बोधकथा
अहंकाराचा वारा संसारी भ्रमवी गरगरा -
bodhkatha knowledgepandit
एक संत आपल्या शिष्यासह
जंगलातून जात होते. समोर एक दरी लागली. दरीजवळ उतारावरून जाताना अचानक शिष्याचा पाय घसरला आणि तो दरी कोसळून जाऊ लागला. पण भगवंताच्या कृपेने एक बांबूचे झाड त्याच्या हाताला लागले त्याने ते पकडले.
आणि तो दरीत पडण्यापासून वाचला. मरणाच्या दारातून परत आला.
तो त्या बांबुला लटकलेला होता. त्याच्या वजनामुळे बांबू धनुष्यासारखा वाकलेला होता. पण ते झाड जमिनीतून उपटले नाही आणि मधून मोडलेही नाही. तो बांबू घट्ट धरून लटकत राहिला. थोड्या वेळाने त्यांचे गुरू आले. त्यांनी हाताचा आधार घेऊन शिष्याला वर खेचले. शिष्य भेदरल्या अवस्थेत तिथे थोडा वेळ बसून होता. गुरुने त्याला जवळील जलकुपिकेचे पाणी पिण्यासाठी दिले. नंतर दोघे इच्छीत स्थळी जाण्यासाठी पुढे निघाले. वाटेत संत शिष्याला म्हणाले - ‘‘वत्स ! तुझा जीव वाचवणाऱ्या त्या बांबुने तुला काही सांगितले ते तु ऐकले का?’’
शिष्य आश्चर्यचकीत होऊन म्हणाला - ‘‘नाही, गुरुवर,
कदाचित माझे प्राण संकटात होते म्हणून मी लक्ष
दिले नाही आणि मला वनस्पती आणि झाडांची भाषा देखील येत नाही. ते बांबुचे झाड
काय म्हणत होते? हे कृपया आपणच सांगा?’’ म्हणून शिष्याने गुरुला विनंती केली.
गुरू किंचित् हसले
आणि म्हणाले - ‘‘बाळा! तू दरीत पडताना पकडलेला बांबू पूर्णपणे धनुष्याकार वळला
होता. तरीही त्याने तुला साथ दिली आणि तुझे प्राण वाचवले.
बांबूने तुझ्यासाठी दिलेला संदेश मी तुला प्रत्यक्ष
दाखवतो. तु लक्षपूर्वक पहा.’’ म्हणून गुरूंनी
वाटेत उभे असलेले एक बांबूचे रोपटे ओढले आणि सोडून दिले. बांबू अलगद लचकून वाकला आणि पूर्ववत् झाला.
ते दाखवत गुरु म्हणाले, ‘‘बाळा
अशी बांबूच्या ठिकाणी असलेली लवचिकता आपल्या अंगी बाणली पाहिजे. जोराचे वादळ, वारा बांबूच्या झाडाला हादरवून उपटून टाकण्याचा
प्रयत्न करतो, पण तो बांबु पुढे मागे होत वाऱ्याप्रमाणे वाकतो, हलतो आणि पृथ्वीवर स्थिर
राहतो. उन्मळून पडत नाही.
पुढे गुरुवर म्हणाले, ‘‘आणि बांबूने तुला हा संदेश दिला आहे की जीवनात जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा थोडेसे नम्र व्हा, ताठ राहून स्वतःला मोडू नका.
मोडेन पण वाकणार नाही. असल्या वाक्यांचे अनुकरण
करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. कारण थोडेसे नम्र झाल्यावर संकटांची
तिव्रता कमी होते. आणि संकट टळल्यावर आपण पुन्हा पूर्वस्थीतीत
येऊ शकतो. हिंदी भाषेत एक म्हण आहे, ‘झुकता वह हैं जिस में जान हैं । अकड तो मुडदे की पहचान हैं।’ म्हणून अहंकार, गर्व, मठारा, अभिमान, दंभ, घमेंड, उर्मी,
माज, मद, इत्यादि दुर्गुणांना आपल्या अंतःकरणातून काढून फेकावे.’’
शिष्य लक्षपूर्वक
ऐकत राहिला. गुरू पुढे म्हणाले ‘‘बांबू फक्त ताण सहन करत नाही, तर तो त्या ताणाला आपली शक्ती बनवतो आणि दुप्पट
वेगाने पूर्ववत् होतो. त्या बांबूने हा
संदेश दिला की तु आयुष्यात असाच लवचिक राहा. आणि
बाळा मलाही झाडे-वनस्पतींची भाषा येत नाही. पण
ते अबोल निष्पाप स्थावर, प्राणी आपल्या
आचरणातून आपल्याला खूप काही शिकवून जातात. परमेश्वर अवतार
श्रीदत्तात्रेयप्रभु महाराजांनी देखिल यदुराजाला २४ गुरु सांगितले त्यात अजगर, कोसकिडी,
हरीण, पक्षी, मधमाश्या, हत्ती इत्यादि प्राण्यांकडूनच एक एक गुण घेऊन यदुराजाला निरूपण
केले.
ही सृष्टीच आपल्याला पावलापावलावर शिकवत असेल पण आपण निरिक्षण करून
ज्ञान संपादन करायचे असते. निरिक्षण केले तर त्यांच्याकडून
शिकण्याची सर्वाधिक संधी आपल्याला मिळते, पण मग आपण जर निरिक्षण केले नाही तर ती आपलीच उणीव म्हणावी.’’ शिष्याचे गुरुंचे
सर्व बोलणे ऐकून गुरुंना नमस्कार केले. आणि दोघांनी पुढील मार्ग पादाक्रांत करायला
सुरूवात केली.
अहंकारामुळे मनुष्याला ज्ञान अभ्यासता येत नाही. ज्ञान होत नाही.
शिक्षण आणि बुद्धी यामध्ये जर अहंकाराची भिंत असली तर बुद्धीचा विकास होणे, बुद्धी
तल्लख होणे कधीच शक्य नाही. कर्ण आणि अर्जुन हे दोघेही महान योद्धे होते. पण अर्जुन
नम्र होता. आणि कर्ण अहंकारी होता. कर्णाने फक्त परशुरामाकडे जाऊन विद्या संपादन केली.
आणि ‘‘आता काही शिकण्याची गरज नाही. मला सर्व येते’’ असल्या फाजिल आत्मविश्वासाने अहंकाराने
अर्जुनाला ललकारले. पण अर्जुनाचे तसे नव्हते. तो नम्र असल्यामुळे शेवटपर्यंत विद्यार्थीपणा
धारण करून अनेकानेक विद्वांनांकडून शिकतच राहिला. द्रोणाचार्याने ब्रम्हास्त्रापर्यंत
सर्व प्रकारची शस्त्रास्त्रांचे ज्ञान अर्जुनाला दिले. पण तेवढ्यावरच थांबेल तो अर्जुन
कसला. त्याने स्वर्गात जाऊन इंद्रादि देवतांना प्रसन्न केले. आणि नाना प्रकारची दिव्यास्त्रे
संपादन केली. महादेवाशी युद्ध केले. आणि पृथ्वीवर फक्त परशुरामाकडे असलेले असे पाशुपतास्त्रदेखिल
प्राप्त करून घेतले. कर्ण मात्र अहंकारामुळे थांबला आणि संपला. अहंकार माणसाचे फार
नुकसान करून जातो. म्हणून विनम्रता, नम्रता, रुजुता, हे फार आवश्यक आहे.
एक राजा होता, त्याला
वाचनाची आणि लेखनाची शिक्षणाची खूप आवड होती. एकदा त्याने मंत्रिपरिषदेद्वारे स्वतःसाठी एका शिक्षकाची
व्यवस्था केली. एक संत राजाला विद्या शिकवायला
येऊ लागले. अनेक विषय ते राजाला शिकवू लागले. राजाही मन लावून ऐकताना दिसत होता.
पण एकही विषय व्यवस्थीत कळत नव्हता. विद्या आत्मसात होत नव्हती. बरेच महिने उलटले, पण राजाला काही फायदा झाला नाही. गुरू रोज परिश्रम करायचे, पण राजाला त्या शिक्षणाचा काही फायदा होत नव्हता.
‘मला का विद्या प्राप्त होत नाहीये’ म्हणून राजा
खूप अस्वस्थ झाला, गुरूंच्या प्रतिभेवर आणि कर्तृत्वावर
प्रश्नचिन्ह उपस्थित करणे देखील चुकीचे आहे कारण गुरू खूप प्रसिद्ध आणि कर्तबगार विद्वान
होते. शेवटी एके दिवशी राणीने राजाला सल्ला दिला की राजन, ‘‘तुम्ही या प्रश्नाचे उत्तर गुरूजींनाच विचारा.’’ राजाला
राणीचे म्हणणे पटले.
एके दिवशी राजाने धैर्याने आपली जिज्ञासा गुरुजींसमोर ठेवली, "हे गुरुवर, मला क्षमा करा, मी अनेक महिने आपल्याकडून शिक्षण घेत आहे, पण मला त्याचा काहीच फायदा होत नाहीये. एकही विषय व्यवस्थीत कळत नाहीये, हे असं का होते आहे?" गुरुजींनी अतिशय शांत स्वरात उत्तर दिले, ‘‘राजन, याचे कारण अगदी साधे आहे.’’
‘‘कृपया गुरुवर, मला या प्रश्नाचे उत्तर लवकर द्या मी खुप चिंतीत आहे.’’, राजाला विनंती केली. गुरुजी म्हणाले, ‘‘राजन तुमचा प्रश्न फारच लहान आहे, पण तुमच्या 'मोठ्या' अहंकारामुळे तुम्हाला विद्या प्राप्त समजू शकले नाही आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आणि दुःखी आहात. हे खरं आहे की, तुम्ही खूप मोठे राजे आहात. तुम्ही पद आणि प्रतिष्ठेत सर्व बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहात, पण इथे तुमचे आणि माझे गुरू - शिष्याचे नाते आहे. विद्याभ्यास करताना तुम्ही आपल्या मनातील मोठेपणाचा अहंकार टाकत नाही. मी एक राजा आहे असे जोपर्यंत तुमच्या मनातून जात नाही आणि मी विद्यार्थी आहे अशी भावना येत नाही तोपर्यंत तुम्हाला विद्या प्राप्त होऊ शकत नाही.
मी तुमचा गुरु म्हणून माझे स्थान तुमच्यापेक्षा वरचढच असले पाहिजे, पण तुम्ही स्वतः उच्च सिंहासनावर बसून मला तुमच्यापेक्षा खालच्या आसनावर बसवले. आणि आपला अहंकार, मोठेपणाचा त्याग केला नाही. म्हणून इतके दिवस व्यर्थ गेले. आणि हे एकमेव कारण आहे की तुम्हाला ना शिक्षण मिळत आहे, ना ज्ञान मिळत आहे. हे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगणार होतो पण तुम्ही राजा असल्याने मी तुम्हाला हे सांगू शकलो नाही. कारण मी सांगितले असते तर तुम्हाला कदाचित क्रोध आला असता आणि अहंकारा-क्रोधाच्या भरात तुम्ही भलतेच काही केले असते.
राजाला आपली चुक समजली त्या गुरुजवळ क्षमा मागितली आणि लगेच गुरुवर्यांना उच्चासनावर बसवले स्वतः खाली नम्रतेने बसला. आणि मी पणाचा अहंकार काढून मन नम्रतेने भरून शिक्षण घेतले. व सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला.
तात्पर्य :- मित्रांनो, या कथेचा
सारांश असा आहे की, आपण वयाने, पदाने किंवा वैभवाने, संपत्तीने कितीही मोठे असलो,
तरी जर आपण मनात आपल्या गुरूला, वडिलधाऱ्यांना योग्य उच्च स्थान दिले नाही, त्यांचा यथोचित
मान, आदर केला नाही तर आपले कल्याण होणे कठीण आहे. आणि इथे उच्च
स्थानाचा अर्थ नुसता उंच आसनावर बसवणे असा नाही तर त्याचा अर्थ आपण आपल्या मनात गुरूला कोणते स्थान देत आहोत?
याचा विचार करणे गरजेचे आहे.
अनेक बुद्धीहीन अज्ञान लोक आपल्या
गुरुकडून साधुसंतांकडून मानासन्मानाची अपेक्षा करताना दिसतात. गुरुकडून साधुसंतांकडून
मानासन्मान मिळाला नाही तर विपरीतही होतात. साधुसंतांचे दोष घेतात. भकतात, ‘‘ते एवढे
मोठेबाबा आम्हाला जवळ बसवतात. आम्हाला स्पेशल बसवतात. आणि तुम्ही विचारतही नाही.’’
असले बोलून दाखवतात. हे अत्यंत चुकीचे आहे. ‘‘जो संतो सें चाहे मान, यम कहे वह मेरा
यजमान’’ अशी म्हण आहे. जो साधुसंतांकडून मानासन्मानाची अपेक्षा करतो. त्याच्यासाठी
यमपुरीची द्वारे नेहमी उगडलेलीच असतात. म्हणून ‘‘अहंकार
सर्वथा त्यागून । संतांचा शरणांगत होऊन । घेई करून कल्याण । स्वये स्वतःचे ।।’’