें ॥

मदनसुहृद बीज भ्रान्त्यनर्थादिकांचें 

अघजनक जनीं या यौवनावीण कैचें ? ॥


मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे 

छंद :- स्रग्धरा

प्रेमाचें स्थान, आणी नरकशतमहादुःख जें मानवातें 

मोहातें जन्म देई; घनपटल जणूं ज्ञानचन्द्रास होतें ।। 

स्नेही मुख्य स्मराचा; कुरचित कविता जी महादोषपूर्ण 

लोकी कांहीं अनर्थप्रद अति दुसरें यौवनावांचुनी न ॥

गद्यार्थ– तारुण्य हे प्रेमाचें ( त्याचमुळे मत्सरादि दोषांचें ) एकमेव अधिष्ठान असतें. ते शंभर नरकांइतकं दुःख मनुष्यास घडवतें, मोहाचे जन्मस्थान, ज्ञानचंद्राचा प्रकाश अडवून धरणारें मेघपटल, मदनाचा एकमेव मित्र, दोषपूर्ण कुरचित अशी जणूं कविता असें असून सर्व अनर्थोचें घरच असें तारुण्यावांचून या जगीं दुसरें कांहींहि नाहीं.

अर्थ :- अनुरागाचे (प्रेमाचे)आगार असलेल्या, (पण त्याचबरोबर) नरकातील शेकडो प्रकारच्या दुःखांना कारणीभूत असणाऱ्या, ज्ञानरुपी तांरांगणाला झाकून टाकणाऱ्या मोहरूपी मेघसमुहाच्या उत्पत्तीचे बीज असणाऱ्या, कामदेवाचा मुख्य मित्र असलेल्या, अनेकविध दोषांना प्रकट करणाऱ्या, सद्गुणकुलाच्या अनर्थाला कारण ठरणाऱ्या या इहलोकात (पृथ्वीवर) तारूण्याशिवाय (यौवनाव्यातिरिक्त) दूसरा कोणताच अनर्थ नाही.

टीप- सांसारिक क्लेशांनी तापून मन विरक्त झाल्याने राजर्षी भर्तृहरी ज्ञानविदग्ध झाले. आपल्या अनुभवसिद्ध ज्ञानाला अलौकिक प्रतिभेची जोड देत त्यांनी शृंगारशतक, वैराग्यशतक आणि नीतीशतक अशी शतकत्रयी रचली. ज्यातून मानवाला सद्वर्तन, सद्गुण आणि सदाचरणाचा योग्य तो बोध केला गेला आहे. 

वरील श्लोकातून राजर्षी भर्तृहरी सांगतात की, तारूण्य हाच तो काळ (वय वर्षे १६ ते २५) असतो की ज्यावेळी मनुष्याने साधकबाधक गोष्टींचा विवेकाने बोध घेत आपल्या जीवनाला आकार द्यायचा असतो. एकदा ही वेळ चुकली की ती चुकतच जाते, ती भरून काढता येणे अशक्य अथवा अतिकष्टप्रद असते. 

     भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे खरेतर मनुष्य स्वतःच स्वतःला घडवत किंवा बिघडवत असतो.

उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत् ।

आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥

                  ~६.५, श्रीमद्भगवद्गीता.

      आपणच आपली प्रगती साधत असतो आणि आपल्या अधोगतीलाही आपण स्वतःच कारणीभूत असतो. आपणच आपल्या स्वतःचं हित इच्छिणारा बांधव असतो आणि आपणच आपले शत्रुही होतो. 

      यातून बोध घेऊन जे उत्तम ते निवडायची प्रेरणा आपण वृद्धिंगत करायला हवी. तारूण्य अनर्थकारी आहे हे वरील श्लोकात याचसाठी म्हटलं गेलंय की तारूण्यात मनुष्य इंद्रिय विषयांच्या आहारी जाऊन मोहवशतेने त्याचा मार्ग चुकू शकतो व पुढील आयुष्य दुःखतर होऊ शकते, खडतर होऊ शकते. त्यामुळे तारूण्यात मनुष्याने अधिक सावधपणे वागायला हवे.  

संकलन व टीप - अभिजीत काळे

=============

संस्कृत सुभाषित क्र. २ 

सच्छिद्रो मध्यकुटिलः कर्णः स्वर्णस्य भाजनम् !

धिग्दैवं निर्मलं नेत्रं पात्रं कज्जलभस्मनः !!

शार्ङ्गधरपद्धति

सच्छिद्रः (छिद्र असलेला), 

मध्यकुटिलः (मध्ये वाकडा असलेला) 

कर्ण (कान) 

स्वर्णस्य ( सोन्यासाठी) 

भाजनम् ( पात्र ठरतो). ( परंतु,) 

निर्मलं ( स्वच्छ) 

नेत्रं (डोळा मात्र) 

कज्जलभस्मनः (शब्दशः काजळरूपी राखेला, काजळाला) 

पात्रम् ( पात्र ठरतो). 

दैवं धिक् ( दैवाचा धिक्कार असो). 

दैवामुळे कुणाला काय मिळेल हे सांगता येत नाही. वाईट व्यक्ती उच्चपदस्थ होते तर सज्जनाच्या वाटेला अवहेलना येते. समर्पक दृष्टांत देण्यात सुभाषितकारांचा हात कुणी धरू शकत नाही. वाईट किंवा दुष्ट व्यक्तीची तुलना कानाशी केली आहे.

कानाला भोक असतं. छिद्र हे दोषाचं, कमतरतेचं प्रतीक आहे. कान छिद्रासहित आहे, सदोष आहे. मध्यकुटिल आहे, मध्यभागी वाकडा आहे. कुटिल शब्दाचे दोन अर्थ आहेत, वाकडा आणि दुष्ट. सरळ स्वभाव, सरळ बुद्धी नसलेल्या अवगुणी व्यक्तीला सर्वोच्च सन्मान  मिळतो. सोन्याचं आभूषण सच्छिद्र आणि वाकड्या कानातच घालतात.‌ 

पण निर्मल म्हणजे स्वच्छ अशा डोळ्यात मात्र काजळ घालतात. काजळासाठी कज्जलभस्म असा शब्द वापरला आहे. सरळमार्गी व्यक्तीच्या वाट्याला येणारी अवहेलना व्यक्त करण्यासाठी आणि छंदाची गरज म्हणून कवीनं हा शब्द तयार केला असावा. अवगुणी कानाला सोनं आणि गुणी डोळ्याला काजळ देणाऱ्या दैवाचा कवीनं धिक्कार केला आहे.

अर्थ :- डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे) 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post