माझी एकविधा अनन्य भक्ती
केवळ एक आणि एकावरच अव्यभिचारीणी प्रेम भक्ति करण्याचा हितोपदेश करणाऱ्या महानुभावीय भक्तिमार्गाची थोरवी महान आहे. एकविधा भक्ति म्हणजे एकाच प्रेमपात्रावर ज्ञानयुक्त प्रेम करणे होय. एकाशिवाय अन्य कोणत्याही दैवतावर भक्ति न करण्याचा हितोपदेशही या महान धर्म मार्गाने निश्चयाने केलेला आहे. त्याची कारणेही तशीच आहेत. एका केंद्रावरच लक्ष केंद्रीत करण्यामुळे अपरिमीत शक्तिची वृद्धी होते. जसे भिंगातून येणारी सूर्यकिरणें एकाच ठिकाणी केंद्रीत करण्यामुळे उद्भुत उर्जा तयार होऊन त्याद्वारे निर्माण होणारी उष्णता त्या पदार्थाचे ठिकाणी ज्वलनाची क्रिया सुरू करण्याइतपत वाढते हे आपण भिंगाचे प्रयोगाने अनुभवतो. भिंगे विस्तवासारखे जळताना दिसत नसले तरी त्यातून केंद्रीय होऊन पडणारी किरणे जेथे पडतात तेथे मात्र ती विस्तवासारखी उष्णता निर्माण करताना दिसतात. तिच किरणे जर विखरून पसरू लागलीत तर मात्र उष्णता निर्माण करण्याची त्यात शक्ति दिसून येत नाही. ही अनुभवजन्य गोष्ट भक्तिच्या संदर्भातही तशीच अनुभुती देणारी ठरते असे महानुभावीय भक्तिसाधनेची अनुभवजन्य ग्वाही आहे. त्यामुळे भक्ति करणाऱ्यांचे लक्ष हे जर एककेंद्री असेल तर कमालीचे परिणामकारक होऊन त्यातून 'भक्तिचा' लाभ अनुभवास येतो.
महानुभावीय साधकांचा सार्वत्रिक अनुभव आहे. आणि जगातील सर्व साधनाप्रणालीचीही तीच अनुभवजन्य ग्वाही आहे. तशीच जगन्मान्य भगवद्गीताही ग्वाही देते.
“अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्य युक्तस्य योगिनः ।।” (गी. ८-१४)
जो मला, परमेश्वराला, दुसऱ्या कोणत्याही विषयात चित्त न ठेवता, प्रतिदिन प्रतिक्षण भजतो, स्मरतो, अशा माझे ठिकाणी स्थिरचित्त झालेल्या साधकाला मी सुलभपणे प्राप्त होणार आहे.
ही भगवंताची ग्वाही हिन्दु म्हणविणाऱ्या भारतीयांनी तरी निष्ठेनी मार्गदर्शक मानायला हवी आहे. इस्लाम तर ठामपणे म्हणतो की जगी एकच भज्य, पूज्य दैवत आहे. त्याला 'अल्लाह' म्हणतात व मी त्याला एकट्यालाच अनन्यभावाने शरण जातो. जगातला सर्वात मोठा आस्तिक धर्म ख्रिश्चन धर्म सुद्धा एकाच देवाला अनन्यभावे शरण जातो. अशी ही 'एकविधा' भक्तिसाधना आजच्या जगातही बहुमान्य आहे. ही एकविधा अनन्य भक्तिची महिमा जगातील सर्व विचारवंत संत थोरांनी कंठरवाने गौरविलेली दिसून येते. जसे एकनाथ आपल्या भागवतात म्हणतात :
“जे अनन्य शरण हरिचरणा ते कर्मबंध नाकळती ॥
जे जे अनन्यशरण। तेचि हरीसि पढीयंते पूर्ण ॥” (ए. भा.)
तसेच संत नामदेव आपले गाथेत आपल्या देशातील बहूदैवत पूजनाच्या भक्तिमार्गाचा उपहास करून तिच ग्वाही देतात. ते म्हणतात
“जाखाई जोखाई उदंड दैवते । वाउगेचि व्यर्थ श्रमतोसी ।।१।।
अंतकाळी तुज सोडविना कोणी । एका श्रीचक्रपाणी वांचोनिया ।।२।।
त्या एका चक्रपाणीवर निष्ठापूर्वक अनन्य भक्ति भक्ताला 'मुक्ती' ची वाट गवसते, अशी साक्ष देणाऱ्या अभंगाला तुकोबांचे अभंगही जागजागी पुष्टी देतात. जसे, ते आपल्या अभंग गाथेत म्हणतात,
"मस्तक सांडुनि सिस फुल गुडघा।
चारा तो अवघा कावळयांचा ।।
तुका म्हणे वेश्यासंगे सुवासिणी इतर पुजनि भाव तैसा ॥
तुका म्हणे मोक्ष नाही कोणापासी । एका गोविंदासी शरण व्हारे ॥"
पंचरत्नी गीतेतही असे स्पष्टपणे म्हटलेले आहे की -
"पार्था सर्वापरीस उत्तम साधन ।
करी माझे नामस्मरण ।।
उच्छिष्ट नको करू मन । आणिका ठाई ।।१।।
जैसी कां पतिव्रता । आणिक धर्म नेणे गा सर्वथा ।
सर्व भक्ति, व्रत, दान, कथा पतीचे कारणे ॥ २॥
कां चातका पक्षिया । स्मरे मेघराया
भूमिचे उदक तया । घेणेचि नाही ।।३।।
तैसे मजवीण जाण । न करी दुजीयाचे स्मरण ।।४।।
अशी नानापरीने 'अव्यभिचारिणी' भक्ति जो साधक करतो, तोच ‘मोक्षपदाला' जातो अशी ग्वाही सर्व अनुभवी संत थोरांनी दिलेली असल्यामुळे हा उपदेश महान अनुभवावर आधारलेला आहे, यात संशयच राहू नये. तो उपदेशच सर्वत्र, निश्चयाने, ठामपणे महानुभाव पंथ सतत करीत आलेला आहे. हा पंथ त्यात कधीच तडजोड करीत नाही. पातीव्रत्याला कधी तडजोड असते का? तसे भक्तिच्या क्षेत्रातही तडजोड नाही असा हितोपदेश परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामी आणि त्यांचे उत्तराधिकारी आचार्य करीत आलेले आहेत.
माझे श्री. गुरूजी कै. महंत श्री. मुरलीधरबाबा कारंजेकर नेहमी म्हणत असत “अनन्य भक्ति हाच आपला श्रेयस मोक्षदायी मार्ग आहे.” ‘अन्य नव्हे ते अनन्य' या त्यांचे चार शब्दांचे सूत्ररूप वाक्यातून मी दोन प्रकारचा बोध घेत आलो आहे. 'अन्य' नव्हे म्हणजे एका भगवंताशिवाय दुसरा नव्हे. आणि या शिवाय दुसऱ्या प्रकारच्या शिथीलक्षम भक्तिमार्गाचा पुरस्कार नव्हे अशी अव्यभिचारिणी एकनिष्ठ भक्ति अशी ग्वाही सर्वच महाराष्ट्रीय मान्यवर संतांनीही
दिलेली आहे. तो परमेश्वर सर्वाचा एकच आहे. तो ब्राह्मणांचा वेगळा अन् अंत्यजांचा वेगळा नाही, अशी ग्वाही देणारी साक्ष संतांनी जागजागी दिलेली आहे. संत एकनाथ म्हणतात.
“उचनीच नाही परी। राया रंका एकच सरी ।।
झाला पुरूषा अथवा नारी । तरी एकचि पद ।। २४।।
ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळे । शुद्रांचे ब्रह्म ओवळे ।।
ऐसे वेगळे आगळे । तेथ असेचिना ।।
माझे करिता 'अनन्यभजन' । मी सर्वधा भक्ताधीन ।।
तेथ जाति गोत ज्ञातेपण । उचनीच वर्ण मी न म्हणे ।।
असा हा अनन्य भक्ति करण्यायोग्य 'देव' ईश्वर किंवा भगवंत, सर्वांचा, सर्वस्थळी एकच आहे. अनन्य आहे. ही गोष्ट केवळ भारतीयच नव्हे तर इतरही देशातील थोर संत आणि पंथांनी सांगितली आहे. तोच भक्तिचा परम श्रेयस मार्ग आहे असे मानणे हे म्हणूनच जगन्मान्य सत्य आहे. ते महानुभाव पंथ मानतो.
एकनाथ ते मानतात, तुकोबा तेच मानतात, ज्ञानदेव आणि नामदेवही तेच मानतात तेव्हा ते इतरेजनांच्या टीकेस पात्र ठरत नाहीत. परंतु महानुभाव ते वैश्विक सत्य, 'एकविधा' भक्तीचे सूत्र निष्ठापूर्वक प्रतिपादीतात तेव्हा मात्र ते टीकापात्र ठरविण्यात येते. ही नवलाई या महाराष्ट्रातील धर्मक्षेत्रात अनुभवायला येत असल्याचे दिसून य येते. ते. महानुभाव लोक आमच्या देवाचा प्रसाद घेत नाहीत.
आमच्या देवाला पूज्य-भज्य मानीत नाहीत. असे आक्षेप घेऊन अनेक ज्ञानवंत म्हणविणारे साधु, संत जन महानुभावांच्या पदरी दोषाचे दान घालून लोकांच्या टीकेचे लक्ष बनवितात. ही गोष्ट अनाकलनीय वाटते खरी, परंतु आज ती सर्व थोर महानुभाव साधुसंत, श्रेष्ठांनी विचार करण्यासारखी खासच आहे. त्यासाठी येथे काही विचार मांडीत आहे. भागवत धर्मातील थोर संत एकनाथ म्हणतात -
“येऊनि नरदेहा भुताते पुजिती।
परमात्मा नेणती महामुर्ख ।। १।।
दगडाच्या देवा सेंदुराचा भार ।
दाविती बडिवार पूजनाचा ।। २।।
रांडा पोरे घेती नवसाचे बगाड ।
नुगवे लींगाड तयाचेनि ।।३।।
आपण बुडती देवाही बुडविती ।
अंतःकाळी होती दैन्यवाणे ।।४।।
एका जनार्दनी ऐसिया देवा ।
जो पूजी गाढवासम होय ।।५।।
या परखड ओव्या लोकांना ऐकविणारे एकनाथ हे थोर भागवत संत म्हणून मानल्या जातात. किंवा
“बहुत देव सृष्टीवरी। त्याची गणना कोण करी ।।
एक देव कोणते परी। ठायी पडेना । दा. बा. ८-१
देव झाले उदंड। देवाचे माजले बंड।
भुता देवतांचे थोतांड । एकचि जाहले ।।"
ही अभंगातील भाषा समस्त महाराष्ट्रातील भोळ्या भाविकांच्या मनाला दुखवित नाही. महानुभाव त्या दैवतांचा किंवा अशा शब्दात उपहास-उपमर्द करीत नसूनही लोकमनाला त्यांना विनयशील 'दैवतांच्या नानात्वाला' असलेला विरोध असह्य वाटतो. तो त्यांचे टीकेचे लक्ष बनतो.
समस्त महाराष्ट्रातील लोकादरास पात्र ठरलेले संत गाडगेबाबा तर लोकांना सरळच विचारीत असत -
"माय बापहो ! तुम्हाला बाप किती ? "
लोक बाबांच्या या विचित्र वा विक्षिप्त प्रश्नाचे वाईट घेत नसत. या प्रश्नावर श्रोत्यात खसखस पिकत असे. मग पुन्हा बाबा
म्हणत “सांगा ना ! तुमचे बाप किती ?” लोकातून आवाज यायचा.
'एक'
बाबा गंभीर होऊन म्हणयचे - "मग मला सांगा तुमचा देव तुमचा बाप नाही काय ?"
“हो बाबा ! देव आमचा बापच हाय.'
बाबा म्हणायचे.
"सांगा तुमच्या गावात मारूती आहे की नाही ?”
"आहे ऽ!”
“मग तुमचे बाप किती ?”
"दोन"
"तुमच्या गावात बहिरमाचे ठाणे आहे की नाही ? मग तुमचे बाप किती ?”
"तीन"
"तुमच्या गावात म्हसोबा आहे की नाही ?”
"आहे ऽ!”
“मग तुमचे बाप किती ?”
“चार" असे बाबा दहापर्यंत देवांची नावे घेत घेत
म्हणायचे “सांगा मग तुमचे बाप किती ?”
"दहा ऽ"
बाबा आवेश बदलवून म्हणायचे,
"मग लाज नाही वाटत 'दहा बाप' सांगाले ?”
“मग बेशरमाइ हो ! सांगा ! तुम्हाला बाप किती पाहिजे ?"
"एक"
“गोपाला ऽ गोपाला ऽ देवकिनंदन गोपालाऽ” चा गजर
सुरू व्हायचा.
लोकांच्या मनात या प्रबोधनाने लख्ख प्रकाश पडायचा की आपला
'देवबाप्पा' एकच आहे आणि तो आहे. “गोपाला ऽ गोपाला ऽ देवकिनंदन गोपाला"
असे लोकप्रबोधनाने कार्य करणाऱ्या गाडगे बाबांच्या शब्दाचे कुणी वाईट वाटून घेत नसत. त्यांची मिस्किल प्रश्नांची कुणी खंत वाटून घेत नसत. कां ?
या 'का' चे उत्तर शोधाल तर महानुभावांच्या एकविधा भक्तिच्या आग्रहाचा लोकांनी शतकानुशतके चालविलेला उपहास आणि विरोध कां ? त्याचे उत्तर सापडेल.
मला त्याचे उत्तर वाटते ते असे की, “गाडगे बाबा आम जनतेच्या सुखदुःखाचा जिव्हाळ्याने विचार करून जनतेच्या कळवळयाने त्यांचे प्रबोधन करीत. किर्तनात ते म्हणायचे - "
“बापहो! तुम्ही कोंबड कापता ना ?"
"होऽय!”
“त्या कोंबड्यासाठी या माह्या आया बाया मसाला वाटतात ना ?”
"होय ऽ”
या लोकातील होकारावर गाडगेबाबा हसून म्हणत -
“यमराज तुमचा मसाला वाटत आहे. कुठं भोगाल तुम्ही हे पाप ? तुमचा सत्यानाश होईल."
या शब्दात तो संत शापवाणी उच्चारायचा परंतु कुणीही त्याचं वाईट वाटून घेत नसत! त्या शापवाणीतूनही लोकांचे खरे प्रबोधन होत असे ?
पुढे बाबा म्हणायचे
"माय बापहो ! मले सांगा ! बामनाच्या घरी कोंबडीसाठी
मसाला वाटतात काय ?"
"नाही ऽ”
"गुजराथी - भाटयाच्या घरी या मसाल्याचा वास येत काय ?”
"नाही ऽ”
"तुम्हाले हे शहाणपण कव्हा येईल बोहाराइहो ?”
“म्हणा गोपाला गोपाला ऽ देवकीनंदन गोपाला ऽ” हा गजर लोकांचे भक्तिचा परिपोष करीत करीत प्रबोधन करणारा ठरायचा !
बाबांच्या भाषेतला 'रांगडा, कडवा' उपदेश लोकमान्य होत असे. याउलट तुमची विनयशील महानुभावीय प्रबोधनाची भाषा लोकांच्या विरोधास कारण ठरते याचे कारण शोधणे आजच्या काळात अपरिहार्य झालेले आहे.
याचे एकच कारण दिसते ते हे की गाडगेबाबांचे ‘रांगडया' शापवाणी ही जनतेच्या कळवळ्याने भारलेली असे. लोकाबद्दलची अतीव कणवं त्यात असायची. लोकांच्या जीवनातील सुखदुःखाशी ते प्रबोधन जुळलेले असायचे. त्यात असलेला जिव्हाळा त्यांच्या शब्दातील रांगडा विनोद सुसह्य करणारा होता. म्हणून त्यांच्या 'दहा 'बाप' म्हणणाऱ्या शब्दाचे लोकांना कौतुक वाटायचे. ती लोकाबद्दलची अतीव कणव प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या शब्दांनी माखून होणारे त्यांचे प्रबोधन सर्व स्तरातल्या, सर्व जातीतल्या लोकांना आवडायचे. लोकांशी त्यांनी असे नाते जोडले होते. ते नाते आपण जोडतो काय ? लोकांना त्यांचे जीवनातील सुखदुःखाला जोडणारे प्रबोधनाचे धागे आपण आपल्या बोलण्यातून जोडतो काय ?
याचे उत्तर 'नाही' असेच आहे. या 'नाही चे होय' होत नाही तोवर स्वामींचा जीवाच्या कणवेचा, जीवाचे उद्धाराचा महान चिरायु विचार आपण लोकप्रिय करण्यास असमर्थ ठरणार आहोत. तुम्ही स्वामींची जीवाबद्दलची अतीव कणव, जीवाच्या उद्धाराची तळमळ, उद्धरणाचे महान तत्त्वज्ञान लोकप्रियतेच शिखरावर नेण्यासाठी आपल्याला आपले प्रबोधनाचे मार्ग आणि पद्धती बदलावी लागेल. तर आणि तरच स्वामींचा परिवर्तनाचा हा मार्ग आणि हेतू सिद्धीस नेण्याच्या श्रेयाचे आपण अधिकारी ठरू शकू !
ते व्हावे या अपेक्षेने आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करून हे माझे विनम्रभावे केलेले निवेदन थांबवितो.
- जय श्रीकृष्ण! दंडवत प्रमाण !
लेखन :- प्रा. पुरुषोत्तम नागपुरे