वर्षाकाल वर्णन
(कवि :- कृष्णदयार्णव)
पुढे पुढे प्रबळ मेघ । नभी दाटती पैं अमोघ ।
शुभ्र धूसर सजल सांग । सावेग रंग पालटती ।।१।।
वर्षाकाळ आला असता मोठे मोठे खुपसारे शुभ्र काळेशार ज्यात ओतप्रोत जल
भरलेले आहे असे मेघ आकाशात एकत्र होतात.
नभ आच्छादे निबिड घनीं । माजी गर्जना दीर्घ
ध्वनी ।
विद्युल्लतांचिया स्फुरणीं । दृश्य दिसोनी
हारपे ।।२।।
त्या पाण्यांनी भरलेल्या निबिडतर ढगांमुळे संपूर्ण आकाश भरले जाते.
आणि त्या मेघांची गर्जना आणि विद्युल्लतेचा कडकडाट भुतलावरील प्राण्यांच्या मनात
हर्षयुक्त भिती निर्माण करतो.
चंद्र सूर्य तारांगणें । घेती अभ्रांची
प्रावरणे ।
स्पष्टास्पष्ट प्रमाहीने । तेणें गुणे
भासतीं ।।३।।
ते
घणदाट मेघ चंद्रसूर्यादि तारांगणांना झांकोळून टाकतात. जणु काही त्या तारांगणांनी
मेघांचे प्रावरण घेतले आहे इतके ते दृश्य मनोहर असते. प्रमा = मर्यादारहीत असलेला
सूर्यप्रकाशही लोपून स्पष्ट दिसणाऱ्या वस्तु अस्पष्ट दिसायला लागतात.
सजल मेघांच्या येती सरी । तेव्हां झांकोनि
जाती गिरी ।
जळे वाहती पृथ्वीवरी । चिंता अंतरी पाथिका
।।४।।
मग
नंतर त्या जलयुक्त मेघांच्या सरी वर्षतात तेव्हा गीरी, डोंगरही दिसेनाशे होतात.
संपूर्ण पृथ्वीवर ते जल उतार दिसेल तिकडे वाट करीत वाहते. रस्तांवर झालेला चिखल
प्रवासी लोकांच्या मनात चिंता निर्माण करतो.
विद्युल्लता कडकडाटी । महामेघांचिया दाटी ।
चंडवायो झडझडाटी । करी दिग्पटी सकंप ।।५।।
मोठमोठाले
दाटलेले मेघ त्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याने वाहणारा वारा सर्व दिशांना
थरारून सोडतो.
जैसे करुणावंत पुरुष । संतप्त जाणूनि जनास ।
वेंचूनि आपुलें अर्थायुष्य । देती तोष
सर्वस्वें ।।६।।
पावसाची
आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्राणीमात्रांसाठी तो जलधारी मेघ कसा आहे म्हणाल, तर जसा
एखादा उदार परोपकारी श्रीमंत माणूस दुष्काळाने गांजलेल्या गरिब लोकांसाठी आपले धन
आणि आयुष्य दोन्ही खर्ची घालतो.
तैसेचि जाण चंड घन । मोक्षण करुनि निज जीवन
।
या जगासी आप्यायमान । सदया समान करिताती ।।७।।
तसेच
ते मेघ आपले जिवन पूर्ण खर्ची करून या जगाला समृद्ध आणि सुखी करून टाकतात.
जलचरा जीवविती जीवन । तृणांदिका अभिवर्षण ।
भूचरां खेचरां तृण धान्य । आप्यायन पौष्टिके
।।८।।
ते
मेघ जलाशयातल्या जलचरांना जीववतात, तृण गवतांवर जणुकाही अमृतसिंचन करतात. भूचर
खेचरांना तृण धान्य मिळते त्यामुळे त्यांची पुष्टता होऊन आयुष्यवृद्धी होते.
ग्रीष्मकाळींचा महा आतप । तेणे शोषूनि गेलें
आप ।
विपर्ण झाले पादप । लोप झाला तृणाचा ।।९।।
ग्रीष्म
ऋतुत आपल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी तापणारा सूर्य या पृथ्वीवरचे सगळे पाणी शोषून घेतो.
पादप = वृक्षवल्ली, विपर्ण = पाने त्या वृक्षवल्लीं पाने गळून पडतात. आणि गवत तर
नाहिसेच होते.
दावानळे जळाली तृणें । झाडी न थरती जीर्ण
पानें ।
आहळली वाळली वठली उष्णें । ती संपूर्ण
खांकरली ।।१०।।
दावानल
= अरण्यात लागणारा वणवा ; डोंगरात लागलेल्या वणव्यामुळे तृण गवत सगळे जळून जातात.
मोठ्या झाडांची पाने अग्निच्या शेकामुळे वाळतात आणि पूर्णपणे खरतात.
तृणीं वनीं जीवनी जंतु । ग्रीष्मता पावले अंतु
।
कृषि संपूर्ण सस्यरहितु । तापें श्रमित
धरित्री ।।११।।
ग्रीष्मऋतु संपता संपता अरण्यातले जीव जंतु सर्व नष्ट होतात. आणि
शेती करणेही पूर्ण बंद होते. संपूर्ण धरित्री, पृथ्वी तप्तायमान होते.
देखोनि कृशता धरित्री अंगीं । देव
म्हणिजे महामेघी ।
मीढ शब्दें
शिपितां वेगीं । पुष्टता सर्वांगी जाहली ।।१२।।
संपूर्ण
पृथ्वी पाण्याशिवाय कृश झालेली पाहून देवांचा राजा इंद्र चतुर्विध मेघांना
वर्षण्याची आज्ञा करतो आणि ते मेघ अतिवेगाने जलवर्षाव करतात आणि सपूर्ण पृथ्वी
पुन्हा पुष्ट होते.
पावसामुळे ती पृथ्वी पुन्हा पुष्ट कशी होते, त्यासाठी कवि उपमा देतात
-
पतिव्रता विरहतापें । कृशता पावे विरहपापें
।
पुढती लाहाता स्वामिकृपें । होय कंदर्प
संतुष्ट ।।१३।।
जशी
एखादी पतिव्रता स्त्री पतिच्या विरहाने कृश होते. आणि पुन्हा पतिची भेट झाल्यावर
तिला शारीर मानसिक सुख रतिसुख प्राप्त होऊन ती संतुष्ट होते.
किंवा सकाम तापस । कृच्छ्रे तनु करिती कृश ।
सफल होता त्यांचे क्लेश । पावती तोष
पुष्टत्व ।।१४।।
किंवा
काहीतरी मनात इच्छा ठेवून तप करणारे लोक नाना प्रकारचे उपवास करून आपले शरीर कृश
करतात. आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर पुन्हा खाऊन पिऊन स्वस्थ होतात.
तैशी पृथ्वी अष्ट मास । उष्णता होतां कृश ।
यथाकाळ ते पाऊस । वर्षतां तोष पावली ।।१५।।
तशी ही पृथ्वी आठ महिने उष्णतेमुळे जणूकाही कृष होऊन जाते. आणि चार
महिने पडणाऱ्या पावसाने पुष्ट होते.
मृत्तिका सांडोनि कठोरत्व । प्रकटे सर्वांगी
मार्दव ।
उखरी अखरी जे जे जीव । जीवने सर्व तोषती ।।१६।।
पावसाच्या पाण्यामुळे माती आपले कठोरत्व टाकून मृदुता धारण करते. आणि
त्या पाण्यामुळे आखरातले, गावातले सर्व जीव मनुष्य तोष पावतात.