नीतिशतकम्-neeti-shatak subhashits
न कश्चिचंडकोपानामात्मीयोनाम भूभुजाम्।
होतारमपि जुह्नानं स्पृष्टो दहति पावकः ।
अर्थ : - सदैव चिडलेल्याच राजास (सत्ताधीशास) आपल्या जवळचा असा कोणीच नसतो. आहुती देण्याकरिता हात पुढे करणार्या होत्यासही अग्नी चटकाच देतो. कोणत्याही स्वरूपातील सत्तेच्या पदावर आसीन व्यक्तीची जर तो संतापी असेल, तर काय दुर्दशा होते हे महाकवि भर्तृहरींनी येथे मोठ्या मार्मिक शब्दात स्पष्ट केले आहे.
ते म्हणतात, सदैव क्रोधायमान असलेल्या राजाच्या प्राक्तनात अनिवार्यरीत्या एकटेपणच येते. कोणीही स्वत:हून त्याच्याजवळ जाऊ इच्छित नाही. जमेल तेवढे काम टाळण्याचाच प्रयास सर्व करतात. त्याचा जवळचा असा कोणीच नसतो. कारण त्याच्या संतापी स्वभावामुळे तो जवळ आलेल्या सगळ्यांना दुखावतच राहतो व मग कालवर जवळचे असणारे आज हात राखूनच राहतात. नवीन कोणी जवळ येण्याचा प्रश्नच नसतो. शेवटी त्याचा क्रोधच त्याच्या विलयाचे कारण होतो.
वास्तविक जे त्याच्या जवळचे असतात ते त्याच्याच फायद्याकरिता कार्य करीत असतात. मात्र, याच्या संतापाच्या भरात हा आपल्या लाभकारींनाही दुखावतो. दृष्टान्त देताना महाराज भर्तृहरी म्हणतात की, यज्ञीय अग्नी पहा. जो आहुती देतो त्या होत्याच्या हातालाही त्या आगीच्या ज्वाला चटकेच देतात. वास्तविक त्यांनी दिलेल्या आहुतीच्या भरवशावरच अग्नीचे अस्तित्व अवलंबून असते. मात्र, याचेही भान न ठेवता अग्नी त्यालाही चटके देतो. शेवटी काय होईल? तर होता आहुती टाकणे बंद करील. त्याने होत्याचे काय बिघडेल? अग्नीच लोप पावेल. त्याचेच तेज क्षीण होईल.
राजाचे, पदाधिकार्याचेही असेच असते. जवळच्यांनाच चटके दिल्याने तेच दूर जातात. मग कामाचे हाल होतात. मग हा चमकेल कोणाच्या भरवशावर?