संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit
लोभ म्हणजे काय?
लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकै:।
सत्यं चेत्तपसा च किं शुचिमनो यद्यस्ति तीर्थेन किम्।
सौजन्यं यदि किं गुणै: सुमहिमा यद्यस्ति किं मन्डनै:।
सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना ॥
अर्थ :- चित्तात लोभ असेल तर अन्य अवगुणांची.. दुर्गुणांची काय आवश्यकता? अंगी नीचपणा, चहाडखोरी किंवा दुसर्याचे दुर्गुण तिसर्याच्या
मनात भरवून वैर निर्माण करण्याची वृत्ती असेल तर अन्य पापांची गरजच काय? सत्याला धरून चालण्यावागण्याचा संकल्प असेल तर वेगळं तप कशाला करायचं?
मन जर शुद्ध,पवित्र असेल तर अन्य तीर्थांना भेटी
कशाला देत रहायचं? सौजन्य हा एक गुण जर अंगी असला तर इतर
सद्गुणांचं काय प्रयोजन? ज्याला सत्कीर्ति, महत्ता मिळाली त्याला अन्य आभूषण अलंकार काय
करायचेत? सद्विद्येची प्राप्ति झाली असेल तर वेगळं
धन मिळवून काय करायचंय आणि जर प्रत्येक बाबतीत अपयशच येत असेल तर त्यासारखं दुसरं मरण
तरी कोणतं?
चिंतन :- या सुभाषितात संपूर्ण जीवन सुखानं आनंदानं सदैव भरून रहावं व दुःख कधीच वाट्याला
येऊ नये यासाठी अंगी बाणवावेत असे सद्गुण व ज्यांचा प्रयत्नपूर्वक त्याग अत्यावश्यक
आहे असे दुर्गुण सुभाषितकारांनी सांगितले आहेत! सत्य,
विशुद्ध मन, सौजन्य, सत्कीर्ति आणि सद्विद्या हे सद्गुण व लोभ, पैशून्य आणि अपयश
हे दुर्गुण यांची चर्चा चिंतन या निमित्तानं करणं इष्ट ठरेल.
तप, तीर्थयात्रा, लौकिक पारमार्थिक सौख्यार्थ आवश्यक गुण, देहामनाची आभूषणं, अलंकार, दागिने, धन यांची सुखमूलकता
व दुर्गुण, पापं, मरण यांची दुःखमूलकता
यांचा तपशीलवार विचार करता आला की आदर्श जीवन जगण्याचा मार्ग सुस्पष्ट होईल! सद्गुण शिकावे लागतात कष्टानं.. बुद्धिपुरस्सर
अंगी बाणवावे लागतात..त्यातून व्यक्तिविकास, समाजाचा.. राष्ट्राचा
उत्कर्ष होऊ शकतो.. होतो !
शांति, समाधान, आनंद, समृद्धि, समानता, बंधुत्व, सामंजस्य
इत्यादींचा लाभ होतो. जीवनात धन्यता मिळते! पण दुर्गुण सहज येऊन चिकटतात, शिकायला कष्ट पडत नाहीत
उलट घालवायला शिकस्तीचे कष्ट प्रयत्न करावे लागतात. दुर्गुणांनी व्यक्ति, समाज व राष्ट्र या तिघांचा र्हास होतो. सर्वत्र अशांति, वैर द्वेष, ईर्ष्या, मत्सर इत्यादि पसरून व्यक्ति समाज व राष्ट्र या तिघांचा विनाश होतो!
सुभाषितात आलेल्या
क्रमानंच सर्वांचा विचार करता प्रथम क्रमांकावर लोभ आलेला दिसतो त्याचा प्रथम विचार करू या! लोभो
मूलमनर्थानाम् ।असं एक वचन आहे. सर्व अनर्थांचं मूळ केवळ लोभ हा दुर्गुण आहे.. जे मिळालंय त्याबद्दलच्या असमाधानातून, असंतुष्टतेतून हा जन्माला येतो. किति मिळवलं असता
पुरेसं होईल याचं वा जीवनात काय किति लागतं.. आवश्यक असतं याचं अज्ञानही या लोभाच्या
बुडात असतं!
अधिक मिळवण्यासाठी
सन्मार्ग उपयुक्त ठरला नाही तर किंवा तो उपयोगी नाहीच या भक्कम धारणेतून.. लोभ माणसाला
दुष्कर्मासाठी, पापाचरणासाठी प्रवृत्त करतो.. कधी त्यासाठी
सक्तीही करतो! लोभानं आंधळा झालेला अविवेकाला बळी पडून..
समोर कोण आहे याचा विचार न करता, त्याची तमा, पर्वा न बाळगता..
निष्ठुरपणे, क्रूरपणे कोणत्याही थराला जाऊन पापकर्मांना प्रवृत्त होत राहतो! चोरी,
मारामारी, लूट लुबाडणूक, खून हत्या, भ्रष्टाचार, अपव्यवहार, अपहार, बलात्कार इत्यादि सर्व पापं करायला सिद्ध असतो! लोभ हाच पापाचा बाप असतो. पण लोभाचं मूळ कामात व कामाचं मूळ देहोऽहं
या अज्ञानरूप धारणेत आहे.
वस्तुतः जड देह व
चैतन्ययुक्त जीव यांचा संगमच असंभव! पण चैतन्य जडाच्या
आश्रयाविना राहू शकत नाही व जडाला चैतन्यावाचून स्वतंत्र विचारशक्तीच नाही. चैतन्यच जडाला अहं या जाणिवेनं बांधून कर्तृत्व भोक्तृत्वादि अहंकार देतं व त्यातूनच
विविध विषयांच्या संगातून काम निर्माण होतो. काम हवा.. तेव्हा, हवा.. तसा, हवा.. तितका पुरवला गेला की खरं तर तो संपायला हवा!
पण तो संपत तर नाहीच
उलट वाढत जातो! हविषा कृष्णवर्त्मेव भूय
एवाभिवर्धते। यज्ञकुंडात जितक्या जितक्या म्हणून घृत
तिलादींच्या आहुती द्याव्यात तितका तो जसा वाढतच जातो
तसा काम विषयपुरवठ्यानं, विषयभोगांनी कधीच
संपत नाही!
न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति। उलट तो पुरवावा तेवढा अधिक कामासाठी लोभ वाढत जाऊन त्याच्या पूर्तीसाठी मनुष्य पापालाही प्रवृत्त होतो! असा जर लोभ चित्तात ठाण मांडून बसलेला असेल तर पापप्रवृत्तिजनक अन्य अगुणांची, दुर्गुणांची आवश्यकताच काय? इथं अगुण शब्द वापरलाय.. गुणस्य अभावः अगुणः। गुणाचा अभाव म्हणजे अगुण.
पण तो दुर्गुणाला
जितक्या सहज प्रवेश व स्थान देऊ शकतो तितक्या सहजपणे सद्गुणाला प्रवेश व स्थान देत
नाही! त्यामुळे अगुणाला No man's land हा दर्जा देता येत नाही व दुर्लक्षिताही येत नाही! त्याचा कल दुर्गुणाकडेच अधिक झुकलेला असतो!
एकटा लोभ सर्वविनाशाला कारणीभूत ठरू शकतो! नरकाच्या तीन द्वारांपैकी लोभ हे तिसरं
सर्वात मोठ्या अनर्थाला प्रवेश देणारं द्वार आहे... त्याला निष्ठुरपणे हाकललाच पाहिजे!
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
कामः क्रोधस्तथा लोभस्तमादेतत्त्रयं त्यजेत् ।।
भगवद्गीता अ.१६
श्री. श्रीपादजी केळकर (कल्याण)