आळसामुळे होणारे नुकसान
आळस हा माणसाचा शत्रू आहे हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. काही लोक तर ते वाक्य विनोदाने घेतात. कोणी जर त्यांना म्हणाले, “अरे आळस झटकून टाक आळस हा माणसाचा शत्रू आहे” तर त्यावर ते उत्तर देतात “शत्रूवर प्रेम करायला पाहिजे” असे म्हणून या वाक्याचा उपवास करतात परंतु आळसामुळे जीवनाचे वाटोळे झालेले लोक आज आपल्याला समाजात दिसतात म्हणून आळस हा माणसाचा शत्रू आहे हे पूर्ण सत्य आहे.
एक सुभाषितकार म्हणतात-
आलसस्य कुतो विद्या , अविद्यस्य कुत: धनम् ।
निर्धनस्य कुतो मित्रम् , अमित्रस्य कुतः सुखम् ॥
आळशी मनुष्यास विद्या कशी प्राप्त होणार? ज्याच्या ठिकाणी आळस आहे त्याला विद्या प्राप्त होणे शक्य नाही. आणि ज्याच्याजवळ विद्या नाही त्याला धन कुठून व कसे प्राप्त होणार? आणि ज्याच्याजवळ धन नाही त्याला मित्र कसे लाभणार? निर्धन माणसाशी कुणीही व्यक्ति मैत्री करत नाही ज्याच्याकडे थोडेफार धन आहे त्याचेच मित्र जास्त असतात असा अनुभव येतो. आणि ज्याला मित्रच नाही त्याला सुख कसे मिळणार? मित्र नसले कि जीवन निरस होते. कारण आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्यास कोणीतरी जवळचा मित्र असलाच पाहिजे असे विद्वान पंडित म्हणतात. आणि कोणीच मित्र नसेल तर जिवनात सुख लाभत नाही वेळेवर चांगला सल्ला देणारी व्यक्ती असल्याशिवाय संकटांना तोंड देणे केवळ अशक्य होते.
विद्या मग ती कोणतीही असो पोट भरण्याची असो, का अध्यात्मविषयक ज्ञान असो, ते कष्ट केल्याशिवाय प्राप्त होत नाही. ज्याला आळस निद्रा व मनोविनोद करमणूक टाइमपास प्रिय आहे त्याला विद्याभ्यासासाठी पुरेसा वेळ कसा देता येईल? विद्येच्या ठिकाणी मन केंद्रित कसे करता येईल? शक्यच नाही. ज्याच्या जवळ विद्या नाही त्याला चांगला नोकरी व्यवसाय हा अलभ्य राहणार. अशिक्षित मनुष्य चांगला ऊर्जितावस्थेत आलेला सहसा दिसून येत नाही. मग अशा अशिक्षित आणि निर्धन माणसाला मित्र कोठून भेटणार! आणि ते टिकणार कसे? हे उघडच आहे.
ज्याच्या जवळ विद्येचे वैभव आहे आणि विशेषतः चार पैसे हाती खेळत असतात त्याच्याच भोवती मित्रमंडळी गोळा होतात ही जग रीती आहे. अर्थात अगदी निरपेक्ष मैत्रीही क्वचितच आढळते. तसेच दोन्ही बाजूंनी काही घेणेदेणे झाल्याशिवाय मैत्री टिकत नाही, वाढत नाही, रूजत नाही. कारण जग हे स्वार्थपर आहे. स्वार्थाशिवाय कोणीही मनुष्य काहीही गोष्ट सहसा करत नाही.
पण एक गोष्ट मात्र खरी की अशा अनेक मित्रांमधूनच एखादा जिव्हाळ्याचा सुखाप्रमाणे दुःखही विभागून घेणारा मित्र भेटून जातो तो कायमची साथ देतो. आयुष्यात सुखाची भर घालतो. सारांश काय तर आळस हा मुळापासूनच उखडून फेकून दिला पाहिजे. तरच पुढील जीवनात एकेका पायरीने उत्तरोत्तर सुखाची वाटचाल मानवाला करता येते.
काही आळशी लोक फक्त मनोरंजन करत बसतात पण त्यांना एक सांगावेसे वाटते की केवळ मनोरथ यांनी काहीएक साध्य होत नाही तर उद्योग असेल ते मुळेच कार्य सिद्ध होतात सिंह कितीही बलशाली असला तरी तो जर आपल्या गुहेतच झोपून राहिला तर त्याच्या मुखात आपण हो होऊन कोणी प्राणी प्रवेश करणार नाही कराल दाढा उग्र मुद्रा बळकट पंजे यांनी युक्त असा सिंह जंगलचा राजा झाला तरी स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याला जंगलात भटकून भक्ष्य शोधून त्याचा पाठलाग करून ते हस्तगत करावे लागते. तसेच त्याच्या हद्दीतील त्याचे राजे पण टिकवण्यासाठी प्रसंगी दुसऱ्या सिंहाशी लढा पण द्यावा लागतो. तेव्हा त्याची सत्ता सिद्ध होते. अन्यथा तो त्याच्या गुहेतच राजे पणाच्या मस्तीत पडून राहिला तर कोणता प्राणी तेथे जाऊन त्याच्या तोंडी आपला जिवाचा घास देईल.
कार्य लहान असो वा मोठे सतत उद्योगाच्या योगाने ते साध्य होते स्वप्ने पाहणे हा माणसाचा स्वभावच आहे ती स्वप्ने ते मनोरथ साध्य करण्यासाठी मात्र उद्योग प्रयत्न तोही योग्य दिशेने करणे आणि पुरेसा काळ पाठपुरावा करणे याची आवश्यकता असते नशिबाने काहीतरी चमत्कार घडून मनोरथ अचानक पूर्ण होतील. अशा प्रकारची भावना केवळ जुगारी मनोवृत्तीची होय अर्थात आयुष्याचा जुगार खेळण्यासारखेच होय.
मनुष्याला पैसा हा पदोपदी लागतोच मात्र तो मिळवण्यासाठी योग्य प्रयत्न भरपूर कष्ट हे हवेतच आजकाल रुढ झालेल्या अनेक प्रकारच्या लॉटरी किंवा अगदी सामान्य प्रतीची गुणवत्ता पुरेशी असणाऱ्या स्पर्धा व लाखो रुपयांच्या त्यांच्या बक्षीस योजना हे सर्व थोडीशी करमणूक म्हणूनच समजणे योग्य होईल त्या चकव्यात न अडकता आपला उद्योगच सतत करीत राहणे श्रेयस्कर आहे.