वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक ५५ ते ६३ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण) 16-10-2021

वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक ५५ ते ६३ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण) 16-10-2021

  16-10-2021

वामनपंडितकृत  विराटपर्व श्लोक ५५ ते  ६३ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण)



छंद :- कामदा

प्रगटला बरा भूपती रवी । दिग्वधूवरी किरण मीरवी ।

सरसरोवर कमळ काननें । मधुर बोलती स्वर पिकाननें ।।५५।।

अर्थ :- वैशंपायन ऋषि म्हणतात, ‘‘हे भुपती जन्मेजया ! अरुणोदय झाला. त्या सूर्याच्या वधू = दशदिशा याच स्त्रीयां आहेत, त्या आपल्या वधुंवर सूर्याने आपले किरण फेकले. दशदिशा सूर्यप्रकाशाने उजळून निघाल्या. आणि सूर्यप्रकाश पृथ्वीवर पसरल्याबरोबर अरण्यामधली सर = लहान तळे, सरोवर = मोठे तळे त्यात सुर्यकमळे विकसीत झाली. आणि मधुर अशा ध्वनींनी पिक = कोळीळ पक्षी कुहु कुहु करू लागले.  कोवळे ऊन्हामुळे सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. ।।

 

छंद :- वसंततिलका

नानाफुली कुसुमपादप फूलले होते पाहतां मन जिचे पथीं फूलले हो ।

ते द्रौपदी सहपती अति लोभली होविश्रांतिची सरसवाट ह्मणे भली हो ।।५६।।

अर्थ :- नानापरीच्या कुसुम पादप = जाई, जुई, मोगरा, चाफा, आवळी, वेहंकळी, टाकळी, अशा फुलांची झाडे फुललेली आहेत, त्यांचा मंद सुंगध सर्वत्र दरवळत आहे. ते सर्व प्रसन्नमय वातावरण पाहून त्या द्रौपदीचे खिन्न उदासिन मन प्रसन्न झाले. त्या द्रौपदीला ते सर्व पाहून अति उत्साहित झाली, तिला फुले तोडण्याचा मोह आवरला नाही, ती लुब्ध झाली. आणि ती मनात म्हणते, ‘‘आपण रात्रभर मार्गक्रमण करत आहोत, विश्रांती घेण्यासाठी ही वाट सरस = योग्य आहे, चांगली आहे. पण आतां थांबणे म्हणजे संकट ओढून घेण्यासारखे आहे.’ असा विचार करीत ती चालत होती. पण ते सुंदर फुलांचे वन पाहून तिचा सर्व शीण जणुकाही मावळला होता. ।।

 

मत्स्यदेश सुरवाडिक सीमालागली परम दिव्य कशी मां

नांदती सरस शेतमळा रेन्यून काय कुसुमा कमळा रे ।।५७।।

अर्थ :- पुढे चालता चालता ते मत्सदेश = आजचे वाई नगराच्या सिमेलगत आले. ती मत्स्यदेशाची सुरवाडिक = सुखावणारी परम दिव्य अशी सिमा पाहून पांडव मां = आश्चर्यचकीत झाले. त्या विराटराजाच्या राज्यात पिकांनी ओतप्रोत भरलेले शेतमळे आणि ठिकठिकाणी असलेले तळे, त्या तळ्यात कमळांच्या फुलांना तिथे काहीच तोटा नव्हता. हे सर्व पाहून ते अधिकच प्रसन्न झाले. ।।

 

त्या नंतरें राहवुनी मुनीचानिरोप मागे धणि आवनीचा ।

तुझ्या प्रसादे प्रकृतिश्रमातेसाहोनि सेवू नृपआश्रमातें ।।५८।।

अर्थ :- विराटराजाच्या नगरीजवळ आल्यावर अवनीचा धनि = पृथ्वीपती युधिष्ठिर राजा तो धौम्यऋषींना राहावून निरोप = अनुज्ञा मागतो. ‘‘हे ऋषिवर्या !  आता आपण परत जा. आणि आम्ही आता नगरात प्रवेश करतो. तुझ्या प्रसादे = तुमच्या आशिर्वादाने आम्ही आम्हाला होणाऱ्या श्रमांना, कष्टांना सहन करून या विराटराजाच्या नगरीत वास करू, मानापमान सहन करून राहू.   

 

छंद :- इंद्रवज्रा

बोलोनि ऐसें नमि पाय त्याचेजो धौम्य ठायीं जननीपित्याचे ।

प्रदक्षणा सव्य ऋषीस घालीसाहीजणे तेथुनियां निघाली ।।५९।।

अर्थ :- असं बोलून धर्मराजाने त्या धौम्यऋषिंचे पाय वंदन केले. अरण्यवासात ते धौम्य ऋषिच पांडवांना जननी-पित्यासारखे होते. मग सर्वांनी धौम्यऋषिंना नमस्कार करून त्यांना प्रदक्षिणा केली. आणि ते सहाही जण तिथून विराटराजाच्या नगरीत प्रवेश करण्यासाठी सरसावले. धौम्य ऋषि पाठमोरे निघालेले पांडव दिसेपर्यंत तिथेच उभे राहून मनोमन त्यांना ‘कल्यानमस्तू’ चा आशिर्वाद देत होते. पांडवांचा वियोग होताना पाहून धौम्यऋषिंनाही अंतःकरण भरून आले. पण हे श्रीकृष्णदेवाचे एकनिष्ट भक्त आहेत, यांचे कुणीही वाकडे करू शकणार नाही, याची त्यांना जाणिव होती. म्हणून ते पांडवांविषयीची चिंता सोडून आपल्या स्वस्थळी निघाले. ।।

 

छंद :-

बोलती विपि रम्य पिकावलीकिलकिलाट करिती कपिकावली ।

मांडिले सरस नृत्य शिखावलीपाहतां द्रुपदि फार सुखावली ।।६०।।

अर्थ :- वृक्षांवर बसलेले पिकावली = कोळीळ पक्ष्यांचे थवे रम्य मधुर असा कुहुरव करून जणुकाही पांडवांचे स्वागत करत आहेत. आणि कपिलावली = माकडांचे थोवे किलकिलाट करून जणुकाही पांडवांच्या दर्शनाने धन्य झाल्याचे म्हणत आहेत. शिखावली = मोर आपल्या लांडोर परिवारासहीत नृत्य करीत आहेत. ते सर्व पाहून द्रौपदी अंतःकरणात फार सुखावली.

 

छंद :- वसंत तिलका

हे तापली महि रवीकरकर्कशानेंजाईल यान नसतां श्रम हा कशानें ।

आतां न पंथ क्रमवे श्रमली पदी जेधर्मा ह्मणे अनलैसंभव द्रौपदी जे ।।६१।।

अर्थ :- हळुहळु सूर्य वर येऊ लागला, महि = जमीन ; रवीकर = सूर्यकिरणांनी तापली. तेव्हा अनलैसंभव द्रौपदी = यज्ञाग्नितून जन्मलेली द्रौपदी धर्मराजाला म्हणते, ‘‘मला खुप श्रम आला आहे, आपल्याकडे यान = काही वाहनही नाही. माझा हा श्रम कशाने जाईल? आता मला मार्गक्रमण होत नाहीये, माझे पाय अत्यंत थकले आहेत, मला आता चालवत नाहीये.’’ ।।

 

छंद :-

अश्रांत देखूनि वनी प्रिया रवासांगे कनिष्ठा वचना प्रिया रवा ।

हे द्रौपदी जे सुकुमार राणीचालोनियां कष्टलि फार रानी ।।६२।।

अर्थ :- त्या अतिश्रमलेल्या प्रिय अशा द्रौपदीचे बोलणे ऐकून आणि तिची ती श्रमलेली चर्या पाहून धर्मराज म्हणतो, ‘‘हे अनुज ! ही सर्वांगसुंदर सकुमार अशी महाराणी द्रौपदी अरण्यात खड्या-गोट्या काट्यांमध्ये चालून फारच श्रमलेली आहे. -

 

जो सखा परम लोकपित्याचाराखितो ध्वज सदा कपि त्याचा ।

तो युधिष्ठिर रवी सरिसा धरीस्कंधयान करवी अमृताधरी ।।६३।।

अर्थ :- जो लोकपित्याचा = भगवान श्रीकृष्णांचा परम सखा = मित्र आहे. ज्याचा रथाच्या ध्वजाचे कपि = हनुमंत रक्षण करतो, अशा अर्जुनाला रविसमान तेज स्फारणारा युधिष्ठिर आज्ञा करतो, ‘की भीमाला सांग, या अमृताधरी = अधरातून अमृत वर्षणाऱ्या द्रौपदीसाठी स्कंधयान करावे म्हणजे हिला खांद्यावर घ्यावे. त्याला तिचे काही ओझे होणार नाही.’’ आणि भीमाने द्रौपदीला खांद्यावर घेतले, आणि चालु लागला. ।।

क्रमशः

पुढील कथा वाचा पुढच्या भागात...


आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा! 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post