घडून गेलेल्या गोष्टीचा शोक करत बसू नये - संस्कृत सुभाषित रसग्रहण
Sunskrit Subhashit Sahitya
आजची लोकोक्ती - गतंं न शोच्य / गते शोको न कर्तव्यो।
गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥
- चाणक्यनीती १३.२
अर्थ :- माणसाने घडून गेलेल्याचे (काळाचे, गोष्टींचे) दुःख करू नये आणि भविष्याच्या काळजीतही गुंतू नये. बुद्धीमान (ज्ञानी, शहाणी) माणसे वर्तमानकाळास अनुसरून वागतात.
टीप- 'घडून गेलेल्या गोष्टीचा शोक करू नये' या अर्थाने गतं न शोच्यम् । किंवा गते शोको न कर्तव्यो। या संस्कृत लोकोक्ती मराठीतही बोलताना उपयोगात आणल्या जातात.
गतं न शोच्यं मन्तव्यं भविष्यं न तु चिंतयेत।
वर्तमानानुकुल्येन वर्तनीय विचक्षणैः॥
घडून गेलेल्या गोष्टीबद्दल उगाच शोक करू नये तसेच भविष्याची देखील वृथा चिंता करू नये. शहाण्या माणसाने नेहमी वर्तमानाचाच विचार करावा. 'घडून गेलेल्या गोष्टीचा शोक करू नये' ह्या वाक्प्रचारावरून महाकवी माघाविषयीची एक मजेशीर आख्यायिका आठवली.
भारतामध्ये काही अतिशय विद्वान आणि पराक्रमी सम्राट होऊन गेले. ज्यांनी विद्वानांना आश्रय दिला ज्यांच्या काळात अनेक ग्रंथ रचले गेले. ज्यांचे साम्राज्यही मोठे होते. त्यात पहिले नाव येते. 'विक्रमादित्य' या उपाधीने प्रसिद्ध असलेला गुप्त राजवंशातील सुमुद्रगुप्ताचा महापराक्रमी मुलगा 'दुसरा चंद्रगुप्त'. हा सम्राट इसवीसनाच्या चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला. याची दुसरी राजधानी 'उज्जैन'.
याच्या राजसभेत कालिदास वराहमिहिर यांसह नऊ विद्वान होते. ज्यांना नवरत्न म्हणून संबोधलं जात असे. विद्वानांना आश्रय देणारा दुसरा राजा म्हणजे इसविसनाच्या नवव्या दहाव्या शतकाच्या संधीदरम्यान होऊन गेलेला 'राजा भोज' होय. हा स्वतःही एक विद्वान होता. याच्या नावावर ८४ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. काव्यशास्त्र आणि व्याकरण या विषयांना वाहिलेला 'सरस्वतीकण्ठाभरण' हा त्याने लिहिलेला महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. त्याचे संपूर्ण भारतावर राज्य होते. अशा ह्या राजा भोजाची राजधानी धारनगरी जी माळव्यात आहे. भोजाच्या राजसभेतही दंडी, भारवि, माघ अशा श्रेष्ठ पंडित कवींचा समावेश होता.
तर राजा भोज आणि माघच्या संदर्भातील आख्यायिका अशी, एकदा राजा भोजाची राणी आणि महाकवी माघाची पत्नी बोलत असतात. तेवढ्यांत तिथून भोजराजा चाललेला असतो. त्या दोघी काय बोलत असाव्यात याबद्दल राजाच्या मनात कुतूहल निर्माण होते. राजा तिथेच जवळपास उभे राहून त्यांचे बोलणे कान देऊन लक्षपूर्वक ऐकू लागतो. याची चाहूल लागताच माघाची पत्नी सहज बोलून जाते, "यावे मूर्ख." हे ऐकून राजा चाचपतो आणि झटकन तिथून निघून जातो. राजाला कळात नाही की त्याने काय मूर्खपणा केला असावा.
त्या दिवशी राजसभेची वेळ झाल्यावर तिथे दंडी, भारवी इ. प्रतिष्ठीतांचे आगमन होते. तेव्हा राजा प्रत्येकालाच "यावे मूर्ख" असे म्हणतो. पण राजाला 'आपण आम्हाला मूर्ख का म्हणालात?' असा जाब विचारणार कोण? म्हणून भीतीने सगळेच मौन राखतात. त्यानंतर महाकवी माघाचेही राज्यसभेत आगमन होते. त्याला पाहूनही भोजराजा म्हणतो "यावे मुर्ख".
ते ऐकून माघ हजरजबाबी पणे खालील श्लोक म्हणतो,
खादन्न गच्छामि हसन्न जल्पे (जल्पामि)
गतं न शोचामि कृतं न मन्ये।
द्वाभ्यां तृतीयो न भवामि राजन्
किं कारणं भोज भवामि मूर्खः॥
हे भोजराज, मी काही खाता खाता चालत नाही; हसत हसत बोलतही नाही; मी घडून गेलेल्या गोष्टींबद्दल शोकही करत नाही; तसेच केलेल्या कर्माचा वृथा अभिमानही बाळगत नाही आणि दोन माणसे बोलत असताना तिथे तिसरा होऊन ऐकतही नाही;मग मला मूर्ख म्हणण्याचे कारण काय? माघाचे हे प्रत्युत्तर ऐकून भोज राजाला आपली चूक कळून येते व तो लगेच म्हणतो "यावे विद्वान."
महाकवी माघाचा विषय निघाला आहेच म्हणून त्याच्याविषयी अजून थोडे... महाकवी माघाने 'शिशुपालवध' हे महाकाव्य लिहिले आहे. संस्कृत भाषेतील मुख्य कवींमध्ये पंडितकवी माघाचा समावेश होतो. महकवी माघाच्या प्रशंसेत रचला गेलेला एक संस्कृत श्लोक असा आहे,
उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम्।
दण्डिनः पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणाः॥
उपमा अलंकार हे कालिदासाच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे, भारविच्या काव्यात आशयपूर्ण रचना आढळते तर पदलालित्य हे दण्डीच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. माघाच्या लिखाणात मात्र हे तिन्ही वैशिष्ट्ये दिसून येतात.
संकलन व टीप : अभिजीत काळे सर