अभिमन्युचा अतुल्य
पराक्रम (
काव्य रचनाकाळ शके :- १७०० च्या सुमारास
जात्यावर गाइले जाणारे स्त्री गीत,
सकाळी उठोनी धर्मानी काय केलें ।
अभिमन्युसी बोलाविले ।।
समसप्तकी अर्जुनासि नेलें । मग कौरवसैन्य
सिद्ध झालें ।।
दुर्योधनाशी द्रोणानी पण केला । धरुन
देईन धर्माला ।।
व्यूहभेदाची युक्ति आहे तुजला । जावे
बाळा युद्धाला ।।
गेला अभिमन्यू अभिमन्यु रणी । चक्रव्यूह
केला द्रोणांनी ।।१।।
अर्थ :- कौरवांचे सेनापती द्रोणाचार्याने उद्या चक्रव्यूह रचून राजा युधिष्ठिराला पकडून आणण्याची प्रतिज्ञा केली आहे असे कळल्यावर राजा युधिष्ठिराने सकाळ उठल्याबरोबर अभिमन्यूला बोलावे व सांगितले की, समसप्तकी योद्ध्यानी अर्जुनाला युद्धभुमीपासून खुप दूर नेले आहे. आणि चक्रव्यूह भेदन फक्त अर्जुनाला माहीत आहे, आणि तुलाही ते माहीत आहे तर तु युद्धासाठी तयार हो!
पुसुनि धर्माला नमस्कार केला । हाका मारी
सारथ्याला ।।
जोड रे घोडे आपल्या रथाला । धर्मानी
आज्ञा दिली मला ।।
सूत म्हणे राजा अपशकून झाला । सूर्य का
दक्षिणेस आला ।।
बोलिला अभिमन्यू भविष्य कळले मला । स्मरा त्या कृष्ण अर्जुनाला ।।२।। अर्थ :- धर्मराजाची आज्ञा घेऊन, त्याला नमस्कार करून अभिमन्यूने आपल्या सारथ्याला रथ सज्ज करण्यासाठी आज्ञा केली. त्या वेळी अनेक प्रकारचे अपशकुन झाले पण त्या अपशकुनांना न जुमानता अभिमन्यू युद्धाला निघाला ।।
रथी बैसला उत्तरेचा पती । मारिले दहा
सहस्र रथी ।
हत्ती आणी घोडे पायदळ किती । पाडिल्या
लोथीच्या लोथी ।
वीर अनिवार गदायुद्ध करिती । त्रिभुवनी
झाली ख्याती ।।
वय लहान नाही तया भीती । जसा शोभला पशुपती ।।३।।
अर्थ :- रथावर आरुढ झालेल्या त्या अभिमन्यूने त्या दिवशी पराक्रम गाजवला असंख्य योद्ध्यांना यमसदनी धाडले. युद्धीभूमीवर प्रेतांचा खच पडला. गदायुद्धातही त्याने दुर्योधनाच्या मुलांना वधले. त्रिभुवनात महारथी म्हणून तो विख्यात झाला. लहान वय असूनही त्याला कसलीही भिती वाटली नाही. तेव्हा असे भासले की अभिमन्यूच्या रूपात युद्धभुमीवर पशुपती = महादेवच विचरत आहे.
रणी मिसळला सुभद्रेचा सूत । सैन्य पाडिले
असंख्यात ।।
शरानी शीरे कितिक उडवीत । राजे झाले
भयाभीत ।।
द्रोणाचार्यासी रवीसूत बोलत । आमुचे सरले
वाटे जिवित ।।
सोळा वर्षाचे वय दिसे लाहान । युद्ध गं केले निर्वाण ।।४।।
अर्थ :- तो अभिमन्यू त्या कौरवांच्या सैन्यात शिरला व त्याने असंख्यात योद्ध्यांना लोळवले. आपल्या धनुष्यातून निघणाऱ्या तिक्ष्ण अशा बाणांनी यमसदनी पाठवले. त्याचा तो पराक्रम पाहून मोठमोठाल्या राजांना धडकी भरली. सर्व कौरव पक्षातले राजे भयभित झाले. कर्णासारखा महारथीही द्रोणाचार्याजवळ येऊन म्हणतो, ‘आज आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, हा अभिमन्यू म्ह. ‘मूर्ति लहान पण किर्ती महान’ आहे. आचार्य काहीतरी करा? म्हणून हात जोडून विनवू लागला.
मग दुर्योधन रडत रडत आला । मिठी मारी
द्रोणाला ।।
पार्थपुत्राने प्रळय फार केला । हटविले
सर्व सैन्याला ।।
तुम्ही मनापासुन युद्ध का कराना । कसे
रक्षिता पांडवाना ।।
इकडे पाहुन सांगे कर्णाला । शकुनिमामा
पळुनि गेला ।।५।।
अर्थ :- कौरव पक्षाचा राजा दुर्योधन रडत रडत द्रोणाचार्याकडे आला व त्याने गुरुला मिठी मारत म्हटले, या अर्जुनाच्या मुलाने सर्व चक्रव्यूह भेदले, आमचे बरेच सैन्य मारले गेले, हा असाच लढत राहिला तर आम्ही सर्व मारले जाऊन आजच युद्ध संपेल, आचार्य पांडव तुमचे आवडते शिष्य आहेत म्हणून तुम्ही मनापासून युद्ध करत नाहीये, त्यांचे रक्षण करत आहात. अभिमन्यूचा पराक्रम पाहून शकुनीमामा जीव वाचवत युद्धभुमीतून पळून गेला.
घ्या घ्या म्हणौनी विभूमधे गेला । जयद्रथाने रोध केला ।।
द्रोणाचार्यासि दारी उभा केला । फिरुनि
सैन्यामधी गेला ।।
त्याच्या पाठीशी येऊ देईना कोणा । तळमळ
सुटली भीमसेना ।।
सांबप्रसादे ते दिवसी जय त्याना । हरवीले पांडवाना ।।६।।
अर्थ :- मग द्रोणाचार्याने तत्काळ भंगलेले चक्रव्यूह पुन्हा सांदून जयद्रथाला भीमादि योद्ध्यांना रोकण्यासाठी चक्रव्यूहच्या प्रवेशद्वारावर उभे केले. त्यामुळे भीमसेनादि योद्ध्यांना अभिमन्यूच्या पाठोपाठ मध्ये शिरता आले नाही. जयद्रथाला महादेवाचे वरदान होते की एक दिवस तू पांडवांना हरवशील म्हणून त्यादिवशी तो अजेय राहिला.
प्रथम द्रोणानी तोडिले धनुष्य । फोडीले अंगीचे कवच ।।
मोडीला रथ मग झाला विरथ । पादचारीच युद्ध करीत ।।
मग दौःशासनी घेउनि गदा हाती । अभिमन्यूसि लावी ख्याती ।।
गदा युद्धाने श्रम फार होती । पाहे तवं कोणी नाही साथी ।।७।।
अर्थ :- मग नंतर कौरव पक्षातले सर्वच भ्याड योद्धे अभिमन्यूवर तुटून पडले. द्रोणाचार्याने त्याचे धनुष्य तोडले, बाणांनीच त्याचे चिलखत फोडले, रथही तोडला. तरी तो महापराक्रमी अभिमन्यूने जमिनीवरून युद्ध सुरू ठेवले. मग दुःशासनाच्या मुलाने हाती गदा घेऊन अभिमन्यूवर हल्ला केला. त्या गदायुद्धामुळे तो खुप श्रमला. तरीही त्याने युद्ध सुरू ठेवले.
तयासी भिडतां गदायुद्ध घायें । श्रमी तो
अधिकचि होये ।।
बाळ घाबरले चोहिकडे पाहे । म्हणे हे
धर्मयुद्ध नोहे ।।
गदा आघाते जर्जर होय । मूर्छित धरणी पडे देह ।।
जयद्रथ तेव्हां धाउनी सत्वर ये ।
लत्ताप्रहार करीताहे ।।८।।
अर्थ :- कौरव पक्षातल्या सर्वांनी एकदाच हल्ला करून त्या अभिमन्यूला जर्जर केले. अभिमन्यू बेशुद्ध होऊन पडला. आणि त्याने प्राण सोडला. तेव्हा जयद्रथाने त्याच्याजवळ येऊन त्याला लत्ताप्रहार केला.
इकडे कीरीटी म्हणे केशवाला । अपशकुन होती
मला ।।
मृगांचा कळप सव्य मला गेला । लवतो माझा
वाम डोळा ।।
मला वाटते कोणी वीर पडला । माझा धर्म
धरुनि नेला ।।
चाल रे देवा जाऊ शिबिराला । कळेल वर्तमान
मला ।।९।।
तिकडे अर्जुन श्रीकृष्ण देवाला म्हणतो, ‘‘हे केशवा! काहीतरी अघटीत घडले आहे. मला सारखे अपशकून होत आहे. हरणांचा कळप मला उजवा गेला. माझा डावा डोळा लवतो आहे, आपल्या पक्षातला कुणीतरी महत्वाचा योद्धा तर मारला गेला नाही ना? किंवा कौरवांनी धर्मराजाला तर धरून नेले नाही ना? लवकर शिबिरात जाऊ तेव्हाच आपल्याला खरे काय ते कळेल!
श्रीकृष्ण अर्जुन शिबीरात आले । राजे अधोमुख बैसले ।।
पुसे भीमाला बाळ कुठे गेला? । हळुच सांगे रणी पडला ।।
अहा रे देवा! कसा घाला पडला? । रणाचे तोंडी
बाळ दीला ।।
पुत्रवियोगी नाकळे देहाला । सावरून
पार्थाला धरिला ।।१०।।
पुढे सोपी रचना आहे म्हणून अर्थ दिलेले नाहीत.
देव अर्जुन रणामधे गेले । बाळ धरणीवरी
लोळे ।।
कुरळे केस रक्ताने भरले । आवरुन पार्थे
बद्ध केले ।।
शिरी
पाहीला गदेचा टोला । गहीवर देवाला आला ।।
धरुनि पोटाशी चुंबन दिले त्याला । मुखचंद्र तो धुळीने भरला ।।११।।
अहा रे पार्था व्यर्थ करिसि शोक ।
मृत्युलोकी हेच दुःख ।।
बोले अभिमन्यु ऐका वृत्तांत । जयद्रथाने
दिली लाथ ।।
सूड घ्या त्याचा करून पुरुषार्थ । आतां
मी पाहातो कृष्णा मुहुर्त ।
इतुके बोलोनी समाधिस्त झाला । चंद्रलोकी प्राण गेला ।।१२।।
देव भगवान भगिनिकडे गेला । थोर आकांत
तिने केला ।।
माझा सौभद्र मजवरी का रुसला । स्तनी
माझ्या पान्हा आला ।।
माझा अभिमन्यू कसा रणी पडला । काय सांगू
उत्तरेला ।।
असो धिक्कार तुझ्या धनुष्याला । प्रताप तुझा नष्ट झाला ।।१३।।
श्रीकृष्ण अर्जुन आले रणात । पळत सुटला जयद्रथ ।।
अहा रे दुष्टा पाप केले बहुत । द्रौपदी
छळिली वनांत ।।
तूंच अपराधी पुत्रा दिली लाथ । जवळ आला
तुझा मृत्यू ।।
दिवसापूर्वी जयद्रथा वधीन । शपथ केली अर्जुनाने ।।१४।।
अहा रे! सखया कठिण केला पण । सिद्धी नेईल भगवान ।।
इकडे श्रीकृष्णाने काय मौज केली । सुदर्शना मधे घाली ।।
अरे रे पार्था रात्र कशी झाली ।
प्रतिज्ञा तुझी व्यर्थ गेली ।।
मग पार्थाने काष्ठे मेळविली । कौरवमंडळी आनंदली ।।१५।।
इतुके पाहोनी बोले यदुवीर । पहा पाठिशी
दिनकर ।।
पुढे जयद्रथ उडव त्याचे शीर । शर सोडिला
वरचेवर ।।
कंदुक जैसा गगनी गेले शीर । पडे पित्याचे
मांडीवरं ।।
त्याने ढकलीले विसरुनी वरी धरणी । देह
पडला तेचि क्षणी ।।
मृत्यू
पावले बापलेक दोन्ही । अघटित देवाची करणी ।।१६।। गेला...
कंदुक = चेंडु ।
संपूर्ण
आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा!