गुरुविना ज्ञान नाही या जगती

गुरुविना ज्ञान नाही या जगती

 गुरुविना ज्ञान नाही या जगती

आज आपण एकविसाव्या शतकात विज्ञान युगात वावरतो. आणि पुस्तके ebooks, दूरदर्शन, कॉम्प्युटर, इंटरनेट यांचा शैक्षणिक साधने म्हणून उपयोग करतो वस्तुतः ही साधने ज्ञान नाही तर माहिती पुरवीत असतात. या माहितीचे संकलन संस्करण करून तिचा योग्य दिशेने उपयोग कसा करता येईल हे यंत्राने नव्हे तर मानवी मन बुद्धी आत्मा यांच्या संयोगाने एखादा ज्ञानीच ठरवू शकतो. असे ज्ञानी गुरु आणि जिज्ञासू शिष्य यांची परंपरा आज खंडित झालेली दिसते. गुरुकुल पद्धती मागे पडून नवीन शिक्षण पद्धती आली त्यातून बहुशः आढळणारे पोटार्थी शिक्षक आणि परीक्षार्थी विद्यार्थी यांना दृष्टीआड करून विचार केल्यास गुरू-शिष्य संबंध कसा असावा हे शोधल्यास सुंदर सुभाषित पुढे येते.

यथा खनन खनित्रेन भूतलाद् वारि विन्दति ।

तथा गुरुगता विद्या शुश्रुषुरधिगच्छति ।।

जमीन खाणारा न थकता खनत खनतच जातो तेव्हा त्याला जमिनीतून पाणी मिळते त्याच्या अथक प्रयत्नानंतर त्याला भूमीच्या पोटात दडलेल्या पाण्याचा जीवनाचा लाभ होतो. तद्वतच गुरूंनी प्राप्त करून जतन करुन ठेवलेली विद्या त्यांची सेवा सुश्रुषा करून त्यांना प्रसन्न करूनच मिळवावी लागते. जो अशी न कंटाळता न थकता आवडीने सेवा करीत राहतो. त्याला गुरूंनी इतर कोणापाशी प्रकट न केलेली विद्या सुसंस्कारित ज्ञान लाभते आणि शिवाय त्यांचे शुभ आशीर्वादही लागतात. 

अर्जुनाची ऋजुता, कष्टाळूपणा, एकाग्रता, संयमीपणा, या गुणांनी आणि सतत गुरु द्रोणाचार्यांचा अवतीभवती राहून त्यांची अविरत सेवा करून मिळवलेली धनुर्विद्या त्याला अमर कीर्ती मिळवून देती झाली. आश्रम व आश्रमाची शेते वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीराचा बांध घालून पाणी घडवणारा `आरुणी' तर सत्शिष्य शिरोमणीच आहे. एवढेच काय राम, परशुराम या देवता अवतारांनी ही आपल्या किशोर वयात आपल्या गुरूंची अविरत सेवा करूनच त्यांच्याकडील गहन अशी शस्त्रास्त्रविद्या जीवनाचे तत्त्वज्ञान आणि उदंड आशीर्वाद यांचा लाभ करून घेतला. 

आजच्या काळात वरील पुराण काळाप्रमाणे उदाहरणे संगीता सारख्या क्षेत्रात खेरीज इतरत्र फारशी आढळून येत नाही पण एक मात्र शंका आहे एखाद्या, तत्त्वदर्शी ज्ञानी व्यासंगी गुरुची अविरत सेवा केल्यास सुसंस्कारीत ज्ञानाबरोबरच त्यांनी हृदयापासून दिलेले जे अनेक आशीर्वाद मिळतील त्याला कम्प्युटरमध्ये काही पर्यायी व्यवस्था असेल काय?  माहिती आणि ज्ञानात फरक आहे माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी गुरुची आवश्यकता असावी लागते पुस्तके वाचून ज्ञान होत नसते. 

पुस्तके वाचून पंडित झालेला व्यक्ती त्याचे लक्षण कसे असतात म्हणाल तर एक सुभाषित आठवते. 

पुस्तक: प्रत्ययाधितं नाधितं गुरुसन्निधौ ।

सभांमध्ये न शोभन्ते, जारगर्भ इव स्त्रीय: ।।

अर्थ :- ज्याने कोणत्याही गुरूकडून अभ्यास केलेला नाही पुस्तके वाचूनच स्वतःला ज्ञानी समजू लागला अशी व्यक्ती कोणत्याही धर्मसभेमध्ये शोभून दिसत नाही जशी व्यभिचारिणी गर्भवती स्त्री कुलस्त्रियांमध्ये शोभून दिसत नाही. 

तात्पर्य:-  गुरुविना ज्ञान नाही या जगति । 

ऐसे थोर थोर संत वदती ।। 


 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post