कस्त्वं कोऽहं कुत आयातः (चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra sunskrit Subhashit knowledgepandit

कस्त्वं कोऽहं कुत आयातः (चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण 

(चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra  

कस्त्वं कोऽहं कुत आयातः 

का मे जननी को मे तातः।

इति परिभावय सर्वमसारं 

विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम् ।।

अर्थ :- तू कोण आहेस? मी कोण आहे? तू मी कुठून आलो (आणि कुठे जाणार)? माझी आई कोण? माझे वडील कोण? असा सर्व विचार करून लक्षात घे की संसार स्वप्नरूप व असार असून त्याचा त्याग करून जे सत्य आहे त्याचा विचार कर.

चिंतन...... श्रीमद्भागवताच्या ६व्या स्कंधात वृत्रासुर वध आख्यानात चित्रकेतू राजाचं उपाख्यान आलंय.. त्यात त्या राजाच्या दिवंगत मुलाच्या जीवाला नारद व अंगिरा ऋषि काही काळासाठी त्या देहात परत बोलावतात व सांगतात की तू एकदाच या तुझ्या पित्याला "बाबा"अशी हाक मारलीस की त्याचं समाधान होईल.. मग तू तुझ्या मार्गानं जा! तो पुत्र सांगतो.. हे केवळ या जन्मात माझे बाबा झालेत.. पण यापूर्वी अनेक जन्मात मी यांचा बाबा झालोय! आपल्या सर्वांची हीच स्थिति आहे. भारत सावित्री नावाच्या महाभारतीय स्तोत्रात व्यासमहर्षि सांगतात..

मातापितृसहस्राणि पुत्रदारशतानि च ।

जन्मांतरसहस्राणि यांति यास्यंति चापरे ।।

आतापर्यंत हजारो जन्म येऊन गेले व पुढेही जातील.. यात हजारो वेळा आपण कुणाचे तरी व कुणीतरी आपले आईबाप झालेत वा होतील..  तसंच शेकडो वेळा पुत्र कन्या पत्नी बहीण इ. झालेत वा होतील. गीतेतही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । आपल्याला पूर्वजन्मांची स्मृति व पुढील जन्मांचं पूर्वज्ञान नसल्यानं आपण केवळ याच जन्माचा विचार करतो व यात मिळालेल्या आईबाप, पुत्रकन्या, बहीण, भाऊ, पतिपत्नी इत्यादि नात्यांचा विचार करून हर्षशोक, आसक्ति विरक्ति, द्वेष वैर, प्रेम क्रोध इत्यादि भावनांच्या  आधारे त्यांच्याबद्दलचा हवंनको असा विचार मनात ठेवून वागतो.. त्यातूनच विविध कर्मांसाठी प्रवृत्त होऊन नवे हिशेब तयार करतो  व पुढच्या जन्मांची कर्मफलानुसार तरतूद करतो..

    हे सर्व करत असताना नेमकं भगवंतालाच विसरतो. आचार्य सांगतायत.. की प्रत्येकानं मनाशी विचार करावा. मी कोण आहे, तू कोण आहेस, माझे आईवडिल कोण आहेत, मी व माझ्या भोवती गोळा झालेला आप्तपरिचितांचा हा मेळा.. त्यातील प्रत्येक जण नेमके कुठून आले व हे आयुष्य संपल्यावर नक्की कुठे जाणार आहेत? हेच आईबाप व परिवारजन मला का मिळाले किंवा मीच यांच्याशी का जोडला गेलो? मी आणि हे सर्व इथे किति काळ आणि का म्हणून राहतील? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा खर्‍या अर्थानं..(आपल्या सोयीसवडीपुरता नव्हे!)  मूलगामी विचार केला तर लक्षात येईल की हे सर्वजण

"यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ।

समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः ।।

    या उपनिषद्वचनाप्रमाणेच दोन जीवांचा, दोन पदार्थांचा, जन्मलेल्या सर्व गोष्टींचा संयोगवियोग घडत असतो. वास्तविक हा नियम यच्चयावत् सर्व भूतमात्रांविषयीच आहे. पण गदिमांनी तो केवळ मनुष्यमात्रांविषयी गृहीत धरून भरताची समजूत घालताना रामांच्या मुखानं असा सांगितला.. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,। एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गाठ । क्षणिक तेवि आहे बाळा मेळ माणसांचा ।।

    याचप्रकारे आपण सर्वजण  कालप्रवाहाच्या एका बिंदूवर एकत्र आलेलो असून कालांतरानं त्याच प्रवाहाच्या दुसऱ्या एखाद्या बिंदूवर पुन्हा विलग होणार आहेत. आपल्या सुखदुःखादि गोष्टींची निमित्तं म्हणून ! यातलं कोणीही चिरकाल टिकणारं नाही. ना आपल्या संबंधानं वा स्वतंत्रपणे ! हे सर्व एखाद्या स्वप्नाप्रमाणेच आहे, असतं! स्वप्नाला जशी कुठे तरी सुरवात असते, काही काळ अस्तित्व असतं व कुठे तरी ते विरतं.. संपतं.. पण स्वप्नकालीन घटनांचे परिणाम नंतरही काही काळापर्यंत स्वप्न बघणार्‍याला भोगावे लागतात.. त्याच्या देहावागण्यावर वर उमटलेले ते परिणाम इतर संबंधितांनाही दिसतात.   तसेच हे सर्व संबंध काही कारणा प्रयोजना निमित्तानं जुळतात.. जडतात, काही काळ देवाणघेवाणीपुरते टिकतात.. राहतात व कारण, प्रयोजन, निमित्त संपलं की विरतात.. तुटतात. 

स्वप्नातल्या गोष्टींना, संबंधांना, भावभावनांना, कमवण्यागमवण्याला जशी जागृतीतल्या व्यवहारात काडीचीही किंमत नसते तसेच हे संबंध असतात. आपल्याला फक्त आपल्या जन्ममृत्यूतल्या अंतराच्या बद्दलच, त्यातल्या घटनांबद्दल, व्यक्तींबद्दलच अंशतः (तेही पूर्णतः नव्हेच!) ज्ञान असतं.  त्याला आपण आपलं जीवन म्हणतो. आपल्या जन्मावेळी उपस्थित असलेले इतर काहीबाही सांगतात म्हणून आपल्याला आपल्या जन्माची ऐकीव माहिती असते.. प्रत्यक्ष ज्ञान नसतं! आपला मृत्यु कुठे कधी कसा किति काळानंतर होणार हेही खरंतर निश्चितपणे ठाऊक नसतं..

    कुणी ज्योतिषी वा निष्णात वैद्य, डॉक्टर अंदाजानं सांगतात (तेही सारेवेळा तसंच तंतोतंत घडतं असं नव्हे!) म्हणून आपण त्यावर विसंबून राहतो व त्या क्षणापर्यंतच्या काळासाठी आवश्यक ती आपली व/वा संबंधितांची/अवलंबितांची काही व्यवस्था लावण्याचा उद्योग वा प्रयत्न करतो! जन्ममृत्यूचा प्रत्यक्ष क्षण आणि त्यांच्या लगतचा काही काळ.. जन्मानंतरचा तसंच मृत्युपूर्वीचा.. याबद्दलही आपणं खरं तर अज्ञानातच असतो! नेमकेपणानं आपल्याला काहीच न सांगता येण्या इतक्या घोर अज्ञानात असतो!

    आपल्याला केवळ आपला हा जो उपलब्ध देह आहे तेवढ्यापुरतंच कळत असतं.. तो आधी नव्हता वा नंतर नसेलही पण त्यावेळी मी होतो की नव्हतो? होतो तर कुठे होतो व नव्हतो तर कुठून आलो? मातेच्या उदरात जीवरूपानं प्रविष्ट होण्यापूर्वी मी कुठे होतो आणि जेव्हा हा देह ठेवून जायची वेळ येईल तेव्हा मी कुठे जाईन? जो आलो व जो जाणार त्या "मी"चं नेमकं स्वरूप काय? पंच महाभूतं ही माझ्या देहाची घटना आहे. ते या देहाचं material आहे पण "मी"चं स्वरूप, घटना, material काय? देहाचे सर्व भौतिक पदार्थांचे कमीअधिक अवयव, तुकडे, भाग करता येतात.. ते विभेद्य विभिन्न असतात... पण ज्याला "मी" म्हणतात त्याचे असे वेगवेगळे भाग तुकडे अवयव नसतात.. "मी" एकच असतो.. निरवयवच असतो. देह येतो जातो पण मी असतोच! देहाला लिंगगुणादि भेद असतो "मी" अभेद्य, अभिन्न, भेदातीत असतो..

    ब्रह्मविद्याज्ञान होताच मीपणा जातो. मी परमेश्वराचा दास आहे असा भाव येतो. मी जीव आहे, श्रीकृष्ण परमेश्वर आहे. अशी यथार्थ जाणीव होते. आणि त्यालाच जागृती अवस्था म्हणतात. जागृतीत आल्यावर जसं स्वप्न रहात नाही.. किंवा स्वप्न तुटतं म्हणूनच जाग येते तसंच या व्याहरारिक संसाराचं आहे... ज्ञाते तत्त्वे कः संसारः? गीता म्हणूनच सांगते..

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।

यस्यां जागृति भूतानां सा निशा पश्यतो मुनेः ।।

    आचार्य आपल्याला जागृत करतात.. स्वप्नं कितीही चांगली, आवडणारी, रंजक असली आवडली वा भयप्रद, कंटाळवाणी, नीरस असली टाळवाशी वाटली तरीही ती मूलतः स्वप्नंच आहेत हे लक्षात घे व जागा हो.. तसंच हा संसार, त्यातील वस्तु पदार्थ घटना व्यक्ति कितीही प्रिय प्रिय हव्या, नकोशा वाटल्या तरी त्या स्वप्नतुल्यच आहेत. पाहता पाहता सुखाचा काळ नष्ट होऊन दुःखाचा काळ येतो. आणि तो काळ अनंत वाटतो. म्हणून त्या संसारात रमू नकोस, गुंतू नकोस आणि परम सत्य जे परब्रह्म.. श्रीगोविंद, माधव, श्रीकृष्ण श्रीचक्रपाणि, श्रीचक्रधरप्रभु, श्रीदत्तात्रेय महाराज त्यादि नामांनी पाच रूपांनी प्रकट झालेला परमेश्वर त्यांचं भजन कर ... तेच तुझ्या परम हिताचं आहे...

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post