मराठी बोधकथा -
धन साचवून ठेवल्याने कमी होते, दान केल्याने धन वाढते
आपण आयुष्यामध्ये कितीही जरी कमविले तरी मृत्यु सारें हिरावून घेईलच. कितीही पकडून ठेवा एक दिवस ते सोडून द्यावच लागेल. सारे सुटले जाईलच तरीदेखील आपण परमात्म्याच्या मार्गाबाबत जिथे सारे मिळणार आहे अन् खास काही सोडावे लागणार नाही तिथेदेखील धाडस करू शकत नाही. आमच्या बुद्धिचे दुबळेपण विलक्षण आहे.
खेई-गोईने सगळे सोडले तर सारे मिळवले. सारे सोडणारेच सार मिळवतात. कणभरही वाचवले तरी तितकीच अडचण ठरेल. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे. एक भिकारी आपल्या घरून निघाला. भीक मागायला. पौर्णिमेचा दिवस होता. कोणता एक धर्मोत्सव होता. त्याला खूप आशा होती की आज खूप काही मिळेल.
भिकारी जसे करतात तसे त्याने घरून निघताना आपल्या झोळीत थोडेसे तांदूळ टाकून घेतले होते. जेव्हा भिकारी भिक मागायला निघतो तेव्हा आपल्या थाळीत थोडेसे पैसे स्वतःच टाकून ठेवतो. त्यामुळे देणाऱ्याला सोयीच होतं । झोळी अगदीच रिकामी असली तर कुणी टाकायला तयार नाही होत. थोडी भरलेली असली तर कुणी काही टाकायला तयार होतं. माणूस भिकाऱ्याला थोडंच काही देतो. आपल्या प्रतिष्ठेसाठी देतो आपल्या अहंकारासाठी देतो!
भिकारी रस्त्यावर आला तो तर चकीतच झाला त्याने पाहिले की सम्राटाचा रथ येतो आहे. एरवी सम्राटाच्या द्वारातून त्याला हाकलून देण्यात येई. सम्राटासमोर झोळी पसरण्याचं भाग्य तर त्याला कधीच लाभलं नव्हतं. त्याला वाटलं आज नशीब जोरावर आहे. आज तर मी भरून जाईल आता बहुतेक भीक मागण्याची गरज भासणार नाही. रथ धूळ उडवत त्याच्याजवळ येऊन धडकला. सम्राट रथातून खाली उतरला तेव्हा तर भिकारी किंकर्तव्यविमूढच झाला. त्याला उमगलच नाही की आता काय करू. तो विसरूनच गेला की झोळी पुढे करावी.
क्षणभर थबकलाच. त्यानं काही करण्यापूर्वीच सम्राटानं आपली झोळी त्याच्यासमोर पसरली ! अन् सम्राट म्हणाला क्षमा कर! ज्योतिषांनी सांगितले आहे की आज सकाळी सकाळी मी रथाबाहेर पडावं अन् जो पहिला माणूस भेटेल त्याला भीक मागावी तर राज्यावर येणारं एक संकट टळू शकेल, नाही तर हे राज्य महासंकटात पडेल. तूच पहिला माणूस आहेस. तू भिकारी आहेस हे मला दिसत आहे. तुझी झोळीचं सार सांगते आहे. तू नेहमी मागितले आहे. कधीही दिलेलं नाहीये हे देखील मला माहीत आहे. देणं तुला अवघड जाईल. पण आज तुला हे करावंच लागेल. कारण साऱ्या साम्राज्याचा प्रश्न आहे. नकार देऊ नकोस काहीही दे. जे काही द्यायच ते दे. एक तांदूळ दिलास तरीदेखील चालेल.
भिकाऱ्याने आपल्या झोळीत हात घातला त्यानं कधी दिलं नव्हतं द्यायची तर त्याला सवयच नव्हती. द्यायचा संस्कारच नव्हता. त्यानं फक्त मागितलं ! तो जन्मोजन्मीचा भिकारी होता. त्यानं मूठ बांधली आन सोडली. बांधली आन सोडली. धाडसच होईना सम्राट म्हणाला मुहूर्त टळून चालला आहे तू नकार तर देणार नाहीस ना? बघ नकार देऊ नकोस तेव्हा त्यानं खूप धाडस करून एक तांदूळ सम्राटाच्या झोळीत टाकला. सम्राट रथात चढला अन् तो सुवर्ण रथ धूळ उडवत निघून गेला. भिकारी धुळीत माखून उभा राहिला. अन् विचार करू लागला की कमाल झाली कधी नव्हे तो सम्राट भेटला. मागण्याची संधी आली होती तीदेखील हुकली. काही मिळालं नाही ते जाऊ दे. पण माझ्या कडचाच एक तांदूळ गेला.
त्या दिवशी दिवसभर त्याला खूप दान मिळालं पण तो एक तांदूळ त्याला दिवसभर खटकत राहिला. असंच माणसाचं मन आहे. जे मिळतं त्याची आपण फिकीर करत नाही अन् जे मिळालं वा जे हरवून गेलं त्याची काळजी करत बसतो. आपला एक पैसा पडला तर दिवसभर आपल्याला त्याची आठवण येत राहते. कधी आपला एक दात तुटतो तेव्हा जीभ पुन्हा पुन्हा तिथे जाते. होता तेव्हा कधी जीभ तेथे गेली नव्हती. आज तुटला तर पुन्हा पुन्हा तेथेच जाते आहे. जे दात आहेत तेथे नाही जात. जे नाहीत तेथेच जाते असं माणसाचं मन आहे.
त्यानं दिवसभर मागितलं. मिळालंही खूप. इतकं कधी मिळालं नव्हतं. पण त्यात त्याला कुठलं स्वारस्य नव्हतं. त्याला वारंवार तीच सकाळची गोष्ट आठवायची. आपल्या जवळचा एक तांदूळ द्यावा लागला. मागण्याची संधी कधी नव्हे ती मिळाली अन् तीदेखील गेली. उलट आपल्या जवळचच काही गेलं उदासवाणा होऊन घरी संध्याकाळी परतला तेव्हा बायको तर खूप आनंदली. त्याची झोळी कधी इतकी भरली नव्हती. काठोकाठ भरली होती. बायको तर खूप आनंदली. खूष झाली. ती म्हणाली आपण खूप भाग्यवान आहात आज तर आपल्याला खूप मिळालं.
तो म्हणाला राहूदे. तुला काय ठाऊक की आज आम्ही किती घालवलं आहे ते! एकतर सम्राटाकडून सारं काही मागून घेतलं असतं ते गेलं. त्यानं सारी हकीकत सांगितली अन् माझ्या जवळचा एक तांदूळ गेला. उदास मनान त्यानं झोळी ओतली. अन् दोघं थक्क झाले. त्या तांदळामध्ये एक तांदूळ सोन्याचा बनून गेला होता. तेव्हा तो उर बडवून रडू लागला की ही खूप मोठी चूक झाली. जर सारेच तांदूळ मी सम्राटाच्या झोळीत टाकले असते, तर सारे तांदूळ सोन्याचे बनून गेले असते.
ही कविता गोड आहे अन् खूप सूचक आहे. जितकं आपण दान देतो तितकं सोन बनून जातं. जितकं आपण थोपवून धरतो तितकं माती बनून जातं. जो जितकं दान देईल तितका सोन्याचा होत जाईल.