लोभीपणाची शिक्षा आणि अति लोभ नरकाचे द्वार

लोभीपणाची शिक्षा आणि अति लोभ नरकाचे द्वार

 अति लोभ नरकाचे द्वार

लोभीपणाची शिक्षा



मातरं पितरं पुत्रं भ्रातरं वा सुहृत्तमम् ।

लोभाविष्टो नरो हन्ति स्वामिनं वा सहोदरम् ।।

अर्थ - लोभाने अंध झालेला मनुष्य माता, पिता, पुत्र, बंधु, उत्तम मित्र, मालक अथवा भाऊ कोणाचीही हत्या करतो, किंवा आई वडिलांचा विश्वासघात करतो. मुघलकालिन अनेक राजांच्या घटना आहेत त्यांनी राज्याच्या सत्तेच्या लोभाने आपल्या वडिलांना कारागृहात टाकले, भावांना जीवे मारले. हा सर्व लोभाचाच परिणाम होए.

        फार पूर्वीची गोष्ट आहे. एका दूर देशात एक म्हातारे जोडपे राहत होते. फार मेहनत करून देखील त्यांना थोडे फारच पोट भरण्यापुरते मिळत असे. काही दिवसांनी म्हातारी मरण पावली. म्हाताऱ्याला अतिशय दुःख झाले. पण दुःख केल्याने काय होणार होते. थंडीचे दिवस असल्याने रात्रीच्यावेळी कुणीच बाहेर नव्हते म्हणून म्हातारा आपल्या शेजाऱ्यांना व नातेवाईकांना मदत मागायला गेला. परंतु तो गरीब असल्याने कुणीच त्याच्या मदतीला आले नाही. मग म्हातारा हताश होऊन गावातील ख्रिश्चन धर्मोपदेशकाकडे गेला व आपल्या पत्नीच्या शवावर धार्मिक विधी करण्यासाठी मदत मागु लागला. परंतु धर्मोपदेशक धुर्त व अप्रामाणिक होता. तो म्हाताऱ्याकडे पैशाची मागणी करू लागला. मग म्हातारा दिनवाणा होऊन म्हणाला, ‘‘मी खर सांगतो, मी अतिशय गरीब आहे, माझ्याजवळ एक पैसा देखील नाही, मला मदत करा, मी पैसे तुम्हाला नंतर थोडे थोडे देण्याचा प्रयत्न करील.’’ परंतु धर्मोपदेशकाला त्याची दया आली नाही. आणि त्याने म्हाताऱ्याला हाकलून दिले.

        म्हातारा निराश झाला व त्याने स्वतःच आपल्या पत्नीच्या शवाला गाडण्याचा निर्णय घेतला. आपल्या पत्नीच्या शवाला घेऊन तो गावाबाहेरच्या स्मशानात आला व गड्डा खणायला लागला. थोडी माती उकरल्यावर त्याला 'टन् टन्' असा आवाज आला त्याने माती बाजूला करून पाहिले तर त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेला घडा दिसला. तो घडा पाहून अर्थातच त्याला आनंद झाला व तो परमेश्वराला प्रार्थना करत म्हणाला, ‘‘धन्यवाद, भगवंता मी आपला आभारी आहे. आपण माझी मदत केलीत.’’ म्हातारा ते धन घेऊन आपल्या घरी गेला त्याने एक आकर्षक शव पेटी तयार केली. तसेच इतरही आवश्यक वस्तूंची जमवाजमव केली. म्हातारा पुन्हा त्या धर्मोपदेशकाकडे गेला. तो म्हाताऱ्याला म्हणाला, ‘‘तुला मी मघाच सांगितले होते ना की तुझ्याजवळ पुरेसा पैसा असल्याशिवाय मी तुला मदत करणार नाही.’’ त्यावर म्हातारा म्हणाला, ‘‘तुम्ही गैरसमज करून घेऊ नका माझ्याजवळ आता पुरेसा पैसा आहे असे म्हणून आपल्याजवळील सोन्याची मोहर देऊन त्याला मदतीसाठी विनविले.’’ सोन्याची मोहर मिळताच धर्मोपदेशकाच्या वागणुकीत बदल झाला तो अतिशय आदरयुक्त शब्दात म्हणाला, ‘‘आपण काळजी करू नका, मी सर्व काही पाहून घेईल.’’ म्हातारा समाधानाने घरी आला. इकडे धर्मोपदेशक आपल्या बायकोला म्हणाला, ‘‘हा मनुष्य थोड्यावेळापूर्वी मी गरीब आहे असे म्हणत होता आणि आताच तो मला एका सोन्याची मोहर देऊन गेला. आजपर्यंत मी खूप जग पाहिलं परंतु असला प्रकार मी पहिल्यांदाच पहात आहे’’ मग त्याने मोठ्या इतमानाने म्हातारीचा अंत्यसंस्कार केला.

        काही दिवसानंतर म्हाताऱ्याने आपल्या घरी सर्व नातेवाईकांना व मित्रांना मेजवानीसाठी आमंत्रित केले. त्यात त्याने त्या धर्मोपदेशकालाही बोलावले होते. मेजवानी एका मोठ्या दिवाणखान्यात होती. दिवाणखाना सर्वत्र महागड्या सजावटी वस्तूंनी भरलेला होता. मोठ मोठी झुंबर त्याची शोभा वाढवत होते. मेजवानीत निरनिराळे स्वादिष्ट पक्वान्न होते. हे सर्व पाहून धर्मोपदेशक चकित झाला. मेजवानीनंतर सर्व लोक निघून गेले. आता फक्त तो म्हातारा आणि धर्मोपदेशकच उरले होते. तो म्हाताऱ्याला म्हणाला ‘‘तू पहिले अतिशय गरीब होतास परंतु आता तु अतिशय समृध्दीचे जीवन जगतो आहेस, ते तु कसे केलेस ते सांग.’’ म्हाताऱ्यानेही मग काहीही न लपवता सर्व सांगून दिले. त्याची कहानी ऐकून धर्मोपदेशक मनातल्या मनात जळफळू लागला. तो घरी आला पण अस्वस्थ मनाने. तो सारखा विचार करायचा की, काहीही करून त्या म्हाताऱ्याकडील संपत्ती आपल्याकडे घ्यायची. त्याला एक युक्ती सुचली. त्याने ती आपल्या बायकोला सांगितली. रात्र झाल्यावर त्याच्याकडील एका बोकडाला त्या दोघांनी मिळून मारले आणि त्याचे कातडे वेगळे केले. ते कातडे त्याने पांघरले व आपल्या बायकोला म्हणाला ‘‘तु सुई दोऱ्याने ते कातडे अशाप्रकारे शिव की ते माझ्या अंगावरून घसरू नये.’’ त्याप्रमाणे त्याच्या बायकोने ते शिवले. मध्यरात्री धर्मोपदेशक म्हाताऱ्याच्या घरातील खिडकीजवळ जाऊन उभा राहिला व जोराजोराने खिडकी वाजवू लागला तो आवाज ऐकून म्हातारा जागा झाला व म्हणाला, ‘‘कोण आहे?’’ त्यावर धर्मोपदेशक म्हणाला, ‘‘मी तुझ्याजवळील धनाचा खरा मालक आहे. तु ते माझ्याकडून हिसकावलेस, माझे धन मला वापस कर नाही तर तुझ्यावर मोठे अरिष्ट कोसळेल.’’ ते ऐकून घाबरलेल्या म्हाताऱ्याने आपल्या जवळील धनाचा घडा आणला आणि अंगणात आणून ठेवला व घरात दडून बसला. इकडे धर्मोपदेशक ते मडके घेऊन आपल्या घरी वापस आला व आपल्या बायकोला म्हणाला, ‘‘हे धन आता आपले आहे याला लपव व चाकूने शिवलेले ते कातडे कापून टाक आणि मला पूर्ववत कर.’’ त्याच्या बायकोने एकचाकू आणला व त्याने पांघरलेले बोकडाचे कातडे कापू लागली पण एकदम रक्त वाहू लागले व तो जोराने ओरडला. ‘‘थांब कापू नकोस’’ मग ती दुसऱ्या जागेवरून कापू लागली परंतु पुन्हा तसेच झाले त्या बोकडाची कातडी आता त्या धर्मोपदेशकाच्या शरीरात रुतली होती व तिथेच वाढत होती. मग त्याला पश्चाताप झाला व त्याने ते धन त्या म्हाताऱ्याला वापस केले परंतु ते बोकडाचे मास तसेच राहिले. कदाचित देवाने त्या धर्मोपदेशकाला त्याच्या लोभीपणामुळे दिलेली ती शिक्षा असावी.

तात्पर्य - दुसऱ्याच्या धनाचा लोभ धरू नये.

एक सुभाषितकार म्हणतात.

लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु सङ्कटम् ।

दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लगुडाहतिम् ।।

अर्थ - लोभी मनुष्य लोभांध झाल्यामुळे फक्त समोर दिसणारे धन पहातो. पण त्या धनाबरोबर येणारे संकट पहात नाही. जसे मांजराचे लक्ष समोर असलेल्या वाटीतल्या फक्त दुधाकडेच असते. पण जवळच असलेल्या माणसाच्या हातातील काठी मात्र ती पहात नाही. लोभामुळे माणसे काय एक करत नाही. ही संपूर्ण जीवसृष्टी स्वार्थी, संपत्तीची लोभी आहे. कारणाशिवाय कोणीही कोणाचा आवडता होत नाही. संपत्तीच्या लोभानेच मुले आईवडिलांची सेवा करतात. आणि एकदा प्रॉपर्टी नावावर झाली की आईवडिलांना वृद्धांश्रमात पाठवले जाते. आजच्या काळात काही तर अशा धक्कादायक घटना घडत आहेत की, सर्व संपत्ती विकून मुलगा विदेशात गेला. आणि आई वडिल इकडे रस्त्यावर भिक मागून जगत आहेत.  

        गरीब माणसाला आजच्या चंदेरी दुनियेचा जगमगाट हवाहवासा वाटत आहे. ती स्वप्नवत्‌ सुखे आपल्यालाही प्राप्त व्हावीत अशी उत्कट इच्छा त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होते. पण पैशांशिवाय ते शक्य नाही. आणि त्यातूनच लोभी प्रवृत्तीचा जन्म होतो. व्यवहारी जगात सुख-उपभोगाची साधने प्रायः धनसंपत्तीशी निगडित असल्याने अनेक प्रकारच्या लोभात धनलोभ मोठ्या प्रमाणावर आढळतो. मग धनसंचय करण्याकडे प्रवृत्ती असते. आणि मग ते धन मिळवण्यासाठी माणूस माणसाचा विश्वासघात करतो. आणि पुढे नरकाची द्वारे खुली होतात. दुःख पर्वताएवढे प्राप्त होते. आणि आपण मेहनतीने मिळवलेल्या धनाचा उपयोग स्वतःलाच व्हायला पाहिजे, इतरे जनासाठी माझे धन नाही अशी विकृती बळावत जाते, आपल्या संचित धनावर जास्तीत जास्त व्याज मिळावे असा लोभ उत्पन्न होतो, मग या धनाचा सदुपयोग करणे बाजूलाच राहते ! उलट ‘लाभात्‌ लोभो विवर्धते’ या उक्तीप्रमाणे जसजसा मनुष्याला द्रव्यलाभ होतो तसतसा त्याचा लोभ वाढतच जातो.

        वास्तविक आपण प्राप्त केलेल्या धनाचा भाग देवाकरता म्हणजे समाजासाठी द्यावा, दान धर्म करावा. असे शास्त्र सांगते. देवाचा भाग न देता उपभोग घेणार्‍याला भगवंतांनी गीतेत चोर असे म्हटले आहे.

दुगुने धनके लोभ मे, लोभी जाता हार ।

लाखो घटना छप रही, जिनउत्तम अखबार ।।

लोभ पाप का बाप है, कहता सब संसार ।

जिन उत्तम संतोष ले, लोभ विजय हितकार ।।

दुप्पट धन मिळविण्याच्या हव्यासापोटी मनुष्य जवळचे धनही गमावून बसतो. अशा असंख्य घटना तुम्हाला वर्तमान पत्रातून वाचावयास मिळतील. बंधुंनो! लोभ हा पापाचा बाप आहे. हे सर्व संत एकमुखाने सांगतात. म्हणून आपल्या इमानदारीने, मेहनतीने जे धन मिळते त्यातच समाधान मानावे. तेव्हाच या लोभावर विजय मिळवता येईल.

 

 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post