(30-09-2021)
(मराठी प्राचिन काव्य रसग्रहण)
मनोगत
प्राचिन संस्कृत काव्यांमध्ये महाभारत हे
महाकाव्य म्हटले गेले आहे. महाभारताची श्रेष्ठता वाखानताना एक सुभाषितकार म्हणतो, ‘भारतो पंचमो वेदः’ अर्थात
महाभारत हे काव्य जणुकाही पाचवा वेदच आहे. महाभारत हे अत्यंत रोचक आणि मनोरंजक काव्य
होय. महाभारतात तत्कालिन सामाजिक स्थीतीचे वर्णन व्यासाने अत्यंत कुशलपूर्वक केले आहे.
महाभारतात एकूण अठरापर्व आहेत पैकी ४थे पर्व अर्थात विराटपर्व हे खुपच रंजक आहे. या
४थ्या पर्वाचा मराठी श्लोकबद्ध अनुवाद महाराष्ट्रातील कवि वामनपंडित ‘विराट पर्व’ या नावाने
केला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या काव्यग्रंथात वामन पंडितांनी यमक अलंकार, अनुप्रास
इत्यादिकांचा मुक्त वापर केला आहे. काव्यालंकारातील त्यांची समर्थता पाहून रामदासांनी
त्यांची एका आर्येमध्ये स्तुती करून त्यांना ‘यमक्या वामन’
ही पदवी दिलीआहे. कौरवांनी पांडवांना द्युतात छल-कपटाने हरवून त्यांच्यावर १२ वर्षे
वनवास व एक वर्ष अज्ञातवास लादला. हे सर्व श्रुत आहेच. यातील एक वर्ष अज्ञातवास हा
अतिशय कठिण काळ, कठिण परिक्षेचा, कसोटीचा, सचोटीचा, तसेच या अज्ञातवासात पांडवांवर
बेतलेले बिकट प्रसंग, चित्तथरारक संकटं, या कठिण प्रसंगी पांडवांनी राखलेला संयम धैर्य
व त्यातून आपली केलेली मुक्तता, अशा प्रसंगी त्यांना वेळोवेळी अनेकांचे लाभलेले आशिर्वाद
देवादिकांनी दिलेले वरदान, आणि परब्रम्ह भगवान श्रीकृष्णांचे कृपाछत्र त्यामुळे पाचही
पांडव यातून सहीसलामत सुटले. हे सर्व वर्णन अगदी रसपूर्णतेने या ग्रंथात पाहावयास मिळते.
या ग्रंथाच्या श्लोकात वामनपंडितांनी क्लिष्टता निर्माण केली असल्याने या ग्रंथाबरोबर
एक म्हण रुढ झालेली आहे. ‘ज्याला असेल विद्येचा गर्व,
त्याने पाहावे विराटपर्व’ आणि ही म्हण
तंतोतंत खरी आहे. या ग्रंथाच्या अर्थाचे जाणकार संपूर्ण महाराष्ट्रात जरी म्हटले तरी
बोटावर मोजण्या इतकेच असतील.
या ग्रंथात वामन पंडितांनी श्लोकनिर्मिती करताना विविध छंद वापरलेले आहेत. या ग्रंथात श्लोकरचनेकरीता वामनपंडितांनी एकूण सोळा छंदांचा वापर केला आहे. ते नावासहीत आपण श्लोकाच्या आधी पाहणारच आहोत. -
वामनपंडितकृत
सार्थ विराटपर्व (श्लोक १ ते ५)
छंद :- वसंत तिलका
वंदुनि पादकमळा, कमळावराने ।
जे पूजिले हरविरंचि सुरेश्वराने ।
आरंभ तत्प्रियकथानक वैभवाचा ।
वाचा करी सकळ दोष हरी भवाचा ।।१।।
ज्या श्रीकृष्णभगवंतांचे पदकमळ कमळावर = विष्णुने वंदिले :।: जे पूजिले हरविरंचि सुरेश्वराने । हर - महादेव । विरंचि - ब्रम्हा । सुर - आणवादि देवतागण त्यांचा ईश्वर तो इंद्र इत्यादि देवतांनी पूजिले. ब्रम्ह्याने गोपवासरे नेली तेव्हा त्याचे गर्वहरण केले तै स्तुती केली. गोवर्धनोद्धारण तै इंद्रे पुजिले. । आरंभ तत्प्रियकथानक वैभवाचा तत् - त्यास प्रिय असलेले जे पांडवादिक भक्त त्यांचे कथानक वैभवातले एक पर्व अर्थात विराट पर्वाचा मी आरंभ करीत आहे. । वाचा करी सकळ दोष हरी भवाचा ही मंगळ अशी पुण्यपावन कथा वाचल्याने भवाचा दोष = संसाररूप दोष तो हरला जातो. ।।
न ज्यांत ये हरिकथा नच तत्प्रियांची ।
धिग् वैखरी जरि सरस्वति आत्मयाची ।
चातुर्य व्यर्थ कविता जनभाळना हो ।
शोभेल किंशुकफुलीं सुरभाळ ना हो ।।२।।
अर्थ :- न ज्यांत ये हरिकथा नच तत्प्रियांची म्ह. ज्या प्रबंधात, ग्रंथात हरिकथा न म्ह. श्रीकृष्णभगवंतांच्या अमृतश्राविया लीळांचे वर्णन नाही. आणि नच तत्प्रियांची म्ह. त्या भगवंताला प्रिय असलेले जे भक्त त्यांचेही वर्णन जी वाचा करत नाही. ज्या कथेमध्ये परमेश्वर भक्तांचेही वर्णन नाही ती । धिग् वैखरी - त्या वाचेला धिक्कार असो! मग ती वाचा जरि आत्मयाची म्ह. (आत्मभूः असे ब्रम्ह्याला म्हणतात.) ब्रम्ह्यांच्या सरस्वतीची जरी असली तरी त्या सरस्वतीच्या वैखरी वाचेलाही धिक्कार असो! का त्यात जर परमेश्वराचे, परमेश्वराच्या भक्तांचे जर वर्णन नाही तर ती कथाही व्यर्थच आहे. । चातुर्य व्यर्थ कविता जनभाळना हो म्ह. इतर अशा असंख्य कविता आहेत, त्या नवरस, नाना प्रकारच्या उपमा, श्लेष उत्प्रेक्षादि अलंकारादिंनी परिपूर्ण असून त्या रसिक श्रोत्यांचे उत्तम प्रकारे मनोरंजनही करतात पण त्या कविता व्यर्थ होत. का त्यात परमेश्वराचे वर्णन नाही. जसे कवीश्वरबासांनी श्रीउद्धवगीतेत म्हटलेले आहे, ‘पुराणीचे दळवाडे : रसांळंकार साबडे : परि भावो न निवडे : कळाविदासि ।।:’ तेणेन्याये त्या इतर कवींच्या कवितांमध्ये भक्तीरस अथवा शांत, निर्वेद रसाचा भाव निवडत नाही. म्हणून ती कविता निरर्थक वाटते. । कोणेन्याये निरर्थक वाटते? शोभेल किंशुकफुलीं सुरभाळ ना हो ।। : किंशुकफुलीं म्ह. पळसाची फुले. पलाशपुष्पे ती दिसायला चांगली आकर्षक, आरक्त वर्णाची अतिशय मोहक असतात. पण त्यांना सुगंध नसतो, असं सुगंधरहित फुल सुरभाळ म्ह. देवतेला वाहिली तर ते उपयोगी ठरेल का? नाही. तसं ज्या काव्यात, कथेत परमेश्वराची भक्ती हाच सुगंध नाही त्या कथेला काहीतरी अर्थ आहे का बरं! ।।
कवीची नम्रवृत्ती
छंद :- शार्दुल विक्रिडित
नेणें सद्गुरुलक्षणें क्षणलवें तत्संग संरक्षणे ।
केली नाहिं निरीक्षणें तमभरें मन्नेत्र दुर्लक्षणे ।
माझा यादव मायबाप मजला तारीं दयार्द्रंक्षणें ।
त्याचे पंक्तिस षड्रसान्न समयीं केलीं सदा भक्षणें ।।३।।
अर्थ :- नेणें सद्गुरुलक्षणें क्षणलवें = माझ्या सत्गुरुचे एकही लक्षण माझ्याठिकाणी नाही. गुरुचे सन्निधान केले पण मी वेळुवासारखा भितरी पोकळ राहिलो. क्षणभरही आणि अल्पकाळदेखिल मी श्रीगुरूंची सत्लक्षणे, प्रमाणोक्त उठीबैसी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. । तत्संग संरक्षणे = त्या श्रीगुरुंचा सत् = पवित्र असा संग तो माझे अनेकापरीच्या अविधींपासून संरक्षण करतो. माझ्या धर्माचे संरक्षण होण्यासाठी श्रीगुरूंचे सान्निध्य लाभले परंतु मी केली नाहिं निरीक्षणें म्ह. त्यांच्या आचाराविचारांचे निरिक्षण करून ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला नाही. का मन्नेत्र = माझे नेत्र ते तमभरें = अज्ञान, अन्यथाज्ञानरूपी अंधकारानी भरलेली आहेत. म्हणून मला गुरुंचे अनुकरण करताच आले नाही. आणि ते नेत्र दुर्लक्षणे = चतुर्विध मार्गाचे दोषच पाहणारे असे नेत्र अवलक्षणी नेत्र त्यांच्याकडून श्रीगुरुंच्या सद्गुणांचे निरिक्षण झालेच नाही. । माझा यादव मायबाप मजला तारीं दयार्द्रंक्षणें । असा मी दुर्मती असलो कितीही अभागी असलो तरीही माझा मायबाप तो श्रीकृष्ण भगवंत तो आपल्या दयारूपी श्रीनेत्रांनी माझ्यावर कृपाकटाक्ष टाकील आणि माझे संरक्षण करील. :।: त्याचे पंक्तिस षड्रसान्न समयीं केलीं सदा भक्षणें = श्रीगुरुंच्या सन्निधानात राहून, किंवा त्या श्रीकृष्णदेवांच्या भक्तांच्या ओळीत राहून मला उत्तमोत्तम पदार्थ खायला मिळाले. पण त्यामुळे मला जाड्यच आले. :।।: मग षड्रसान्न स्थानी पंच प्रकारक ब्रम्हविद्या शास्त्र आणि लीळारूपे चरित्रे ते कर्णपुटी पान करावया मिळाले. पण मी पाण्यांतुल गुंडेयासारखा वरवडेच भिजलो. किंवा कपाळपरिक्षेचेनि न्याये. या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले. ।।
छंद :- भुजंग प्रयात
प्रभावें तया षड्ररसान्ना रसाच्या ।
मनोभृंग किंचित् कथा सारसाच्या ।
हरिच्या जडे कीं कृपा अक्षपातें ।
सदा पाहिलें माझिया पक्षपातें ।।४।।
अर्थ :- प्रभावें तया षड्ररसान्ना रसाच्या = श्रीगुरुंचे ते सबीज ओले, शास्त्र आणि भगवंतांची चरित्रे या निरूपणाच्या प्रभावाने माझा मनोभृंग किंचित् त्या सारसाच्या = भक्त आणि भगवंताच्या कथारूप कमळांच्या ठाई रेंगाळत आहे. (सारस = दोन : हा अभिधानिक शब्द आहे. सारस नावाचा पक्षी ते जोड्याने राहतात. त्याला चक्रवाकही म्हणतात.) आणि असा त्या देवा-भक्तांच्या कथेच्या ठाई रेंगाळणारा माझा मनोभृंग हरिच्या = श्रीकृष्णदेवाच्या अक्षपाते = दृष्टीक्षेपानेच जडे की = रममाण होईल. अक्ष = डोळे, नेत्र : आणि त्या श्रीकृष्णदेवाच्या कथांना आणि ज्ञानिया भक्तांच्या कथांकडे नेहमी पक्षपाताने बघत राहिलो म्ह. त्या कथांमध्ये दोष पाहत राहिलो. ।।
छंद :- वसंत तिलका
ऐका कथा सरस भारतवंशजाची ।
काची मतीभ्रम हरीजन साधकाची ।
लाधेल उंच पद सज्जन अक्षराचें ।
होतांच या श्रवण सत्कथनाक्षरांचें ।।५।।
अर्थ :- कवि श्रोत्यांना म्हणतो, आता मी भारतवंशजांची = कुरुकुळात भरत नावाचा राजा होऊन गेला त्याचे वंशज पांडव, त्या पांडवांची सरस = षड्रसपरिपुर्ण अशी कथा वर्णन करीत आहे ती ऐका! :।: हरीजन = श्रीकृष्णभगवंतांचे भक्तजन त्या साधकाची = अनन्यभक्तीरूप साधना आचरणारे असे ते ; त्यांची काची मति = साह्य वर्तण्याविषयी जर प्रतिती पातळ असेल आणि भ्रम = मनांत किंतु परंतु असेल तर ते या कथाश्रवणाने दुर होईल. का पांडवांना पावला पावलावर साह्य झाले. :।: आणि या कथेचे एक अक्षर जरी श्रवण झाले तरी सज्जन असे भक्त त्या अक्षराचे = परमेश्वराचे पद लाहतात. न क्षरतीति अक्षरः ।।
पुढे वामन पंडित म्हणतात-
छंद :- शार्दुलविक्रिडित (गण- म स ज स त त ग)
श्रीमद्भारत वेदसार म्हणती, अष्टादशी पर्व जे ।
त्यां माजी चवथें विराट वदला, तो व्यास आपूर्व जे ।।
वैशंपायन सांग सांगत कथा, जन्मेजयाच्या मना ।
जेणें होय विशेष पूर्वजकथा, ऐकावया कामना ।।६।।
अर्थ :- श्रीमद्भारत वेदसार म्हणती = विद्वान लोक महाभारताला वेदांचे सार म्हणतात. । अष्टादशी पर्व जे = त्या महाभारतात जे अठरा पर्व सांगितलेले आहेत. । त्यां माजि चवथें आपूर्व जे विराट = त्या मध्ये अपूर्व असे जे चवथे ‘विराट पर्व’ ते तो व्यास वदला = व्यासाने वर्णन केले. । पुढे वामनपंडित म्हणतात. ही कथा = म्ह. विराटपर्व वैशंपायन = वैशंपायन नावाचे ऋषी ते सांग = स+आंग = अंगासहीत अर्थात पांडवांच्या जीवनात त्या काळात घडलेल्या सर्व घटनांचे बारकावे सांगत = सांगून जन्मेजयाच्या मना = जन्मेजय राजाच्या मनात ठसवत आहेत. जेणें विशेष पूर्वजकथा, ऐकावया कामना होय = म्ह. पूर्वजांची विशेष अशी कथा मन लावून ऐकण्याची इच्छा आपल्याला मनात दृढ होते. ।।
छंद :- भुजंग प्रयात (गण - य य य य)
म्हणे भूपती भारताची कथा रे । न ऐकें तरी काळ वाटे वृथा रे ।
न थारे मन स्वल्प संदेह जाची । तरी सांग पुढें स्थिती पूर्वजांची ।।७।।
अर्थ :- त्या वैशंपायन ऋषिचे भाषण ऐकून श्रोता राजा जन्मेजय तो काय म्हणतो की, हे ऋषिवर ! ही महाभारताची कथा जर न ऐकली तर काळ व्यर्थ गेला असे वाटते. म्हणून पांडवादि भक्तांची कथा ऐकण्यासाठी अंतःकरण सादर असावे लागते. आणि ती कथा जर ऐकायला मिळाली नाही तर मन न थारे = स्थीर राहत नाही. ती कथा ऐकताना स्वल्प संदेह जाची = अल्प संदेह जरी उत्पन्न झाला तरी तो मनात घोळत राहतो. ‘हे कसं झालं असेल? ते कसं झालं असेल?’ मुनिवर्या तुम्ही सांगत आहात त्यामुळे सगळे संदेह दुर होत आहेत. म्हणून हे वैशंपायन ऋषिवर्या ! सांग पुढें स्थिती पूर्वजांची = माझ्या पूर्वजांची स्थीती पुढे कशी होती? १२ वर्षाचा वनवास संपल्यानंतर पुढील १ वर्षाच्या अज्ञातवासात माझ्या पूर्वजांचे काय झाले? ।।
छंद :- शार्दुलविक्रिडित
वर्षे द्वादश लोटलीं न घटली ज्यांची धिरे काननीं ।
तैसी ते द्रुपदात्मजा विचरली सत्त्वें मृगांकाननीं ।।
ते सर्वज्ञमुखें तुझे करुनियां आकर्णिलें विस्तरें ।
आतां सांग चरित्र जें प्रगटलें अज्ञातवासांत रें ।।८।।
अर्थ :- पुढे वैशंपायन ऋषि राजाला म्हणतो, हे राजन् ! वर्षे द्वादश लोटलीं = अज्ञातवासाची बारा वर्षे लोटली परंतु बारा वर्षे काननीं = भयानक अशा अरण्यात राहूनही ज्यांची धिरे = धैर्ये न घटली = किंचित देखिल कमी झाली नाहीत । तैसी = त्याचप्रमाणे मृगांकाननीं = चंद्रासारखे तेजस्वी आणि सुंदर मुखचंद्र असून अत्यंत सकुमार अशी ते द्रुपदात्मजा = द्रुपदराजाची मुलगी (द्रुपद+आत्मजा) द्रौपदी ती सत्त्वें विचरली = अत्यंत सत्वाने पतिव्रता धर्माचे यथोक्त पालन करून त्या पांडवांबरोबर वनवासात फिरली. ते = हे बारावर्ष वनवासाचे वर्णन सर्वज्ञमुखें तुझे करुनियां = महाभारताबद्दल सर्व जाणणाऱ्या तुझ्या मुखातून मी विस्तरें आकर्णिलें = सविस्तारपूर्वक ऐकले आहे आणि आतां सांग चरित्र जें प्रगटलें अज्ञातवासांत रें = आत इथून पुढे वनवासापेक्षा कठिण अशा एक वर्षाच्या अज्ञातवासात पांडव कसे राहिले? पांडवांनी आपल्या शौर्याचे तेज कसे लपवले? द्रौपदीने आपले अद्वितीय सौंदर्य कसे लपवले? धर्मराजाचे सत्य बोलण्याचे व्रत शेवटपर्यंत टीकले की नाही? हे सर्व मला सविस्तरपणे सांग ।।
छंद :- द्रुत विलंबित (गण - न भ भ र)
मुनि म्हणे परिसें नृपकेसरी । सगुणतेस तुझ्या न टिके सरी ।
करिसि प्रश्न अलौलिक फारसा । करुनियां मन निर्मळ आरसा ।।९।।
अर्थ :- वैशंपायन मुनि म्हणतात, हे नृपकेसरी अशा जन्मेजय राजा तु फार गुणवान आहेस! हे महाभारत भावपूर्वक ऐकणारा तुझ्या सारखा गुणवान श्रोता मला आतापर्यंत कुणी सापडला नाही, सगुणतेस तुझ्या न टिके सरी = तुझ्या गुणवत्तेच्या पुढे कुणीही टीकणार नाही. कारण आरसा मन निर्मळ करुनियां = तु तुझे अंतःकरण, मन आरश्यासारखे निर्मळ करून मग फारसा अलौलिक प्रश्न करिसि = आतापर्यंत कुणी न विचारलेला प्रश्न तु मला विचारतो आहेस त्यामुळे माझे मन अत्यंत प्रसन्न झाले आहे. ।।
छंद :- इंद्रवज्रा( गण - त त ज ग ग)
प्रमाण संवत्सर द्वादशांचें । वनीं क्रमोनी अति दुर्दशांचें ।
अज्ञातवासास कसें करावें? । तो धर्म बोले अतिशोकरावें ।।१०।।
अर्थ :- वैशंपायन मुनि पुढे कथा प्रारंभ करतात. पाचही पांडव आणि द्रौपदी अरण्यात एका वृक्षाखाली बसले तेव्हा तो धर्म बोले अतिशोक रावें = तो धर्मराजा अतिशोकयुक्त शब्दाने आपल्या भावांना उद्देशून म्हणतो- प्रमाण संवत्सर द्वादशांचें = बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास असे ठरले होते. तर आता १२ वर्ष वनवासाचा अवघड काळ संपलेला आहे. आम्ही एवढे मोठे राजे असून, सर्व सुखे पायाशी लोळत होती, तरी त्या वनीं = वनवासात अति दुर्दशांचें क्रमोनी = अति दुर्दशेने भरलेला काळ क्रमून, कंदमुळे, फळे खाऊन, ऋषिलोकांमध्ये राहून, अरण्यांत हिंस्र पशुंच्या सहवासात बारा वर्ष राहून आपण तो काळ घालवला, तो कसातरी निभावून नेला पण आता अज्ञातवासास कसें करावें? कारण आपल्या बंधुंचे तेज तो धर्मराजाला चांगले माहीत होते. ते त्यांचे शौर्याचे तेज लपवणे अत्यंत अवघड होते. म्हणून त्याला प्रश्न पडला की, आता या एक वर्षाचा अज्ञातवास कुठे काढावा? ।।१०।।
छंद :- भुजंग प्रयात (गण - य य य य)
सुचेना पुढें कांहिं त्या अद्वयातें । विचारी तदा द्वंद्व बंधुद्वयातें ।
असे लोटणें बाप हो एक साला । महादुष्ट संताप होई कसाला ।।११।।
अर्थ :- पुढे अद्वय = धर्मराज युधिष्ठिर ; (त्याच्यासारखा दुसरा कुणी नव्हता म्हणून त्याला अद्वय म्हटले ; अ-नाही/द्वय-दुसरा) अशा युधिष्ठिराला काहीच सुचत नाही, ‘काय करावे?’ विचारी तदा द्वंद्व बंधुद्वयातें = म्हणून तो आपल्या चारही भावांना विचारतो. (द्वंद्व- दोन/ बंधुद्वय- दोन = चार) । बाप हो! = अरे बाबांनो! एक साला लोटणें असे = एक वर्ष आपल्याला लोटायचे आहे. आणि त्या एक वर्षात जर आपल्याला कुणी ओळखले तर पुन्हा महादुष्ट अशा बारा वर्षाचा वनवासाच्या कसाला = त्रासाला आपल्याला भोगावं लागेल. तो महाभयंकर असा संताप आपल्याला प्राप्त होईल. आपल्या खुप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल ।।
छंद :- शिखिरिणी (गण - य म न स भ ल ग)
क्षुधा बाधी साधी कवण तयिं या वायुतनया ।
न याया सिंधूला सकळ नृपती लीन विनया ।
न याच्या सामर्थ्यासम बळि असे अन्य दुसरा ।
सराया युद्धीं यां कठिण करदुर्मुष्टिघसरा ।।१२।।
अर्थ :- पुढे युधिष्ठिर राजा म्हणतो, या वायुतनया क्षुधा बाधी साधी तयिं कवण : हा वायुतनया = वायुदेवतेचा पूत्र भिम त्याला जर भुक लागली तर त्याला खायला कोण देणार? कारण कमी अन्नाने त्याची भुक भागत नाही. त्याला भरपूर अन्न लागते. असं जरी असलं तरी न याया सिंधूला सकळ नृपती लीन विनया = या भिमाचा पराक्रम पाहून पृथ्वीवरचे सर्व राजे त्याच्या पुढे नतमस्तक होतात. न याच्या सामर्थ्यासम बळि असे अन्य दुसरा । या भिमासारखा बलवान पराक्रमी या भुतलावर दुसरा कोणी नाही. याच्या शौर्यासमोर दुसरा कोणी तग धरू शकत नाही. युद्धीं यां कठिण करदुर्मुष्टिघसरा सराया = युद्धामध्ये याच्या मुष्टीचा एक ठोसा जर बसला की शत्रु कितीजरी मोठा योद्धा असला तरी त्याचे जिवंत राहणे कठिण होते, तो तत्काळ गतप्राण होतो. महाभारतात हत्तीचे शेपूट धरून कर्णावर हत्ती फेकला असे भीमसेनाच्या पराक्रमाचे वर्णन आलेले आहे.
उर्वरित पुढच्या भागात -
© कॉपिराईट