मरणसमयीचे औषध आणि वैद्य
हे शरीर नश्वर आहे या शरीराला अवस्था आहेत जन्मणे, वाढणे, काही काळ स्थिर राहणे, मग हळूहळू म्हातारपण येणे, मग क्षिणता येणे आणि मरणे. शरीर तेथे व्याधी हे एक कटू वास्तव आहे. या व्याधींशी आणि वेदनांशी संघर्ष करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी काय काय उपचार शोधून काढले आहेत हे पाहता मन आश्चर्यमुग्ध होते. जगाचे राहो केवळ आपल्याच देशात एखाद्या व्याधीवरचे उपचार शोधून नोंदवून म्हटले तर सर्वमान्य उपचार पद्धती शिवाय अगणित इतर उपचारांची माहिती मिळू शकेल. तरीही अजूनही काही रोगांवर औषध सापडलेले नाही. आणि नवीन नवीन व्हायरस तयार होतच असतात.
मनुष्य सतत होणाऱ्या रोगांवर औषध शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो. कारण एकच माणसाला अनेक व्यथा वेदना नको असते. आणि इंद्रियांचे भोग मात्र अपरंपार हे वाटतात एकीकडे सतत धावणारा काळही शरीराला झिजवत असतो. तर जोडीला चिंता टेन्शन ट्रेस इत्यादी नकारात्मक भावना शरीर पोखरत असतातच. त्यामुळे एक ना एक दिवस प्रत्येकाच्या जीवनात असा येतो की शरीर व्याधींनी ग्रस्त आणि अर्धमेले झालेले असते. अशावेळी त्याला कोणतेही औषध लागू पडत नाही. कोणीही धन्वंतरी त्याला आरोग्य प्रदान करू शकत नाही. मग अशावेळी श्रीकृष्ण भगवंतांचे चरणोदक हेच औषध आणि श्रीकृष्ण भगवंत हाच वैद्य. डॉक्टर वैद्य ते होमोपॅथी असो का आयुर्वेदिक असो ऍलोपॅथी असो यापैकी कोणीही माणसाचे आयुष्य वाढू शकत नाही यासाठी वैद्यकशास्त्रात एक सुभाषित आहे.
व्याधेस्तत्वपरिज्ञानं वेदनायाश्च निग्रहः ।
एतद् वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषः ।।
आजारांच्या कारण व स्वरूपाचे निदान आणि वेदनांपासून आराम देण्यापुरतेच वैद्याचे वैद्यत्व असते. वैद्य काही कोणाच्या आयुष्याचा स्वामी नसतो यासाठी जेव्हा घटिका भरत येते, आयुष्य पूर्ण होते, तेव्हा श्रीकृष्ण भगवंताच्या नामस्मरणरूप उपचारावरच विसंबून रहावे. एरवी मात्र योग्य वेळी उपचार घेणे हाच शहाणपणा.
औषध न घे असून व्यथा । पथ्य न करी सर्वथा । न मिळे आलीया पदार्थात । तो एक मूर्ख ।।
असे रामदासांनी दासबोधात मूर्खांची लक्षणे वर्णन करताना सांगितले आहे. कारण शरीर हेच धर्मकर्तव्य करण्याचे साधन आहे म्हणून शरीर धडधाकट राखणे हेच श्रेयस्कर असते. आद्य मराठी गद्य लेखक म्हाईभटांनी म्हटले आहे अन्नमय प्राण : प्राणमय पराक्रम । जर योग्य आहार आपण घेत असू तर आपले शरीरही सुदृढ राहते. आणि आपल्याला धर्माचरणी दक्षता मिळते.
योग्यवेळी उपचार करणे वेदना शांतपणे सहन करणे शरीर व्याधीने म्हातारपणाने जर्जर झाले असता धीरोदात्तपणे परमेश्वरालाच वैद्य म्हणून त्याच्या उपचाराची वाट पाहणे हा व्याधी विषयीच्या वेगवेगळ्या संदर्भातला विवेक विचार होय.