दैव आणि कर्म मराठी बोधकथा - marathi bodhkatha
प्राचिन काळात एक राजा होता. त्या राजाचा प्रधान अतिशय चतुर आणि हुशार होता. राजाला एखाद्या प्रश्नावर वादविवाद करण्यात मोठी मौज वाटे कोणाच्या ना कोणत्या तरी प्रश्नावर तो प्रधानाशी सतत वादविवाद करी. प्रधानही, चतुरपणे बिनतोड उत्तरे देऊन राजाचे पूर्ण समाधान करी. एके दिवशी राजाने प्रधानाला विचारले, प्रधानजी दैव आणि कर्म यात श्रेष्ठ कोण?
प्रधानाने ठामपणे उत्तर दिले. दोन्हीही श्रेष्ठच! तितक्याच ठामपणे राजा म्हणाला, शक्यच नाही. कर्माहून दैवच श्रेष्ठ मानायला हवं ! प्रधान म्हणाला वेळ आली की पटवून देईन. एक दिवस राजा आणि प्रधान फिरायला राजवाड्याबाहेर पडले. इतक्यात दुरूनच एक पंडित येत असलेला प्रधानाने पाहिला. लगेच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली त्याने आपल्या गळ्यातील हार रूमालात बांधून. तो रूमाल पंडित येत असलेल्या रस्त्यावर टाकला.
ते पाहून राजा म्हणाला प्रधानजी हा काय वेडेपणा? मौल्यवान हाराचं गाठोडं तुम्ही रस्त्यावर का टाकले? 'गंमत पहा तरी खरं' असं म्हणत प्रधान रस्त्याकडेच्या एका झाडाआड लपला. राजालाही त्याने लपवण्याची खुण केली. मग राजाही प्रधानाच्या मागे लपला.
ते दोघेही त्या झाडाआडून
रस्त्यावरच्या हाराच्या गाठोडयाकडे पाहू लागले. इतक्यात तो पंडीत त्या गाठोड्याजवळ
आला. आता तो हाराचे गाठोडे उचलतो कि काय या विचाराने राजा उत्सुकतेने त्या
पंडीताकडे श्वास रोखून पाहू लागला. पण तो पंडीत हाराचं ते
मौल्यवान गाठोडं ओलांडून तसाच पुढे निघून गेला. राजाला
त्याचा खूप राग आला त्या रागाच्या भरातच तो पंडीताला त्वेषाने म्हणाला. ‘‘अरे मुर्ख माणसा, तुला मौल्यवान हाराच हे
गाठोडं दिसलं नाही का?’’
पंडित गडबडून उत्तरला, ‘‘कसं दिसणार? मी डोळे मिटून चाललो होतो ना?’’ ‘‘तुला हे मौल्यवान गाठोडं नको होत काय?’’ ‘‘असं कसं होईल महाराज ? सापडलं असतं तर मला ते हवंच होत. पण ऐनवेळी मला आंधळे रस्त्याने कसे चालत असतील ते अनुभवण्याची दुर्बुद्धी झाली आणि मी डोळे मिटून चालू लागलो !’’ ‘‘अरे कर्मदरिद्र्या तुला दैवाने दिले होते, पण तुझ्या कर्माने तु ते घालावलेस.’’
राजाच्या तोंडून असे उद्गार निघताच
प्रधान मिष्किलपणे राजाला म्हणाला, ‘‘महाराज दैवाला
कर्माच्या साक्षीशिवाय श्रेष्ठत्व नाही, हे आपल्याला पटलं ना?’’ प्रधानाच्या प्रश्नावर होकारार्थी मान
हलवत राजा म्हणाला ‘‘दैव समोर आलं तरी त्याचा लाभ
घेण्यासाठी माणसाच्या हातून तसं कर्मही घडायला हवं, हे
अगदी शंभर टक्के खरं !’’
तात्पर्य :- दैवात असले तरी कर्म जर त्या दृष्टीने केले नसेल
तर काही उपयोग नाही म्हणून कर्म करीत राहावे. कर्माने दैवात नसेल तरी प्राप्त होते. परमेश्वराचे साह्य होते कर्माने दैव निर्माण होते.