भिक्षा स्तोत्र - भिक्षाष्टक
महानुभाव-पंथिय-कविता-रसग्रहण
भिक्षा स्तोत्र या काव्यात भिक्षाविधीचे महत्त्व निरूपण केलेले आहे. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी परब्रम्ह परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींनी मोक्ष प्राप्तीसाठी आचरण करणाऱ्या साधकास भिक्षाविधी सांगितला. भिक्षाविधीचे महत्व अनन्य असाधारण आहे. महानुभाव पंथीय साधक महात्मा भिक्षाविधी पोट भरण्यासाठी मागत नाहीत ते परमेश्वराची आज्ञा म्हणून भिक्षा मागतात. भिक्षाविधीमध्ये परमेश्वर शोधणे करणे हा मुख्य विधी असतो.
भिक्षाविधी हा देवाने पोट भरण्यासाठी सांगितला अशी अज्ञानमूलक समजूत अलीकडील बऱ्याचशा महानुभाव पंथातील साधूंची झालेली आहे. जो भिक्षा मागत नाही त्याच्या ठिकाणी निराभिमानता येत नाही आणि ज्याच्या ठिकाणी निराभिमानता येत नाही तो परमेश्वर प्राप्तीला अधिकार्या होत नाही.
परमेश्वर आज्ञेप्रमाणे जो भिक्षा मागून खातो त्याच्याच ठिकाणी भिक्षूचे धर्म अहिंसा निरभिमानता क्षमा शांती इत्यादी असंख्य प्रकारचे गुण बाणतात. जे भिक्षा मागून खात नाहीत त्यांच्या शब्दाशब्दातून अहंकार अभिमान आत्मप्रौढी टपकत असते. त्यांच्या ठिकाणी साधूच्या, संताच्या ठिकाणी असलेले समाधान स्वस्थता येत नाही.
भिक्षाविधी हा मोक्षप्राप्तीला नेणाऱ्या विधींमध्ये श्रेष्ठ विधी आहे म्हणून प्रत्येक साधनवंताने भिक्षाविधी आचरलाच पाहिजे. परब्रम्ह परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींनी स्वतः भिक्षाविधी आचरून दाखवला व भिक्षेचे महत्त्व आपल्या भक्तांना सांगितले. भिक्षेचे अन्न पवित्र व अंतःकरण शुद्ध करणारे असते. भिक्षाविधीमुळे उजळता राहते. भिक्षाविधी आचरला नाही तर मानसिके मालीन्य येते व इतर धार्मिक विधी आचरण्याची बुद्धी होत नाही. इतर धार्मिक विधी आचरण्याचा तरी मनापासून ते आचरले जात नाहीत.
अनुचित अन्नामुळे होणारे दुष्परिणाम सर्वांना माहीतच आहेत. साधनवंताचे अंतकरण अष्ट प्रहर शुद्ध असावे म्हणून भगवंतांनी भिक्षाविधी लिहिला. कारण अन्न पवित्र आणि शुद्ध असेल तरच अंतःकरणात पवित्र भाव येतील. म्हणून भिक्षाविधी हा अति श्रेष्ठ आहे. तीच भिक्षा कशा प्रकारे करावी याचे वर्णन पुढील काव्यात कवीने अत्यंत रसाळ शब्दात केलेले आहे. काव्याची भाषा ही खूप सुगम आहे. आपण त्या काव्याचा आस्वाद घेऊया-
छंद :- इंद्रवज्रा
झोळी नि आम्हा लग्न लावताती।
भिक्षान्न थोरी प्रभु सांगताती
ऐसा विधी की निज प्रेम व्हावे
भीक्षा विधीसी नित आचरावे ||१||
आदौ विनंती मज पामराची
बीजे करावे नगरांत आजी
अप्राप्ती ऐसी करिताचि जावे
भीक्षा विधीसी नित आचरावे || २ ||
की मौन व्हावे स्मरणी रमावे
हींसा न व्हावी भय हे असावे
भिक्षेचि लीळा स्मरताचि जावे
भीक्षा विधीसी नित आचरावे ||३||
ग्रामी दिसे जी सुतकी घरे ही
मंदीर टोळे नि नपाळते ही
ते सांडूनी पैल घराशी जावे
भीक्षा विधीसी नित आचरावे ||४||
की दूध पीते दिसताये बाळे
की द्वंद्व ऐसे उभयासि पोळे
ऐसी घरे ती निषिध्दे म्हणावी
भीक्षा विधीसी नित आचरावे ||५||
(द्वंद्व म्ह. भांडण)
लीसी पुसीही सदनी स्त्रियांची
होताय गोष्टी उभया जनांची
टाळून त्यासी पुढती चलावे
भीक्षा विधीसी नित आचरावे ||६||
दारांत आहे अज ताम्रचूड:
की नासिताये जल मंदमूढ:
दृष्टीस येता क्षणेचि त्यजावे
भीक्षा विधीसी नित आचरावे ||७||
(अज म्ह. बकरी /तांब्रचुड म्ह. कोंबड्या)
प्रेमासि नेता नि सुखासि देता
जोही यथोक्त नित आचरीता
ऐसा विधी हा अति थोर आहे
जो आचरे तोचि देवासि पाहे ||८||
कवि :-
श्रीधर मुनी अंकुळनेरकर
श्रीदेवदत्त आश्रम जाधववाडी जिल्हा पुणे
जाधववाडी