आद्य मराठी कवयित्री जिज्ञासू महदाईसा - महानुभावांचा-इतिहास महादाईसा-Mahanubhav-panth-history

आद्य मराठी कवयित्री जिज्ञासू महदाईसा - महानुभावांचा-इतिहास महादाईसा-Mahanubhav-panth-history

आद्य मराठी कवयित्री जिज्ञासू महदाईसा -  

महानुभावांचा-इतिहास-Mahanubhav-panth-history

महदाईसा मुळातच स्वभावतः धार्मिक आणि जिज्ञासू होती. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक धार्मिक व्यक्तींना ती प्रश्न विचारीत असे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडून आपल्या प्रश्नांचं समाधान करून घेत असे तिच्या तर्कसंगत आणि तात्विक प्रश्नांमुळेच संप्रदायाच्या समृद्ध तत्त्वज्ञानाचा आणि मौलिक श्रीकृष्ण चरित्राचा जन्म झाला. म्हणूनच सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी म्हणतात "म्हातारी चर्चक, म्हातारी एथ काही पुसतची असे" म्हणून महदाईसाचा गौरव करतात.

स्मृतिस्थळातील महदाईसेच्या साहसी, भावुक, अनुशासित आणि संघटित वृत्तीचा अविष्कार पाहायला मिळतो.

     एके दिवशी भिक्षाविधी संपन्न करीत असताना वाटेवरच्या चिमुकल्या बालकानं केलेल्या सर्वज्ञांच्या नामोच्चारानं महदाईसा मनोमन सुखावली, तीन त्याचक्षणी त्याच्याजवळ जाऊन त्याला झाडून पुसून आपल्या कवेत घेतलं आणि त्याचे पटापट मुके घेतले. अशा प्रकारे महदाईसेनं स्मरणभक्तीचा एक आदर्श प्रस्थापित केला.

     नवगावला आचार्य श्रीनागदेव तिची प्रशंसा करताना म्हणतात "महदाईसा! पहिल्या दिसापासौनी सेवटील दिसापर्यंत देवो तो तुआची आठविला" हे प्रथम आचार्यांचे विधान किती सार्थक आणि महादाईसेच्या जीवनाचा आलेख मांडणारे आहे.

      महदाईसा अर्थात महदंबा म्हणजे मराठी काव्याला पडलेलं पहाटेचे मधुर स्वप्न या मधुर स्वप्नाची लोभसवाणी प्रभोत्सर्जक, चर्चक, चिकित्सकतेचा वारसा आणि वसा म्हणजे जिज्ञासू महदाईसा या मनोवेधक, मनमोहक, मनोहर कादंबरीस डॉ. बाबासाहेब बिडकर मेरठ (डि.लीट) यांनी शब्दबद्ध केलं आहे. अप्रतिम, उत्कृष्ट प्रतिभेचे देण लाभलेल्या मराठीतील महदाईसा या आद्यकवयित्रीच्या जीवनावर व काव्यावर फारसे लेखन झालेले दिसत नाही एका प्रतिभा संपन्न भावुक मनाच्या संन्यस्त वृत्तीतील प्रतिभा, शब्दरचनेवरची तिची पकड, त्यातील सहज आलेली गेयता इत्यादी उत्कटतेने दाखविणारे कथानक तसेच या आद्य कवियत्रीच्या जीवनाचा पट डॉ.बाबासाहेब बीडकर मेरठ, यांच्या प्रभावी व ओघवत्या निवेदन शैलीतून आपल्यासमोर सहजपणे या कादंबरीतून उलगडला गेला आहे.

       महदंबा हिचे मूळचे नाव रूपैसा महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंच्या परिवारात रूपैचा चुलतबंधू श्री नागदेवाचार्य यांचे समवेत सामील होते. रुपैसा बालविधवा होती. श्री चक्रधरांची प्रवचने ऐकून ऐकून तिची प्रतिभा फुलते आणि पाहता पाहता महादंबा या आदरार्थी पदाला ही बालविधवा पोहोचते.

     आपल्या चर्चक, जिज्ञासक व बहुगुणी व्यक्तिमत्त्वामुळे तसेच उपजत प्रतिभा गुणांमुळे ती आद्यकवयित्री होते. बाराव्या (१२) व्या शतकातील रुढीच्या बंधनांमुळे तिची झालेली घुसमट तसेच बालपणापासून अंतिम श्वासापर्यंत महदाईसेच्या जीवनात होत गेलेल्या स्थित्यंतराचे सुंदर रेखाटन कादंबरीत उत्कटतेने चितारले गेले. महदाईसेच्या मनाची उत्तरोत्तर बदलत जाणारी अवस्था याचे सुंदर वर्णन लेखकांनी जणू महदाईसेच्या मनाशी एकरूप होऊन केलेले आहे. त्यामुळे महदाईचे व्यक्तिचित्रण रेखीव, स्पष्टपणे डोळ्यासमोर उभे राहते. त्याचबरोबर बाराव्या शतकातील समाजजीवन, सहजीवन आपल्यासमोर अतिशय ओघवत्या शैलीत लेखकांनी उभे केले आहे.

      महदंबा ही थोर विदुषी. श्री चक्रधर स्वामींशी तत्त्वचर्चा करून महादंबेने बरेचसे तत्त्वज्ञान महानुभाव पंथाला उपलब्ध करून दिले आहे. अशा पांडित्याचे वैभव लाभलेल्या महदंबेच्या तेवढ्याच भावुक मनाचा शोध घेण्यात लेखक यशस्वी झाले आहे.

       लालित्याच्या अंगाने जाणारे मनोविश्लेषणात्मक आणि कादंबरीचा आकार धारण केलेले असे लेखन महानुभाव साहित्यात फार थोडे आढळते. चर्चात्मक, वर्णनपर, पांडित्यपूर्ण, संशोधकीय लेखनाच्या या प्रांतात जिज्ञासू महदाईसा ही अंतरंगाचा ठाव घेणारी कादंबरी विषयाच्या वेगळेपणामुळे व प्रासादिक शैलीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेईल. यात तिळमात्र शंका नाही.

       प्राचीन काळातील आध्यात्मिक क्षेत्रातील विभूती, आपल्या लौकिक भावभावनांवर विजय मिळवित मनाची उच्च अशी पारलौकिक अवस्था प्राप्त केलेल्या महदंबेचे रेखाटन करताना तिच्या उदात्त प्रवृत्तीचे व विचारांचे भान ठेवून लेखकांनी तसे वर्णन समर्थपणे केले आहे. तसेच आपल्या जिज्ञासक, चिकित्सक वृत्तीतून तितक्याच कणखरपणाने वागणाऱ्या महदंबेच्या मनाची आंदोलने चित्रीत करण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे हि कादंबरी आपल्या मनावर प्रभाव टाकल्याशिवाय राहणार नाही.

    तेव्हा जिज्ञासू महदाईसा या साडेसहाशे पानांच्या लालीत्यपूर्ण कलाकृतीवर सकारात्मक व वस्तुनिष्ठ *चर्चासत्र आणि लेखकाचा सत्कार समारंभ* आयोजित केला आहे तेव्हा आपण सर्वांनी या अविस्मरणीय सोहळ्याचा आस्वाद घ्यावा आणि हा सोहळा अनेकांना प्रेरणादायी कसा होईल याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती.

धन्यवाद!!

🙏दंडवत प्रणाम🙏🌺जयश्री चक्रधर🌺🌺जय महानुभाव🌺

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post