श्रीकृष्ण बाळ लीळामृत
कंसाच्या अत्याचारांनी
पृथ्वीवरचा आनंद नष्ट झाला होता. सगळीकडे दुःखच दुःख पसरलं होतं. आसुरी
लोकांनी जगाला छळाला सुरवात केली. धर्माची चौकट खिळखिळी झाली. धर्मक्रिया बंद पडल्या
देवादिकांची विटंबना सुरू झाली. त्या दुष्टाने उग्रसेनला पित्याला
कारागृहात बंद करून टाकलं. राजसत्ता बळकावली. कंस संतांना कसपटासारखं समजू लागला. स्त्रियांना
असुरक्षितता वाटू लागली. नैतिक अधपतन होत होतं. कंसाच्या छळाला त्रस्त झालेली पृथ्वी
गाईचं रूप घेऊन परमेश्वराचा धावा करू लागली.
आता ये धावुनी भगवंता । दूर करी तू आमुची चिंता ।।धृ०।।
असुराने हा खेळ मांडीला दुःखी जनता सारी ।
धर्मकर्म हे सारे बुडाले कोण आम्हाला
तारी दिन दयाला तुचि अनंता । तुजविन नाही त्राता
।।१।।
तुझ्या मंदिरी
नाचगाण हे करीती दैत्य सारी।
भजन कीर्तन बंदचि पडले कुणी नसे कैवारी
दयाहिन हे आसुर सगळे मारीती तवगुण गाता ।।२।।
पृथ्वीनं गायीचं रूप घेऊन भगवंताचा धावा केला. पृथ्वीनं गायीचं
रुप घेतलं हे रुपक समजून घेणं महत्वाचं आहे. पृथ्वी म्हणजे पृथ्वीवरचे समग्र मानवांचे
प्रतिनिधित्व करणारी मंडळी, गायीच्या रूपाने म्हणजे अत्यंत दीन होऊन धावा केला. कारण गायीसारखा गरीब प्राणी
जगात दुसरा नाही. म्हणून गायीचं उदाहरण देऊन पृथ्वी वरच्या गांजलेल्या लोकांनी परमेश्वरांची
करूणा भाकली.अव्यक्त परमेश्वराने त्यांचा धावा ऐकला
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
सज्जनाचं रक्षण करणाऱ्या व धर्म स्थापन्याचं आश्वासन देणाऱ्या
परमेश्वरांन भक्तांची आर्त हाक ऐकली व यादव कुळात शूरसेनाचा पुत्र वसुदेवकीच्या उदरी
अवतार घेण्याचे नक्की केले. देवकाची मुलगी ‘देवकी’ कंसाची मानलेली भगिणी हिचा
वासुदेवा बरोबर लग्न सोहळा संपन्न झाला. वरात निघाली. राजवाडया समोरून वरात चालली होती.
नानावाद्यांनी मथुरा नगर गजबजून गेलं. लोक धुंद होऊन नाचत होते. फटाक्यांचा आवाज येत
होता. दीव्यांच्या झगमगाटाने मथुरा नगरी नटली. प्रचंड जनसमुदाय वरातीचं दृष्य डोळ्यात
साठवून घेत होता. रथात बसलेल्या नवरानवरीला लोक निरखित होते. मुळातच गौररंग व हळदीने
पिवळी धमक दिसणाऱ्या देवकीच्या अंगावर अंगभर सुवर्ण अलंकाराने ती अलंकृत झाली होती.
प्रिय भगिणीच्या वरातीचा रथ स्वत: कंस हाकित होता. आनंदातिशयाने तोही देहभान ‘‘मथुरेचे
जन पाहाती सोहळा आनंदूनी गेला कंस तेव्हा’’ वाद्यांच्या
तालात लोक नृत्य करीत होते. गल्ली बोळातून आनंद वाहात होता. आपली दुष्ट भावना विसरून
कंस रथ हाकीत होता. एवढ्यात आकाशवाणी झाली.
‘‘हे दुष्ट कंसा ! जिच्या रथात बसून तू घोडे हाकत आहेस त्या देवकीचा
आठवा पुत्र तुझा वध करणार. सावधान ! सावधान ! सावधान !’’
एका क्षणात वातावरण बदलून गेले. कंसाचा चेहरा खर्रकन उतरला. त्याच्यातल्या
दुष्ट भावनेनं डोकं वर काढलं. लगेच त्याने रथातून खाली उडी टाकली. देवकीला रथाच्या
खाली ओढलं, सपकन् कमरेची तलवार उपसली, म्हणाला, 'देवकी, तुझ्या उदरी जन्माला येणारा आठवा पुत्र मला मारणार पण मी तसं
होऊ देणार नाही. मी आताच तुझा वध करतो.' कंस तलवारीने तिच्यावर वार करणार तेवढ्यात वसुदेवाने त्याचा
हात धरला,
म्हणाला, कंसा, तू शूरवीर आहेस. बलवान, सामर्थ्यवान आहेस. तुझ्या हातून स्त्रिचा वध झाला तर,
तुझी अपकीर्ती होईल, अरे ! तिचा आठवा पुत्र तुझा शत्रु आहेना. काळजी करू नको त्याचा
जन्म होताच त्याला तुझ्या स्वाधीन करीन. पण स्त्रिची हत्या करून तुझ्या कीर्तीला कलंक
लाऊ नकोस. अहंकाराला स्तुती आवडत असते. कंसाने मान्य केले. वधुवराला सोडून दिलं. कलह
प्रिय नारदाला ही वार्ता समजली
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी । हे नाथ परमेश्वर वासुदेवा ।
विणा चिपळ्यांच्या तालात हा गजर म्हणत ते कंसाच्या भेटीला आले.
म्हणाले कंसा ! तू वासुदेव देवकीला मुक्त केलस म्हणे;
कंस म्हणाला हो, त्यांचा आठवा पुत्र माझा शत्रु आहे तो पर्यंत चिंता नाही. नारायण ! नारायण
! म्हणत नारदाने हातात कमळाच फूल घेतल व कंसाला दाखवत म्हणाले,
हे पहा कंसा,
ह्या कमळाच्या फुलाला आठ पाकळ्या आहेत. त्यातली पहिली कोणती
व आठवी कोणती सांग बरं? कंस कोड्यात पडला. नारद म्हणाले, गोलाकार असलेल्या पाकळ्या मधली कोणतीही पहिली व कोणती ही आठवी
होऊ शकते. तसेच देवकीला होणारे आठवे मूल प्रथम जन्म घेऊ शकते व पहिले आठव्या क्रमांकावर
जाऊ शकते. कुठून मोजायचं हा प्रश्न आहे. हे ऐकताच कंस घाबरला. वसुदेव देवकीला कारागृहात
बंद केलं. साखळ दंडाने बांधून टाकलं. आपलं काम झालं म्हणून नारद नारायण ! नारायण !
म्हणत निघून गेले. देवकीच्या उदरी जन्माला येणारं प्रत्येक मूल दुष्ट कंस निर्दयपणे
मारीत होता. आपल्या डोळ्याने बाळाचा करूण अंत देवकी पाहात होती. कंसाच्या पाया पडून
दयेची याचना करीत होती. धरणी वर लोळून आक्रोश करीत होती. कारागृहाच्या भिंतीला पाझर
फुटत होता पण कंसाच्या पाषाण हृदयावर त्याचा परिणाम होत नव्हता. त्या कारागृहात वसुदेव
देवकी आपल्या बालहत्त्येच दुःख घेऊन जगत होती. फक्त अश्रू ढाळणे एवढेच त्यांच्या हाती
होते. आता जन्माला येणारे मुल आठवं होतं. याचं पण असच होईल कां?
ह्या भितीने थरकाप होत होता. देवकी देवाची करूणा भाकत होती.
किती अंत आता पाहासी अनंता दिनाचिया नाथा सर्वेश्वरा
।
बालकाची हत्त्या काय दुःख त्याचे कळण्या मातेचे हृदय
व्हावे ।
वियोगाने दुःखाक्रांत झालेल्या माता देवकीसमोर अकस्मात श्रावण
वद्य पुत्र अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री एक बालकमूर्ती उभी राहिली. विलक्षण सौंदर्य आणि लावण्याने
नटलेली ती मूर्ती पाहून वसुदेव देवकीला अत्यंत आनंद झाला. सगळं कारागृह आनंदाने ओसंडून
वाहू लागलं. बालमूर्ती धारण केलेल्या परमेश्वराने देवकी वसुदेवास सांगितले,
‘‘घाबरू नका,
मी तुमच्या उदरी अवतार घेत आहे. या वेळेस गोकुळात नंदाच्या घरी
यशोदेला एक मुलगी झाली आहे. तिला येथे घेऊन या व मला यशोदे जवळ ठेवा. त्वरा करा’’.
असं म्हणून त्या मूर्तीने नुकत्याच जन्मलेल्या बालकाचे रूप घेतले.
वसुदेवाच्या हातापायातल्या बेड्या गळून पडल्या. पाहारेकरी राक्षसांना झोपा लागल्या.
बंद दरवाजे आपोआप उघडले. बाळाला घेऊन वसुदेव भरल्या यमुनेतून गोकुळात गेले. बाळाला
गाढ निद्रेत असलेल्या यशोदे जवळ ठेवलं. मुलगी घेऊन परत कारागृहात आले. पुन्हा दारं
बंद झाली. हातापायात बेड्या पडल्या. सगळं पुर्ववत झालं. मुलगी रडायला लागली. सर्व पहारेकरी
उठले. कंसाला निरोप दिला. आठवा जन्माला आला म्हणून तो धावतच आला. येता क्षणी बाळ हातात
घेतले. पण आश्चर्य! ही तर मुलगी आहे; त्यानं विकट हास्य केलं. आठवा मला घाबरला. तो भ्याला. पळाला.
पण मी ह्या मुलीला सुद्धा जीवंत ठेवणार नाही असं म्हणून त्यानं तिला दगडावर आपटण्यासाठी
उचललं,
खाली टाकणार तशीच ती हातातून निसटली,
विजेसारखी तळपत आकाशात गेली व कडाडली,
‘‘अरे दुष्ट कंसा ! तू काय मला मारणार,
तुझा शत्रु गोकुळात नांदत आहे. तुझा अंत जवळ आला आहे.’’
अस म्हणून ती लुप्त झाली.
इकडे गोकुळात आनंद बहरला होता. जगाचा पालनकर्ता आनंदघन अवतरला होता. आनंद हे परमेश्वराचे नाव आहे. साक्षात तोच माता यशोदेचं स्तनपान
करू लागला. अनंत ब्रह्मांडाचं पोषण करणारा सर्वेश्वर तो माता यशोदेच्या दुधासाठी भुकेला
झाला होता. नंदबाबांनी पुरोहित गर्गमुनी यांना पाचारण केलं. त्यांनी बाळाच नामकरण केलं.
श्रीकृष्ण नाव ठेवलं. श्रीकृष्ण शब्दाचा अर्थ आहे. आकृष्ट करणारा. श्रीकृष्ण म्हणजे
नांगरणारा. मनाच्या शेतीत नांगर हाकुन अहंकाराचा कुंदा काढून शांतीची बाग फुलवणारा.
ते सुंदर गोजीरवाणं बाळ मात यशोदेचं नव्हे तर सर्वच गोकुळवासीयांना
कुठे ठेऊ अन कुठे नाही. अस झालं होतं. गोपबाला गीत गाऊन झोके देत होत्या. कडाखांद्यावर
घेऊन नाचत बागडत होत्या. श्रीकृष्ण हे समग्र गोकुळवासियाचं वैभव झालं. श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयातला
प्राण झाला होता. त्याच्या हासण्याने सारं गोकुळ हासत होतं.
तिकडे कंसाची झोप उडाली होती, त्याला जिकडे तिकडे श्रीकृष्ण दिसू लागला. जेवणाच्या पात्रात
श्रीकृष्ण, पाण्यात
श्रीकृष्ण, जागेपणी
श्रीकृष्ण, झोपेत
श्रीकृष्ण, सगळीकडे
क्षणाक्षणाला श्रीकृष्ण दिसत होता. तो झोपेतून दचकून उठायचा. कंसाच्या जीवनाचा एकही
क्षण सुखाचा राहिला नव्हता. भयग्रस्त
झालेल्या कंसाने पुरोहिताला बोलावलं, कोण हा? हा ब्रह्मराक्षस. महाबळ याच नाव. तो मायावी अत्यंत भयंकर दिसत
होता. कंसाने त्याला आपल दुःख सांगितलं. त्याने श्रीकृष्णाला ओखटेचा विडा उचलला. म्हणाला,
राजा निश्चिंत राहा. मी रिकाम्या हाताने परत येणार नाही. त्या
मुलाचं प्रेत घेऊनच तुला भेटेन. अरे तो मला पाहूनच प्राण सोडील,
तू राक्षस आहे व मी ब्रह्मराक्षस आहे. कंसाला प्रणाम करून तो
गोकुळाच्या वाटेला लागला.
त्यानं वयस्कर ब्राम्हणाचं रूप धारण केलं. पोकळ काट्याचं पाढरं
शुभ्र धोतर नेसला होता. डोक्यावर पगडी, एका हातात पचांग व एका हातात काठी होती. कपाळवरच्या रेखीव गंधाने
तो वैष्णव दिसता होता. असा साज चढऊन तो निघाला.
महाबळ भट ते आले गोकुळी नंदाचे घरी
टाकीती चंदनपाट बसाया यशोदा सुंदरी ।।
गर्गमुनी नुकतेच नंदबाबाच्या घरून गेले अन हा तेथे जाऊन पोहचला.
धर्मभोळी यशोदेने त्याला घरात घेतलं. सत्कार केला. बसायला चंदनाचा पाट टाकला. आपण मथुरेचे
ब्राम्हण असून तुझ्या श्रीकृष्णाचं भविष्य सांगायला आलो म्हणून त्याने परिचय दिला.
आपल्या लाडक्या बाळाचं भविष्य ऐकायला कुठल्या मातेला आवडत तू नाही. माता यशोदा
हात जोडून समोर बसली होती. महाबळाने पचांग उघडलं,
हाताच्या बोटावर आकडेमोड केली. तोंडात पुटपुटला व सांगायला आरंभ
केला ‘‘काय सांगु यशोदे ह्या बाळाचे गुण हे द्वाड, कारटं टाकावं की मारून’’
भगवंत पाळण्यात महाबळाचं भविष्य ऐकत होते. पाळण्याच्या पटीतून त्याला
निरखित होते. सापाच्या बिळात उंदिर स्वतःहून याव तसा महाबळ नंदाच्या
घरी आला होता. यशोदेच्या हातूनच श्रीकृष्ण मेला तर फारच चांगलं म्हणून तो म्हणाला,
'यशोदे! हा मूळनक्षत्रावर जन्माला आला
आहे. कुळाचा विनाश करणार. हे काळकुट्ट पोरगं अपशकुनी आहे. याला तोळाभर आफु खायाला दे,
ते मरून जाईन
आणि तुम्ही सर्व मोठ्या संकटातून मुक्त व्हाल.
हे मना विरूद्ध भविष्य ऐकून माता यशोदा भांबावून गेली. भोळ्या मातेला फसवणाऱ्या
महाबळाचा भगवंताचा राग आला. तो मनात म्हणाला, ‘महाबळा मी पाळण्यात झोपण्यासाठी आलो नाही. मी तर
तुमचा समाचार घेण्यासाठी आलो. महाबळा तू भाग्यवान आहेस. कारण
माझं पहिलं गिऱ्हाईक होण्याचा मान
तू मिळवलास.’ असा विचार करून बाल श्रीकृष्णाने घरात चौफेर नजर
फिरवली. बेलणं, मुसळ,
मिरची पाट, हे रिझर्व्ह सैनिक होते. लाटण्याकडं पाहात देव म्हणाले,
तुमचा मोर्चा काढा, किती दिवस पोळ्या लाटणारं, मुसळा! उखळातलं धान्य कांडून तू बोडर झालास ना?
जा! महाबळाचा समाचार घे, आणि क्षणात घरातल्या सगळ्या जडवस्तु महाबळाकडे
धावल्या. त्याचं बोलणं बंद करण्यासाठी बेलणं आरपार तोंडात घुसलं. मिरची नाकात जाऊन
बसली. चुल्ही जवळच्या तव्याने तोंडाला काळा रंग फासला. मुसळाने पाठीवर बदडायला सुरूवात
केली. महाबळ कासाविस झाला. पंचांग फाटून बाजूला पडलं. उठायचा प्रयत्न करायला लागला
पण पाटाने त्याला चिटकून ठेवलं. पळून जाऊ नये म्हणून खाटेने सिग्नलची भूमिका केली.
मुसळाने पाया पासून डोक्यापर्यंत महाबळाचं हाडनहाड खिळखिलं करून टाकलं. शेवटी त्याने
हात जोडून क्षमा याचना केली. देवाने त्याला मुक्त केलं. लंगडत लंगडत तो कंस दरबारात
जाऊन पोहचला.
कंस त्याची वाट पाहातच होता. श्रीकृष्णाचं प्रेत घेऊन येईल अशी त्याला खात्री
होती. प्रेताला पुरावं की जाळावं, कापावं की चिरावं. टुकडे करावे की कुटके अशा विचारात तो डुबला
होता. महाबळाने दिलेली वेळ निघून गेली. कंसाची उत्सुकता शिगेला पोचली. शिपायाने महाबळ
आल्याची सूचना केली. काम फत्ते झालं म्हणून कंस हसला. दरबारात येण्याची परवानगी दिली.
दरबारात आलेल्या महाबळाला पाहून कंस थक्कच झाला.
त्याच्या अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. चेहरा सुजल्यामुळे
हा महाबळ की आणखी कोण ? शंका येत होती. अंगावर हिरवे पिवळे ओठ दिसले. तोंडाला काळं फासल्याने
विद्रुप दिसत होता. कंसाला नमस्कार करण्यासाठी त्याला वाकताही येत नव्हतं व तोंडातून
आवाज पण काढता येत नव्हता. हे दृष्य पाहून कंस थंडगार पडला. महाबळा ! तुझे हे हाल कुणी
केले?
कसंतरी एकेक शब्द उच्चारून तो घडला प्रकार सांगू लागला. महाराज!
माझे हे हाल तीन दिवसाचं वय असलेल्या लहान मुलाने केले आहेत. ज्या बाळाला पाळण्यात
शी व सू करायचं कळत नाही त्याला तुम्ही काय करता हे पाळण्यातच कळतं. पाळण्यातली मुलं
पाळण्यावर टांगलेल्या कापडी पक्षां सोबत खेळत असतात पण हा श्रीकृष्ण मला पाहाताक्षणी
रडला नाही, तो हासला
त्यानं माझी ही दशा केली, मुसळाने अंगावर वळ आले. महाराज निर्जीव वस्तू त्याचं ऐकतात,
त्यानं माझ हे रूप, हा रगं केला. मी त्याला क्षमा मागितली म्हणून सुटलो. परत मला
त्या श्रीकृष्णाकडे पाठऊ नका. हवं तर सरपण फोडायला सांगा.
पाळण्यातल्या श्रीकृष्णाचा हा पराक्रम पाहून लोक आनंदीत झाले.
तो परमेश्वर
असल्याची खात्री झाली. ईश्वर भक्तांना त्याच्या दर्शनाची उत्कंठा निर्माण झाली.
हे नंद किशोरा कन्हैयारे प्रभु । मज तव दर्शन दे
।।धृ०।।
मोरपिसांचा सुंदरसा तो किरीट विराजत भाळी
कोमल चरणी पैंजणवाळे खाली सख्या वनमाळी
त्या गोपगोपींच्या समुहाने प्रभु ।।१।।
कुंजबिहारी रूप सावळे दाखवी चंचलगतीने
दामोदर तव दास चिमुकला वदतो केविलवाने
तो मुरली मनोहर वाजविता ।।२।।
श्रीकृष्ण हा पहिलाच सत्कारमूर्ती असा आहे की त्याने पाळण्यातच सत्कार घेतला.
हा हा म्हणता महाबळाची वार्ता गोकुळात पसरली व नंदवाड्यात गोपगोपी जमले. बाळाला घेऊन
नाचू, बागडू
लागले.
महाबळ फजित पावल्यावर कंसाची बहिण हिने श्रीकृष्णवधाचा विडा उचलला. ती महाभयंकर
राक्षासिन मायांवी विविध रूपं धारण करणारी. अत्यंत कपटी. लहान मूलं खाणे हाच तिचा आहार.
ती कंसाला म्हणाली, घाबरू नकोस, अरे
श्रीकृष्ण हा माझा जेवणाच्या ताटातला एका घासाचा एक लाडू आहे. चिलटाला मारायला जेवढा
वेळ लागतो तेवढ्या वेळात मी त्याला मारून येते असं म्हणून ती आकाश मार्गे उडाली. सोबत
काही राक्षसिनी होत्याच, ब्राम्हण स्त्रियाचं रूप धारण करून त्यांनी गोकुळात केला.
अत्यंत सुंदरूप धारण केलेल्या पुतनेने आपल्या स्तनात अत्यंत
विषारी विष
भरलं होतं. स्तनाला तोंड लावताच बाळाने मरून जावं असं ते जहाल विष होतं. नंदवाड्यात
तिने प्रवेश केला. यशोदेने तिला पाहताच आदरातिथ्य केलं. मथुरेच्या ब्राम्हण स्त्रिया
म्हणून तिने परिचय दिला. नाटकी अभिनयानं तिनं यशोदेचं मन जिंकलं. बऱ्या घरची प्रेमळ
स्त्री अशी यशोदेची समजूत झाली. पुतनेनं बाळाचं कौतुक करत करत त्याला जवळ घेतलं. सावज
जाळ्यात अडकल्याचं तिला समाधान वाटलें. श्रीकृष्णाला आपल्या स्तनाला लावलं श्रीकृष्ण
पुतनेचं दूध पिऊ लागला. पुतनेचा हर्ष गगनांत मावेना. मनात म्हणाली,
कंसा ! तुझं काम झाल रे बाबा. श्रीकृष्ण स्तनातलं पूर्ण विष
प्याला. नंतर दूध प्यायल सुरूवात केली. दूध ही संपलं पण श्रीकृष्णाची भूक शमली नव्हती.
दुधानंतर त्याने रक्त प्यायला सुरूवात केली. पुतना काही रक्तदान करायला आली नव्हती.
शरीरातलं रक्त संपत आलं. पेट्रोल संपल्यावर गाडी जशी झटके मारते तशी ती झटके मारू लागली.
श्रीकृष्णाला बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिचे सर्व प्रयत्न अत्यंत विफल झाले. देव तिला काही सोडेना. पुतनेला वेदना होऊ लागल्या. डोळे फाडायला लागली. हातपाय खोडायला सुरूवात केली.
चित्रविचित्र कर्कश आवाज काढू लागली. घशाला कोरड पडली. अन कासाविस झालेली पुतना प्राण
वाचविण्यासाठी उठून पळायला लागली. ती गावाच्या बाहेर जाऊन पडली. ती मूळ स्वरूपात आली
तेव्हा तिचा देह आठ किलोमीटर लांब होता. मरताना तिनं हातपाय झाडले तेंव्हा सर्व सामाजिक
वनीकरणाची झाडे मोडून टाकली.
सारं गोकुल धावत गेलं. पुतना मरून पडली होती. श्रीकृष्ण स्तनपान करीतच होता.
पण तो जमिनीपासून फारच उंच होता. त्याला कसं काढावं हा लोकांना प्रश्न पडला. शेवटी
शिड्या लावल्या. डोंगरावर चढावं तसं काही लोक चढले. तिच्या अंगातला रक्ताचा शेवटचा
थेंब संपला तेव्हा श्रीकृष्ण बाजूला झाला. ह्या प्रचंड काय प्रेताचं काय करायचं?
लोकांना प्रश्न पडला. सगळ्या गावातले बैल लाऊनही प्रेत सरकत
नव्हतं. मग रोजगार हमी सुरू केली. कुऱ्हाडीने प्रेताचे टुकडे केले. व गावातलं सगळं
सरपण जमा करून जाळूण टाकलं. ही वार्ता पुतने सोबतच्या राक्षस स्त्रियांनी कंसाला सांगितली
तेव्हा तो अक्षरश: आरबाळायाला लागला.
एकेक शत्रु मथुरेहून येत होता. मरून जात होता. कंसाच्या दृष्टीने लढाई होती
पण श्रीकृष्णाच्या दृष्टीने तो तर खेळ होता. त्याचा खेळ जर असा आहे तर युद्ध कसं असेल.
कंसाची झोप उडाली. कवि अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात.
ज्याच्या खेळण्याने । खळ नष्ट झाले ।
ब्रह्मादिक आलें । पायापासी ।।
श्रीकृष्ण पाळण्यातून उतरला,
चालू लागला. मथुरेहून राक्षसांच्या रूपाने मृत्यु येत होता मरून
जात होता. आठ दहा वर्षाचा काळ निघून गेला. श्रीकृष्ण आता मोठा झाला होता. अनेक शत्रुंचा
संहार केला, पण त्याचं
लक्ष्य होत कंस. आणि तो श्रीकृष्णाचाच शत्रु नव्हता, मानवतेचा शत्रु होता. मानवेतला काळीमा फासणारा पापात्मा होता.
स्वतःच्या पित्याला उग्रसेनाला कारागृहात बंद करणारा कुपुत्र होता. त्या कंसाला संपविण्यासाठी
श्रीकृष्णाने संघटन बांधायला आरंभ केला. गोकुळातलं दूध मथुरेला जात होतं ते बंद करण्यासाठी
आंदोलन उभारलं.
मुलांची संघटना केली. गावातलं दूध गावातच राहायला पाहिजे. मूलं बळवान झाली
पाहिजे. बलशाली बालकं ही गावाची संपदा आहे. लोक ऐकत नव्हते म्हणून त्याने दह्या,
दुधाच्या चोऱ्या सुरू केल्या. मडकी फोडू लागला.
भगवंतांच्या खोड्या ह्या खोड्या नव्हत्या त्यात सामाजिक कार्याचं बीज होतं. कंसाची
असुरी सत्ता दुबळी मुलं कशी उधळून टाकणार, श्रीकृष्ण हा बलशाली सेना उभारू पाहात होता. दूध डेअरीला घालण्याऱ्या
व मुलांना चटणी सोबत भाकर देणाऱ्या आईबापाने श्रीकृष्ण चरित्र नीट समजून घ्यावं. साध्या
भोळ्या गौळणींना हे आंदोलन कळत नव्हतं. त्या माता यशोदेकडे गाऱ्हाणे घेऊन जायच्या,
म्हणायच्या,
सांज सकाळी भलत्यावेळी घरामध्ये घुसतो,
दही दूध खाऊन मडके फोडीतो, मस्करी
माझी करीतो ॥ धृ ॥
गोकुळच्या गौळणी तक्रार करीत होत्या. खरं तर ती तक्रार नव्हतीच तो तर एक बहाणा
होता. श्रीकृष्णा घरी जाण्याचा. गोकुळ श्रीकृष्णाला कंटाळलं होतं. त्याचा गावाला त्रास
होत होता. पण नकोनको म्हणत हवाहवासा वाटणारा तो त्रास होता. मुलं त्रास देतात म्हणून
घरातली माणसं कंटाळतात पण तेच चार दिवस बाहेरगावी गेले तर त्यांच्या गोड त्रासाची घराला
भूक लागते. असाच श्रीकृष्णाचा गोड त्रास होता.
त्याच्या ह्या सत्कार्यात कुणी अडथळा आणला की त्याने खोडी केलीच म्हणून समजा.
द्वाड पती पत्नी नेहमी श्रीकृष्णाच्या विरोधात असायचे. एके दिवशी ते रात्री झोपले.
नवऱ्याची दाढी बेंबीपर्यंत वाढली होती. भगवंत रात्री त्यांच्या घरी गेले व ते झोपेत
असतानाच नवऱ्याची दाढी व बायकोची वेणी याची गाठ मारली. सकाळीच पत्नी उठली तर वेणी ताणल्या
गेली. नवऱ्याच्या दाढीला पण ताण बसला. चेष्टा का करता म्हणून दोघेही एकमेकावर चिडले.
नंतर त्यांच्या लक्षात आलं की गाठ पक्की बसली आहे. कैची घेतली पण कैचीने एक ही केस
कापला नाही. शेवटी जाळायचा विचार केला ती आगीने जळत नव्हती. ही खोडी श्रीकृष्णानेच
केली हे त्यांच्या लक्षात आलं व ती तक्रार घेऊन पती पत्नी यशोदे घरी निघाले. लग्नात
पति पुढे व पत्नि मागे पण आज पत्नी पुढे व पती मागे चालले. श्रीकृष्णाने मुलांना कल्पना
दिलीच होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मुलांची गर्दी होती. गोकुळात अशी शोभायात्रा
प्रथमच निघाली होती. यशोदा मातेजवळ हे जोडपं जाऊन पोहचलं यशोदा वैतागून गेली व श्रीकृष्णाला
म्हणाली,
श्रीकृष्णा तुला मी ताकीद करीते।
घराला कुणाच्या कधी ही जाऊ नको रे" ।।
माता यशोदा सात्विक संताप व्यक्त करीत होती. दह्या दुधाच्या चोऱ्या ही सामान्य
बाब होती पण यमुना डोहात स्नान करणाऱ्या गोपींचं वस्त्र हरण करणे. ह्या खोडीचा अर्थ
मातेला काय कळणार? पाण्यात नग्न स्नान करणे म्हणजे जलदेवतेचा अपमान व सभ्यतेला धरून नव्हते म्हणून
वस्त्रहरण करून देवाने गोपींना शिक्षा केली होती. हा गुह्यार्थ ज्ञानीजनांना कळत होता.
एक नव युग, नवी
पहाट जन्माला येणार, क्रांती घडणार, सृष्टी आनंदाने बहरणार, श्रीकृष्णाचं पाऊल म्हणजे युग पुरूषाचं पाऊल होतं.
संत सकाळी झोपेतून उठता क्षणी त्याची प्रार्थना करीत असत हळुवार
शब्दाने भूपाळी
उठ परमेश्वरा श्रीचक्रधरा, हसली
रे वसुंधरा
थवा पाखरांचा गायी योगेश्वरा ।।
म्हणत असत.
अमृतधारांचे कदंब फुटले मम अंतरा
भावनेचा कुंभ फुटूनी वाहे भक्ति झरा ।।१।।
जागले हे जग सारे सुखावल्या दाहि दिशा
शब्दावरी वरलता उमलली फुलला मनमोगरा ।।२।।
भगवान श्रीकृष्णाचं बालपण म्हणजे सद्गुणांचा समुच्चय. संतांना
त्यातलं देवत्व भावलं. गोपजनांना मैत्री. अभिनेत्यांना तो नटवर वाटला. पहेलवानांना
गुरू वाटला. चेंडुफळीचा खेळ चांगला खेळतो म्हणून क्रिडापटुंना आदर्श वाटला. बांबुच्या
लहान टुकड्याची बांसरी करून चराचराला मोहिनी घालणारा तो संगीतकार होता. सर्वच क्षेत्रातली
माणसं श्रीश्रीकृष्णा कडून प्रभावित झाली होती. एका संतांनी तर त्याला चांगला चोर म्हणून
नमस्कार केला आहे.
“व्रजे
प्रसिद्धं नवनीत चोरं गोपांगणानांच दुकुल चोर
अनेक जन्मार्जित पापचौरं
चोराग्रगण्यं कृष्णं नमामि"
अर्थ असं हे अलौकिक घटनेनं भरलेलं, चमत्काराने व्यापलेलं. तरी ही मानवी मनाच्या पातळीवर वावरणार
जीवन होतं.
माता यशोदनं विचार केला, हा दिवसभर गावात खोड्या करतो. त्यावर एकच पर्याय आहे आणि तो
म्हणजे त्याला गुरं सांभाळण्यासाठी पाठविणे. तिनं गुरं सांभाळणाऱ्या गोपगड्यांना सांगून
ठेवलं. श्रीकृष्ण गुरं सांभाळण्यासाठी येणार म्हणून मुलं हुरळून गेली. माता यशोदा सकाळी
लवकर उठली. कन्हैया झोपलेला होता. आपल्या लाडक्या बाळाला ती जागं करते,
याचं वर्णन कवी अनंताने फार सुंदर केलं आहे
प्रभातकाळी जननी यशोदा उठी म्हणे सत्वर बा मुकुंदा
गोपाळ येती तुजला बाहाती । गोविंद दामोदर माधवेति
।।
भक्तांच्या भुपाळीने, गोपगड्यांच्या आवाजाने व आईच्या प्रेमळ हाकेने भगवंत उठले. मुख
प्रक्षाळण करून लोणी रोटी खाल्ली. कटी पितांबर नेसले,
कमरेला बांसरी खोवली. डोक्यावर ब्रम्हचर्याचं प्रतिक असलेलं
मोरपिस लावलं. खांद्यावर घोंगडी व हातात काठी घेऊन गोपीमित्रांसह गायी घेऊन वृन्दावनाच्या
जंगलात गेले. वृन्दावनात पावा घुमऊ लागला. त्याच्या सुमधूर आवाजाने गायी वासरं वेधल्या
जाऊ लागली. वाहणारं यमुनेचं पाणी स्थिर होऊ लागलं. झाडाची पानं स्थिर होऊ लागली. हुतुतु,
हमामा, हुमरी खेळाने गोपाळामध्ये वेगळाच आनंद निर्माण झाला. श्रीश्रीकृष्ण
हा गोपगड्यांचा जीव की प्राण झाला. दररोज उठावं दिवसभर गुरं सांभाळून घरी यावं असा
हा क्रम चालू होता.
इकडे कंसाला समजलं की आपला वैरी गुरं सांभाळण्यासाठी वृन्दावनाच्या जंगलात
येत असतो. पुन्हा त्याने अघासूर नावाचा दैत्य पाठविला. गोपाळांच्या
वाटेवर सपाट मैदानावर तो भला मोठा अजगर होऊन पडला. त्याचा एक ओठ जमिनीवर तर एक आभाळाला
भिडला होता. त्याचं तोंड एखाद्या भुयारासारखं दिसत होतं. गोपाळांनी हा नविनच प्रकार
पाहिला. वाटेवर कधीच नव्हता असा लांब बोदगा, सर्वच थक्क झाले. सगळ्यांना श्रीकृष्णाची काळजी वाटली. गोप म्हणाले,
किसना तू भुयारात जाऊ नकोस. पहिल्यांदा आम्हाला आंत जाऊन पाहु
दे,
आम्ही वाचलो तर तू आत ये. अघासुर श्रीकृष्ण तोंडात येण्याची वाट पहात होता. पण विषाची चव गोपाळ
स्वतः घेणार होते. वयाने लहान साधी भोली मुलं श्रीकृष्णाला म्हणत होती. श्रीकृष्णा आम्हाला तुझ्यासाठी मरू दे. तुझ्यासाठी मिटण्याचं भाग्य आम्हाला दे. केवढी
ही स्वामीनिष्ठा. मुलं मरण्यासाठी श्रीकृष्णा जवळ जगत होती. आज खरच निष्ठेला वय नसतं,
जात नसते व शिक्षणाची ही गरज नसते.
मुलांची स्वामीनिष्ठा पाहून भगवंत प्रसन्न झाले. सर्व
गोपाळ त्याच्या तोंडात गेले. शेवटी श्रीकृष्णाने प्रवेश केला अन आधासुराने तोंड मिटलं.
रेल्वेतल्या प्रवाशासारखे हे असेच कंसाकडे घेऊन जाऊ असा तो विचार करू लागला. पण त्याच्या
पोटात चमका निघू लागल्या. लाथा बुक्यांचा मार आतून बसू लागला. आतून मार खाणारा हा जगातला
पहिलाच प्राणी होता. मुलं घाबरली पण श्रीकृष्णभगवंतांनी शरीर
विशाल केलं. आधासूर लोळत होता. अंग आपटीत होता,
आळेपिळे देत होता. शेवटी श्रीकृष्णभगवंतांनी त्याला काकडीसारखं चिरलं व सर्व
गोपाल मुक्त केले. सर्व गोपाळ जयजयकार करू लागले.
डोंगराएवढं संकट संघटना मजबूत असेल तर वरच्या
वर उचलून धरता येतं. हे त्याने गोवर्धन उचलून दाखऊन दिलं. संकट हे नेहमी विषमतेच्या
वाटेने येत असतं.
महंमद कासिमने भारतावर प्रथम आक्रमण केलं तेव्हा त्याने उंच
टेकडी वरून भारताचं सैन्य पाहिलं, त्याच्या मूठभर सैन्यापेक्षा ते फार मोठं होतं. तरी तो म्हणाला
आपण जिंकणार, त्याचा
साथी म्हणाला हे कसं शक्य आहे. ते आपल्यापेक्षा जास्त आहेत. कासिम म्हणाला,
ते जास्त असून थोडे आहेत. आपण थोडे असून जास्त आहोत. कारण त्यांच्यात
विषमता आहे. ते जातीत विभागल्या गेलेत, पंथात विभागल्या गेलेत. त्यांच्यात एकजीव होऊ शकत नाही. तो म्हणाला
पाहा गटागटाच्या चुल्ही आहेत. आपापल्या जातीचे स्वयंपाक होताहेत. त्यांच्यात वाटावाट आहे. आणि खरचं त्याने जिंकलं.
सैन्यबळ थोडं असून कासिम एकेक राज्य जिंकत गेला.
हे श्रीकृष्णभगवंतांनी पाच हजार वर्षापूर्वी बाल वयातच
आम्हाला समजावून सांगितले. भगवंताने लोकांमध्ये एकता,
एकात्मता निर्माण करण्याचा आणखी एक अभिनव उपक्रम केला. सर्व
गोपाल जेवायला बसत ते गटागटाने. त्यातून गरीब श्रीमंत,
लहान मोठा हे भेद स्पष्ट होत होते. भगवंत म्हणाले,
मित्र हो !!
प्रत्येकाचे जेवण वेगळे असेल तर आपल्यात एकता निर्माण होणार
नाही. नेहमी
आपण एकमेकात मिसळतो अन जेवतांना बाजूला होतो. हे चांगलं नाही. आपण आज एक नवा
प्रयोग करू. आपण जे पदार्थ खातो त्यांनाच एकत्र करू व सर्व एकत्र बसून जेवू. अन खरोखर
त्या दिवशी शिदोऱ्या एकत्र केल्या. सर्व शिदोऱ्यांचा काला केला. ह्या काल्याने गरीबांचा
संकोच गेला व श्रीमंताचा अहंकार संपला.
माणसं जवळ येण्यासाठी ह्याच दोन महत्त्वाच्या अडचणी आहेत. लपून बसतो व अहंकार
जागा सोडत नाही. हा मंगलमय सोहळा संकोच पाहण्यासाठी देवता समुह तेथे आला. कारण त्यांना
हे नविनच होतं. एकात्मता त्यांनीही आपसात साधली नव्हती. ती गुरं सांभाळणाऱ्या एका गोपाळाकने
कशी निर्माण केली. हे पाहण्यासाठी देवतांची गर्दी झाली. एकात्मतेत प्रसन्नता आहे,
आनंद आहे. मनामनातला आनंद पदार्थांच्या कणाकणात एकरूप झाला होता.
तो पदार्थ, पदार्थ
नव्हता पदार्थाच्या रूपाने आनंदच होता. त्या आनंदाचा एखादा कण तरी आपल्याला मिळावा
म्हणून देवतागण आसुसले होते.
गुप्तरूपाने जमलेली देवांची गर्दी श्रीकृष्णाने जाणली. पण त्यांना तो प्रसाद
मिळू द्यायचा नाही असा त्याने निश्चय केला. कारण देवता या प्रसादाचे अधिकारी नाहीत.
प्रसाद ग्रहण करण्यासाठी मनाची प्रसन्नता असावी लागते ती देवतेकडे नाही. म्हणून भगवंताने
सर्व गोपाळांना सूचना केली. गड्यांनो ! गोपाळकाल्याचा प्रसाद घेतल्यावर कुणीही येमुनेत
हात धुवायला जायचे नाही. कारण - ‘‘काल्याचिये मिसे देव जळी झाले मासे ’’ काल्याचा प्रसाद मिळावा म्हणून देव पाण्यात मासे होऊन फिरत होते.
पाण्यात
हात धुतल्यावर तरी आपल्याला प्रसाद मिळेल म्हणून ते यमुनेत मासे
होऊन फिरू लागले. प्रसादाच्या कणासाठी देवता जलचर झाल्या होत्या. गोप म्हणाले,
अरे, श्रीकृष्णा हात धुवायचे नाही, मग ते का खरकटेच ठेवायचे? श्रीकृष्ण म्हणाला नाही आपापल्या टिरीला पुसा आणि गोपाळांनी
तसच केलं असा हा अपूर्व सोहळा मानव जातीला अभेद शिकवणारा होता. माणसांची फाटलेली मनं सांघणारा होता. जातींच्या भिंती ढासाळून टाकणारा
आहे व सांप्रदायिक संघर्ष मिटवणारा आहे. दुष्टांचं निर्दाळने करण्यासाठी भगवंत
अवतार घेतो हे खरं आहे पण दुष्ट म्हणजे काय,
दुष्प्रवृत्ती ती भयंकर राक्षसापेक्षा भयंकर असते ती गोपालकाल्यानी
नष्ट झाली. आजही आपण काल्याचा कार्यक्रम करीत असतो. दही व लाह्या एकत्र करतो. ते दोन्ही
पदार्थ एकमेकात मिसळून जातात. किती गोड कल्पना आहे ही नाही का?
भगवंत ज्या काल्याने तृप्त झाला त्याची महिमा खरोखरच अवर्णनीय
आहे
श्रीकृष्ण भगवान की जय
पू.श्रीबाबुळगावकर
शास्त्रीबाबा
सुंदर
ReplyDelete