09-10-2021
वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक ४० ते ४६ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण)
छंद :- इंदवज्रा
असो अशा मत्स्यपती विरा जी । राजी सदा लोक गुणाकरा जी ।
राजीवनेत्रीसह बंधुराजी । राजीत देशी करु आसरा जी ।।४०।।
अर्थ :- धर्मराजा
धौम्यऋषिंना म्हणतो, ‘‘अशा श्रेष्ठ नगराचा वीर असा मत्स्यपती
= विराट राजा तो अतिशय गुणवान असून त्याला त्या राज्याची प्रजा राजी आहे. म्हणजे
त्याच्या राज्यसंस्थेवर अनुकूळ आहे, प्रसन्न आहे. राजीवनेत्री
= कमळासारखे नेत्र असेलली अशी जी द्रौपदी तिच्यासह बंधूराजी = चारही भावांसोबत त्या राजीतदेशी =
सुंदर अशा देशात तिथे आम्ही आसरा = आश्रय घेणार आहोत.’’
छंद :- शार्दुलविक्रिडीत
तेव्हां तो वदला पुरोहित हिते, जें वर्तिजे आपदी ।
दीजे मान त्यजोनि सावध मनें, हे रक्षिजे द्रौपदी ।
दीनाचे परि मानिती जन तरी थोरीव दावू नये ।
येती शोधित शत्रुदूत लपिजे तेणे पुढे मान ये ।।४१।।
अर्थ :- मग तेव्हा तो पुरोहित =
धौम्यऋषी धर्मराजाला म्हणाले, ‘‘तुम्ही आता विराटनगरीत जाणार, १२ वर्षाच्या
वनवासापेक्षाही अज्ञातवास फार कठिण आहे. म्हणून मी तुम्हाला काही हितकारक नियम सांगतो.
तिथे केवढी जरी आपदी = आपत्ती संकट आले तरी त्याला मान द्या, अर्थात लगेच
प्रतिकार करू नका. प्रतिकार केला तर तुम्ही ओळखले जाल. अतिशय सावधानतेने
मुकाट्याने ती आपत्ती सहन करा आणि सर्वांनी मिळून अतिशय कुळतेने या द्रौपदीचे
रक्षण करा. दीनाचे परि मानिती जन तरी थोरीव
दावू नये : नगरजन किंवा राजवाड्यातले लोक तुम्हाला दीनाचे परी =
अतिशय हिन समजतील, तिथे तुम्ही आपली थोरी मोठेपणा दाखवू नका. आणि तुमचे शत्रु कौरव
त्यांचे दूत तुम्हाला शोधत येतील तेव्हा स्वतःला लपवा. तरच हा अज्ञातवास शेवटाला
जाईल. आणि गमावलेला राजाचा मान पुन्हा मिळेल.
जेणें
राजमनोगतास सुख ये ऐशी गिरा बोलिजे ।
जेथे देशनिधीवधूजन बिदी त्या पंथिं ना चालिजे
।।
जे जे राजसमंधिक प्रिय सखे लीनत्व त्यांसी
किजे ।
जेव्हां सांगिल भूप कार्य तयि ते नायोग्यही
ऐकिजे ।।४२।।
अर्थ :- ज्या ज्या बोलण्याने विराटराजाच्या
मनाला सुख वाटेल अशीच गीरा = बोलणे करावे. आणि ज्या रस्त्याने देशाटन
करणारे पांथस्थ जातात येतात अशा राज रस्त्यांवरून चालू नका. कारण एखाद्या बाहेर
देशातील व्यक्तीने तुम्हाला ओळखायला नको. आणि जे जे राजाशी संबंधित लोक आहेत,
राजाला जे प्रिय लोक आहेत ते दुष्ट असो, का चांगले असो, त्यांच्याशी नम्रतेचे
वर्तन करावे. तो भूप = राजा एखादे कार्य सांगेल ते अयोग्य जरी असले, हलके
काम जरी असले तरी ते मुकाट्याने करावे. ।।
छंद :- वसंततिलका
झाले जरी बहुत हीन तरी त्रयाला । विद्वान विप्र हुतवाहन क्षत्रियाला ।
औमानितां त्वरित होय आपय साचा । सांगे असा मुनि समुद्र दयारसाचा ।।४३।।
अर्थ :- ‘‘तीन लोक असे
आहेत की ते कितीजरी हिन झाले तरी त्यांना अपमान सहन होत नाही. तेच कोण? १. विद्वान २.
अग्निहोम हवण करणारा ब्राम्हण ३. क्षत्रिय : या तिघांचा जर कोणी अपमान केला
तर त्याला त्वरित अपाय झाल्याशिवाय राहत नाही. ताबडतोब ते क्षुब्ध होतात. तसं
तुम्ही क्षुब्ध व्हायचं नाही.’’ असा उपदेश धौम्यऋषि पांडवांना करीत आहेत.
छंद :- स्रग्धरा (म र भ न य य य)
क्षत्री प्राबल्य राजे, बहु तव अनुजें, जिंकिले विक्रमाने
।
मानें ऐश्वर्यसिंधू, अनुपम असती , बाण
ज्याचे क्रमाने ।।
माने हा वास दुष्ट, श्रमकरकरसा, जो सदा दुःखदायी ।
दायादी ओळखीला, तरि मग च पुन्हां, काननींची बिदायी ।।४४।।
अर्थ :- ‘‘हे धर्मराजा ! तवं अनुजे
= तुझ्या लहान भावांनी प्रबळ = बलवान असे क्षत्रिय राजे आपल्या पराक्रमाने
जिंकले आहेत. हे ऐश्वर्यसिंधू धर्मराजा हा अर्जुन क्षणात सहस्रावधी बाणा क्रमानेच
शत्रुंवर प्रेरतो. असा हा पराक्रमी, याला खुप धैर्य धारण करावे लागेल. धर्मराजा !
मान्य आहे की हा अज्ञातवास अतिशय दुष्ट क्षमकर = कष्टदायक असून दुःखदायी
आहे. कारण दायादी = शत्रुंनी जर तुम्हाला ओळखले तर मग पुन्हा काननीची
बिदायी = तुम्ही बारा वर्ष अरण्यात गेलेच असं समजा.’’
छंद :- भुजंगप्रयात
असो यावरी वंदुनी पाय त्याचे । ह्मणे धर्म आह्मांस कुंतीपित्याचे ।
स्थळी तूं च की ज्ञानवंता उदारा । अशीर्वाद दे गुप्त राह्या सदारा ।।१५।।
अर्थ :- धौम्य ऋषिंनी असा
उपदेश केल्यावर पांडवांनी त्यांना नमस्कार केला. आणि धर्मराजा म्हणतो, ‘‘ हे
ज्ञानवान उदार अशा ऋषिवर्या! या वेळेला या ठिकाणी आपणच आम्हाला माता कुंती आणि
पिता पांडुसमान आहात. आपण आम्हाला सदारा =
द्रौपदीसह एक वर्ष गुप्त राहण्यासाठी आशिर्वाद द्या. (स + दारा = स्त्री)
पांच बंधु वनितेसह ते जी । चालिले मुनिसवे रवितेजी ।
शस्त्रबद्ध शर कार्मुकपाणी । आठवूनि हरि अंबुजपाणी ।। ४६।।
अर्थ :- मग तदनंतर ते
पाचही बंधू द्रौपदीसह दिवस मावळण्याच्या सुमारास अतिशय वेगाने निघाले.
त्यांच्याबरोबर मुनिही काही दूरपर्यंत निघाले. तेव्हा ते पांडव शस्त्रसज्ज होते.
त्यांच्या हातमध्ये भाला, गदा, धनुष्यबाण, तलवार इत्यादि शस्त्रे आहेत. असे ते भयानक
अरण्यातून वाट काढीत श्रीकृष्णदेवाचे स्मरण करीत विराट राजाच्या नगरीकडे निघाले.
आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा!