अल्प चरित्र
श्रीदर्यापुरकरबाबांचा जन्म ई. सन १८५० च्या सुमाराला भुसाऱ्याचे वाडगांव जि. औरंगाबाद येथे फूल माळी कुळांत झाला. त्यांना बालपणीच एक साधारण स्थितीच्या भिंगी बोरसर जि. औरंगाबाद येथे राहणाच्या म. गोपाळदादा पाटोदेकर यांना सोपवण्यात आले. म्हणजे अल्पवयातच त्यांनी त्यांचे शिष्यत्व स्विकार केले.
पण म. गोपाळदादा पाटोदेकर स्वतः एक खेड्यात रहात असल्यामुळे आपल्याकडून यांच्या शिक्षणाची व आचार सुधाराची सोय होणार नाही असे समजून त्यांनी पारिमांडल्याम्नाय प्रमुख प. म. श्री. लासूरकर महानुभाव यांच्या सान्निध्यात पाठवले. त्या काळाला दोन दोनशे तीन तीनशे पांचशेपर्यंत महानुभावांचा गुरुकुळ रहात. त्या ठिकाणी ब्रम्हविद्या शास्त्राची व इतर शिक्षणाची व्यवस्था असे. वागणूकीची शिस्त असे, कटाक्षाने आचारधर्म पाळला जात असे.
प. म. श्री. लासूरकर महानुभाव हे महापात्र होते. त्यांच्या सान्निध्यात त्यांनी अल्पकाळांतच अंत:करणापासून केलेल्या सेवेने व शुद्ध आचार विचाराने महंत लासुरकर बाबांचे परम आवडते सच्छिष्य बनले. बराच काळ त्यांच्या सान्निधींत राहून आचारदक्ष व ब्रम्हविद्या पारंगत बनले. पुढे लासुरकर बाबा देवदर्शनाला गेल्यावर त्यांचे प. म. श्री. धाराशिवकर महानुभाव व प. म. श्री. पंडित मयंकराज महानुभाव यांच्या सन्निधींत राहून पूर्ण ज्ञानसंपन्न झाले. नंतर बराच काळ आपण अत्यंत निस्पृह वृत्तिने तपश्चर्येत घालविला. सुमारे ३६ वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या सेवटी डोंगरात उत्कर्षाची चर्या केली. अधुन मधुन स्थानोद्देशे तीर्थाटण करण्यासाठी ते मध्य देशात येत असत. या कालखंडांत कोणी प्रार्थना केली, काही साधु मंडळी जपून आली तर त्यांना ब्रम्हविद्याशास्त्राचे प्रवचन रुपाने शिक्षण द्यायचे, रहस्य समजावयाचे त्यांचे नानाविध शंका समाधान करायाचे. पण आचार विचाराची कडक शिस्त पाळावयाची आज्ञा असावयाची. त्यांत यत्किंचितसुद्धा शिथिलता दिसली की त्या सर्वांचा त्याग करून एकट्याने देशपर्यटन करायाचे. बाल, तरुण, वृद्ध, सन्यस्त गृहस्थ कोणीहि स्त्री असो, तिला शास्त्रोपदेशाच्या निमित्तानेसुद्धा जवळ येऊ द्यायचे नाही. मग नुसते भाषण किंवा इतर निमित्ताने सहवास हे तर सहसा असंभव पहिले काही लोकांना असे वाटे की ' सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी स्त्री पुरुष ऊंच नीच भाव यांचे कडवे विरोधी, त्यांचे हे अनुयायी असून यांना असा स्त्रियांचा तिटकारा का वाटतो? यांचे असे करणे अनुचित् आहे. यांच्या मनात स्त्री जातीविषयीं विषमता आहे. पण सत्तरी उलटल्यानतर कामवासनेचा मूलोछेद होऊन व साधकावस्था संपून सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर त्यांच्या स्त्री जातीच्या दृष्टिकोणात एकदम पालट घडून आला, जे पूर्वी स्त्रियांना आपल्या सावलीतहि उभे करीत ना, तेच आपण आता ५०-६०-१०० शंभर तरुण वृद्ध सर्व प्रकारच्या स्त्रियांना जवळ ठेवून धर्मोपदेश करूं लागले. आणि त्यांचा धर्म सिद्धीला जाण्याची काळजी वाहू लागले. मग सर्वांना पटले की आपले असे करणेच उचित होते, आणि जोपर्यंत पूर्णपणे इंद्रिय वश होत नाहीत. मानव स्वभाव धर्माप्रमाणे त्या इंद्रियांचे कार्य स्वाभाविकच प्रथमावस्थेला प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत स्त्री द्रव्यादि विषयांचा अत्यंत त्याग करणेच योगी पुरुषाला योग्य आहे. याचकरतां आपण सत्तरी लोटेपर्यंत कोण्या महंतीच्याहि प्रलोभांत पडले नाही. सत्तरी लोटल्यावर आपण ई. सन १९३२ मध्ये मोठ मोठ्या सत्पुषाच्या आग्रहावरून कासारबोरी जि. परभणी येथे कविश्वरान्मायाची प्रमुख गादी दर्यापूरकरीचा स्वीकार केला, त्यांचे दिक्षेचे शुभनाम ई श्री. रुस्तुमराजदादा पाटोदेकर असे होते. ही महंती स्वीकार केल्यावर त्यांची प्रतिष्ठा फार वाढली. कारण एकतर त्यांचे ज्ञान भक्ति वैराग्य कसोटीला लागले होते व कठीणतम परिक्षेतून आपण पार पडले होते व धीरे धीरे प्राचीन सत्पुरुष साधुमहंत इहलोकीची यात्रा संपवून परब्रम्ह पदी लीन झाले होते.
ई. स. १९३५ साली ब्रम्हविद्या शास्त्रातील आचार विचार मालिका प्रकरणांचे प्रवचन ऐकण्यास एक हजारावर साधुसमाज व बराचसा गृहस्थ समाज श्री क्षेत्र गोपाळ चावडी येथे सतत ३ महिने जमून होता. ई. स. १९३६ साली कासारबोरी जि. परभणी येथे त्यांचे महावाक्य प्रकरणांचे प्रवचन झाले. तेव्हां हजाराच्यावर लोक समुदाय हजर होता. त्यात प्रामुख्याने साधु मंडळी होती. हे वचन २ महिने सतत चालले. '
ई. स. १९४० साली कासारबोरी येथे आपण एक मोठा अभिषेक महोत्सवहि केला. ई. स. १९४२ साली श्रीक्षेत्र पंचाळेश्वर येथे महावाक्य प्रकरणाचे त्यांचे प्रवचन झाले. तेव्हाहि आठ नऊशेष्यावर संतमंडळी जमली होता व भाविक गृहस्थ जनता निराळीच होती. इ. स. ५२ साली पुन्हा पंचाळेश्वर येथे महावाक्य प्रकरणांत प्रवचन झाले. तेव्हां १००० च्या वर संत समाज व काही सद्गृहस्थ मंडळी २ महिने पर्यंत जमून होती. त्यांचा स्वभाव विशेष निर्लोभ करारी असून सत्य व स्पष्टवक्तेपणाची निरंतर त्यात छटा दिसायची ‘निस्पृहस्य तृणं जगत्' ही म्हण त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे चरितार्थ झाली होती. त्यामुळेच थोडा स्वभावात तेजपणा प्रगट होत असे. अशा सत्पुरुषाचा आतां लाभ होणे महान कठीण कार्य आहे.
परमपूज्य प. म. श्री. दर्यापूरकर महानुभाव यांचे श्रीक्षेत्र पांचाळेश्वर जि. बीड येथे वयाच्या जवळ जवळ ९५ व्या वर्षी ता. ११-१-५४ सोमवार प्रातःकाळी ४ वाजतां प्रातःकाळी परमेश्वराचे ध्यान करीतच श्रीचक्रधरारायांची श्रीमूर्ति आठवित देहावसान झाले.
==============================
-: श्रद्धांजली :-
त्रिदण्डीयुक्त, कवीश्वर कुलाचार्य, आचार्य प्रवर, प्रात:संस्मरणीय, गुरुवर्य, परमपूज्य प. महन्त 108 कै.- "श्रीपाटोदेकर दयापुरकर बाबाजी महानुभाव" श्रीक्षेत्र पांचाळेश्वर से अनन्त यात्रा के लिए गमन कर गए । पंथ आपकी विरह-वेदना में कुछ इस तरह आकूल-व्याकूल हुआ,
शाके बाण समुद्र पर्व गणना नामे विजै वत्सरी ।
पौषे शुक्ल तिथि समुद्र समयी प्रात: शशी वासरी ।।
आम्हा टाकुनि धर्मछत्र आमुचे दर्यापुराख्ये मुनि ।
गेले स्वामी पदी प्रसिद्ध जगती ते षड्रिपू जिंकुनी ।।१।।
गोदावरीच्या यामे पहा हो । पंचाळ नामे ग्रामासि त्या हो ।
श्रीदत्त गुंफेमध्ये महा हो । आक्रोश झाला साधु जना हो ।।२।।
ज्ञानाचे तरणी विरक्त अवनी आदर्श धर्मज्ञ जे ।
तेजाचे उदधी सुयोग्य मतिचा देती परामर्ष जे ॥
भक्ति प्राचुरता अती कुशलता होती तयांच्या मनी ।
हा! हा! स्वामी कठोर ते मन कसें नेलें आह्मा पासुनी ।।३।।
कै. म. श्री, ऋषिराज बाबाजी उर्फ श्रीदर्यापुरकरबाबाजी महानुभाव
श्लोक शा. वि.
शाके बाण समुद्र आदि शशि तो त्या पौष शुक्लांत हा ।
इंदू वार तिथी महर्षि विजया संवत्सरी योग हा ।
पंचाळेश्वर पुण्य पावन मही पश्चात काळात ते ।
श्रीदर्यापुर भीद रुस्तुम मुनी कैवल्य धामा गते ।
कविः - कै. श्रीदामोदर शेवलीकर महानुभाव
कैवल्यवासी परमपुज्य पट्टाधीष्टीत महदाचार्य श्रीगुरुवर्य दर्यापूरकर बाबा यांचे चरणारविंदीसमर्पण
-: श्रद्धांजली :-
( चाल:-कीती तरी गोड तुझे हरीनाम )
दर्यापुरकर श्रीमुनीराज, टाकुनी का ? गेले हो आज ॥धृ०॥
होती ज्ञान वृद्धता अंगी । तशी वैराग्य वृत्तीही स्वांगी ॥
वाटे परमार्गी शिरताज ॥१॥
आचरणी होति दक्षता फार । निरोपी ब्रम्हज्ञान विस्तार ॥
करोनि निज धर्माचे काज ॥२॥ टाकुनी,
झिजउनि आजवरी काया । अर्पुनि देह प्रभू पाया ॥
गेले मोक्ष पदी गुरुराज ॥३॥ टाकुनी,
शके अठराशे बाण सींधू । पौष शुद्धांत वार इंदू ॥
सप्तमि प्रात: समई गुरुराज ॥४॥ टाकुनी.
दुःख पांचाल भीद नगरा । कुणाला शांती नाही अंतरा ॥
बुडाले शांतीचे जहाज ॥५॥ टाकुनी.
सर्व या अखिल महात्म पंथात । जाहला हाचि एक आकांत ॥
बाबा ! बाबा ! गेले आज ॥६॥ टाकुनी,
हरीणी त्यजुनि जाय पाडसा । तशी गत झालि श्रीधर दासा ॥
जाहला नीज मनी नाराज ॥७॥ टाकुनी,
शोकनिमग्नार्भक - श्रीधर यशवंत लखदिवे