दुःख आल्यावर तुम्ही पण देवावर बोल ठेवता का? देवाला दोष देता का?
dukha aalyavar tumhi devavar bol thevata ka? devala dosh deta ka?
धर्मबंधुंनो! आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत,
त्या लक्षणाचे लोक आपल्याला १० मधून ७ सापडतील की ते थोडेसे काही दुःखले-खुपले की लगेच
देवाच्या नावाने खडे फोडतात. ‘देवाने आमच्यासोबत देवाने वाईट केले, आमचं काय चुकलं,
आमच्यावर अन्याय झाला.’ असे उद्गार चांगल्या श्रद्धावान् वासनिकांकडून, नामधारकांकडून
ऐकायला मिळतात. जाणिव असून, ज्ञान असून देवाच्या व्यवस्थेत कधीच अन्याय होत नाही. हे
ते सपशेल विसरतात. याच विषयावर आजचा हा लेख.
आमच्या गावात माझ्या घराशेजारी एक मुलगा राहत होता त्याचे नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि नाव घेणे बरोबर ही नाही म्हणून आपण त्याचे नाव तात्पुरते संपत असे ठेवू. मी चार वर्षापासून संपतला चांगला ओळखतो. वडिलांची छत्रछाया तर आधीच हरवलेली होती. आई कष्ट करून घर चालवत होती. संपत मात्र आपल्या भविष्याविषयी आणि घरातल्या परिस्थीतीविषयी बेफिकिर होता. वडिल गेल्यानंतर दोन महिण्यात त्याने शिक्षणाला तिलांजली दिली होती. दिवसभर इकडे तिकडे भटकणे, मिळेल ते काम करणे, आलेले पैसे उडवणे हीच त्याची दिनचर्या होती.
बऱ्याच वेळा तो आमच्या घरीही काही कामानिमित्त यायचा. मी घरात नसलो की, आई त्याच्याकडून सिलेंडर आणणे, बाजार आणणे इत्यादि कामे करून घ्यायची. व दहाची नोट त्याच्या हातावर टेकवायची. त्याची माझी ओळख झाली तेव्हा तो अठरा वर्षाचा होता आता तो बावीस वर्षाचा आहे. पण दुर्दैवाने बाविसाव्या वर्षी तो कॅन्सर या महा भयंकर आजाराने ग्रस्त आहे. मी काही दिवस काही कामानिमित्त बाहेर गावी होतो म्हणून मला त्याच्याविषयी काही समजलेले नव्हते. पण मी एकदा त्याच्या मित्राला विचारले,
‘‘गणेश! कारे संपत दिसत नाही?’’
तो म्हणाला, ‘‘तुम्हाला माहिती नाही का?’’
मी म्हणालो ‘‘नाही’’
‘‘सर! त्याला कॅन्सर झाला आहे, तो सध्या घरीच असतो घराबाहेर निघत नाही.’’ मला ऐकून फार वाईट वाटले. सायंकाळी मी त्याच्या घरी गेलो. घरात भयान शांतता होती. त्याची आई कुठेतरी बाहेर गेली होती. समोर खाटल्यावर पडलेला संपत दिसला पत्र्याच्या छतावर लटकलेल्या पंख्याकडे शून्य दृष्टीने पाहत होता. या गंजलेल्या पत्र्यांप्रमाणेच आपले जीवन जर्जर झाले आहे असा विचार तो करत असावा. मी घरात प्रवेश करतात त्याने माझ्याकडे पाहिले. चेहऱ्यावर जबरदस्तीचे हास्य आणत “सर या” म्हणून त्याने माझे स्वागत केले. आणि बसायला स्टूल दिला, मी स्टूलवर बसलो.
संपतची अवस्था खूप
वाईट होती. शरीराने शुष्क होत चाललेला संपत मनाने पूर्ण खचून गेला होता. मलाही बोलण्याची
सुरुवात कुठून करावी काही कळत नव्हते. संपतविषयी खूप वाईट वाटत होते. शेवटी शांतता
भंग करीत मी म्हणालो, ‘‘तुझ्या मित्राने मला तुझ्याविषयी सांगितले, खूप वाईट वाटलं म्हणून तुला पडताळण्यासाठी आलो आहे. तू लवकर बरा होशील काळजी करू
नकोस मी औषधीच्या खर्चासाठी तुझी मदत करेन.’’
यावर तो उपहासाने
हसत असल्यासारखा किंचित हसला आणि म्हणाला, “धन्यवाद सर! पण आपल्यालाही
माहीत आहे की, मी कधीच बरा होणार नाही. माझा आजार लास्ट
स्टेजला आहे. देवाने माझ्यासोबत खूप वाईट केले, इतक्या तरुण वयात
मला हा आजार दिला. मला तर वाटते या जगात देव नाहीच नाही, असता तर असा अन्याय माझ्यावर कसा झाला असता? देव असतो वगैरे हे सगळं खोटं आहे. ”
आता मात्र उपहासाने
हसण्याची पाळी माझी होती. त्याचे वाक्य ऐकून मी मुद्दाम उपहासाने हसलो. यावर तो डोळे
वटारून माझ्याकडे पाहू लागला व म्हणाला, “इथे माझी काय हालत
आहे आणि तुम्ही हसत आहात?”
“संपत गैरसमज नको करून घेऊ तुझ्या बोलण्याने मला हसू आले.”
“ यात हसण्यासारखे काय आहे सर? माझे म्हणणे खोटे आहे का?”
मी म्हणालो, “हो तुझे म्हणणे पूर्ण खोटे आहे देवाने तुझ्यावर
अजिबात अन्याय केलेला नाही ही संपूर्ण सृष्टी व्यवस्था परमेश्वराची आहे आणि परमेश्वर
कुणावर कधीही अन्याय करत नाही. हे सगळे आपल्या कर्माचे भोग असतात ते आपल्याला भोगावेच
लागतात. आणि ते कर्मभोग आपण भोगतो हा ही परमेश्वराचाच न्याय आहे.”
यावर संपत म्हणाला, “माफ करा सर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहात विचारवंत आहात पण याचा अर्थ
असे नाही की मी तुमचे काहीही ऐकून घेईन. मला तरुण वयात कॅन्सर झाला हा अन्याय नाही
का?”
मी म्हणालो, “अजिबात नाही तू जे कर्म केले आहेत त्याचेच
फळ कदाचित हा आजार म्हणून तू भोगतो आहेस. आणि.....”
“नाही सर मी असले काहीही केलेले नाही” मधेच माझ्या बोलण्याला
तोडत संपत म्हणाला.
मी म्हणालो “ठिक आहे तुला मान्य नसेल, पण तरीही मी माझ्या मतावर ठाम आहे. आणि संपत तू म्हणतो आहेस मी काहीच केले नाही, तर बाळा वाईट वाटून घेऊ नको, पण मी तुझ्या आयुष्यातली
एक घटना तुला आठवण करून देतो, संपत! तुला आठवते साधारण
साडे तीन-चार वर्षांपूर्वी आप्पा बळवंत चौकात तू फिरण्यासाठी आलेला होता, आणि मीही काही पुस्तके विकत घेण्यासाठी तिकडे आलेलो होतो. तेव्हा मला तू दिसलास, मी तुला हाक मारणार तेवढ्यात तू एका वृद्ध व्यक्तीची पिशवी हिसकावली आणि पळून गेला.
तू इतक्या जलद गतीने गर्दीत मिसळल्यास की तो म्हातारा माणूस हतबल होऊन पाहतच राहिला, तो काहीच करू शकला नाही. आठवले का?”
आता मात्र संपतचा चेहरा अजून निस्तेज झाला शरमेने मान खाली घालून पाहून म्हणाला
“हो सर आठवलं, ती माझी चुक होती, पण एवढ्याशा चुकीची एवढी मोठी शिक्षा का? ”
मी म्हणालो, “संपत अरे अजून मी पूर्ण गोष्ट तुला सांगितलेलीच
नाही. त्या दिवशी तु त्या पैशांची दारू पिलास, जुगारही खेळलास हे
मला तुझ्या मित्राने सांगितले होते. खरे आहे का?”
“हो सर हे खरे आहे”
आता ही सर्व तुझी
बाजू झाली आता त्या वृद्ध व्यक्तीची बाजू ऐक. तू पळून गेल्यानंतर ती वृद्ध व्यक्ती
पैसे आणि पिशवी गेली अक्षरशः रडायला लागली. दहा-पंधरा मिनिटे तो म्हातारा तिथेच बसून
होता. शेवटी मी पुस्तकांच्या दुकानातून बाहेर येऊन पाहिले, आणि इतका वेळ ही इथे का बसून आहेत म्हणुन विचारपुस केली? तेव्हा ते सद्गृहस्थ म्हणाले माझी बायको आजारी आहे तिला बीपीचा भयंकर त्रास आहेत
गोळ्या संपल्या आहेत मी गोळ्या आणण्यासाठी मेडिकल ला जात होतो तेवढ्यात एका भामट्याने
माझ्या हातातली पिशवी हिसकावली, त्यात तिच्या औषधी होत्या, पिशवीसोबत औषधेही गेली. आता माझ्याकडे पुन्हा
औषधे घेण्यासाठी पैसे नाहीत आणि औषध मिळाले नाही तर कदाचित बायको राहणार नाही.”
मी म्हणालो “आजोबा काळजी करू नका मी तुम्हाला औषधे
विकत घेऊन देत आणि घरीही सोडतो.” म्हणून आम्ही दोघे पुन्हा
मेडिकल मध्ये गेलो आणि औषधे घेऊन मी त्यांना घरी सोडले कृतज्ञता म्हणून त्यांनी आज
या म्हणून मला घरात येण्यासाठी म्हटले. मी आज गेलो त्यांनी त्यांच्या पत्नीला दोन तीन
आवाज दिले. पण काहीच प्रतिसाद आला नाही. मग तिला बेडवर झोपलेल्या पत्नीकडे गेले आणि
पाहिलं तर शरीर पूर्ण घामाने डबडबले होते, श्वास घेण्यासाठी
भयंकर त्रास होत होता, माझ्या लक्षात आले आजींचा बीपी वाढलेला
आहे.
मी लगेच अंबुलन्सला
कॉल केला आणि बोलावले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला नेले. डॉक्टरांनी भरती करून घेतले
पण तोपर्यंत आजीबाईंनी हा इहलोक सोडला होता. डॉक्टर म्हणाले थोड्या आधी आणले असते तर
बरे झाले असते. आणि यांना बीपीचा त्रास होता बीपी च्या गोळ्या वेळेवर का दिल्या नाहीत
वेळेवर गोळ्या दिल्या असत्या तर असे झाले नसते म्हणून डॉक्टर आजोबांवर रागावले. आजोबांचा
आता बांध फुटला व ती रडू लागले.
मी आजोबांकडून नंबर
घेऊन त्यांच्या मुलाला फोन केला तो मुंबईला जॉब करत होता त्याला बोलावून घेतले आणि
मी आजोबांचे सांत्वन करून घरी निघून आलो. तर मग संपत बाळा सांग आता यात त्या वृद्ध
माणसाची काय चूक होती? तू त्याचे पैसे हिसकावून
त्याच्यावर अन्याय केला नाहीस का? कदाचित त्या म्हातारीला
वेळेवर औषध मिळाले असते तर ती वाचली असती.”
पूर्ण घटना ऐकून पश्चातापाने
संपत ढसढसा रडू लागला “माझ्याकडून फार चुकले
मी हे काय करून बसलो?”
मी त्याला म्हटले, “संपत हा एवढा मोठा आजार आणि आपल्या जीवनात येणारे
दुःख हे सर्व आपल्या एकच कर्मामुळे मिळत नसते, तर अशी अनंत वाईट कर्मे आपण अनंत जन्मात करून ठेवलेली आहेत, त्या सर्व कर्मांचे भोग आपल्याला क्रमानुसार भोगवले जातात. ज्यांनी चांगले कर्म
केलेले आहेत ते सध्याच्या घडीला सुखी आहेत. ज्यांनी वाईट कर्म केलेली आहेत, ते दुःख भोगत आहेत ही परमेश्वराची
न्याय व्यवस्था आहे. परमेश्वर कधीही कोणाचे वाईट करत नाही. आपल्या कर्मांमुळेच आपण हे असले दुःख भोगतो.” माझे म्हणणे संपला
पटले होते.
पुढे तो म्हणाला, ‘‘सर
यावर काही उपाय असेल ना?’’
मी म्हणालो, “हो आहे परमेश्वराला अनन्यगतीने शरण जाणे हाच
यावर उपाय आहे.”
“सर मला काहीच कळत नाहीये तुम्हीच स्पष्टीकरण करून सांगा.”
मी म्हणालो, “तू जास्त काही करू नको फलटण तुला माहीतच आहे,
तिथे आमच्या महानुभाव पंथाचे महास्थान आहे, श्रीकृष्ण मंदिर बाबासाहेब
म्हणून विख्यात आहे. तिथे जाऊन तू सव्वा महिना रहा. तिथल्या देवस्थानाची
सेवा कर, चरणोदक घे, आणि प्रार्थना कर तिथे साधू बाबा तुला जो विधी सांगतील त्याप्रमाणे आचरण कर. फरक
पडला तर चांगलेच आहे, नाहीतर तसंही तुझ्याकडे दुसरा उपाय नाहीये, तुझी देवावर श्रद्धा नाही पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे! किंवा मग अहमदनगर जिल्ह्यात पारनेरच्या जवळ लोणी नावाचे गाव आहे
तिथेही आमच्या महानुभाव पंथाचे महास्थान आहे. तिथे अनेक लोकांचे आजार बरे होतात, तिथेही तु जाऊ शकतोस. पहा विचार कर”
“सर! मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही
माझे हितचिंतक आहात, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरूर करीन.”
एक दोन दिवसातच संपतने
फलटणला जाण्याची तयारी केली माझ्याकडून पूर्ण पत्ता लिहून घेतला. तिथे माझ्या ओळखीचे एक भिक्षुकबाबा होते, त्यांना फोन करून मी संपतबद्दल सांगितले. त्यांनीही ‘काळजी करू नका मी त्याला सांभाळून घेईन’ म्हणून
आश्वासन दिले.
सव्वा महिन्यापर्यंत
संपत तिथल्या संपूर्ण नियमांप्रमाणे राहिला आणि तुम्हा सर्वांना
आश्चर्य वाटेल की, त्याचा आजार बरा होत आला होता. चेहऱ्यावरही
तेज आले होते. कृश झालेले शरीर थोडे भरलेले दिसत होते. पहिल्या
आठ दिवसातच संपतने महानुभाव पंथाचा उपदेश घेतला होता. मी एक महिण्यांसी स्थान
करण्यासाठी फलठणला गेलो. संपतला भेटलो.
संपतला पाहून मला खूप
बरे वाटले न्यायी असून दयाळू परमेश्वराने संपतला बरे केले होते. आणि स्थानाजवळ गेल्यावर
मला ही भरून आले. कारण माझ्या शब्दामुळे संपत इथे आलेला होता, देवाने माझी ही लाज राखली होती. निघताना मी संपतला विचारले, “पुढे काय विचार आहे?”
संपत म्हणाला, “मी तर मरणारच होतो हा माझा पुनर्जन्म
झालेला आहे, हे आयुष्य मला देवाने दिले, मी हे संपूर्ण आयुष्य देवाच्या सेवेतच घालवण्याचे ठरवले आहे.”
पुढे एक दोन महिन्यातच संपत नाही महानुभाव पंथाचा संन्यास घेतला आणि “ तुझे तुलाच अर्पण” म्हणून हे जीवनपुष्प परमेश्वराच्या श्रीचरणी
अर्पण केले.
तर धर्म बंधुंनो!!
या घटनेचे कथेचे गोष्टीचे तात्पर्य हेच की आपल्या वाईट कर्मामुळे आपल्याला नाना प्रकारचे
महारोग आजार होतात त्याबद्दल देवाला दोष देणे हे फार चुकीचे आहे. म्हणून कधीही देवाला
दोष देऊ नका. उलट देवाला अनन्य गतीने शरण जा, कारण फक्त परमेश्वरच आपल्याला आपल्या कर्मभोगांपासून सोडवू शकतो. देवता सोडवू शकत
नाहीत.
दंडवत प्रणाम