मराठी बोधकथा :- marathi bodhkatha knowledgepandit
दहः किमन्नदातुः स्वं निषेक्तुर्मातुरेव च ।
मातुः पितुर्वा बलिनः क्रेतुरग्नेः शुनोऽपि वा ।।
श्रीमद्भागवत स्कं. १० / अ.१० / श्लो.११
नलकूबेर व
मणिग्रीव या दोन मद्योन्मत्त व मदोन्मत्त कुबेरपुत्रांची नारदांनी केलेली
कानउघाडणी म्हणजे हा श्लोक! त्या निमित्तानं सर्वांनीच बोध घेण्यासारखा! त्यांनी
विचारलंय की ज्याला मी माझा म्हणतो तो हा
पांचमहाभौतिक देह नेमका कुणाचा? आईवडिल असून वा
नसूनही अन्न देऊन पोसणार्याचा? की रेतस् रूपी
स्वतःच्या अर्काचं माझ्या मातेच्या गर्भात सिंचन करून बीजाधान करणार्या माझ्या
पित्याचा? की जिनं नऊ महिने स्वतःच्या रक्तामांसावर
गर्भात वाढवलेल्या माझ्या आईचा? की आईच्या आईवडिलांचा
वा पित्याच्या आईवडिलांचा? की लत्ता मत्ता सत्ता मनगट
शिक्षण नेतृत्व इ. इ. विविध
प्रकारच्या बळानं मला स्वतःला हवं तसं राबवणार्याचा? की
माझी बुद्धि, श्रम विकत घेणार्याचा? की मला मृत वा जिवंत जाळून या देहाची चिमूटभर राख करू शकणार्या अग्नीचा? की जन्मतःच मला यदाकदाचित अवांछित, गैरसोयीची
संतती म्हणून कचर्यात फेकून दिल्यावर लचके तोडणार्या कुत्र्यांचा वा टोचाळून
फाडून खाणार्या कावळ्यागिधाडांचा?
मूलगामी विचार करतो असा दावा करणारे या प्रश्नाचं तर्कसंगत व नेमकं उत्तर
देऊ शकतील? मुळीच नाही! ज्या बिंदूपुढे जाणं त्यांच्या
बुद्धीच्या आवाक्यात येत नाहीत तिथंच ते थांबतात व हेच मूळ उत्तर असल्याचा दावा
करतात! मी कोण? याचा शोध
घ्यायचा झाल्यास मी देह नसून भिन्न असं काही तत्त्व आहे असं जाणवलं तर प्रथम देह
काय आहे कुणाचा आहे याचा शोधबोध घेणं ही प्रथम पायरी आहे!
त्या पायरीवर
चढायचं तर वरील प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत... त्यातूनच देहाबद्दलचा अभिमान, अहंकार, ममत्व, देहसुखाबद्दलची
ओढ, खेच, लालसा यांवर संयम
आणत आणत शेवटी नाहीसं करता येईल व सर्व लक्ष भगवंताकडे लावता येईल. भगवंताचं
अस्तित्व नाकारणार्यांसाठीसुद्धा या श्लोकातून
मिळणारा बोध तितकाच उपयुक्त आहे. जर त्यांना लौकिकातील सर्वोच्च यश, कीर्ति, मान, सन्मान
प्राप्त करायचे असतील तर!
नल कुबेरांनी
नारदाची अवहेलना केली. त्यांना हिन लेखले. उपहास केला. त्याचे फळ त्यांना शाप
भोगून भोगावे लागले. कुणालाही हिन लेखू नये. कारण नियतीने कोणाच्या भविष्यात काय
लिहून ठेवले आहे ते आपल्याला माहिती नाही. प्राचिन काळात एक मुलगा होता, शाळेत सर्वजण त्याला मतिमंद म्हणायचे. तो अभ्यासात खूपच कमकुवत होता आणि त्याची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्याचे
शिक्षकही त्याच्यावर सतत रागावायचे.
वर्गात त्याची कामगिरी नेहमीच खराब असायची. एकाही
प्रश्नाचे उत्तर त्याला निट देता यायचे नाही. आणि मुलं नेहमी त्याची चेष्टा करत असत. त्याच्यासाठी अभ्यासाला
जाणे ही एकप्रकारे शिक्षाच
होती, तो वर्गात शिरताच मुले त्याच्याकडे पाहून हसायला लागत, कोणी
त्याला मूर्ख म्हणे, तर कोणी
त्याला नंदीबैल म्हणायचे. काही
शिक्षक सुद्धा त्याची चेष्टा करण्यापासून स्वतःला रोकू
शकत नसत. सुरवातीला तर त्याला मुलाला काही वाटायचे नाही
पण पुढे चालून त्याला या सगळ्याचा त्रास होऊ लागला आणि त्याने गुरुकुळात जाणे बंद केले.
आता तो दिवसभर
इकडे तिकडे भटकायचा आणि आपला वेळ वाया घालवायचा. एके
दिवशी तो असाच कुठेतरी चालला होता, फिरत असताना त्याला
तहान लागली. तो इकडे तिकडे पाणी शोधू लागला. शेवटी त्याला एक विहीर दिसली. तिथे
जाऊन विहिरीतून पाणी काढून त्याने तहान भागवली. तो खूप थकला होता त्यामुळे पाणी पिऊन तो तिथेच बसला. मग
त्याची नजर त्या दगडावर पडलेल्या खुणांकडे गेली, विहिरीतील
पाणी दोरीने वारंवार ओढल्यामुळे तिथे खाच पडली होती. ते पाहून त्याचे हृदय परिवर्तीत झाले.
तो मनात विचार
करू लागला की, वारंवार पाणी खेचल्याने एवढ्या कठीण
दगडावर दोरीचा ठसा उमटतो, दोरीदेखिल दगडाला खाच पाडू शकते. तर मग सतत कष्ट करून मलाही ज्ञान मिळायलाच
पाहिजे. आणि तो लगेच उठला. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा शाळेत जाऊ लागला. पुढे काही दिवस लोक त्याची अशीच चेष्टा करत राहिले, पण
हळूहळू त्याची अभ्यासाची जिद्द, त्याचे विद्येप्रती समर्पण
पाहून शिक्षकांनीही त्याला साथ द्यायला सुरुवात केली. त्याने अथक परिश्रम घेतले. आणि काही वर्षांनी तो विद्यार्थी
महान विद्वान
वरदराज म्हणून प्रसिद्ध झाला. त्या वरदराजाने संस्कृतमध्ये मुग्धबोध आणि लघुसिद्धांत
कौमुदी यांसारखे ग्रंथ रचले.
तात्पर्य असे आहे की, कोणालाही कमी समजू नये. जितके लोक
प्रसिद्धीस पावले, महान शास्त्रज्ञ झाले, विद्वान झाले, त्यांच्या आत्मचरित्र पाहिल्यावर
आपल्या लक्षात येईल की, त्यांनी यशस्वी होण्यासाठी
सुरूवातीला खुप संघर्ष केला. लोकांनी त्यांना वेड्यात काढले, त्यांचा अपमान केला पण तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. आणि जगाला नमवले.