नीतिशतकम् सुभाषित रसग्रहण
भर्तृहरी संस्कृत श्लोक
मनुष्याच्या ठिकाणी दुर्गुण असले की सद्गुण गमावतो - neeti-shatak-subhashits
लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकैः।
सत्यं चेत् तपसा च किं शुचि मनो यद्यस्ति तीर्थेण किम् ॥
सौजन्यं यदि किं निजैः स्वमहिमा यद्यस्ति किं मण्डनैः ।
सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना ॥
मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित
छंद :- शार्दूलविक्रीडित
तैं कां दुर्गुण लोभ जैं ? पिशुनता जैं, कां महापातकें ?
काशाला तप, सत्य जैं ? मन शुचें जैं, कां सुतीर्थोदकें ?
कांशाला गुण जैं भलेपण असे? कां भूषण, कीर्ति जै ?
सद्विया जधिं, कां धनें? मरण कां दुष्कीर्ति लोकींच जैं ? ॥
मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे
वृत्त :- आर्या
लोभ असे तर दुर्गुणकशास-पातक असून दुष्टपण ? ।
सत्य असे तर तपही कशास तीर्थं, असून शुद्ध मन? ॥
असुनि भलेपण, गुण ते-कशास मंडन असेल जर कीर्ति? ।
सद्विद्या असतां धन कशास मृत्युहि असून दुष्कीर्ति? ॥
गद्यार्थ- एक लोभ असेल, तर, आणखी दुसरा दुर्गुण (किंवा गुणाचा अभाव) हवा कशाला? एक दुष्ट चुगलखोरपणा असेल, तर निराळें पातक कशाला करण्यास हवें? एक सत्य असेल तर निराळी तपश्चर्या काय करायची?
आपले मन शुद्ध असेल तर तीर्थे धुंडण्याचें काय प्रयोजन? एक भलेपणा असेल तर आणखी सद्गुण असण्याची आवश्यकताच काय? एक सत्कीर्ति असेल तर अलंकार कशाला? सद्विद्या असेल तर धनाची महती काय ? एक दुष्कीर्ति असेल तर आणखी मरण तें निराळें काय असतें?
विस्तृत अर्थ :-
हावरटपणा असेल तर (अन्य) दुर्गुण कशाला (हवेत)? दुष्टत्व असेल तर पाप कशाला? सत्य असेल तर तप कशाला? शुद्ध मन असेल तर तीर्थे कशाला? सौजन्य अंगी असेल तर नातलगच कशाला? आत्मकर्तृत्व असेल तर अलंकार कशाला? सुंदर विद्या असेल तर धनाची (गरजच) काय? आणि अपयश असेल तर मृत्यू (हवाच) कशाला? (अर्थात या सगळ्यांची वेगळेपणाने गरजच नसते.)
जीवनात तुमच्याजवळ काय असले की काय कमावता येते वा गमावता येते, हे महाराज भर्तृहरींनी येथे विशद केले आहे. ते म्हणतात, तुमच्याजवळ हाव, आसक्ती, स्पृहा असेल तर अन्य अवगुणांची गरजच नाही. ती एकटीच सर्व अवगुण जमा करतेच. जर तुमच्याजवळ पिशुनता अर्थात दुष्टत्व असेल, तर पापांची गरजच नाही. कारण, मग तुम्ही जे करीत जाता ते पापाचरणच ठरत राहते. पाप गोळा होतच राहते.
मन शुद्ध असेल तर तीर्थयात्रेला जाण्याची गरजच नाही. कारण, तीर्थयात्रादिक सगळ्या साधनांचा परिणाम तर चित्तशुद्धीच आहे ना? तोच असेल तर मग फिरण्याचे श्रम हवेतच कशाला? आणि उलट्या बाजूने विचार केल्यास मन शुद्ध नसेल, तर तीर्थयात्रांचा उपयोग तरी काय ?
सृजनता असली तर नातेवाईकांची गरजच नाही, कारण मग सगळे जगच आपले सहकारी होते. नाते नसले तरी जडते. आपल्या ठायी कर्तृत्व हवे. मग अन्य अलंकारांची आवश्यकताच नाही. माणूस फुलतो तो कर्तृत्वानेच. ते नसले तर अन्य दागिन्यांनी काय शोभा येणार? तो तर पुतळ्याचा शृंगार झाला ना?
विद्या असेल तर धन हवे कशाला? ते तर केव्हाही उभे करता येईल आणि अपयश असेल तर मृत्यूची गरजच काय? कारण ते अपयशच मृत्यूपेक्षा भयानक आहे. ते प्रतिक्षणी मृत्यूप्रमाणे दु:ख देते. पर्यायाने घाबरावे फक्त त्या अपयशालाच.