तृष्णेची अतृप्त विहीर जी कधीही भरत नाही
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एकदा राजा भोजच्या दरबारात प्रश्न पडला की अशी कोणती विहीर आहे ज्यामध्ये पडल्यावर माणूस बाहेर पडू शकत नाही? या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकले नाही. शेवटी राजा भोजने राजपंडितांना सांगितले की, “या प्रश्नाचे उत्तर सात दिवसांत आणा, अन्यथा आजपर्यंत तुम्हाला दिलेली बक्षिसे, इनाम मिळालेल्या जमिनी वगैरे परत घेतल्या जातील आणि तुम्हा सर्वांना ही धारा नगरी सोडून दुसऱ्या राज्यात जावे लागेल.
सहा दिवस उलटून गेले. पण राज पंडितांना उत्तर मिळाले नाही. सगळे चिंतीत होते. एक पंडीत हताश होऊन एखाद्या साधूला विचारू म्हणून जंगलाकडे निघाला. तिथे त्याला एक मेंढपाळ भेटला. त्याने ओळखले कुणीतरी राजदरबारातला माणूस आहे. मग मेंढपाळाने विचारले, “तुम्ही राजपुत्र आहात, राजाचे लाडके आहात, मग तुमच्या चेहऱ्यावर एवढी उदासीनता का?
हा मेंढपाळ मला काय मार्गदर्शन करेल?? असा विचार करून पंडित काहीच बोलले नाहीत. त्यावर मेंढपाळाने पुन्हा पुन्हा दुःखाचे कारण विचारले आणि म्हणाला “पंडित जी,आम्हीही सत्संगी आहोत, कदाचित तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे असेल, म्हणून थोडावेळ मोठेपणा बाजुला ठेवून सांगून मोकळे व्हा.
राज पंडितांने प्रश्न सांगितला आणि सांगितले की जर उद्यापर्यंत प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर राजा त्याला शहराबाहेर हाकलून देईल.
मेंढपाळ म्हणाला - माझ्याकडे परीस आहे, त्यापासून भरपूर सोने कर. एक भोजराजा कुठे लावला, त्याच्यासारखे लाखो राजे तुझ्या पाठीमागे फिरतील. फक्त परीस देण्यापूर्वी मला एक अट मान्य करावी लागेल की तुला माझे शिष्य व्हावे लागेल.
राज पंडिताचा अहंकार जागृत झाला की, 'मी दोन पैशांच्या मेंढपाळाचा शिष्य होऊ?' पण परिस मिळेल या लोभाने तो मेंढपाळांचा शिष्य बनण्यास तयार झाला.
मेंढपाळ पुन्हा म्हणाला - “आधी मेंढ्याचे दूध प्या, मग शिष्य व्हा.”
पंडित म्हणाला, “मेढींचे दुध पिले तर माझी बुद्धी कमी होईल. मी पिणार नाही.”
“नाही पिणार तर जा, मी परीस देणार नाही” - मेंढपाळ म्हणाला.
राज पंडित म्हणाला- “ठीक आहे, मी दूध प्यायला तयार आहे, पुढे काय करायचे?”
मेंढपाळ म्हणाला - “आता आधी मी दूध उष्टे करीन, मग तुला प्यावे लागेल.”
राजपंडित म्हणाले - *तू तुझी लायकी विसरत आहेस. चड्डीत रहा, ब्राह्मणाला उष्टे देणार का?”
मेंढपाळ म्हणाला- “जा मग मी परिस देत नाही.”
राज पंडित म्हणाले - “ठीक आहे, मी तुझे उष्टे दूध प्यायला तयार आहे.”
मेंढपाळ म्हणाला - “ठीक आहे मग आणखी एक अट - आता समोर पडलेल्या मेलेल्या माणसाच्या कवटीत मी दूध ओतेन, त्याला उष्टे करीन, कुत्र्याला चाटायला लावीन आणि मग तुला प्यायला देईन. आणि मग तुला परीस मिळेल. ही अट मान्य असेल तर बोला नाहीतर नाहीतर रस्त्याला लागा”
खूप विचार करून राजपंडित म्हणाले - “ बाबा रे! हे खूप अवघड आहे पण मी तयार आहे.”
मेंढपाळ म्हणाला - “क्षमा असावी पंडित जी, पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर हेच आहे की, ही लोभाची, लालसेची विहीर आहे ज्यात माणूस पडत राहतो, खोलवर जातो आणि पुन्हा कधीच बाहेर पडत नाही. परीस मिळवण्यासाठी या लोभाच्या विहिरीत पडलात आणि नको ते करायला तयार झालात.
यावर भर्तुहरीच्या वैराग्य शतकात श्लोक आहे-
छंद :-शार्दुलविक्रिडीत
भ्रान्तं देशमनेकदुर्गविषमं प्राप्तं न किंचित्फलम् ।
त्यक्त्वा जातिकुलाभिमानमुचितं सेवा कृता निष्फला ।
भुक्तं मानविवर्जितं परगृहे साशङ्कितं काकवत्
तृष्णे जृम्भसि पापकर्मनिरते नाद्यापि संतुष्यासि ॥४॥
वामनपंडित मराठी अनुवाद :-
छंद :- पृथ्वी
शिणोनि फिरलो महाविषमदुर्गदेशांतरी ।
तथा प्रभुहि सेविले न फळ लाधले की तरी ॥
सशंक तरि जेविलो परगृही जसा कावळा ।
परंतु न दिसे मला कठिण आस हे दुर्बळा ॥४॥
ल. गो. विंझे
:-
छंद : शार्दुल विक्रिडित
हिंडोनि किति देश दुर्गम मला लाभे न कांही फळ ।
केली योग्य कुलाभिमान त्यजुनी सेवाहि मी निष्फळ ।।
खाल्लें, शंकित, मानहिन परकें मी
अन्न काकापरी ।
तृष्णे! पापिणि ! वाढसी अजुनि
कां तृप्ती नसे जाहली ।।
मराठी अर्थ :- विषयभोगांच्या लालसेने मी अवघड असे अनेक देश फिरलो, परंतु काही फळ प्राप्त झाले नाही. चांडाल अशी विषय वासन शमली तर नाहीच, उलट वाढत गेली त्यामुळे मी अधिक अस्वस्थ झालो. त्या विषयोपभोगाच्या वासनेने मी आपल्या जातीचा आणि कुळाचा अभिमान सोडून देऊन दुसऱ्याची सेवा केली, परंतु ती निष्फळ गेली,
जसा एखादा श्वान एका भाकरीसाठी २४ तास त्या मालकाचा दारवंठा राखत असतो पण त्याला पोटभर जेवण मिळत नाही. तशीच माझी अवस्था आहे. विषयभोगाच्या वासनेने जीवा देवतांची दारवठे झिजवतो. वरदानरूपी भिक मागतो. आणि त्या जीवदेवतांकडे माझा काही एक आदर मान नसतां त्यांच्या घरीचे अन्न शुद्ध आहे की अशुद्ध आहे? अशा साशंक मनाने खाल्ले, जीव देवतांचे उष्टे खाल्ले, देवतांचा उच्छीष्ट प्रसाद घेतला, चरणोदक घेतले. तरीही माझ्या वासनेला उपमर्दक असा कोणताही बदल माझ्यात झालेला नाही.
मी अजूनही विषय
पदार्थांचे दर्शन झाले की लाळ गाळत असतो. अजूनही हे पापकर्मिणी तृष्णे! तूं वाढतच आहेस. तुझी अजून तृप्ती का होत नाही? आणि पापकर्माविषयी रत होऊन कशाला वागवतेस? अजून कितीक दिवस तू मला ययातीसारखी
तुझ्याअधिन ठेवशील. त्या ययातीने हजारो वर्ष उपभोग घेऊनही तो तृप्त झाला नाही.
शेवटी त्याला वैराग्य उत्पन्न झाले आणि तो म्हणतो.
न जातु काम कामाणाम् उपभोगेन शाम्यति ।
हविषा कृष्ण वर्त्मैव, भुयएवाभिवर्धते ।।
अर्थात - कामवासनेत गुंतून यथेच्छ विषयांचे भोग घेऊन
ही कामवासना शमत नाही. उलट वाढतच जाते. जसे की अग्नि लागल्यावर तुपा तेलाचे सिंचन
केले असता तो अग्नि अधिकच भडकतो. तेणेन्याये संयमरूपी जलाने ही अग्निरूपी वासना
विझवावी लागते.
एक संत छोटासा आश्रम चालवायचे. एके दिवशी त्यांनी जवळच्या रस्त्यावरून एका वाटसरूला बोलावले आणि त्याला शिष्यांसमोर विचारले, वाटेत सोन्याच्या मोहरांनी भरलेली पिशवी सापडली तर तू काय करशील?
तो माणूस म्हणाला - "मी ताबडतोब त्याचा मालक शोधून परत करीन, नाहीतर मी ते सरकारी तिजोरीत जमा करेन."
संत हसले आणि तेथून त्या माणसाला जायला सांगितले आणि शिष्यांना म्हणाले - "हा माणूस मूर्ख आहे."
शिष्य खूप आश्चर्यचकित झाले की गुरुजी काय म्हणत आहेत? या माणसाने बरोबर सांगितले आहे आणि प्रत्येकाला हेच शिकवले गेले आहे की “परद्रव्य मानी वमन” परक्याची वस्तू स्वीकारू नये. ती एक प्रकारची चोरीच आहे. थोड्या वेळाने पुन्हा त्या संतांनी दुसऱ्या एका माणसाला आत आणले आणि त्याला तोच प्रश्न पुन्हा विचारला.
दुसऱ्या माणसाने उत्तर दिले, " मला जर जर मला सोन्याच्या मोरांनी भरलेली पिशवी सापडली तर मी त्याच्या मालकाला कशाला शोधत बसेन!! तुम्ही मला मूर्ख समजता का?"
त्याला गुरूंनी जायला सांगितले. तो निघून गेल्यानंतर संत म्हणाले - "ही व्यक्ती दुर्जन आहे. शिष्यांना अधिकच आश्चर्य वाटले की, पहिल्या मनुष्याने योग्य उत्तर दिले तरी त्याला म्हणाले आणि दुसर्याला दुर्जन? मग गुरुजींना नेमके काय सांगायचे आहे?
या वेळी गुरूने तिसरा मनुष्य शोधला आणि त्याला आत आणले आणि त्याच प्रश्नाची पुनरावृत्ती केली. त्या माणसाने नम्रपणे उत्तर दिले - “गुरूवर! याबद्दल आताच निश्चित सांगणे फार कठीण आहे. कारण माझ्या मनाचा काही भरवसा नाही कधी बदलेल, देवाच्या कृपेने माझा सतदसद्बुद्धी विवेक जागृत राहिला तर त्या मी परत करेन”
संत प्रसन्न झाले व म्हणाले - "हा माणूस खरा आहे. त्याने आपले जीवन देवाकडे सोपवलं आहे. आणि जो परमेश्वरालाच सर्वस्व मानतो परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्य करतो अशा व्यक्तींकडून कधीही चुकीचा निर्णय घेतला जात नाही.”
ज्येष्ठ कुंतीपुत्र सर्वात मोठा पांडव सुर्यपूत्र कर्ण, दैवी संपत्तीचा होता कर्म, धर्म जाणणारा होता, पण दुर्जनांच्या आधार मी लोकांच्या संगतीने आणि स्वतः वरच्या फाजील आत्मविश्वासाने लहान भाऊ अर्जुनकडून पराभूत झाला. तो अर्जुनापेक्षा कर्म आणि धर्म दोन्हीमध्ये श्रेष्ठ होता. तरीही तो पराभूत झाला, त्याचं पार वाटोळं झालं. त्याचे कारणच असे होते की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या हातात आपल्या जीवन रथाचा दोरी दिली होती.
तसेच आपणही तन-मन-धन परमेश्वराला समर्पित करावे तरच आपल्या जीवनाची पूर्णपणे सार्थक चा होईल.
विश्वास ठेवा की सर्व सुख दुःखाच्या चढ-उतारांमुळे जीवनात काही फरक पडणार नाही, म्हणूनच संत नेहमी म्हणतात की “जे काही मिळाले आहे ते पुरेसे आहे !!”