संस्कृत सुभाषित रसग्रहण
(चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra
सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्त शरीरे रोगः।
यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुंचति पापाचरणम् ।।
अर्थ.. पुरुष स्त्रीदेहाचा (उलट पक्षीं स्त्रियाही पुरुषदेहाचा) स्वसुखासाठी यथेच्छ भोग घेतात पण, अरेरे !! नंतर त्या
देहातच रोग शिरतात! जरी या लोकी मरण
हाच शेवटचा आसरा आहे.. गन्तव्यस्थान आहे..
मरण निश्चित आहे, तरीही माणसं पापाचरण
काही सोडत नाहीत!
चिंतन :- शरीरं व्याधिमंदिरम् असं म्हटलं जातं..
म्हणजे हे शरीर अनेक व्याधींचे, रोगांचे मंदिर. आहे. कोणत्याही विषयाचा अकाली, अस्थानी, क्षमतेचा विचार न करता.. अतिरेकी, अनैसर्गिक, अनिर्बंध भोग घेतला की तो शरीरात व्याधीच निर्माण करणार व्याधी निर्माण करणारच !! आजकाल भस्मासुरासारखा पसरलेला एड्स् सारखा रोग याचं सर्वात ठळक
उदाहरण म्हणून घ्यायला हरकत नाही!
अपेक्षित
भोग, भोगक्षमता असूनही
अपेक्षित वेळी न मिळाला वा भोगक्षमता नसल्यामुळे भोगता आला नाही तर त्यातून मानसिक
विकृति,
आजार आधीही निर्माण होणार! भोगे रोगभयम् असं जे म्हटलंय ते त्यामुळेच! काही भोग वय अवस्थेनुसारच भोगावे
लागतात! आणि त्यातूनही
आधिव्याधि जडू शकतात.
माणसाला, स्त्रीपुरुषांना... सर्वात अधिक आकर्षण ज्या भोगाबद्दल असतं तो
म्हणजे.. शृंगारोत्पन्न देहभोग! त्यासाठीही जी काही वयाची निम्नतम व उच्चतम मर्यादा आणि भोगार्थ स्थलकालस्थितिगतिपद्धती
इत्यादि विषयक नीति धर्मशास्त्रानं व वैद्यकशास्त्रानं घालून दिली आहे ती मानवता टिकावी.. देहाचं आरोग्य टिकावं
आणि पशुतेवर नियंत्रण रहावं याच उद्देशानं!
पण ज्यांना
धर्म,
न्याय, नीति यांबद्दल
काहीच विधि - निषेध नाही ते स्त्रीपुरुष
स्वैरपणे पशुपक्ष्यांच्या
पातळीवर जाऊन देहभोग घेतात आणि देहातली भोगक्षमता संपली की विविध रोगांना बळी पडून
शेवटी मरून जातात. ही भोगलालसा इतकी
टोकाला पोहोचते की त्यातून व्यसनाधीनता, कलह,
निर्दयपणे, क्रूरपणे अमानुष
हत्या, मारामार्या, कौटुंबिक अशांति, सामाजिक अस्वास्थ्य इत्यादि निर्माण होऊन राष्ट्रच रसातळाला जाईल की काय अशी भीती
निर्माण होते.
जगाच्या
पाठीवरून काही संस्कृति या एका सुखभोगाच्या अतिरेकापायी नष्ट नामशेष झाल्याचा इतिहासही
वाचायला मिळतो! कामातुराणां
न भयं न लज्जा. या न्यायानं कुत्र्यामांजरांसारखा
नंगानाच सुरु होतो. हे वासनांध लहान मुलंमुली व वृद्धांना सुद्धा आपली शिकार बनवून त्यांना आयुष्यातून
उठवतातच पण स्वतःच्याही आयुष्याची माती करून घेतात...
स्वतंत्र
भारताच्या राज्यघटनेनं दिलेली विविध मूलभूत स्वातंत्र्ये केवळ या एका देहसुखासाठीच
दिलेली आहेत की काय असा प्रश्न पडावा इतक्या स्वैरपणे ललित वाङ्मय, चित्रपट, दूरदर्शनवरील धारावाहिक
मालिका,
नाटकं माणसाची पातळी नीचतम पातळीवर आणून ठेवत असल्याचं दिसतं! आजकाल तर तसल्या
भोगांचा सुळसुळाट झालाय.
माणसाची सहज प्रवृत्ति दृश्यातच अडकण्याची असल्यानं व विशेषतः
बाल्यावस्थेतयौवनावस्थेत त्याचा मनावर विशेष प्रभाव पडत असल्यानं नको त्या वयात नको
ती दृश्ये डोळ्यांसमोर आली की त्यांचा साधकबाधक वा सत्यासत्यतेचा विचार न करता मुलं
त्याचं आंधळं अनुकरण करण्यामागे लागतात. यातूनच पुढे गुन्हेगारी अपराधी प्रवृत्तीकडे ही पिढी वळते हेही आजकाल उघड होणारं
नग्नसत्य आहे.
त्यात पुन्हा
पाश्चिमात्य जगतातील permissive societyच्या प्रभावामुळे दिवसातून अनेकवार आपल्या मर्जी आवडीप्रमाणे कपडे बदलावेत इतक्या
सहजतेनं शृंगारक्रीडेतील सहचर, भागीदार बदलण्याच्या
वाढत्या प्रवृत्तीमुळे आणि नंतरची जबाबदारी टाळण्याच्या वाढत्या
प्रवृत्तीमुळे निर्बीज शृंगाराकडे जरी कल वाढला असला तरी निसर्ग माणसांच्या नकळत हूल
देतो, त्यांना चकवतो..
कठोरपणे
त्यांच्या अविचाराचं माप त्यांच्या पदरात टाकतो आणि मग संकरज, अवांछित, अनौरस इत्यादि
प्रकारची प्रजा निर्माण होते, जी समाज व राष्ट्राच्या
हिताला बाधक ठरू शकते! संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च । हे अर्जुनानं गीतेत नोंदवलेलं निरीक्षणही
या संदर्भात महत्त्वाचं ठरतं!
समाजात
अनाथ बालकसंगोपन केंद्रे व वृद्धाश्रम यांची संख्या वाढण्याच्या कारणांपैकी ही प्रवृत्तीही
एक मुख्य कारण आहे... निरोगी, सुदृढ, निकोप, स्वस्थ समाजाला
व राष्ट्राला ते भूषणावह नसलं तरी! माणसाच्या ठिकाणची ही भोगलालसा राष्ट्राराष्ट्रातील सत्तासंघर्षात फितुरीचं, हेरगिरीचं एक प्रबळ साधन बनून राष्ट्राचं स्वातंत्र्य.. सार्वभौमत्वही
धोक्यात आणतात हाही आतापर्यंतचा इतिहास सर्वज्ञात, सर्वश्रुत आहेच! ही दारेषणाच माणसाला
त्याला अपेक्षित नित्य हितावह असलेल्या संयमित व सुखानंदी जीवनपद्धतीपासून दूर नेते..
जीवनाच्या
चरमसाध्याचा विचार करण्यापासून परावृत्त करते. विविध कर्माकर्मविकर्मांच्या चिखलात रुतवून ठेवते. अधर्माचरणाकडे खेचून नेते. जन्ममरणाच्या चक्रात भरकटायला लावते व खर्या निर्भेळ नित्य
सुखाचं दर्शन दूरच पण दुःखाग्नीत होरपळवते! या संदर्भात
न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति ।
हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ।।
आणि
मात्रा स्वस्रा दुहित्रा वा नैकशय्यासनो/नाविविक्तासनो भवेत्।
बलवानिंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति।।
या श्रीमद्भागवतमहापुराणाच्या ९ व्या स्कंधातील.. ययाति वचनाचं जणु सर्वांनाच विस्मरण झालंय की काय असं वाटण्याच्या या परिस्थितीत जर समाजस्वास्थ्य.. सामाजिक ऐक्य.. राष्ट्रीय हित टिकवायचं असेल तर आचार्यांनी नमूद केलेली वस्तुस्थिति डोळ्यांआड करून चालणार नाही!
मरणं प्रकृतिः शरीरिणाम् ..
मरणं शरणम्..अद्य वाब्दशतांते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः..
हे लक्षात
ठेवून सुखतः क्रियते रामाभोगः याला मर्यादा घालता येईल का याचा विचार व्हायला हवा! त्या दृष्टीनं सनातन वैदिक धर्मातील "पातिव्रत्य व एकपत्नीत्व" एतद्विषयक आचारमर्यादा या "धन्यो गृहस्थाश्रमः"
असं निश्चितच वाटायला लावू शकतात! पण यासाठी कुटुंबसंस्था, विवाहसंस्कार, बालसंगोपन यांच्याशी जवळून व घट्टपणे संबंधित असलेला जो देहसुखभोग
त्याचा धर्माच्या कर्तव्याच्या विशेषतः देहारोग्याच्या आणि अंतिम प्राप्तव्याच्या अंगांनी विचार व्हायला
हवा व पापाचरणापासून परावृत्त होऊन जेवढ्यास तेवढाच तो विषय भोगून उर्वरित काळ ईशचिंतनातच
व्यतीत व्हायला हवा या उद्देशानं आचार्य वारंवार सांगतात..
भज गोविंदम् ।
----------