संस्कृत सुभाषित रसग्रहण
चाणक्य नीती
काळ सकळ प्राणिमात्रांना गिळून टाकतो. काळावर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही. Sunskrit-subhashit
आजची लोकोक्ती - कालो हि दुरतिक्रमः।
कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः।
कालः सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः॥
- चाणक्यनीती
अर्थ :- काळ सकळ प्राणिमात्रांना गिळून टाकतो. काळच सर्वांचा विनाश करतो. झोपलेल्यांमध्येही काळ जागा असतो. काळावर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही. (हेच शाश्वत सत्य आहे.)
टीप- वरील सुभाषितापासून कालो हि दुरतिक्रमः। ही उक्ती प्रचलित झालेली आहे. काळाच्या पुढे कोणाचेही काही चालत नाही. अमर्याद पैसा अलेल्यांना, अखंड पृथ्वीचे राज्य उपभोगणाऱ्यांनाच काय तर तिन्ही लोकांवर विजय मिळविणाऱ्यांना आणि खडतर दीर्घ तपश्चर्याकरून अमरपद मागणाऱ्यांनाही काळापुढे अखेरीस नमावे लागते या अर्थाने ही लोकोक्ती बोलली जाते.
काळ सतत पुढे सरकत आहे हे विश्व नाशिवंत आहे याची तो सतत आपल्याला जाणीव देत असतो. हे सत्य चाणक्यनीतीमधील श्लोकातून आपल्याला सांगण्यात आले आहे. आपण काळअसून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. काळ ही मिती आहे म्हणूनच विश्व पुढे सरकते आहे म्हणूनच अखिल ब्रह्मांडांला भूत आणि भविष्य आहे.
काळ ही संज्ञा आपण मृत्यूसाठी वापरतो कारण कधीही कोणासाठी थांबत नसणारा काळ एक दिवस सर्वांच्या मृत्यूची वेळ घेऊन येणार असतो. मग त्यापासून सुटकेचा काही उपाय आहे का हा प्रश्नही मानवी बुद्धीला पडणारच. या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला फक्त आणि फक्त कालजयी असे संतच देऊ शकतात. कारण ते काळाच्या तडाख्यापासून, या जगात जन्माला येणे व मरण पावणे या चक्रापासून, चौऱ्यांशीच्या फेऱ्यापासून मुक्त झालेले असतात.
संत एकनाथ आणि संत तुकाराम यांसारखे संतपुरुष हेच सर्वांविषयी करुणाभाव मनात असल्याने पोटतिडकीने आपल्या अभंगातून समस्त मनुष्यमात्राला कळवळून सांगतात. एकनाथ लिहितात,
आयुष्य जातें पळ पळ तुजला कैसें कळेना।
दो दिवसाची तनु हे साची आलासी रे पाहुणा॥१॥
चौसष्ट घडीयामाजीं रात्र गेलीं समजेना।
आयुष्य खातो काळ तुम्हीं श्रीकृष्ण कां रे म्हणाना॥२॥
नरदेह पांचाचा आणिलासे उसना।
कांहीं तरी स्वहित करा व्यर्थ कां रे वल्गना॥३॥
श्रीकृष्ण दृढ धरशील तरी तुटेल यातना।
भ्रांति माया काढी नको पडुं बंधना ॥४॥
वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणात ।
एका जनार्दनीं म्हणे जाई साधुदर्शना॥५॥
हेच तुकोबारायही त्यांच्या शब्दांतून सांगतात,
क्षणोक्षणी हा चि करावा विचार। तरावया पार भवसिंधु॥१॥
नाशिवंत देह जाणार सकळा। आयुष्य खातो काळ सावधान॥ध्रु.॥
संत समागमीं धरावी आवडी। करावी तांतडी परमार्थाची॥२॥
तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारें। नका डोळे धुरें भरूनि राहों॥३॥
एकनाथ आणि तुकाराम दोघांचेही म्हणणे आहे की, ह्या काळाच्या हातातून सहीसलामत सुटायचे असेल तर, संतसंगती हाच उपाय आहे. आजच्या काळात संतसंगत कुठून मिळेल? हा विचार करता विवेकाने अंती हेच कळून येते की, संतांनी मानवकल्याणासाठी निर्माण केलेले ग्रंथ हीच आजच्याकाळातील संतसंगत आहे.
त्यामुळे वरील दोन्ही अभंगात सांगितल्याप्रमाणे या जगाच्या मायाव्यवहाराच्या भ्रमात राहू नका भौतिक सुखांच्या धुराने डोळे व्याप्त होऊ देऊ नका त्यापेक्षा दृष्टी स्वच्छ होण्यासाठी जी ग्रंथरुपी सत्संगती आहे तिला जवळ करा. म्हणजेच काळ देहासी आला खाऊ हे नित्य भय असतानाही भ्रमात न राहाता शुद्ध ज्ञानाच्या आधारे आम्ही आनंदे नाचू गाऊ हे घडणे शक्य होईल अन्यथा असावधान राहिल्यास, मायाभ्रमात गुंतल्यास एकनाथांनी आणि तुकोबारायांनी बोलल्यानुसार आयुष्य खातो काळ घडणे आहेच आहे.
कारण..
कालो हि दुरतिक्रमः।
संकलन व टीप - अभिजीत काळे,