13-10-2021
वामनपंडितकृत विराटपर्व श्लोक ४७ ते ५४ सार्थ (मराठी प्राचिन काव्य रसग्रहण)
दाटलें तम समग्र भरानें । एक वर्ण दिसती नभ रानें ।।४७।।
अर्थ :- शशी =
चंद्र त्याची ; प्रिया यामिनी = रात्र ती जयिं माजे = जास्त गडद अंधार
होतो, रात्र १२ वाजेच्या सुमारास तरुण असे ऐसी माजे ; अर्थात मध्यरात्रीच्या
सुमारास ते सर्व मेळाव्याने चालले आहेत. आधी चंद्राचा थोडाफार प्रकाश होता तोही
मावळला. आणि अतिशय तम = अंधार दाटला. त्यामुळे नभ = आकाश आणि रान =
ते निबिड अरण्य एकवर्ण दिसायला लागले म्हणजे काळेकुट्ट दिसायला लागले. ।।
पुढे कवि त्या भयानक अरण्यातून चालताना त्यां कोमलांगी द्रौपदीची
अवस्था कशी होती याचे वर्णन करतात-
छंद :- शिखिरिणी
पथीं चाले हाले
जगति गति हंसापरि पदी ।
पदींद्राचे घ्याया
सबळ पति ऐशीस अपदीं ।
नवीनें पद्में ती पदतळ महा कोमळ तसे ।
अशी सौंदर्याची लहरि रजपंके मळतसे ।।४८।।
अर्थ :- हंसगतिवत् अतिशय मोहक पदन्यास करत ती द्रौपदी
चालताना हालत होती, स्वतःला सावरत वाट काढत पांडवांसोबत वेगाने चालत होती. पण अशा
भयानक अरण्यांतून चालताना त्या धैर्यवान अबलेला काहीच भिती वाटत नव्हती. कारण
इंद्राचे स्वर्गपद घेण्याची क्षमता असलेले असे सबळ पराक्रमी पती तिच्या सोबत होते
म्हणून भिती वाटण्याचे कारण काय! राजकन्या असून सम्राटाची राणी द्रौपदी तिचे पाय
कधीच जमिनीवर पडलेले नव्हते इतके कोमल पदतळ ते जणुकाही नवीन पद्मे = नवीनच
उगवलेली कमळांची फुलांसारखे मुलायम आहेत, पण आता तिला खडे, गोटे, काट्यांतून
मार्गक्रमण करावे लागत होते. तरीही ती किंचितही डगमगली नाही. अशी
सौंदर्यसाम्राज्ञी द्रौपदी तिचे ते दैवी सौंदर्य रजपंके = धुळीने आणि
चिखलाने मलीन होत होते, माखत होते.
छंद :- इंद्रवज्रा
ते पाय ठेवी जगतीतळा या । अशक्त जे पापमळातळाया ।
तेव्हां धरा स्पर्श पवित्र तीचा । मानी स्वभाराहरणी सतीचा ।।४९।।
अर्थ :- जिचे पद जमिनीवर असलेल्या मळ स्पर्श
करण्यासाठी जणु अशक्त = पात्र नाही, असे कोमल पद ती द्रौपदी या भुमीवर ठेवत चालत
होती. किंवा जिला पाप मळ कधीच स्पर्शला नाही ती द्रौपदी या भुतलावर हळुहळु पदन्यास
करत अतिशय लालित्याने चालत होती. तेव्हा धरा = पृथ्वीला त्या पवित्र अशा द्रौपदीचा
स्पर्श कसा जाणवत होता म्हणाल तर एखादे हरीण चालत असताना जमिनीला पदांचा किंचित्
स्पर्श होऊ देते त्याप्रमाणे ती द्रौपदी चालत होती. भुमीला तिचा भगार अजिबात जाणवत
नव्हता.
छंद :- भुजंगप्रयात
न साहे जिला भार रत्नी नगांचे । चढे उतरे घांट यत्नी नगांचे ।
जरी कष्ट भारी पथीं काननींचे । तरी सत्व मोठे मृगांकाननीचें ।।५०।।
अर्थ :- राजवाड्यात असताना त्या द्रौपदीला
हाताच्या बोटांमध्ये असलेले अंगठ्यांचे रत्नही जड वाटत होते. अशी जी द्रौपदी नगांचे
घाट = डोंगरातील चढ - उतार मोठ्या प्रयत्नाने उतरत होती. जरी अरण्याच्या
रस्त्यात अतिशय थोर कष्ट होत होते तरी मृगांकाननी = चंद्रासारखे सुंदर मुख
असलेल्या त्या द्रौपदीच्या ठिकाणी कधीही न डगमगणारे असे अतिशय थोर सत्व होते.
क्षणे क्रोधमात्रेच दुर्वंश जाळी । क्रमी ते पदी दाट दुर्वंशजाळी ।
मृगेंद्रादिकां
त्या स्थळी स्वस्थ जीणें । पतीच्या बळें मानिले तुच्छ जीणे
।।५१।।
अर्थ :- आपल्या पातिव्रत्याच्या बळाने एका
क्षणात दुष्टांचा वंश जाळून भस्म करणारी अशी द्रौपदी ती अतिशय दाट असलेली अशी वंशजाळी
= बांबुंची वने ते क्रमी = पादाक्रांत करते आहे. अशा निबिडतर वेळुच्या
अरण्यांत मृगेंद्रादिका = सिंहादिक हिंस्र पशु वास करतात असे ते भयावह
अरण्य असून आपल्या पराक्रमी पतींच्या बळावर तिने ते सगळे तुच्छ मानले म्ह. तिथून
जातांना तिला अजिबात भय वाटले नाही.
छंद :-
दाट वृक्ष जडती बदरीचे । ज्यांत गर्जति मृगेंद्र दरीचे ।
राहती विविध श्वापदजाती । त्या पथों गजगती पदि जाती ।।५२।।
अर्थ
:-
त्या अरण्यात पुढे चालत असताना बदरीचे =
बोरीचे दाट असे बन लागले त्यात मृगेंद्र =
सिंह ते गर्जना करीत होते. (हिंस्र पशुंना माणसांचा वास आला की ते गर्जना करतात.) अशा
त्या जंगलात विविध श्वापद जातींचा वास होता. आणि त्यातून रस्ता काढीत हे द्रौपदी
आणि पाचही पांडव शस्त्रे हातात घेऊन गजगती
= हत्तीसारखे निर्भय होऊन अतिशय वेगाने चालत होते.
असे लागले दाट दुर्वृक्ष पाहे । सरे जोवरी अंधकारी क्षपा हे ।
यमुनानदी टाकुनी सव्य भागी । पुढे चालिले कौरवांचे विभागी ।।५३।।
अर्थ :- अशा दाट झाडीतून पांडव चालले आहेत,
तोपर्यंत क्षपा = अंधारी रात्र ती संपत आली होती. थोडेसे उजाळले आहे अशा
वेळेला यमुनानदी सव्यभागी = उजव्या भागी टाकून कौरवांकडून संपत्तीचा अर्धा
हिस्सा घेणारे ते पांडव पुढे चालले.
अशी चालतां ते शशीरूप तंगे । प्रभातेस यायास केले पतंगें ।
बहू मातला थाट एणीकुळाचा । असे धर्म तो क्षत्रियांच्या कुळाचा ।।५४।।
अर्थ :- असे मार्गक्रमण करत असताना
चंद्राची तंगे = पत्नीच जणु अशी ती रात्र, तिचे कार्य पुर्ण झाले व प्रभातेस
= सकाळच्या रामप्रहरी पतंगे = सुर्याने ; यायास केले = आगमन केले.
त्यामुळे क्षितीजावर लाली पसरली आहे. अशावेळेला एणीकुळ = हरणांचे समुदाय
निर्भय होऊन विचरत आहेत. तसेच निर्भयतेने विचरण करणे हाच खरा क्षत्रियांचा धर्म
आहे. तसे ते पांडव देखिल निर्भयतेने पुर्ण रात्रभर चालतच होते.
आमच्या संकेतस्थळाचे लेख आपणास आवडल्यास LIKE AND FOLLOW करा! आणि लिंकसहीत लेख शेअर करा!