09-10-2021
वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक ३३ ते ३९ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण)
कंक बल्लव तशी बृहन्नळा । नाम कुंतितनयांस कूशळा ।
दामग्रंथि नकुळास नाम रे । तंतिपाळ सहदेव जाण रे ।।३३।।
अर्थ :- अज्ञातवासात
विराटराजाच्या घरी कोण कोणत्या नावाने वास करील हे ठरले, ती कुशळ नावे पुढील
प्रमाणे - १) युधिष्ठिर राजाने ‘कंकभट’ हे नाव धारण केले. २) भिमाने ‘बल्लव
स्वयंपाकी’ हे नाव घेतले. ३) अर्जुन उर्वशी अप्सरेचा शाप भोगण्यासाठी सज्ज झाला
त्याने ‘बृहन्नळा’ नाव धारण केले. ४) पुढील एक वर्षात नकुल ‘दामग्रंथी’ या नावाने
ओळखला जाईल. ५) आणि सहदेव ‘तंतिपाळ’ झाला. ६) आणि द्रौपदीने ‘सैरंध्री’ नाव घेतले.
।।
योजूनि ऐशा परमा हिताते । त्यानंतर धौम्य पुरोहिताते ।
वंदोनियां त्या अवनीपतीने । भीमादिबंधू सहदंपतीने ।।३४।।
अर्थ :- असे पाचही पांडवांनी आपल्या परम
अशा हीताची तयारी करून अवनीपती = राजा युधिष्ठिराने आणि द्रौपदीसहीत चारही भावांनी त्यांचे पुरोहीत असलेल्या
धौम्य ऋषिंना नमस्कार केला.
कूळ गोत्र सकळ प्रवरासी । जाणत्या परम विप्रवरासी ।
त्या गुरूस विनयालय वाचा । त्वत्समागम ह्मणे दइवाचा ।।३५।।
अर्थ
:- ज्याचे
कुळ गोत्र सर्वच प्रवर = श्रेष्ठ असून जो जाणता आहे अशा विप्रवरासी= धौम्य
ऋषिंना अत्यंत नम्रतेने बोलले ‘‘हे ऋषिवर! आतापर्यंत एवढे वर्ष आपण आमच्या बरोबर
राहिलात. तो आपला दैवाने मिळणारा समागम, सुयोग आमच्यासाठी अत्यंत सुखद काळ होता.’’
-
प्रामाण्य एक सरले खल दुर्जनाचे । नाचेल ही तव सवें सुख काननाचें ।
नाचेल देखत अह्मा दुसऱ्या प्रमाणी । माणिक्यतुल्य वधु बंधुजनास मानी
।।३६।।
अर्थ :- पुढे धर्मराजा
म्हणतो, ‘‘खल दुर्जन = वाईट वृत्ती असलेला दुर्योधन त्याचे एक प्रमाण
सरले = १२ वर्ष वनवास भोगणे ही अट संपली. त्या १२ वर्षाच्या काळात आम्ही
आपल्याबरोबर नातच गात अत्यंत आनंदाने राहिलो. आता इथून पुढे दुसरे प्रमाण म्हणजेच
एक वर्ष अज्ञातवासाचे सुरू होत आहे. त्या अज्ञातवासात माझी माणिक्यतुल्य वधु
द्रौपदी आणि चारही बंधुजनासहीत हा दुस्तर असा अज्ञातवास ही नाचेल = सुखातच निघून
जाईल अशी आशा आहे. ’’
आज्ञा तरी क्रमण वत्सर मत्स्यदेशा । दे शार्वरीत गमनास हितोपदेशा ।
देशाटना सकळ साधियले नराने । राने वनें बहुत याच किं दे वरानें ।।३७।।
अर्थ :- पुढे धर्मराजा म्हणतो, ‘‘हे धौम्य
ऋषिवर! आता आम्हाला विराटराजाच्या नगरीत क्रमण
वत्सर = एक वर्षाचा काळ
क्रमण्यासाठी आज्ञा द्या. आम्ही शार्वरीत =
रात्रीतच मार्गक्रमण करून दिवस उजाळायच्या आता विराटराजाच्या नगरीत गेलोच पाहिजे.
आमचा सर्वांचा नमस्कार स्वीकार करा. आपण आमच्याबद्दल असेच स्नेह, प्रेम ठेवा, या
१२ वर्षाच्या काळात आपली सेवा करताना आमच्याकडून कमीजास्त झाले असेल, बोलताना वेडेवाकडे
बोलले गेले असेल त्याची क्षमा करा. मग धौम्यऋषिने विचारले ‘‘अहो धर्मराज, पण
तुम्ही वाईंदेशाला असे जाल?’’ तेव्हा धर्मराजा म्हणतो, ‘‘या नराने =
अर्जुनाने मागे देशाटन केलेले आहे, याला सर्व रस्ते माहीत आहेत. हा सर्व राने वने
फिरलेला आहे, हाच आम्हाला वाईदेशाला घेऊन जाईल. तरी आपण आम्हाला काहीतरी हितोपदेश
करा.’’ ।।
जेथें सदाधर्मदिवा न वाहे । वाहे नदी भागिरथी प्रवाहे ।
वाहे मृषा आण न
देशवासी । सदा मनी आठवि केशवासी ।।३८।।
अर्थ :- धौम्य ऋषि
पांडवांना उपदेश करतात- ‘‘जेथे कधीच अधर्मदिवा पेटत नाही. आणि ज्याच्या राज्यातून
भागिरथी नदी मोठ्या स्वच्छनिर्मळ प्रवाहाने वाहते आहे, अशा वाई देशात तुम्ही जात
आहात. त्या विराट देशातले लोक कधीही मृषा =
मिथ्या आण वाहत नाहीत म्ह. खोटी शपथ घेत नाहीत. तिथे वास करत असताना नेहमी
श्रीकृष्णभगवंतांचे स्मरण केले पाहिजे.
जेथे द्विजावांचुनि देव नाही । वाहीम वाटे नवयौवना ही ।
नाहीं अकर्मा जन पूत नारी । सदा मनी आठवि पूतनारी ।।३९।।
अर्थ :- त्या विराट राजाच्या नगरात
ब्राम्हणाला देवासारखे पूजनिय मानले जाते. आणि तेथिल सात्विक वृत्तीचे लोक नवयौवना
स्त्री समोरून जरी आली तरी त्यांना ती वाहीम वाटते म्ह. कन्येसमान मातृसमान पूज्य
वाटते. तेथिल जन - नारी कधीच अकर्म अधर्म करत नाहीत. आणि सतत पुतनारी =
श्रीकृष्णभगवंतांचे स्मरण करत असतात. (पुतना + अरी =
पुतनेचा शत्रु तो श्रीकृष्ण भगवंत) ।।
पुढचा प्रसंग पुढील भागात :-
आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा!