(05-10-2021)
वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक १२ ते २२ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण)
अशी भीमाबद्दल
चिंता करून पुढे युधिष्ठिर अर्जुनाबद्दल चिंता व्यक्त करतो-
छंद :- वसंततिलका (त भ ज ज ग ग )
गांडिवपाणि तरणी करतुल्य भाज्या । भाज्यांपरी खुडि शिरें रिपुची सभाज्या
।
ऐसा कसा परम संकटवासकाळीं । कालिंदिवल्लभसखा लपवूं सकाळीं ।।१३।।
अर्थ :- गांडिवपाणि = अर्जून ; ज्याच्या
पाणि - हातात ; गांडिव नावाचे धनुष्य आहे
असा अर्जून ; त्या गांडिव धनुष्याचे ; भाज्या = तेज ; तरणीकर
= सूर्याच्या किरणांसारखे चमकदार आहे. ते धनुष्य
अर्जुनाला अग्नि देवतेने दिले होते. म्हणून ते अतिशय तेजस्वी
होते. त्यामुळे हा सुंदर आणि पराक्रमी असा अर्जुन तेव्हाच ओळखला
जाईल. या अर्जुनाचा पराक्रम काय वर्णन करावा, हा जर युद्धभुमीवर उतरला तर रिपुची शिरें भाज्यांपरी
खुडि सभाज्या = स्त्रीया जशा भाज्यांची देठे नखाने
खुडतात तसा हा शत्रुंची शिरे बाणांचा वर्षाव करून खुडतो. ; ऐसा कसा परम संकटवासकाळीं = अशा परमसंकट काळी कालिंदिवल्लभसखा = अर्जुन त्याला
मी सकाळीं = उद्या पहाटेपासून
अज्ञातवास सुरू होतो आहे तर त्याला कसा लपवूं ?
कुठे लपवू ? त्याला कुठे ठेवायचं? अशी चिंता युधिष्ठिर करतो आहे. ।।
(कालिंदिवल्लभसखा = कालिंदी - श्रीकृष्णभगवंताची आठ मुख्य राण्यापैकी एक राणी तिचा वल्लभ - श्रीकृष्णभगवंत ; त्याचा सखा - मित्र अर्जुन ।।)
राजा युधिष्ठिर
पुढे नकुलाविषयी म्हणतो,
छंद :- शालिनी (गण
:- न न म य य)
नकुळ कुळमणी हा शस्त्रपाणी सदा ही ।
अगणित रिपुवृंदें बाणअग्नींत दाहीं ।
अनुजहि नकुळाचा त्यापरी विक्रमीं रें ।
मदनतनु परी हा काळ कैसा क्रमी रे ।।१४।।
अर्थ :- सदा = नेहमी । पाणि = हातात । शस्त्र ठेवणारा
हा कुळाचा मुकुटमणीच जणु असा नकुल अत्यंत पराक्रमी आहे. अगणित
रिपुंचे = शत्रुंचे समुदाय
त्याच्या बाणांच्या अग्नित भस्म झाले आहेत. त्या नकुलाचा अनुज = सहदेव तोही त्याच्यासारखा
महा पराक्रमी आहे. आणि हा सहदेव मदनासारखा अत्यंत सुंदर आहे.
तो या एक वर्षाच्या अज्ञातवासात त्याची सुंदरता लपवून कालक्रमणा कशी
करील? आपण सगळे सहज ओळखले जाऊ :।।
पुढे द्रौपदीविषयी चिंता व्यक्त करीत धर्मराजा म्हणाला -
छंद :- भुजंग प्रयात (गण - य य य य)
सुधातुल्य जीची अती गोडवाणी । बरी साजिरी गोजरी कोडवाणी ।
अशा द्रौपदीच्या धरी काळजीला । न ठावा अशा संकटीं काळ - जीला ।।१५।।
अर्थ :- सुधातुल्य = जिची वाणी अमृतासारखी
गोड आहे. बरी = चांगली । साजिरी = अत्यंत सुंदर । गोजरी = गुलजार । कोडवाणी = म्ह. जिच्या सौंदर्याचे शिलतेचे कौतुकच करावे अशा द्रौपदीच्या काळजीने युधिष्ठिर चिंताग्रस्त झाला. अशा संकटीं = अज्ञातवासात हिला
कुठे ठेवायचे? बाकीचे सगळे पुरुष आहेत पण ही स्त्री आहे,
हिचं कसं होईल?
छंद :- शिखिरिणी (गण - य म न स भ
ल ग)
अशा नाना दुःखें विलपत नृपा धर्मसुत रे ।
तरे ज्याच्या नामें जन भवनदी सौख्यवत रे ।
तरी सत्त्वाचा तो उदधि न शिवे पातकमळा ।
मळा सौजन्याचा सदय न दुजा चित्तकमळा ।।१६।।
अर्थ :- हे
नृपा = जन्मेजया ! असं नानाप्रकारे
विलाप करत धर्मसुत = युधिष्ठिर दुःख करतोय. (धर्म = यमधर्म त्याच्या मंत्राने जन्मला म्हणून धर्मसुत)
: ज्याच्या नामाने हा अज्ञ जन भवनदी = संसाररूप
नदी सौख्यवत = सुखेच तरेल ; असा
युधिष्ठिर राजा त्याला इतके दुःख असूनही तो कधीच पाप करायला प्रवृत्ती होत नाही.
असा तो सत्त्वाचा उदधी = समुद्र त्याला
पातकमळ = पापरूप मळ कधीच स्पर्शत नाही. त्याने अंतःकरणानेही कधीच कोणाचे वाईट चिंतिले नाही असा निष्पाप युधिष्ठिर
त्याच्यासारखा सौजन्याचा मळा दुसरा कुणीही मिळणार नाही. असा युधिष्ठिर
राजा चिंता करतो. ।।
छंद :- इंद्रवज्रा( गण - त त ज ग ग)
ऐकौनि त्याच्या वचनप्रभावा । भावां मनीं सौख्य न सत्स्वभावा ।
भावार्थ कीं हा अमुच्या श्रमानें । माना जणूं टाकिल स्वप्रमाणें ।।१७।।
अर्थ :- धर्मराजाच्या बोलण्याला ऐकून चारी भावांच्या मनातून सुख निघून गेले.
आपल्याकरीता हा रडतो आहे, आपली चिंता हा करतोय,
असं पाहून ते मनातून खुप दुःखी झाले. भावार्थ असा
आहे की, हा धर्मराज आमच्या श्रमाने याला असे वाटते की,
हे माझ्याजवळ येऊन खाली माना घालतील अर्थात संकटातून बाहेर निघू शकणार
नाही. अशी या थोरल्या भावाची कल्पना झालेली आहे. पण तेही खरेच आहे म्हणा, कारण अशा अज्ञातवासात आपण ओळखले
नाही गेलो पाहिजे, आपण क्षत्रिय लोक आहोत, आपले शौर्याचे तेज कसे लपेल? ।।
छंद :- वसंततिलका (त भ ज ज ग ग )
आम्हांनिमित्त श्रम होति समग्र ज्याते । हें जाणुनी विनविती मग अग्रजातें
।
कां क्लेश फार करिसी नृपसत्त्वशीळा । शीळेपरी मन कीजे अपदी सुशीळा ।।१८।।
अर्थ
:- आपल्यामुळे या धर्मराजाला श्रम होत
आहेत हे पाहून चारही बंधू आपला अग्रज = पाचां भावांमध्ये सर्वात आधी
जन्मलेला भाऊ धर्मराजाला विनंती करतात ‘‘हे!
सत्वशिल धर्मराजा तु स्वतःच्या मनाला का क्लेश करून घेत आहेस?
तु शांतीचा मेरु आहेस, तुला असा शोक करणे शोभत
नाही. तु आमची अजिबात चिंता करू नकोस. हे
सुशिल अशा धर्मराजा या अपदी = संकट प्रसंगी शीळेपरी मन कीजे = दगडासारखे
कठोर मन कर ।।
चिंता धरीं न अमुचीच जिवीं क्रमाया । मायानदीस परी संकट विक्रमा या ।
माया मनांतुनि तुला निजबाळकांची । काचीं मुलें श्रमति कीं महिपाळकांची ।।१९।।
अर्थ :- या अज्ञात वासाच्या काळात तूं आमुची चिंता धरू नको.
तूं तुझं पहा! कारण तूं खोटं बोलणार नाहीस,
तिथे गेल्यावर तुला कोणी विचारले, ‘आपण कोण?’
: तू म्हणणार ‘मी युधिष्ठिर आहे’ : आणि आपण ओळखले जाऊ. आम्ही तर खोटं बोलून निभावून नेऊ.
पण तुझे काय होईल? हा अज्ञातवास म्हणजे मायारूपी
नदीच्या पाण्यात असलेला भोवराच आहे हा महासंकटरूपी भोवऱ्यातून आपण श्रीकृष्णभगवंतांच्या
कृपेने सहज बाहेर पडू. हे धर्मराजा! तुला निज = आपल्या बाळकांची = लहान भावांविषयी माया =
स्नेह आहे, प्रेम आहे म्हणून तू चिंता करतो आहेस,
पण हे भ्राता! जर महिपाळाची = राजाची मुले जर कणखर नसली, काची असली तर त्यांना जास्त
श्रम होतो. म्हणून आपण सर्व पंडुराजाची मुले आहोत म्हणून हा काचेपणा
आपल्याला जास्त श्रमदायक ठरेल.
कुंतिचा
मधिल बाळक सारें । बोलिला अमृतरूप विसारें ।
स्वर्गपालरमणीशिं
रमेना । शाप दे म्हणुनि सुंदर मेना ।।२०।।
षंढत्व पावसि
असें चतुरप्रवीणा । वीणाकरी वदलि शाप वधू नवीना ।
वीणार जे
मज तिच्या कळलें पतीतें । तीतें म्हणे कवण शाप दिला पतीतें ।।२१।।
अर्थ :- कुंतिचा मधला बाळक
= भीम तो युधिष्ठिर राजाला त्याच्या मनात आलेली योजना विस्ताराने समजावून सांगतो. की,
एकदा अर्जुन स्वर्गात गेला होता, तेव्हा उर्वशी त्याच्यावर अनुरक्त जाली. ती हातात वीणा घेऊन अर्जुनाचे मन रमविण्याकरीता त्याच्या
कक्षात आली, व अर्जुनाकडे विषयभोगाची मागणी केली, अर्जुनाने नकार दिल्यावर तिने त्याला
शाप दिला. ‘षंढत्व पावसि असें चतुरप्रवीणा =
हे चतुर प्रवीण अशा अर्जुना तू माझ्या सौंदर्याचा अपमान केला आहेस तथापि मी तुला शाप
देत आहे की एक वर्षपर्यंत तुझा पुरुषार्थ नाहिसा होईल, आणि तू षंढ बनून राहशील’ : असा
शाप दिल्यानंतर ती गोष्ट इंद्राला कळली. त्याने तिला विचारले, ‘पतिते! तु असा कसा शाप
दिला?’’ : मग इंद्राने मध्यस्थी केल्यावर अर्जुनाच्या मनाप्रमाणे तो शाप भोगण्याचा
उःशाप दिला. तो उःशाप भोगण्याची हीच खरी वेळ आहे. म्हणून तू अजर्नाची चिंता करू नकोस
।।
छंद :-
वसंत तिलका
नाकेश जाणुनि
पुढील भविष्यमाना । मानाब्द एक इचिया वचनप्रमाणा ।
मानीं न
हानि तुज संकटिंच्या प्रसंगी । संगीत नृत्य शिकवीं निजक्षिप्रसंगीं ।।२२।।
अर्थ :- नाकेश = देवांचा
राजा इंद्र ; (नाक - स्वर्ग त्याचा ; ईश - मालक) तो पांडवांचे भविष्य
जाणून होता. त्याला हे माहिती होते की पुढे असे संकट येणार आहे. म्हणून तो इंद्र अर्जुनाला
म्हणतो, ‘‘तु हिच्या वचनाला एक वर्ष मानून घे, कारण ते तुझ्या कामाला येणार आहे, तुझ्या
हिच्या शापाचा फार हिनपणा घेऊ नको, हा शाप भोगतांना तुझी कुठेही मानहानी होणार नाहीये.
संकटाच्या प्रसंगी तुला हा शाप उपयोगी पडणार आहे. त्यावेळी तू संगीत कला नृत्य शिकव,
त्यामुळे तुझा मानच वाढेल’’ असं या अर्जुनाला देवराज इंद्राने सांगितले आहे. म्हणून
याची चिंता नसावी ।।
पुढे भिम नकुल सहदेवाविषयी आणि माझ्याविषयी तू कशी चिंता करू नकोस ते युधिष्ठिराला समजावतो.
पुढचा प्रसंग पुढील भागात :-
आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा!