अशिक्षित माणूस म्हणजे हंसांच्या सभेमध्ये बगळाच!!
आजकाल शिक्षणगंगा सगळीकडे मोठ्या जोमाने वाहते आहे. परंतु पोटभरण्यासाठी अभ्यासलेली माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे माणुसकी सकारात्मकता परोपकार इत्यादी गोष्टी आपल्याला शिकवते अमलात आणण्यास भाग पडते त्याला म्हणावे ज्ञान. सुसंस्कृत आणि सुशिक्षित याच्यात फरक आहे सुसंस्कृत माणूस उच्चशिक्षित असेलच असे नाही आणि उच्चशिक्षित माणूस सुसंस्कृत असेलच असे नाही जेव्हा एखादी उच्चशिक्षित व्यक्ती संस्कृतपनाने वागते तेव्हा तेव्हा आपल्या लक्षात येते की हा फक्त पुस्तक पंडित आहे याच्यावर त्याच्या मातापित्यांचे कुठलेही संस्कार झालेले नाहीत.
आई वडिलांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या मुलांवर आपण लहानपणापासूनच योग्य ते संस्कार केले पाहिजे. जय माता पिता आपल्या मुलांकडे लक्ष देत नाहीत त्यांना इथे एक सुभाषित सांगावेसे वाटते कुसंस्कारी कुव्यसनी मुलांकडे पाहून प्रस्तुत सुभाषिताचे महत्त्व जास्तच पटते.
माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पाठितः ।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ।।
ज्या माता-पित्यांना आपल्या बालकाचे हित समजत नाही आणि माता पिता म्हणून असलेले आपले विहित कर्तव्य समजत नाही त्यांना काय म्हणावे, बालकाला शिक्षणाची गोडी लावणे, शिक्षणात प्रवृत्त करणे आणि त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याच्या भरण-पोषणाचा आणि अर्थातच शिक्षणाचा भार उचलणे हे माता पित्याचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य करण्याचे चुकले ते त्या बालकाचे माता पिता नसून शत्रू आहेत असेच मानावे. शिक्षणामुळे बुद्धीचा विकास होतो. तसेच मनावरही सुसंस्कार होतात. ज्ञानाने दृष्टी विस्तारते. तसा विचारांचा आवाकाही वाढतो अनेक विद्या कलांची ओळख होऊन अंगी बहुश्रुतता येते. तसेच विनोद बुद्धीच्या विकासाने तणावपूर्ण परिस्थितीतही मन प्रफुल्लित ठेवण्याचे कसब अंगी येते. मुलांची विचारसरणी नेहमी सकारात्मक असते.
याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाचा विकास झाल्याने सभाधीटपणा आत्मविश्वास आणि धैर्य या गुणांचाही अनायासेच विकास होत जातो. कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे धाडस त्यांच्या ठिकाणी येते. अशा विद्याविभूषित यांच्या सभेत जर एखादा अशिक्षित मनुष्य जाऊन बसला तर त्याला ना सभेचा विषय समजेल ना असे सभेत बोलले जाणारे शब्द जर त्याला समजले नाहीत संदर्भ लक्षात आले नाहीत तर त्यावर तो प्रतिक्रिया ती काय करणार अशा वेळी त्याचा आत्मविश्वास आणखीनच ढासळेल मन संकुचित होऊन आपला बावळटपणा झाकण्याचा दुबळा प्रयत्न तो करीत राहील त्या प्रयत्नात तो जास्तच उघडा पडेल आणि डौलदार हंसांमध्ये एखादा बगळा जसा विरूप आणि केविलवाणा दिसतो तशीच त्याची अवस्था होईल.
त्याच्या या अवस्थेचा कारणीभूत असणारा अशिक्षितपणा हा जेवढा गरीबीमुळे असू शकतो तेवढाच किंवा त्याहीपेक्षा जास्त करून मात्यापित्यांच्या अडाणीपणा, निष्काळजीपणा, त्याच्या बुद्धीमत्तेकडे दुर्लक्ष करून केला जाणारा फाजिल लाड, आणि बालकाच्या कमाईचा क्षणिक फायद्याचा मोह यांचा परिपाक असतो. अशा परिस्थितीत प्रस्तुत सुभाषितातले कठोर शब्द चूक कसे म्हणता येतील?? म्हणून मुलांचे खाण्यापिण्या व्यतिरिक्त आणि कसलेही लाड नसावेत. त्याला वेळेवर अभ्यास करण्यासाठी बाध्य करावे वेळोवेळी मुलांचा अभ्यास घ्यावा कारण मुलांना आई वडिलांनी लावलेले संस्कार त्याला जन्मभर कामी पडतात.