खालील संस्कृत सुभाषिताचे रसग्रहण करा !
संस्कृत सुवचनानि
आजची लोकोक्ती - अपूज्या यत्र पूज्यन्ते।
अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानां तु विमानना।
त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्भिक्षं मरणं भयम्॥
संदर्भ - काकोलूकीय, पञ्चतंत्र''
अर्थ :- ज्या ठिकाणी अयोग्य व्यक्तींचा आदर केला जातो आणि आदरणीय व्यक्तींचा अपमान होतो त्या ठिकाणी दुष्काळ, मरण आणि भीती या तीन गोष्टी ओढवतात. काही अनुचीत घडलं की त्याची कारणमिमांसा करताना बऱ्याचदा जाणकार अपूज्या यत्र पूज्यन्ते। ह्या लोकोक्तीचा उल्लेख करतात. वरील श्लोकाच्या दुसऱ्या चरणात अशीही शब्दरचना आढळते,
पूज्यानां तु विमानना।
च्या जागी
पूज्यानामवमानना।
पूज्यानां तु अनादरः।
पूज्यानां च निरादर।
प्राचीन काळात क्षत्रिय राज्य करत असत, क्षत्रियाला लहानपणापासूनच शस्त्रास्त्रविद्या, युद्धनीती, राजनीती आणि नीतीशास्त्र याचे शिक्षण दिले जात असे त्यामुळे तो राजपद भूषविण्यास पात्र होत असे. आजकाल ज्याला जास्त मतं (बहुमत) मिळतात तो राज्य करतो. मग तो स्वभावाने, शिक्षणाने कसाही असो. अयोग्य व्यक्ती अधिकार पदावर बसली की मग काय घडतं हे पंचतंत्रातील वरील श्लोकातून सांगितले आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण व शिवपुराण यांमध्येसुद्धा याच अर्थाचे श्लोक आहेत.
अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यपूजाव्यतिक्रमः।
त्रीणि तत्र प्रजायते दुर्भिक्ष मरणं भयत्॥
- ३.४८, स्कंदपुराण.
अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानां च व्यतिक्रमः।
त्रीणि तत्र भविष्यंति दुर्भिक्षं मरणं भयम्॥
- ६.१११.१४, पद्मपुराण.
अपूज्या यत्र पूज्यन्ते पूजनीयो न पूज्यते।
त्रीणि तत्र भविष्यन्ति दारिद्रयं मरणं भयम॥
- शिवपुराण.
अगदी हाच अर्थ वेगळी उदाहरणे देऊन सांगणारा एक श्लोक चाणक्यनीतीतही समाविष्ट आहे,
अबला यत्र प्रबला शिशुरवनीशो निरक्षरो मन्त्री॥
नही नही तत्र धनाशा जीवितुमाशापि दुर्लभा भवति॥
ज्या राज्यात (देशात)स्त्री अथवा स्त्रैण वृत्तीचे वर्चस्व असते. ज्या देशाचा राजा बालक किंवा बालबुद्धी असतो. जिथले मंत्री अशिक्षित असतात. आहो, त्या राज्यात (देशात) राहून धन (पैसा, संपत्ती) कमविण्याची आशा तर सोडाच पण उदरभरणापुरत्या प्राप्तीची, जीविताची आशा करणेही दुर्लभ होय. (त्या राज्यात जिवंत राहाणेही अशक्य असते.)
यासंदर्भातच महात्मा कबीरांचा एक दोहा आहे त्यातूनही हाच संदेश मिळतो की अयोग्य माणसाला जेथे उच्च स्थान मिळते तो देश, राजा, स्थानही सज्जन व ज्ञानार्थींकरिता अयोग्यच होय. पाहा,
महलन मांहि पोढते, परिमल अंग लगाय।
छत्रपति की छार में, गदहा लोटे जाय।
कबीरजींना यातून सांगायचंय की मूर्ख राज्याच्या महालात राजाबरोबरच त्याच्या राजमहात राहून एखादा गाढव (अयोग्य व्यक्तीही) राज-ऐश्वर्य भोगतो. राजवाड्यातच लोळतो राजाप्रमाणेच त्याच्या शरीरालाही अत्तरादी सुंगधी द्रव्यांचा भोग प्राप्त होतो. है अर्थात एका मूर्ख आणि भ्रष्ट राजाच्या राज्यात एखादा मुर्ख देखील सन्माननीय पदावर असू शकतो. अपूज्या यत्र पूज्यन्ते। चे छान उदाहरणच हा दोहा आपल्यासमोर ठेवतो.
इतकेच काय जिथे सगळेच विद्वान तिथेही हीच अवस्था होते. हा श्लोक पाहा,
सर्वे यत्र विनेतारः सर्वे पंडितमानिनः।
सर्वे महत्त्वमिच्छिन्ति कुलं तदवसीदति॥
जिथे, ज्या कुळात (समाजात / राज्यात / देशात) सगळेच पुढारी, नेता असतात; जिथे सर्वजण स्वतःला पंडित/विद्वान समजतात; जेथे प्रत्येकालाचा मोठेपणा, मानसन्मान हवा असतो; त्या कूळाचा (समाजाचा/राज्याचा/देशाचा) विनाश होतो.
असो, तर अशा अपूज्य व अयोग्य शासकाचे प्रशासनही स्वैर व मर्यादाहीन असते आणि मनुष्य आपली मर्यादा सोडून निसर्गनियमांविरुद्ध वागला तर मग खालील तीन गोष्टींचं प्राबल्य वाढणारच.
१. दुर्भिक्ष (दुष्काळ, अनावृष्टी, अतिवृष्टी, वादळ, पूर, भूकंप, रोगराई), २. भय, आणि ३. मरण. अपूज्य, अयोग्य व्यक्तीच नव्हे तर अयोग्य स्थानी असलेले अपूज्य अवस्थेतील लिंगही सामान्य जनांकडून दुर्लक्षित झाल्याने तेथे अयोग्य कर्म करणारे लोक अश्रय घेतात. हे सांगताना जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात.,
स्मशान ते भूमि प्रेतरूप जन।
सेवाभक्तिहीन ग्रामवासी॥१॥
भरतील पोट श्वानाचिया परी।
वस्ति दिली घरीं यमदूतां॥ध्रु.॥
अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा।
ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥२॥
तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती।
यमाची निश्चिती कुळवाडी ॥३॥
रहिमदास एका दोह्यातून अशाच अपूज्य वाईट लोकांच्या संगतीचा परिणाम काय होतो हे सांगतात,
ओछे को सतसंग रहिमन तजहु अंगार ज्यों।
तातो जारै अंग सीरै पै कारौ लगै॥
वाईट लोकांचा सहवास चांगल्या माणसांनी सोडून द्यावा कारण त्यांची संगत निखार्यासारखी असते. ज्याप्रमाणे जळता निखारा हातात घेतला तर पिळतो आणि विझलेला निखारा हातात घेतला तर हात काळे होतात. दोन्ही प्रकारे तो नुकसानच करतो. व्यक्ती असो वा स्थान, अयोग्य आणि अपूज्य असेल तर, त्यांबाबत अनुचित तेच घडणार. हे वरील उदाहरणातून निश्चितपणे लक्षात येते. ह्या अर्थीच अपूज्या यत्र पूज्यन्ते ही लोकोक्ती प्रचलीत झाली असावी.
चिंतन लेखक :- अभिजीत काळे सर