दुष्टांचे हृदय परिवर्तन होणे अशक्यच!!

दुष्टांचे हृदय परिवर्तन होणे अशक्यच!!

 दुष्टांचे हृदय परिवर्तन होणे अशक्यच!! 

दुष्टांचे हृदय : पाषाणाहुनि कठिण :

तेथ चांगुलपण : कैसे राहे ।।१।।

प्रत्येक समस्येला उत्तर हे असतेच असे आशावादी व प्रयत्नवादी लोक मानतात. “जगात अशक्य असे काही नाही” हे नेपोलियनचे तोंडचे वाक्य प्रसिद्धच आहे पण प्रत्येक नियमाला छेद देणारा एखाद्या अपवादही असतो. पुढील सुभाषितात कोणकोणत्या कठीण वस्तूंचा भेद कशाने होतो हेच सांगून दुष्टांच्या कठोर हृदयाचा त्याला अपवाद आहे. हे विषादाने नमूद केलेले दिसते.

पाषाणोSभिद्यते टङ्कै: वज्रं वज्रेन भिद्यते ।

सर्वोSपि भिद्यते मन्त्रैः दुष्टात्मा नैव भिद्यते ।।

पाषाण हा अतिशय कठीण कठोर म्हणून उपमा देण्यासाठी योजना जाणारा पदार्थ पण टाकीच्या घावांनी कठीण पाषाणही फुटतो त्यातून सुंदर शिल्पे देवता मूर्ती निर्माण होतात. वज्र हे तर अभेद्य असे शस्त्र अखेरचा उपाय म्हणून राखून ठेवले जाणारे पण तसाच तुल्यबळ योद्धा समोर असेल तर तोते वज्र ही वज्राने भेदू शकतो. त्याही पुढे जाऊन मंत्राने सर्वकाही भेदता येते योग्य शब्द उच्चार योग्य असे स्वरांचे चढ-उतार सांभाळून मंत्रोच्चार केला तर त्या ध्वनिलहरी एवढ्या प्रचंड प्रमाणात शक्ती निर्माण करतात किंवा आकर्षून घेतात की त्याने काहीही भेदता येथे. 

आधुनिक विज्ञानातही ध्वनी लहरींचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतला जातो. मंत्रशास्त्र हे ध्वनी लहरींचे शास्त्र आहे. पूर्वीच्या ऋषीमुनींच्या व मंत्र युक्त शस्त्रे अस्त्रे वापरणाऱ्यांच्या कथा आपल्याला चमत्कार वाटत असल्या तरी आपल्या बुद्धीची एकाग्रतेची ज्ञानाची तपा चरणाची मर्यादा लक्षात घेता आपल्याला ते चमत्कार वाटणे हे स्वाभाविक आहे. पण त्यात चमत्कार वाटण्यासारखे काही नाही कारण तेही एक विज्ञानच आहे पण त्या विज्ञानाचा अभ्यास आता यथार्थ कुणालाही नाही म्हणून ते विज्ञान लोपलेले आहे.  टाकी वज्र आणि अगदी मंत्र सुद्धा त्यांच्या पलीकडे शिल्लक राहते ते दुष्टांचे हृदय,  त्याचे हृदय आणि आत्मा मलिन विचारांनी तेवढा कठोर झालेला असतो की त्याच्यात कशानेही बदल होत नाही.

 क्रोध, लोभ,  मत्सर,  सूड,  मानापमान,  अहंकार,  विध्वंस, पैशांची हाव, स्वार्थ, सर्व काही मलाच पाहिजे अशी वृत्ती,  इतरांच्या होणाऱ्या प्रगतीबद्दल जळफळाट या सर्वांनी सर्व बाजूंनी त्याला जसे जखडून टाकले असते की त्यांच्या पाशातून त्यांची सुटका होत नसते. त्यांच्या हिताचा उपदेश करणारे त्याला लबाड खोटारडे दृष्ट वाटतात. आणि मग बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तशी त्याची गत होते एक चूक झाकण्यासाठी पुढे बऱ्याच चुकांची साखळी तो निर्माण करतो त्या साखळीत स्वतः बद्ध होऊन दुःखाच्या अशांती च्या खाईत ओढला जातो. याचे वर्णन श्रीमद्भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात श्रीकृष्ण भगवंतांनी फारच यथार्थपणे केलेले आहे.

दुष्ट वृत्तीच्या माणसाने एखादे चांगले काम जरी करायचे म्हटले तरी त्यात इतरांना त्रास होतो इतरांसाठी ते उपद्रवकारक ठरते जसं वाघाने उपवास करू म्हटलं तर त्या उपवासाचे पारणे तो एखादा पशू मारूनच करणार!!  दुष्ट व्यक्ती वरवर गोड बोलून आपले काम काढण्यात पटाईत असतो त्याची वाणी इतकी मधाळ असते की आपल्याला त्याच्याविषयी आपलेपणा वाटायला लागून जातो पण काम संपताच तो आपले मूळ स्वरूप प्रकट करतो आणि त्याचा तो स्वार्थी भयानक चेहरा पाहून आपल्याला धक्का बसतो पण आपल्या कडे पश्चातापाव्यतिरिक्त करण्यासारखे काहीही नसते. म्हणून अशा व्यक्तीपासून नेहमी सावधान असावे त्यांना आपले गुपित सांगू नये. आपली कमतरता आपल्या घरातली भांडणे हे कधीही सांगू नये. 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post