द्रौपदीच्या श्रीकृष्णभक्तीपुढे दुष्ट दुर्योधनाचे दानातून उभे राहिलेले दुर्वासा ऋषीचे ऐश्वर्य पराभूत झाले - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता

द्रौपदीच्या श्रीकृष्णभक्तीपुढे दुष्ट दुर्योधनाचे दानातून उभे राहिलेले दुर्वासा ऋषीचे ऐश्वर्य पराभूत झाले - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता

 



द्रौपदीच्या नाम श्रीकृष्णभक्तीपुढे दुष्ट दुर्योधनाचे दानातून  उभे राहिलेले दुर्वासा ऋषीचे ऐश्वर्य पराभूत झाले

----------------------------------------------

        ऋषी, मुनी, साधू , संत, तपस्व्यांना मिळालेले दुष्ट दुर्जनाचे दान व त्या दानातून उभे राहिलेले ऐश्वर्य अधोगतीला नेते. या ऐश्वर्यामुळे माज उत्पन्न होतो असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे सूत्रवचन आहे ते असे - "द्रव्य अस्तित्वे माजवी". या प्रदुषित धनातून प्राप्त झालेल्या ऐश्वर्यामुळे माज उत्पन्न होतो. हा माज अहंकाराहूनही भयानक असतो असा या वचनाचा भावार्थ आहे.   अहंकार वाईट आहे. परंतु या अहंकाराहूनही माज फारच वाईट आहे. अहंकार एकट्यालाच अधोगतीला नेतो. परंतु माज हा स्वतासह अनेकांना धर्मापासून भ्रष्ट, विपरित व पतीत बनवितो. इतका तो भयावह असतो. म्हणूनच श्री चक्रधरस्वामींनी सूत्र वचनात अहंकार हा शब्द वापरण्याऐवजी माज हा शब्द वापरला आहे. द्रव्य अस्तित्वे माजवी असे स्वामी म्हणतात.

       दुष्ट दुर्जनाच्या दानातून मिळालेल्या ऐश्वर्यातून माज उत्पन्न होतो. म्हणून साधकाने अशा द्रव्याचा संग्रह करून ऐश्वर्य निर्माण करू नये. अशी श्री चक्रधरप्रभूंची भक्तांना आज्ञा आहे. कलियुगात असे ऐश्वर्य निर्माण करणार्यांचे पतन झालेले अनेक उदाहरणे समोर आहेत. तसे द्वापार युगातही अशा ऐश्वर्याने संपन्न ऋषींचे पतन झालेले अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी दुर्वासा ऋषी व त्यांचे 88 हजार शिष्य. हे उदाहरण आपण पाहू या...

   श्रीकृष्णाचे भक्त पांडव द्वैत वनामध्ये अरण्यवासात राहत होते. पांडवाचा नाश करण्यासाठी दुर्योधनाने दुर्वासा ऋषी व त्यांचे 88 हजार शिष्यांना चातुर्मासीसाठी हस्तिनापुरला निमंत्रित करून बोलावून घेतले. त्यांना चार महिने  भोजन दिले व राज ऐश्वर्याने त्यांचे अतिथ्य केले. राजमहालात त्यांची उत्तम व्यवस्था केली. दुर्योधनाच्या दात्रुत्वातून दुर्वासा ऋषींचे ऐश्वर्य समाजात तळपू लागले. 

       दुर्वासांना चातुर्मास देण्याचा दुर्योधनाचा धार्मिक हेतू नव्हता. दुर्वासाला हाताशी धरून वनवासात राहत असलेल्या पांडवांचा नाश करण्याचा मोठा कट शकूनीने आखला होता. दुर्वासाने मध्यरात्री पांडवांकडे जावे व भोजन मागावे. पांडव 88 हजार ऋषींना भोजन देऊ शकणार नाहीत. हा अपमान समजून  दुर्वासाने पांडवांना शाप देऊन त्यांना जाळून भस्म करावे. या साठी दुर्वासांना चातुर्मास देऊन दुर्योधनाने त्यांची उत्तम बडदास्त ठेवली होती.

        दूर्योधनाचे अन्न खाल्यामुळे, मानसन्मान व ऐश्वर्याचा स्वीकार केल्यामुळे दुर्वासाने त्याचे ऐकले व  त्याच्या कपट कारस्थानाला बळी पडले. मध्यरात्री अरण्यात पांडवांकडे गेले व त्यांना भोजन मागितले.भोजन नाही दिले तर श्राप देऊन भस्म करण्याची धमकीही दिली...

         मध्यरात्री आलेले दुर्वास ऋषी व त्यांची मागणी ऐकून पांडव घाबरून गेले. त्यांचेकडे कणभरही अन्न नव्हते. त्यामुळे 88 हजार ऋषीश्वरांना भोजन देणे पांडवांना शक्यच नव्हते. श्रीक्रुष्णाचे क्रुपेने त्यांचेकडे अक्षय थाळी जरूर होती. परतु तिच्यातून दिवसाच अन्न मिळे. रात्रीला अन्न मिळत नव्हते. त्यामुळे पांडव घाबरून गेले. दुर्वासा आता शाप देतील व जाळून भस्म करतील असा त्यांना धाक पडला.

        तप सामर्थ्याने व दुर्योधनाने दिलेल्या ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या दुर्वासा ऋषींनी केलेली भोजनाची मागणी व भोजन दिले नाही तर शाप देऊन जाळून भस्म करण्याची धमकी या मुळे फार मोठे संकट पांडवांवर कोसळले होते.  दुर्योधन, शकूनी, कर्ण दुशासन या चांडाळ चौकडीने पांडवांना ठार मारण्याचा डाव साधला होता व या कट कारस्थानात दुर्वास ऋषीही नकळतपणे सहभागी झाले होते.    

       दुर्योधनाच्या चातूर्मासीचा स्वीकार करून व त्याचे अन्न खाऊन दुर्वास ऋषीं या चांडाळ चौकडीच्या कारस्थानात पुरते अडकले होते.  त्यांचे हातून पांडवाचा नाश करण्याचा व दुर्योधनाला हस्तिनापूर साम्राज्याचा राज्याभिषेक करण्याचा शकूनी मामाचा कुटील डाव होता. उग्र तामसिक तपश्चर्या व दुष्ट दुर्जनाने दिले दान जिथे एकत्र नांदत असते तिथे विनाश असतो. परंतु त्या विनाशक असूरी ऐश्वर्याला पराजित करण्याचे सामर्थ्य मात्र परमेश्वराच्या नाम स्मरण भक्तीत असते. 

        आतापर्यंत द्रौपदी हे सर्व मूकपणे पाहात होती. ती पुढे येऊन म्हणाली," ऋषीवर्य आपण स्नान करून या. तोपर्यंत आम्ही भोजनाची तयारी करू." असे सांगून त्यांना तिने स्नानाला नदीवर पाठवून दिले व ती श्री क्रुष्णाचे नामस्मरण करू लागली. तिच्या ह्रदयातील नामस्मरणाच्या लहरीने परमेश्वर श्रीकृष्णाला तिथे खेचून आणले. भगवान श्रीक्रुष्ण प्रिय भक्त द्रौपदीच्या अर्थात पांडवांच्या साहाय्याला मध्यरात्री त्या अरण्यात आले व पर्णकुटीत पांडवाच्या समोर प्रकट झाले. ती पर्णकुटी प्रकाशाने उजळून निघाली. देवाला पाहून पांडवांना खुप आनंद झाला. 

सर्वांनी देवाच्या श्री चरणावर मस्तक ठेऊन वंदन केले. देव आसनावर विराजमान होऊन म्हणाले, "द्रौपदी मला फार भूक लागली आहे. मला भोजन दे". द्रौपदी गोंधळली.भोजनाला तिच्याजवळ काहीच पदार्थ नव्हते. देवाला भोजनाला काय द्यावे या विवंचनेत ती पडली. तिची ती अवस्था पाहून श्री कृष्णच तिला म्हणाले, "जे ही काही असेल ते दे." द्रौपदीने झोपडीत शोधाशोध केली. तेव्हा तिला अक्षय थाळीला भाजीचे पान असलेले दिसले. तिने तेच भाजीचे पान देवाला भोजन म्हणून भक्ती भावाने दिले. देवाने ते पान खाल्ले व त्रुप्ततेने ढेकर दिली व पांडवांना म्हणाले, "तुम्ही काहीही चिंता करू नका. मी तुमचा सखा तुमच्या पाठिशी उभा आहे." पांडव आता निर्धास्त झाले होते.

          श्री कृष्णाने इकडे पांडवांना अभय दिले व भाजीचे पान खाल्ले आणि तिकडे नदीवर स्नानाला गेलेल्या  दुर्वासा ऋषींचे व त्यांच्या 88 हजार शिष्यांचे पोट भरले. त्यांना त्रुप्ततेची ढेकर आली. हे असे कसे झाले ? शेवटी ही परमेश्वराचीच लीळा आहे हे त्यांचे लगेच लक्षात आले व त्यांनी पर्णकुटीत येऊन श्री कृष्णाची क्षमा मागितली. दुर्वासा म्हणाले, " हे श्री कृष्णा, दुष्ट दुर्योधनाचे अन्न खाल्यामुळे व त्याचे कडून ऐश्वर्य उपभोगल्यामुळे तुझ्या भक्तांवर विपरित बुद्धी आली. मध्यरात्री तुझ्या भक्तांना भोजन मागावयास आलो.त्यांना संकटात टाकले. त्यांनी तुझे नामस्मरण केले. म्हणून तू भक्ताच्या रक्षणासाठी धाऊन आला. देवा तुला त्रास झाला. श्रीकृष्णा, दुष्ट दुर्योधनाच्या दानामुळे व त्याने दिलेल्या ऐश्वर्या मुळे आम्हाला ही दुर्बुद्धी झाली.देवा, मला क्षमा कर. मी तुला शरण आलो आहे." अशी क्षमायाचना करून दुर्वासाने श्री कृष्णाचे चरण धरले. देवाने त्याला क्षमा केली.

         दुष्ट व दुर्जन असलेल्या दुर्योधनाच्या धनावर व अन्नावर दुर्वासाचे ऐश्वर्य तळपत होते. त्यामुळेच त्यांना आपल्या ऐश्वर्याचा माज आला होता. संत सज्जन पांडवांना छळण्याची दुर्बुद्धी झाली होती. नामस्मरण करणार्या द्रौपदीला संकटात टाकण्याची हिम्मत झाली व दुष्ट दुर्योधनाला साथ देण्याची दुर्भावना दुर्वास ऋषींना उत्पन्न झाली. 

         श्री चक्रधरस्वामी म्हणतात- " द्रव्य अस्तित्वे माजवी " दुष्ट दुर्योधनाच्या चातुर्मासीच्या धनामुळे व दुर्योधनाने दिलेल्या मानसन्मान व ऐश्वर्यामुळे दुर्वासासारख्या महान ऋषींनाही माज उत्पन्न झाला होता. परंतु द्रौपदीने नामस्मरणाच्या बळाने दुर्वास ऋषींचा माज क्षणार्धात उतरवला व त्यांना एखाद्या बालकाप्रमाणे श्रीकृष्णाला शरण यायला भाग पाडले.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post