श्रेष्ठ पुरुषांची लक्षणे

श्रेष्ठ पुरुषांची लक्षणे

 श्रेष्ठ पुरुषांची लक्षणे 



चंदनाचा वृक्ष सर्वांनाच माहित आहे. चंदन पुन्हापुन्हा किती घासले तरी त्याचा सुगंध किंचितही कमी होत नाही, तेवढाच सुगंध ते अखेरपर्यंत उधळत राहते. ज्या कुर्‍हाडीने चंदन तोडले जाते ती कुर्‍हाड देखिल ते सुगंधित करून सोडते. तसेच उसाचे किती तुकडे तुकडे केले तरी त्याची गोडी तेवढीच आणि तशीच कायम राहते. सोने कितीही वेळा तापवले तरी त्याची झळाळी कणभरही कमी होत नाही. ते शुद्ध होत जाते आणि झळकत जाते उत्तम वस्तू असो किंवा व्यक्ती असो श्रेष्ठ गुण हीच त्याची प्रकृती असते प्राणांतिक संकट आले तरी त्याच्या गुणात विकृती कधीच निर्माण होत नाही, भक्तीत व्यभिचरत नाही. ते कधीही खालच्या थराला जात नाहीत. 

जसे राजा युधिष्ठिराच्या आयुष्यात किती कठीण प्रसंग आले पण त्याने सत्य बोलणे कधीच सोडले नाही. ज्या कौरवांमुळे वनवासाला जावे लागले त्याच कौरवांच्या मदतीसाठी गंधर्व युद्धात भीमाला आणि अर्जुनाला पाठवले. असा तो अतिशय सत्ववान राजा होता. 

संकटात सापडले असता त्यातून सुटण्यासाठी सामान्यमाणूस तडजोड करतो. नाईलाजाने का होईना पण आपली तत्वे बाजूला ठेवून अधर्माचे आचरण करायला तयार होतो. कारण मुळातच त्याची प्रकृती चंचल असते, मन कमकुवत असते, शरीर सुखलोलुप असते, द्रव्याची हाव असते आणि बुद्धीला परिपक्वता आलेली नसते. अशा परिस्थितीत त्याच्यावर अनेक संकटे येतात. कधी कधी तर तो स्वतःच स्वतःच्या चुकीने संकटे ओढवून घेतो. 'इकडे आड तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण करून घेतो. आणि मग ती गुंतागुंत सोडवता सोडवता संकटातून बाहेर त्याची अशी दमछाक होते. शेवटी तो हतबल होऊन विचार करतो की, 'तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले' अशी परिस्थिती होण्यापेक्षा तत्त्व गेले तर गेले तरी चालेल पण निदान थोडा फायदा तरी पदरी पाडून घेऊ असा बचावात्मक आणि स्वार्थी पनाचा पवित्रा तो घेतो. मग अशा वेळेला स्वजनांशी गद्दारी करावी लागली तरी चालेल पण आपली पोळी भाजून घ्या इतका हलका विचार तो करतो. इतिहासात असे अनेक उदाहरण आहेत द्रव्य लोभापायी स्वजनांशी राजाशी गद्दारी करून पसार झाले. 

श्रेष्ठ पुरुष मात्र या कोणत्याही गुंतागुंती निर्माण न करता आपले सत्व व तत्व न सोडता कसोटीस उतरतात. थोरामोठ्यांच्या चरित्राचे निरीक्षण केले असता ही गोष्ट वारंवार स्पष्ट होते किंबहुना ते धीरोदात्तपणे स्वधर्माचाच आचरतात म्हणूनच ते श्रेष्ठ ठरतात. त्यांचे जीवन इतरांना मार्गदर्शक ठरते. त्यांनी देहत्याग केला तरी त्यांचे नाव व कार्य अमर ठरते. कितीही संकट ओढवले कितीही कठीण प्रसंग आला तरी ते परमेश्वराची भक्ति सोडून देवतेला शरण जात नाहीत परमेश्वराची अनन्य भक्ती करणे हेच त्यांचे अंतिम ध्येय असते.

१८ दिवसात महाभारत युद्ध संपले होते. श्रीकृष्ण भगवंत द्वारकेला परतण्याच्या तयारीत होते. 

ते कुंती मातेला म्हणाले, “मी निघतोय तुला काही मागायचे आहे का? असल्यास निःसंकोचपणे सांग. 

कुंती मातेचे डोळे भरुन आले व सहजच तिच्या मुखातून बाहेर पडले, प्रभो ! तुम्ही खरोखर धन्य आहात. आमच्यासाठी तुम्ही नेहमीच दयाळू आणि उदारतेच्या मर्यादेपर्यंत उदार आहात. आपण नेहमीच आमच्यावर कृपा केली आहे. आमच्या आयुष्यात असेच संकटं येत राहावेत. कारण त्या संकटांमुळे तू आम्हाला आठवतोस. म्हणून दुःखाशिवाय एक क्षणही न जावा जेणेकरून सतत तुझी आठवण राहील. याशिवाय मला कशाचीही इच्छा नाही.' श्रीकृष्णभगंवंत म्हणाले, आत्या ! जर तुम्हाला मागायचेच असेल तर एखादी चांगली गोष्ट मागा, जी आयुष्यात उपयोगी पडेल. अशा त्रासदायक वर का मागताय? संकटात पडून कोणता आनंद मिळतो? तुम्ही आजवर खूप त्रास सहन केला आहे. आता तरी आनंद मागा म्हणजे पुढील जीवन सुखकर आणि आनंदी होईल आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. असे काहीतरी मागा. 

कुंती म्हणाली, “प्रभो! जेव्हा-जेव्हा आमच्यावर संकटे आली आहेत, तेव्हा तेव्हा तू दर्शन देऊन आमचे सर्व दुःख दूर केले आहेस. यामुळेच मी म्हणते की, आयुष्यात संकटे कायम येत राहिली, तर खूप चांगले होईल; कारण दुःखात माणूस आपल्या इष्टाचे स्मरण मनापासून करतो आणि कृपाळू भगवंत भक्तांवर आपल्या कृपेचा वर्षाव करायला नक्कीच येतो. म्हणून तेच द्या.”

असे थोर पुरुष संकटांना घाबरत नाहीत आणि आपला स्वधर्म टाकत नाही. कारण त्यांना परमेश्वरावर दृढ विश्वास असतो. आणि तोच भक्त देवाला आवडतो. त्याला देव पावलापावलावर सहाय्य करतो. 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post