भगवद्गीता किञ्चिदधीता (चर्पट पंजरिका स्तोत्रम्) मराठी श्लोकार्थ Charpat Panjarika Stotra knowledgepandit

भगवद्गीता किञ्चिदधीता (चर्पट पंजरिका स्तोत्रम्) मराठी श्लोकार्थ Charpat Panjarika Stotra knowledgepandit

संस्कृत सुभाषित रसग्रहण - मराठी श्लोकार्थ

(चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra 

भगवद्गीता किञ्चिदधीता गंगाजललवकणिका पीता ।

येनाकारि मुरारिसमर्चा तस्य यम: किं कुरुते चर्चाम् ।।

अर्थ- ज्यानं भगवद्गीतेचं किंचित् का होईना अध्ययन केलंय, ज्यानं गंगाजलाचा एखादाच थेंब का होईना प्यायलाय, ज्यानं एकदा तरी भगवान् मुरारींची नीट पूजा अर्चा केलीय त्याच्या संबंधी यम काय मृत्युचर्चा  करू शकणार? (सुतराम्‌ अशक्यच!)

चिंतन :- माणसाला सर्वसामान्यतः सर्वात मोठं भय कोणतं असेल तर ते मृत्यूचं! ते घालवण्यासाठीचे उपाय सांगताना आचार्यांनी वरील प्रकारे अर्थवादात्मक विधान केलंय. एकदा जरी.. थोडंसं जरी श्रीमद्भगवद्गीतेचं अध्ययन केलं असलं तरी त्या माणसाला मरणाचं भय उरणार नाही! एखादा जरी गंगाजलाचा थेंब जिभेवर पडून पोटात गेला तरी तो मृत्युभयापासून मुक्त होतो!

    भगवान मुरारींची एकदा जरी मनोभावे पूजाअर्चा केली असली तरी त्याला मृत्यु स्पर्शू शकणार नाही. वरील गोष्टींचा असा अर्थ नाही की माणसानं गीतेचा अल्पसाच अभ्यास करावा किंवा थेंबभरच गंगाजल प्यावं किंवा एकदाच केव्हा तरी भगवान मुरारीची पूजा अर्चा करावी. आचार्यांनी त्या त्या गोष्टींच्या सामर्थ्याची केवळ चुणुक दाखवण्यासाठीच किंवा मधाचं बोट चाटवून तिकडे सर्वांची प्रवृत्ति वळवावी या हेतूनच तसा उल्लेख केलाय.

    साक्षात भगवंतांच्या मुखातून... शास्त्रवेत्ता असलेल्या पण आप्तेष्ट, गुरुजन, स्वजन इत्यादींविषयी  मोहग्रस्त झालेल्या.. किंकर्तव्यमूढ झालेल्या.. कर्तव्यपराङ्मुख झालेल्या.. आत्मविस्मृतीच्या गर्तेत कोसळलेल्या अर्जुनाला युद्धरूप स्वकर्तव्याला प्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली गेली..

    त्यानिमित्ताने कर्म ज्ञान भक्ती व वैराग्याचं खरं स्वरूप ध्यानात आणून दिलं आणि प्रारंभी "न योत्स्ये" असं म्हणून "तूष्णीं स्थित" असलेल्या अर्जुनाच्या तोंडून शेवटी "नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा.. स्थितोऽस्मि गतसंदेहः" अशी स्वीकृति आणि "करिष्ये वचनं तव" अशी प्रतिज्ञाही वदवून घेतली! अशा.. सर्व उपनिषद्रूपी गायींचं गीतामृतरूपी दूध साक्षात भगवंतानी दोहून अर्जुनासारख्या सर्वच वत्सांना उपलब्ध करून दिलं..

    सामान्य दुधाचं अतिरेकी प्रमाणात प्राशन केलं तर शरीरारोग्य बिघडू शकेल पण श्रद्धा भक्ति निष्ठायुक्त अंतःकरणानं गीतामृतरूप दूध कितीही प्राशन केलं तरी अनारोग्य येणार तर नाहीच उलट तन मन बुद्धि विचार वासना शुद्ध होऊन जीवाला परमार्थमार्गावर पाऊल ठेवायची बुद्धि होईल व पुढेपुढे चालत राहण्याचं बळही मिळेल.

    इथे भगवद्गीता लीळाचरित्र सुत्रपाठ इ. सद्ग्रंथसुद्धा वाचनात, श्रवण पठणात, मनन निदिध्यासनादिकात समाविष्ट करावेत.. विचारात ठेवावेत असंही गृहीत धरायला हरकत नाही. गंगाजलाची पवित्रता.. श्रद्धा असेल तर घरात उपलब्ध असलेल्या पाण्यातही उतरवता येईल.. 

    मन चंगा तो काठवद में गंगा या न्यायानं.. हिमालयात उगम पावून बंगालच्या उपसागरात विलीन होणारी गंगा.. घरातल्या स्नानगृहातील पाण्यातही उतरवता येईल. गंगेचं पावित्र्य कृष्णा गोदा कावेरी नर्मदांमधे आहेच.. इतकंच काय.. ते जवळच्या ओढ्या ओहोळातल्या पाण्यातही आणता येईल.. जर मनही तितकंच पवित्र व शुद्ध असेल तर! भगवंताच्या कोणत्याही मूर्तीची पूजा उपलब्ध उपचार सामग्रीनं केली तरी त्यातून सुख, समाधान व आनंद मिळू शकेल..

    जर आपली भक्ति, श्रद्धा तितकीच प्रबळ असेल व नाचरी नसेल तर! पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति असं म्हणणारे भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय कसे राहतील? म्हणूनच वाराणसीत गंगाकाठी "डुकृञ् करणे" असा व्याकरण सूत्राचा पाठ घोकणार्‍या वृद्ध ब्राह्मणाला आचार्य आचार विचार शुद्धीचा मार्ग दाखवताना सांगतात ..

भगवद्गीता किंचिदधीता.. आणि शेवटी सांगतात भज गोविंदम् !

---------

 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post