भाग 03 नामधारकाचा आचारधर्म (असतिपरी)
नामस्मरण :
१. हातात गाठी न घेता नामस्मरण करावे का?
- हातात गाठी असली म्हणजे स्मरणापासून चित्त विचलीत होत नाही. झालेच तर गाठीमुळे लवकर लक्षात येते पण गाठी उपलब्ध नसेल तेव्हा त्याचा अडसर नसावा, कारण गाठी नाही म्हणून स्मरण टाळू नये.
अन्नदान ही गृहस्थधर्मात अत्यंत महत्त्वाची श्रेष्ठ क्रिया आहे. गृहस्थधर्मात यथाशक्ती जास्तीत जास्त अन्नदानाची क्रिया करावी पण त्याची काही पथ्ये पाळावीत ती पुढील प्रमाणे :
१. अन्नदान निर्हेतूक असावे.
२. अन्नदान ईश्वर बुध्दीने करावे.
३. अन्नदान विनम्रबुध्दीने करावे
४. अन्नदान सात्त्विक बुध्दीने करावे.
५. अन्नदान शुध्दमनाने करावे.
६. अन्नदान निःसंकोचपणे करावे.
७. अन्नदान योग्यस्थळी, योग्यकाळी व योग्यपात्री करावे.
८. अन्नदान दुष्काळी भागात विशेष लाभदायी!
९. अन्नदान विधीपूर्वक करावे.
१०. अन्नदानाचा उल्लेख करु नये.
११. आपल्या सहयोगाची मर्यादा व अपेक्षित खर्च यांचे अगोदर नियोजन करावे.
सेवासुश्रुषा
'जो करी सेवा, त्यालाच मिळे मेवा', अध्यात्मिक कार्यात सेवेला खूप महत्त्व आहे, साधू संत अधिकरण यांची सेवा केल्याने आपल्या अनंत विविध कर्माचा नाश होतो. सेवेला किती महत्त्व आहे. यासाठी भगवान श्रीकृष्णांनी राजसुययज्ञात ऋषी भोजनानंतर स्वतः पत्रावळी उचलून सेवेचे महत्त्व दाखविले आहे.
त्यामुळे आपली प्रतिष्ठा बाजुला ठेवून मिळेल ती सेवा आपण केली पाहिजे. निदान आपली सेवा तरी इतरांकडून करुन घेऊ नये. कारण त्यात सेवा करणारा कमावतो पण सेवा घेणारा खूप गमावतो. गृहस्थधर्मीयांनी हे विशेष लक्षात घ्यावे.
विशेषतः अशक्त साधू संतांची सेवा म्हणजे प्रेमाचा उपायांपैकी एक उपाय आहे. म्हणून अशी संधी कुणीही सोडू नये. पेक्षा संधी शोधण्याचा प्रयत्न करावा, मात्र सेवा निर्हेतूक व निरभिमानी असावी.
स्थानभेट :
१. गृहस्थ धर्म आचरीत असतांना सांसारीक व्यापातून वेळ काढून आपल्या सवडीनुसार सहकुटूंब एखादे स्थान वंदन करण्यास गेले पाहिजे. स्थान वंदनाला जाण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
१. स्थानावर जाण्यापूर्वी आपणास ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचा मार्ग व संपूर्ण माहिती नकाशा मधून अथवा माहिती असलेल्या कडून मार्गदर्शन घ्यावे.
२. घरुन निघतांना पूर्ण नियोजन करुन म्हणजे मुक्कामाचे साहित्य. विडा उपहार पूजेचे साहित्य इ. गोष्टींची पूर्ण तयारीनीशी निघावे.
३. स्थानावर पोहचल्यावर हातपाय स्वच्छ धुऊन स्थान वंदन करावे.
५. वंदन करतांना तिथली लीळा आठवावी व इतरांना सांगावी. माहिती नसल्यास तिथल्या भिक्षूक पूजारी यांना विचारावी.
६. स्थानावर त्याकाळी भक्तांना परमेश्वराकडून जो लाभ झाला तो आठवून आपणास तसा लाभ का झाला नाही याचे दुःख करावे.
७. स्थानाची सेवा करावी. लीळा आठवून गाठी करावी.
८. नियोजनानुसार उटी, उपहार, पुजाआरती, वस्त्रदान इ. क्रिया पूर्ण कराव्या. दंडवत घालावे.
९. स्थानावर अधिक काळ थांबायचे असेल किंवा मुक्काम करावयाचा असेल तर आश्रमातील भिक्षुकांना कमीत कमी त्रास होईल असे पहावे.
१०. आश्रमातील भिक्षुकांकडून सेवा करुन घेऊ नये.
११. आपणच मार्गाची सेवा करावी. यथाशक्ती अन्नदान करावे, योग्य अशी द्रव्यपूजा करावी.
१२. परत निघतांना अधिकरणाजवळ प्रसव मोडावा.
भिक्षुक भेट :
गृहस्थधर्म आचरीत असतांना कधी काळी विधी निमित्ये भिक्षुक, साधू संत अधिकरण येत असतात ती आपल्यासाठी एक अपूर्व संधी असते कारण म्हटले आहे की, “साधूसंत येती घरा, तोचि दिवाळी आणि दसरा."
भिक्षूक म्हणजे चतुर्विध साधनातील तिसरा खांब असतो, जो परमेश्वराने सांगितलेला आचारधर्म पाळतो, परमेश्वराची कृपा लाभावी व परमेश्वर प्राप्ती व्हावी म्हणून परमेश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग केलेला पण परमेश्वराचा सोयरा असतो. म्हणून भिक्षुक हा गृहस्थधर्मीयांसाठी भजनीय व पूजनीय असतो. म्हणून कधी काळी आपल्याकडे भिक्षूक, साधू, संत यांचे आगमन झाले तर
१. भिक्षुकांना सामोरे जावून दंडवत प्रणाम करावा.
२. श्रम परीहार करावा, पाय धूवावे.
३. सुपारी, नारळ देवून दर्शन भेट घ्यावी.
४. क्षेम वार्ता विचारावी.
५. जलपान, भजन, पूजन व यथाशक्ती, द्रव्यदान करावे.
६. शंका समाधान धर्मवार्ता करावी.
७. हा सर्व अतिथी सत्कार ईश्वरार्पण बुध्दीने करावा.
८. पण, भिक्षूकावर ईश्वरबुध्दी ठेवू नये.
९. सर्व भिक्षुकांवर समान बुध्दी ठेवावी.
१०. 'मोल न करो तलवारकी, पडन रहने दो म्यान' म्हणजे भिक्षुकाच्या राहणीमानकडे न पाहता ज्ञानाकडे पहावे.
११. भिक्षुकाचे पूजन म्हणजे त्यांच्या ठायी असलेल्या ज्ञानाचे पूजन असते.
१२. नम्रतापूर्वक भोजनाचे विचारावे किंवा आग्रह धरावा होकार मिळाल्यावर लगेच भोजनाचे पाच दंडवत घालावे.
१३. पथ्य,पाणी विचारुन आवडीचा स्वयंपाक करावा.
१४. शारीरीक सेवेची संधी मिळाल्यास सेवा करावी.
१५. शेवटी प्रसन्नता प्राप्त करुन आशिर्वाद घ्यावा.
काही लक्षात घ्यावयाच्या बाबी :
अंधश्रध्देने किंवा धर्माव्यतिरिक्त ममतेने पूजन करु नये, ज्ञान भक्ति व वैराग्याच्या संदर्भात भिक्षुक पारखता आला तर पारखावा व त्याप्रमाणे क्रिया: करावी. परंतू आपणास पटले नाही तरी कोणत्याही भिक्षुकाची अवहेलना अथवा टिंगल, टवाळकी करु नये.
* एक ईश्वरीचा म्हणून त्याचा योग्य आदरच करावा कारण, 'मार्गीचा मुंजा कसा म्हणू मी लहान? त्यांचा अभिमान देवराया !'
* भिक्षुकाजवळ आपल्या सांसारीक समस्यांची चर्चा करु नये व त्यांच्या वैयक्तिक बाबींकडेही लक्ष देवू नये.
* एका भिक्षुकाजवळ दुसऱ्या भिक्षुकाची कुचेष्टा करु नये.
* स्वैराचारास प्रोत्साहन देऊ नये, नितीशास्त्रानुसार प्रस्थापीत धर्म आचरणाचे कोणी उल्लंघन करीत असल्यास त्यास समज देण्यास किंवा विरोध करण्यास हरकत नाही.
भिक्षुक, अधिकरण यांचा भोजन क्रिया विधी:
अन्नदान ही श्रेष्ठक्रिया! त्यातल्या त्यात सत्पात्री साधू संतास भोजन म्हणजे अतिउत्तम ! शिवाय विधीपूर्वक अन्नदान केले तर दुधात साखर! करीता गृहस्थाश्रमात अशी संधी कुणीही सोडू नये. त्याचा विधी पुढीलप्रमाणे :
१. भिक्षूकास, अधिकरणास भोजनाचे पाच दंडवत घालावे.
२. त्यांच्या खाण्याचे पथ्यपाणी व आवडी निवडी विचारुन स्वयंपाक करावा.
३. स्वयंपाकानंतर त्यांच्या करवी देवास (नैवेद्य) उपहार दाखवावा. ४. पाट मांडून आसनस्थ करावे, ताटासाठीही पाट ठेवावा.
५. ताटाभोवती शक्य असल्यास रांगोळी काढावी.
६. गंध, अक्षता, पुष्प, माळा इ. ने पूजा करावी.
७. पूर्ण पदार्थ वाढून ताट ठेवावा व निर्हेतुक अन्नदान व द्रव्यदान श्रीकृष्णार्पण असे म्हणून हातावर संकल्प सोडावे.
८. संकल्प सोडतांना आपल्या उजव्या हातात पाण्याचा ग्लास धरावा व डावा हात त्यांच्या हाताखाली धरावा.
९. पाच दंडवते घालून प्रार्थना म्हणावी (अन्नदान स्विकारण्याची)
१०. धूपार्ती, उदबत्ती ओवाळावी.
११. प्रसन्नतेने निर्हेतूक आग्रहाने भोजन विधी पूर्ण करावा.
१२. प्रकृती नुसार भोजनाचा आग्रह करावा. दंडवत घालतांना पुढील प्रमाणे मनःपूर्वक प्रार्थना करावी....
“तुम्ही ईश्वराचे राजहंस आहात, माझ्या क्रियेचा स्वीकार श्रीचक्रधर स्वामी करणार नाहीत, म्हणून स्वामींना माझी क्रिया स्वीकारात घ्यायला सांगा! तुमच्या योग्य काहीच नाही, तरी मज गरीबाचे अन्न गोड करुन घ्या, मी दैवहिन व खंतीचा प्राणी आहे. स्वर्गातील अमृतादी पदार्थ आणून तुम्हाला जेवू घालावे, रत्नांची पूजा करावी, अशी तुमची योग्यता आहे, पण माझा तसा द्रव्यभाव, श्रध्दा प्रीती नाही.”
हे देवा! श्रीचक्रधरराया माझ्यावरील खंती परिहरुन या क्रियेचा स्वीकार करावा.
हे सकळही देवाचे देव देईल ते माझे! तुमचेच तुम्हाला अर्पण करीत आहे. माझे काहीच नाही. असे नम्रभावे दुःखपूर्वक म्हणावे व ५ दंडवते घालावी.
* भिक्षुक, साधू संतांपासून होणारा लाभ :
१. भिक्षूक, साधू संत यांच्या ठायी असलेल्या ज्ञानामुळे नामधारक, वेधवंत व साधनवंत यांचे अज्ञान व अन्यथा ज्ञान दूर होवून यथार्थ ज्ञान प्राप्ती होते.
२. साधू, संत हे परमेश्वरीय ज्ञानाचे माध्यम आहे. कारण, असन्निधानी परमेश्वर साधू, संत अधिकरण यांच्या मुखातून ज्ञान प्रदान करीत असतात.
३. साधू, संत, अधिकरण यांच्या सेवेने गृहस्थधर्मीयांची अध्यात्मीक प्रगती होत असते.
४. अशक्त साधू संतांची सेवा केल्याने पुढे परमेश्वर सेवेचे योग येतो.
५. साधू, संत हे परमेश्वर प्राप्तीचे मार्गदर्शक व दिपस्तंभ असतात.
३. वासनिक भेट :
ज्याला परमेश्वराची अत्यंत गोडी असते. जो परमेश्वराचे सतत चिंतन करतो. ज्याला चतुर्विध साधनांची आवडी असते व अनुसरणाची अत्यंत तळमळ असते पण तो अनुसरलेला नसतो. काही विशिष्ट कारणास्तव नाममात्र संसारात असतो. अशा गृहस्थधर्मीय व्यक्तिस वासनीक म्हणतात.
वासनीकाचे महत्त्व :
आपण गृहस्थधर्मात फक्त भिक्षुकांना महत्त्वाचे मानतो. वासनीकाला आपल्या सारखाच गृहस्थधर्मी समजतो पण वासनिक हा चतुर्विध साधनातील चवथा खांब असतो. कुण्या वासनिकाची पात्रता किती आहे हे आपल्याला माहित नसते. म्हणून वासनिकाशी वागतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.
१. वासनिक भेटला असता त्याला स्वतःहून दंडवत प्रणाम करावा.
२. आपल्याकडे येणाऱ्या नातेवाईकांपेक्षाही अधिक आवडीने आदरातीथ्य करावे.
३. आपल्याकडे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात आमंत्रण द्यावे.
४. वासनिकाशी परमप्रीती असावी कारण तो अच्युत गोत्रीय असतो.
५. वासनिकाला अडीअडचणीच्या वेळी मदत करावी.
६. वासनिकाची भेट स्वतःहून घ्यावी कारण देव दुर्लभ त्याहीपेक्षा देव आठविणारा दुर्लभ!
७. भेट निर्हेतूक असावी, भेटीची ओढ कायम असावी.
४. संगसांगात :
गृहस्थधर्मात असतांना मोक्ष मार्गाची वाटचाल करण्यासाठी धर्माचे ज्ञान वाढविणे आवश्यक असते. पण ज्ञान हे स्वतःहून कुणाचे दार ठोठावित नसते. ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी चतुर्विध साधनांच्या सहवासाची गरज असते. (स्थान, भिक्षूक, वासनीक, प्रसाद).
आपल्या गुरुंचे सन्निधान नेहमी लाभत नाही. करीता तत्सम भिक्षुक, ज्ञानी, अधिकरण यांच्या सहवासात राहवे. घर बसल्या नुसती पुस्तके, ग्रंथ वाचून ज्ञान प्राप्ती होत नसते. ते अधिकृत अधिकरणाकडून घ्यावे लागते म्हणून :
१. ज्ञानी अधिकरणाचे धार्मिक प्रवचन, पोथी इत्यादी कार्यक्रमात उपस्थित राहून ज्ञानाचा लाभ घ्यावा.
२. संत सहवासात शास्त्र चर्चा करुन शंका समाधान करावे. ३. घरी आलेल्या भिक्षुकाजवळ धार्मिक चर्चा करावी.
४. सत्संगाला उपस्थित राहावे.
५. वेळ काढून काही दिवस आश्रमात साधू संतांचा सहवास करुन ज्ञान प्राप्ती करावी. विधीयुक्त आचरणाचे ज्ञान करुन घ्यावे.
६. रिकाम्या वेळी टी.व्ही. वगैरे पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा धार्मिक पुस्तकांचे वाचन करावे. कारण ज्ञानामुळेच मोक्ष व प्रेम प्राप्ती होते. ज्ञानाविना वैराग्य कामाचे नसते. तसेच ज्ञानाविना विधी करु नये. माहिती नसेल तर निःसंकोच माहिती करुन घ्यावी अन्यथा केली क्रिया वाया जाते. केलेल्या क्रियांचा अभिमान व समाधान मानू नये कारण, परमेश्वर प्राप्ती हेच आपले समाधान! तो पर्यंत असमाधानीच असावे. म्हणून गृहस्थधर्मात जास्तीत जास्त विधीयुक्त आचरण करुन ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा न्युटरल गिअर मध्ये कितीही गाडीचे इंजिन चालविले तर इंधन वाया जाईल पण गाडी पुढे सरकणार नाही व पुढचा प्रवास होणार नाही. म्हणून गृहस्थधर्मात न्युटरल (म्हणजे निष्क्रिय) न राहता क्रियाशील असावे. म्हणजे विधीयुक्त क्रिया, ज्ञानार्जन व आचरणशील राहवे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे!
* दंडवताचे महत्त्व :
१. चारही प्रकारच्या कर्मफळांचे दुःख मुक्त करुन पशु पक्षी व ।। सरपटणाऱ्या जीवांचे भोग चुकतात.
२. अनंत कर्मांची बंधने नष्ट होतात.
३. व्यायाम होऊन शरीरातील वात नष्ट होतो. आरोग्य लाभते.
४. मन प्रसन्न होते.
५. बौध्दिक उन्नती होऊन स्मरणशक्ती वाढते
६. परमेश्वर दोषांची क्षमा करतात.
७. सर्व सद्कर्मामध्ये परमेश्वरांचे सहाय्य वर्तते.
८. अंगी नम्रता येते.
अविधीचे तोटे :-
१. अविधीने केलेल्या क्रियेचा परमेश्वर स्विकार करीत नाही.
२. केलेली क्रिया वाया जाते.
३. अविधीचा दोष लागतो.
४. अविधीतून नविन अविधी होतात.
५. परिणामी साधकाचे मोक्षमार्गावरुन पतन होते.
४. गंध टिळा व पुष्प समर्पण:
देवपूजा वंदन झाल्यावर विशेषांना चंदनाचा गंध लावावा. अक्षता समर्पित करुन ताजी फुले वा पुष्पमाला समर्पण करावी.
गंध लावतांना प्रार्थना म्हणावी
'देवा तुझ्या प्रदेश भाळा । कस्तुरीचा असें टिळा ।
चंदन गंध दयाळा । बाईसा सम स्विकरी ।।'
पुष्प, माळा वाहतांना प्रार्थना म्हणावी : '
रिंगणी पुष्प येल्हाईसे । सुवर्ण भावे स्विकारीतसे ।
नागदेवे गुंफिली असे । अवसरासी फुले ।।'
प्रसाद वंदनाचे महत्त्व :
प्रसाद वंदनाने, धर्माचरणात दक्षता मनाची प्रसन्नता, परमेश्वरा विषयी आवडी, विघ्ननाश विधी आचरणाची योग्यता, अंतःकरणाची सात्विकता व परमेश्वराचे सन्नीधान यांची प्राप्ती होते.
५. विडा समर्पण करणे :
नागवेलीची पाने, नारळ, सुपारी, वेलदोडा, लवंग इ. युक्त पदार्थांनी विडा समर्पण करतांना प्रार्थना म्हणावी
'पत्रं पुष्पं फलं तोयं पोफळ द्रव्य समर्पणम् ।
किंवा
बीड स्थानी भटोबासी । अर्पिला विडा देवासी ।
सुपारी श्रीफळ तैसे । नागवेली समर्पितो ।।
६. धूप दाखविणे:
सुगंधीत उदबत्ती अथवा धूप लावून प्रार्थना म्हणावी.
'धूपं दीप फलं पुष्पं तुभ्य समर्पणम्'
अथवा
भोगरामीचा राणा । दसांग धूप श्रीचरण ।
अंगी करावी प्रार्थना । अपूर्व भावे अवसरा ।।
आरती ओवाळणे :
आरतीचे तबक दोन्ही हातात धरुन देवपूजेला सामोरे व्हावे व आरती ओवाळून प्रार्थना म्हणावी.
जयतु मंगल मंगला, परम मंगल रुपा, सुंदरा नागरा, पतीत पावना, अव्यक्ता, अनंता, सच्छिदानंदरुपा, यतीमुनिवेषधारका, श्रीचक्रधरा शरणांगतः वज्रपंजरा, तुज पंचप्राणारती ओवाळीतो, तरी कृपादिगुणाकडून स्विकारावे जी स्वामीया ! मज सेवकासी सन्निधानस्थित करोनी कैवल्यानंद ज्योतीचा आनंद द्यावा जी स्वामीराया! जयतुमंगल मंगला, परममंगलरुपा, परमेश्वरा श्रीचक्रधरराया ! *
दंडवत घालणे व प्रायश्चित करणे :
दंडवत :- दंड म्हणजे काठी व वत् म्हणजे त्या प्रमाणे.
काठी जशी जमिनीवर पडली असता पूर्णपणे जमिनीला स्पर्श करते. त्यानुसार आपल्या शरीराची आठही अंगे जमिनीला स्पर्श करुन वंदन करणे यास साष्टांग दंडवत क्रिया असे म्हणतात.
देवपूजा विधी संपल्यावर कमीत कमी पाच दंडवत घालावे व प्रार्थना म्हणावी.
'पापोहं पापकर्माऽहं पापात्मा, पाप संभवः।
त्राही माम् कृपया देव, शरणांगत वत्सल.।।'
देवा ! परमेश्वरा तुम्ही कृपाळू, मयाळू, दयाळू, कनवाळू आहात, माझ्या सकळही दोषांची क्षमा करावी व पुढील दोषांपासून रक्षावे! माझ्या भक्ती मार्गातील अडथळे दूर करुन मला प्रेमदानास पात्र करावे! जी!
अशी प्रार्थना करुन पाचही अवतारांच्या नामांचा जयघोष करावा.
प्रायश्चित
प्रायश्चित म्हणजे झालेल्या दोषांची क्षमा मागणे, प्रायश्चित हे दुःखपूर्वक मनस्तापाने रडून करावयाचा विधी असतो. रोज संध्याकाळी देवपूजा झाल्यावर दंडवते टाकून पुढील प्रमाणे प्रार्थना म्हणावी.
हे प्रभु, विभू, सच्चिदानंदरुपा, परमेश्वरा, तू दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू, आर्तदानी, अनिमत्त बंधू जीवोध्दारण व्यसनीया, वज्र पंजरुवा, अनाथनाथा, भक्तवत्सला, पतीत पावना ! नित्य मुक्तीदायका!
मी अनंत जन्माचा अनाचारी! कामक्रोधी! लोभ, मोह, मद, मत्सर आदि दोषांनी नखशिकांत भरलेला आहे. अनंत सृष्टीचा, प्रमादिया, असून कुटील, अधम, पापी, हिंसक, घातकी, राजसी, तामसी, गुरुद्रोही, मार्गद्रोही, परीवार द्रोही, आत्मघातकी, विश्वास घातकी, विश्वहननी, विमूढ, योगभ्रष्ट, आंतराई, वर्मस्पर्शी, नित्यनरकी, असा अनंत अपराधी आहे. तरी मज अपवित्रताते पवित्र करोनी क्षमा करावी, जी! स्वामीराया !
माझ्या विकार विकल्प हिंसा कखाय वर्मस्पर्श चोरी अधिकवृत्ती पातलेपण असळग या सर्व दोषांची क्षमा करावी जी!
स्वर्ग, नर्क, कर्मभूमी, मोक्ष या चतूर्विध कर्मफळादि देवताचक्रापासून मज सोडवावे, व तुमच्या शुध्द, बुध्द, नित्यमुक्त, आनंदघन, कैवल्यानंद स्वरुपाचिया नित्य संबंधासी पावन करावे, जी! स्वामीराया,श्रीचक्रधरराया!
आनंदकंद भगवान श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेयप्रभू श्रीचक्रपाणी महाराज, श्रीगोविंदप्रभू आणि श्रीचक्रधरप्रभू तथा त्रिगुणातीत, आनंदरुप अव्यक्त ईश्वरास माझे साष्टांग दंडवत प्रणाम !
स्थान, प्रसाद, भिक्षूक व वासनीक या चारही साधनांस, चारी ज्ञानीयांस, आठही भक्तास व सकल गुरुकूल परमार्गासी माझे साष्टांग दंडवत प्रणाम !
हे प्रायश्चित म्हणून पुन्हा दंडवत घालावे.
* लग्न कार्यात देवता विधी कसा टाळावा?
उपदेशी गृहस्थाकडे लग्न कार्य असतांना रुढीपरंपरेनुसार देवता विधी कराव्या लागतात. त्यासाठी काही ठिकाणी परमेश्वर अवतार चरणांकीत विशेष ठेवतात. किंवा कार्यक्रमानंतर एखाद्या अधिकरणाजवळ प्रसव मोडून प्रायश्चित करावे.
संकलित
Dandwat, Mahanubhav swatacha Lagn Vidhi ka banawat nahit?? Sagalya dharmache lagn Vidhi abhyasun ek apala swatacha banaun gheta yeil
ReplyDelete