वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक ६४ ते ७६ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण) 21-10-2021

वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक ६४ ते ७६ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण) 21-10-2021

 21-10-2021

वामनपंडितकृत  विराटपर्व श्लोक  ते  ७६ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण)


छंद :- भुजंग प्रयात

पुढे देखिले पंथ शेतामळ्यांचेगुरे चारिती स्तोम त्या गोवळ्यांचे ।

ह्मणे धर्म बंधूजनप्रीयराशी । पहा पैल त्या मत्सनाथापुरासी ।।६४।।

अर्थ :- पुढे पांडवांनी शेतातून, मळ्यांमधले रस्ते पाहिले. शेतकरी आपापल्या शेतकामात गुंग आहेत. कोणाचेही लक्ष पांडवांकडे गेले नाही. गवळ्यांचे स्तोम = समुह ते गुरे चारण्यात गुंग आहेत. तेव्हा बंधुंना आणि सकळ लोकांना प्रिय असलेला असा अजातशत्रु धर्मराज युधिष्ठिर आपल्या भावंडांना म्हणतो, ‘‘बंधुंनो! हे पहा, ही जे दुरून दिसते आहे, ही विराट राजाची नगरी आहे. इथेच पुढील एक वर्ष आपल्याला वास्तव्य करायचे आहे.’’

 

छंद :- इंद्रवज्रा

गांडीवपाणी शरसज्ज हस्तीहस्तींद्र जेणे अणिला स्वमस्ती ।

हस्त्याव्हग्रामेश जनप्रसिद्धासिद्धा सुबद्धा रणचंडयोद्धा ।।६५।।

अर्थ :- बाणांसहीत गांडिव धनुष्याने सज्ज असलेला अर्जुन ; त्या अर्जुनाने हस्तींद्र म्ह. ऐरावत तो बाणांचा पुल तयार करून भुतलावर आणला. अशी कथा आहे कवि त्या कथेला इथे उद्धृत करत आहेत.

तिच कथा पुढील प्रमाणे :- एकदा संक्रांतीच्या दिवशी गांधारी कौरवांना म्हणाली मला संपूर्ण नगरात साखर वाटायची आहे, कौरवांनी आपली माता गांधारीला हत्तीवर बसवून संपूर्ण नगरात फिरवले. तिने लोकांना यथेच्छ साखरदान केले. ते पाहून कुंती माता थोडी निराश झाली. ते अर्जुनाने पाहिले, तो म्हणाला, ‘‘माते! तू अजिबात काळजी करू नकोस, आपण इंद्राचा ऐरावत आणू, त्यावर बसून तू साखर वाट’’ : अर्जुनाने आपल्या अक्षय भात्यातून एक बाण काढला आणि त्यावर ‘ऐरावत हत्ती काही वेळासाठी पाहिजे होता.’ अशा आशयाचा खलिता लिहून तो स्वर्गाच्या दिशेने प्रेरला. तो बाण इंद्राच्या पायाजवळ पडला. इंद्राने ते वाचले. आपल्या मानसपुत्राचा, अर्जुनाचा तो निरोप वाचून व त्याचा पराक्रम पाहून इंद्र प्रसन्न झाला. त्याने नारदमुनींजवळ निरोप पाठवला की, ‘तुम्हाला नेता येईल तर घेऊन जा’  : तो निरोप ऐकताच अर्जुनाने हस्तिनापुरपासून तर थेट स्वर्गापर्यंत बाणांचा पुल तयार केला. त्यावरून ऐरावत हत्ती चालत आला. त्यावर राजामाता कुंती विराजमान झाली. आणि हस्तिनापुरात तिने साखर दान केले. ऐरावत हत्ती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी आली. ते सर्व अद्भूत दृश्य पाहून कौरवांना फार जळफळाट झाला. अशी ती कथा होए.

हस्त्याव्हग्रामेश जनप्रसिद्धा = हस्तिनापुर नावाच्या नगरीचा योद्ध्यांचा ईश असा अतिप्रसिद्ध योद्धा अर्जुन तो नेहमी युद्धासाठी सिद्ध = तयारच असतो. सिद्धा सुबद्धा रणचंडयोद्धा = रणभुमीमध्ये उतरला की त्याचे शौर्याचे तेच सर्वत्र स्फारते असा तो प्रचंड योद्धा आहे.

 

छंद :- शार्दुलविक्रिडित

बोले धर्म सुवर्मवाक्य कुशळा बंधूजनालागुनी

क्षत्री चापकरी समस्त हि तुम्ही लोपाल कैसे गुणी ।

आतां गांडिव आदि सर्वहि ठिवा हे पंच इष्वासरे

वर्षानंतर साधिती जय असे यांचाच विश्वास रे ।।६६।।

अर्थ :- त्यानंतर धर्मराजा आपल्या कुशळ अशा बंधुंना सुवर्मवाक्य = अत्यंत गोपनिय वचन सांगता झाला, ‘‘तुम्ही सर्व क्षत्रिय आहात, तुमच्या हातात धनुष्य आहे, गदा आहे, हे कुठे ठेवाल आता? सर्वात आधी यांची व्यवस्था लावावी लागेल. पण हे पाचही धनुष्य आणि गदा कुठे ठेवायची? कारण एक वर्षांनंतर हीच शस्त्रास्त्रे आपल्याला जय मिळवून देतील. म्हणून एकाच ठिकाणी हे सर्व ठेवावे लागणार आहेत.

 

पूज्यमान विजयादशमीचा

तो विशाळतरु एक शमीचा ।

ज्या समीप जळती शवराशी 

पार्थ दावित महीशवरासी ।।६७।।

अर्थ :- त्या दिवशी दसरा होता, सकळ जगाला पूज्यमान असा विजयादशमीचा तो दिवस होता. ते पाचही बंधु एका मोठ्या शमी वृक्षाजवळ गेले. तिथे जवळ काही प्रेतं जळत होते. ते दृश्य अर्जुनाने मही ईश = पृथ्वीचा नियंता अशा धर्मराजाला दाखवले. व ‘इथे आपली शस्त्रे सुरक्षित राहतील’ असे सुचवले.

 

छंद :- इंद्रवज्रा

काढोनि संभार शरासनांचेकदंब भाते रिपुनाशनाचे ।

बांधोनि कृष्णाजिन मोट भारीचढे तरू तो प्रियकैठभारी ।।६।।

अर्थ :- तिथे सर्वांनी सं+भार = त्यांच्या खांद्यावर असलेले शरासनाचे = धनुष्य, बाणाचे भाते, इत्यादि शास्त्रांस्त्रांचा भार उतरवून एकत्र केला.  आणि त्या सगळ्या शस्त्रांना कृष्णाजिन = (हरणाचे कातडे) त्या हरणाच्या चांबड्यात ती मोट बांधली. आणि भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असलेला असा अर्जुन तो ते ओझे घेऊन त्या शमी वृक्षावर चढला. (शमी = आपट्याचे झाड) आणि त्याने ती शस्त्रास्त्रांची मोट तिथे व्यवस्थित चर्माच्याच दोरीने बांधली. आणि कोणीही त्या वृक्षाजवळ येऊ नये म्हणून ती अर्धवट जळालेली प्रेते त्या वृक्षाच्या फांद्यांना टांगून दिली आणि खाली उतरला.

छंद :- इंद्रवज्रा

उतावळा भीम बहू मनाचानाशावया स्तोम रिपूजनांचा ।

येईल शस्त्रास्त्र आणावयातेप्रमाण दील्याविण दे न यातें ।।७२।।

अर्थ :- धर्मराजा त्या शमी वृक्षाचे रक्षण करणाऱ्या नागदेवतेला म्हणतो, ‘‘हा माझा धाकटा बंधु भीम खुपच अधीर आहे, उतावळ्या मनाचा आहे, एक वर्ष संपण्याआधीच शुत्रुंचा सैन्याचा नाश करण्यासाठी इथे शस्त्रास्त्र घेण्यासाठी येईल. पण माझे प्रमाण घेतल्याशिवाय याला शस्त्रास्त्रे देऊ नकोस.’’ ।।

 

सांगौनि ऐसे शमिच्या रूहातेहातें धरी तुंडसरोरुहाते ।

भीमा ह्मणे तो जगमित्र ज्याचाकनिष्ठ बंधू वर मित्र ज्याचा ।।७३।।

अर्थ :- असे धर्मराजाने त्या शमीच्या वृक्षाला सांगितले, तेव्हा तो भिमाने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला आणि मनात म्हणतो, ‘मध्यंतरी शस्त्रे घ्यायला येईल, मी इतका उतावळा आहे का?’ मग तो जगमित्र = जगात कोणीही ज्याचा शत्रु नाही असा सर्वांचा मित्र असलेला अजातशत्रु असा धर्मराजा कनिष्ठ बंधू = भिमाला म्हणतो -  

 

प्रमाण केल्यास्तव एक सालाअज्ञातवासांत भरूं कसाला ।

ऐशा प्रमाणी मज भाक देशीतेव्हां सुखें राहिन मत्स्यदेशीं ।।७४।।

अर्थ :- एक वर्षाचे प्रमाण भरल्याशिवाय, अज्ञातवासाचे कसाला = कष्ट भोगल्याशिवाय ही शस्त्रे इथून काढायची नाही असे मला वचन दे तरच मी सुखाने या वाई नगरात वास करू शकेन. नाहीतर मला ‘तूं शस्त्रें काढणार!‘ असा सारखा धाक राहील.

 

छंद :- इंद्रवज्रा

हांसोनी भिम बोलिला उकलिला चित्तांतुनी भूपती ।

ज्याचा क्रोधभडाग्नि धूम्र उठतां शत्रुतृणे लोपती

स्वामी तूं जननी पिता समजतां सर्वज्ञ दिव्या दृशा

ऐसा कोण कुशील की करि तुझी सत्यप्रतिज्ञा मृषा ।।७५।।

अर्थ :- पुढे वैशंपायन ऋषि म्हणतात, हे जन्मेजय राजा! ते धर्मराजाचे बोलणे ऐकून भीमाला हसू आले. तो भीम कसा आहे म्हणशील तर, ज्या क्रोधाग्नी जर भडकला तर सर्व शत्रुरूपी तृणे = गवत जळून भस्म होते. किंवा शत्रु पळून जाऊन प्राण वाचवण्यासाठी गवतात लपतात. असा तो भीम हसतच धर्मराजा म्हणतो, ‘‘‍हे बंधो! मी तुला स्वामी मानतो. आणि तुच आम्हाला मात्यापित्यासारखा आहेस, असा तु सर्व जाणणारा आहेस मग असा कोण मुर्ख आहे की तू प्रतिज्ञा केली आणि मी ती मृषा = खोटी, असत्य करीन हे कधीच शक्य नाही. तू माझा अजिबात धाक मानू नकोस, मी इथे कधीच येणार नाही.

 

गंभीरवेगी गति चालणारी तीतें ह्मणे धर्मजि चाल नारी ।

संतुष्ट बंधूंसह द्रौपदीशीये धर्म वेगें त्रिदशानदीसी ।।७६।।

अर्थ :- आतापर्यंत झालेले पांडवांचे बोलणे गंभिर होऊन अतिशय शांत चित्ताने ऐकणाऱ्या द्रौपदीला धर्मराजा म्हणतो, ‘‘हे कृष्णे! आता इथून पुढे चलावं.’’ शस्त्रास्त्रें लपविण्यात यश आल्यामुळे सर्व बंधु मनातून संतुष्ट झाले. द्रौपदीही त्यांच्या चर्येवरचा संतोष पाहून प्रसन्न झाली. आणि ते सर्व जण वेगानेच विराट नगरीजवळ असलेल्या त्रिदशा गंगेजवळ आले.

उर्वरित कथा पुढील भागात


आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा! 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post