वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक २२ ते ३२ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण) 06-10-2021

वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक २२ ते ३२ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण) 06-10-2021

  06-10-2021

वामनपंडितकृत  विराटपर्व श्लोक २२ ते ३२ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण)



मागिल बाविसाव्या श्लोकापासून पुढे

ऐक त्यावरि नृपा नकुळाचें । बोलणें परम सानुकुळाचें ।

अश्वशिक्षण कळाकुसरी त्याजाणता अन नसे च सरी त्या ।।२३।।

अर्थ :- त्यानंतर माद्रीचा मोठा मुलगा नकुल परम सानुकुळ भावाने धर्मराजाला म्हणतो, ‘तूं माझीही चिंता करू नकोस. मला अश्वविद्या अवगत आहे. त्या विद्येचा उपयोग करून मी विराट राजाचे घोडे सांभाळीन. माझ्यासारखे अश्वहृदय जाणणारा या भुतलावर कुणीच नाही.

 

नाचवनि तुरगास लगामीलावितां कर करीं नभगामी ।

वायुवेगगति ते समरांगणीं । नाकलोकपति पाहुनियां गणी ।।२४।।

अर्थ :- मला अश्वविद्या इतकी कुशलतेने येते की मी घोड्याच्या लगामाला हात घातल्याबरोबर घोडा नाचायला लागतो. आणि मी घोड्यावर आरुढ होऊन लगामाला माझ्या हाताचा स्पर्श झाला की, तो घोडा वायुवेगाने आकाशाचीही सैर करण्यास सज्ज होतो. माझ्याकडून शिक्षण प्राप्त झालेले घोडे समरंगणी = युद्धात वायुवेगाने विचरतात. ते पाहून नाकलोकपति = स्वर्गाचा राजा इंद्रही आश्चर्यचकीत होऊन माझी प्रशंसा करतो.

 

छंद :- इंद्रवज्रा

सेवीन अश्वां नरपुंगवाच्यावाचाळ माद्रेय वदे गवांच्या ।

श्रेणी भल्या राखिन एकनिष्ठें । हें बोलिलें पांडुसुतें कनिष्ठें ।।२५।।

अर्थ :- म्हणून मी नरपुंगव = नरांमध्ये श्रेष्ठ असा विराट राजा त्याच्या अश्वशाळेत राहीन.  त्यानंतर लहान भाऊ सहदेव धर्मराजाला म्हणतो, मी विराटराजाच्या गोशाळेत राहून गाईंना सांभाळण्याचे काम मी करीन. म्हणून तू माझ्याविषयीही निश्चिंत रहा.

 

छंद :- वसंततिलका

पाकक्रिया कुशळ मी निपुणांत रायाहे नष्टकाळनदि दुस्तर ऊत्तराया ।

आहे उपाय मज हा तनुपोषणासीपाहोनि पाक नृप तोषिल मद्गुणासी ।।२६।।

अर्थ :- पुन्हा भीम म्हणतो, ‘ही नष्ट काळरूपी दुस्तर अशी नदी उतरण्यासाठी मला उपाय आहे, मी पाकक्रियेत अत्यंत कुशल निपुण आहे. मी आचारी म्हणून विराटराजाच्या स्वयंपाक घरातच राहीन. माझे पोट भरण्यासाठी हा उपाय सर्वोत्तम आहे. आणि माझ्या पाककलेतली कुशळता पाहून, मी निष्पन्न केलेले स्वादिष्ट अन्न सेवून विराट राजा माझ्यावर सहज प्रसन्न राहील. म्हणून तू माझी चिंता तर अजिबात करू नकोस.

 

छंद :- कामदा(गण- र य ज ग)

त्यावरी वदे अग्निसंभवाभोगणार जे नित्य वैभवा ।

सत्त्वशीळ तूं त्या तुला कसामोह योग्य हा टाकिं ओकसा ॥२७॥

अर्थ :- मग हे सर्व ऐकून अग्निसंभवा = अग्निपासून उत्पन्न झालेली नित्यदिनी अष्टभोग भोगणारी द्रौपदी धर्मराजाला म्हणते, ‘‘हे आर्यपूत्र! आपण सत्वशिल आहात, आमच्याबद्दल जो तुम्हाला हा मोह = अज्ञानमूलक प्रेम, स्नेह उत्पन्न झालेले आहे ते टाकून वांतीसारखे टाकून दे. आणि माझीही चिंता करू नकोस.

 

छंद :- शालिनी (गण- म त त ग ग)

सैरंध्री मी होउनीयां सुशीलाशीलावंती राजजाया अशीला ।

शीळाचित्ता मी तया मानिनीची । नीची सेवा सेविं पद्माननीची ॥२८॥

अर्थ :- पुढे द्रौपदी म्हणते, मी सुशील अशी सैरंध्री होऊन अंतःकरणावर दगड ठेवून शीलवती अशी जी पद्माननी मानिनी विराटराजाची राणी सुदेष्णा तिची नीची सेवा = हलक्यातली हलकी सेवा करीन. माझी चिंता करूच नका.

 

छंद :- वसंततिलका

ऐकोनि हे वचन पंकजलोचनीचेनीची मुखीं सरतसे जळ लोचनींचें ।

ऐसा युधिष्ठिर ह्मणे सुख पावलों कीं । लौकीकयोग्य अबळे कर भाव लोकीं ।।२९।।

अर्थ :- त्या पंकजलोचनीचे = कमलनेत्रा द्रौपदीचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिर राजा खाली पाहू लागला त्याच्या नेत्रांतून घळाघळा अश्रु वाहू लागले. आणि तो म्हणतो आपण सर्व या संकटातून वाचणार म्हणून मला सुख होतेय. हे कृष्णे! अबले! तू या जगात लौकीक मिळवणारी आहेस, तू जे बोलली त्याप्रमाणेच सर्व पार पडो.

 

छंद :- कामदा(गण- र य ज ग)

सकळ बंधु ते आणि योषिताह्मणति ऐक जी सत्वभूषिता ।

केविं लोपसी ज्या तुझ्या नसेउदय ऊपमे देव मानसे ।।३०।।

अर्थ :- मग चारही बंधु आणि योषिता = द्रौपदी धर्मराजाला म्हणतात, हे सत्वभुषिता = सत्वाने विभुषित अशा धर्मराजा तुझ्या उपमेला देव माणसं पावणार नाहीत, असे तुझे बोलणे, वागणे, वर्तन ते तू कसं लोपशील? तू सत्यच बोलशील आणि तुझी ओळख विचारल्यावर तू काय सांगशील? हाच इथे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.

 

कष्ट भोगिलें काननीं तसेहे नव्हेत कीं बहु अनीतसे ।

परघरांत हा वास नष्ट कीभोगणें तुह्मां परम कष्ट की ।।३१।।

अर्थ :- हे धर्मराजा! काननी = अरण्यात आपण जे कष्ट भोगले तसे या अज्ञातवासात होणार नाहीत पण हा अज्ञातवास भोगणे त्यापेक्षाही कठीण आहे. का एवढा मोठा राजा असून दुसऱ्याच्या घरात ओळख लपवून राहणे, त्याची सेवा करणे यापेक्षा तुम्हाला परमकष्ट ते कोणते?


 छंद :- भुजंग प्रयात (गण - य य य य)

म्हणे धर्म मी घेउनी विप्रवेशासुखे राजगेहीं करीन प्रवेशा ।

सदा खेळुनी तोषवींक्ष रायामनोद्देशिंच्या जाणिजे अक्षरा या ।।३२।।

अर्थ :- यावर धर्मराजा म्हणतो, ‘‘मी ब्राम्हणाचा वेष धरून कंक नाव धारण करून सुखपूर्वक निर्भयतेने विराटराजाच्या घरात प्रवेश करीन आणि राजाचा सल्लागार बनेन त्याच्यासोबत अक्ष = द्युत खेळून त्याचे मन रमवीन असे माझ्या मनांत आहे ते तुम्ही जाणून घ्या. आणि माझी चिंता करू नका.

पुढचा प्रसंग पुढील भागात :-

 

आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास लिंक शेअर करा!

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post