प्राचिन मराठी कविता रसग्रहण
कवि परिचय :-
नाव :- अमृतराय
जन्म :- शके १६२०
गाव :- साखरखेर्डा ता. मेहकर
अमृतराय हे किर्तनकार व शीघ्र कवि होते.
जीवदशा - कटाव (कवि -
अमृतराय)
सदर कवितेत अमृतराय नावाच्या
कवीने ‘कटाव’ हा काव्य प्रकारात जीवदशेचे वर्णन केले आहे.
सज्जन हो निजगुज आपुलें
उमजाना,
हरिलागिं भजा ना ।।धृ०।।
नऊ मास गर्भात सांपडे,
मूत्र मलादिक फार सांकडे ।
तनुसि तोडिती जंतू कीडे,
बहु श्रमाने बाहेर पडे, ।।
स्मरण मुळींचे सर्व विसरला,
कोहं कोहं रडू लागला ।
दिवसा मासा वृद्धि पावला,
क्षणक्षणा अपघात चूकला ।।
धनमदगर्वे फार दाटला,
अहंपणाचा पूर लोटला ।
पांच विषयामाजि बाटला,
पापाचरणे मनीं काटला ।।
भला थाटला संसार अपार,
थोर करितो कारभार ।
महाल मुलुख जागीर
इजारा, कमाविसदारी ।।
भारि पसारा, सावकारी,
हत्ती घोडे सैन्य शिबीका ।
वा पोषाख कानि चौकडा,
सुंदर वनिता प्रिया नवोढा ।।
शहाणपणाचा गर्व गाढा,
मनसोब्याचा करी निवाडा,
वाडा रंगित रंगमहाल, सोनेरी बैठका,
जरीभर्जरी तमाम ऐने,
काम मुलायम फिरंगाणी ।।
बिल्लोरी फाणसें, मिनेगारी किनखापी पडदे, ।
खणोखणी रेशमी गालिचे, बागबगीचे, ।।
रागरंगामधि गुंग बेटा, निसंग मोठा, ।
अभिमानाचा चढला ताठा, उन्मत्त खोटा, ।।
धर्माविषयी फार करंटा,
त्याच्या बंधुनि धरल्या वाटा, ।।
अग्नी तस्कर करिति
चपेटा, आटापीटा, ।।
राजदंड उदंड उदेले, भंड निघालें,
लंडपणे प्रचंड भोगिलें ।।
परोपरीची छी थू अवघी मारामारी,
जरेबंद कडाकड सोटे मारी
कमचा पाठीं उडती भारी, या या परिचे जाच शरीरी
हृदयीं मस्तकी शिळा
भारी
वेढितां जड खोडी बेडी,
पायिं रोकडी, प्राप्त देहुडी
तरी येइना कबूल कवडी,
अधिकारी घरदार सांवडी
सर्वहि नेली घोडीपाडी,
उरली नाही एकहि कवडी
पहिली होती बिनी
वांकडी,
शालजोडीला शेलाजोडी
देव द्विजगुरु तडीतापडी,
त्यांसि क्रोधे फार
झडाडी
ईश्वर त्यांची मस्ती
मोडी,
आतां कैची उप्पर माडी
देशधढीवर गुढी लाविली,
दुष्कर्माची अभ्रें दाटलीं
पहा पहा रे डोळे उघडुनि,
पुढे यातना यमलोकींच्या, नानापरिंच्या,
जाणोनि एथेंचि कां रे सावध व्हा ना, हरिलागि भजाना ।।१।।
--------------
शब्दार्थ:-
निजगुज = स्वतःचे रहस्य
। उमजाना = जाणून घ्या । सांकडे = अत्यंत सांकड जागेत । बहुश्रमाने
बाहेर पडे = जन्मताना होणारे दुःख । कोहं कोहं =
मी कोण, मी कोण म्हणत रडु लागला । क्षणक्षणा
अपघात चूकला = लहान मुल बऱ्याच वेळा पडते सावरते
सतत बाळकाला जीवित हानीची भीती असते. । धनाच्या मदाने गर्वाने फुगला । पांच विषय = १) शब्द २) स्पर्श
३) रस ४) रूप ५) गंध । पापाचरणे मनी काटला = पापं करून मन दुषित झाले । महाल मिळाला । मुलुख जागीर = जहागीर मिळाली
। भारी पसारा =
मोठा पसारा थाटला । शिबीका = पालखी । नवोढा = तरुण षोडश वर्षीय स्त्री पत्नी झाली । मोठा वाडा रंगित महाल =
नर्तकींचे नृत्य आदि जिथे होते. । करंटा = धर्महिन, अधर्मी । अग्नी तस्कर करिति चपेटा = त्याच्या
वाड्याला आग लागली किंवा चोरांनी दरोडा घातला सर्व द्रव्य हिरावून नेले । अथवा राजदंड उदंड उदेले = राजाने दोषी मानून सर्व द्रव्य नेले ।
मग त्याला शिक्षा दिली त्याचे
वर्णन पुढे केलेले आहे.