‘डंगवै-पुराण’
प्राचीन मराठी कवींनी या लोकारूढ कथेवर अनेक काव्ये रचिली आहेत.
‘डंगवै पुराण’ किंवा ‘डांगवीआख्यान’ या नावांच्या काव्यातून ही कथा आलेली आहे. ती पुढिलप्रमाणे :-
तपोनिधी दुर्वासा ऋषींची पंच इंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये त्यांच्या उग्र तपःश्चर्येमुळे अत्यंत त्रासून गेली. कसल्याही प्रकारचा विषय उपभोग त्यांना भोगता आला नाही. त्या चक्षु, श्रवण, रसना, घ्राण आदी इंद्रियांनी दुर्वास ऋषींना भोगेच्छा पुरविण्याची विनंती केली की, ‘‘हे ऋषिवर्या ! आम्हाला विषयसुखाचा काहीच अनुभव नाही, तरी तु आमचा आणि विषयाचा योग कर, आम्ही सर्व तुला विनंती करीत आहोत’’
दुर्वासाने ती विनंती मान्य केली. व इंद्रियांची इच्छा पुरविण्यासाठी दुर्वास ऋषी इंद्रलोकास स्वर्गात गेला. इंद्रांनी त्यांचा यथोचित आदरसत्कार केला. दुर्वाश्याने इंद्राला आपण मानस बोलून दाखवला. इंद्राने भोजनाची व्यवस्था केली त्यात विविध प्रकारच्या पदार्थांचे, पंच पक्वान्नाचे भोजन देऊन रसनेंद्रियांची तृप्ती केली. सर्व सुखासाठी इंद्राने उर्वशीचे नृत्य आयोजित केले इंद्रसभेत उर्वशीचे नृत्य सुरू असताना तिची दृष्टी दुर्वासाकडे गेली व ती विचार करू लागली की, ‘हा थेरडा दुर्वासा विषयभोगाच्या इच्छेने इथे आला, याचे रूप किती किळसवाने आहे. याच्यां भोवयांचे केस डोळ्यांवर लोंबत आहेत. याच्या काखेच्या केसांच्या जटा झालेल्या आहेत, नखाच्या चुंबळ झालेल्या आहेत. याचे पिवळसर दात, अक्राळविक्राळ दाढांमुळे हा किती भयानक दिसतो आहे, काय सांगावे या इंद्रराजाला याच्यासाठी मला इथे बोलावले, माझ्या रूपाचा पार धुराळा केला याने’ असा ती विचार करत होती ते दुर्वासा ऋषींच्या लक्षात आले, व तो रागाने संतप्त झाला व त्याने उर्वशीला शाप दिला, ‘‘तू माझ्याविषयी घृणेची कल्पना केली त्यामुळे मृत्यूलोकात जाऊन पडशील, एवढंच नव्हे तर तू दिवसा अश्विनी(घोडी) आणि रात्री अप्सरा स्त्री होशील.’’ ती शापवाणी ऐकून सर्व सभासद निराशेने जागच्या जागी खिळले, स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा आता मृत्यूलोकात जाणार म्हणून सर्वांना दुःख झाले. उर्वशीने तत्काळ दुर्वासा ऋषिंजवळ क्षमा मागितली. व उःशाप मागितला. इंद्रादि देवतांनीही ऋषिंना प्रार्थना केली. मग त्यांनी उःशाप दिली की, ‘‘साडेतीन वज्रांचे मीलन झाल्यावर किंवा श्रीकृष्ण भगवंत आणि पांडव जेव्हा एकमेकांच्या विरोधात युद्ध करतील तेव्हा तुझी मुक्तता होईल आणि तू इंद्रलोकात येशील’’ या शापा-उःशापामुळे उर्वशी अश्विनी(घोडी) होऊन भुतलावर डंग देशातील नेपाळ प्रांतात येथे आली. आणि अरण्यात इकडे तिकडे भ्रमण करू लागली. दिवस असल्यामुळे ती शापित अप्सरा घोडीच्या रूपात होती. त्याच वेळेला डंग देशाचा राजा ‘डंगवै’ शिकारीसाठी तिकडे आलेला होता. त्याचे लक्ष या अत्यंत सुंदर अशा घोडीकडे गेले. राजाला ती घोडी खुप आवडली. राजासोबत काही सैनिक होते, त्यांनी त्या घोडीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण ती पळून गेली सैनिकांच्या हाती लागली नाही. मग राजा एकटाच त्या घोडीच्या मागे निघाला. दिवस तिचा पाठलाग केल्यानंतर सायंकाळच्या वेळेला ती घोडी डंगवै राजाच्या हाती आली, तोपर्यंत राजाचे सैन्य सगळे खुप मागे राहून गेले होते. त्या घोर अरण्यात घोडी आणि राजा दोघेच होते. राजाने तिला बांधले आणि घोड्यावर बसला आणि ओढत राजवाड्याकडे निघाला. तेवढ्यात दिवस मावळला, राजाने पाहिजे घोडीच्या जागी स्वरूपसुंदर लावण्यवती स्त्री उभी आहे. राजा आश्चर्यचकीत झाला की, हा काय प्रकार आहे? हा जादुटोणा तर नाही? मग त्याने विचारले,
‘‘कोण आहेस तू? आणि अचानक स्त्री कशी झाली? तूं पिशाच्च राक्षसी तर नाहीस?’’ :
मग ती स्त्रीरूपात असलेली अप्सरा उत्तरली,
‘‘हे राजा घाबरू नकोस, मी कुणी राक्षसी, पिशाच्च वगैरे नाही, मी स्वर्गलोकीची अप्सरा आहे, माझे नाव उर्वशी आहे’’
‘‘मग तुला हे असे कसे झाले?’’
मग तिने सर्व वृत्तांत कथन केला.
‘‘मग तू यातून कशी मुक्त होशील?’’ राजाने प्रश्न केला.
त्यावर उर्वशी खुप उदास होऊन म्हणते, ‘‘मला माहीत नाही, कारण त्या ऋषिने खुप विचित्र प्रकारचा शाप दिलेला आहे, पांडवांचे आणि यादवांचे युद्ध होईल, आऊठ वज्र एकत्र येतील मग माझी मुक्तता होईल, असा उःशाप आहे, पण या सर्व अघटीत आणि अशक्य गोष्टी आहेत. पण त्या ऋषिचे बोलणे आहे, म्हणून मान्य करावेच लागेल.’’
मग राजा तिला आपल्या राजवाड्यात घेऊन आला. मग डंगवै राजा व तिचा गांधर्व पद्धतीने विवाह झाला. व राजाने तिच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. राजाने तिच्यासाठी स्वतंत्र महाल बांधला. तिथे रात्री इतरांना जाण्यास सक्त मनाई केली. ती दिवसा घोडी रूपात राहायची आणि रात्री स्त्रीरूपात. मग त्या घोडीची ख्याती तिन्ही लोकात पसरली. या अद्भूत अश्विनीची हकीगत नारदासही कळली. नारदाने डंग देशात येऊन डंगवै राजास अश्विनीची मागणी केली. राजाने नम्रपणे नकार दिला.
वारंवार म्हणत असूनही राजाकडून नकार मिळाल्यावर नारदमुनी क्रोधीत झाले व त्यांनी ‘‘मी तुझी कळी भरवशाने लावीन आणि ही घोडी तुझ्याजवळ राहू देणार नाही’’ अशी प्रतिज्ञा करून द्वारकेला आले. आणि श्रीकृष्ण भगवंतास सर्व हकीगत सांगितली, आणि म्हटले, ‘‘तुमच्या द्वारकेत सर्व अलौकिक वस्तु आहेत, स्वर्गलोकीचा पार्यातकही आहे, पण त्या ढंगवै राजाकडे जी सुंदर घोडी आहे, ती मात्र तुमच्याकडे नाही. त्यामुळे तुमचे वैभव अपूर्णच आहे.’’ हे सर्व सांगत असताना सत्यभामा तिथे होती. तिने श्रीकृष्णदेवाकडे हट्ट केला की, ‘‘ती सुंदर घोडी मला पाहिजे म्हणजे पाहिजे.’’ पूर्विच्या काळी राजस्त्रीयांना फिरण्यासाठी अशा अश्विनी असायच्या. म्हणून तिने मला अशी सुंदर घोडी पाहिजेच म्हणून हट्ट केला.
नारदाचे काम झाले. तो स्त्रीहट्ट पाहून नारदाने काढता पाय घेतला. येथे संघर्षाचे बीच रुजले. मग श्रीकृष्ण भगवंतांनी दूत पाठवून डंगवै राजाकडे अश्विनीची मागणी केली. नाहीतर युद्धास तयार राहायला सांगितले.
डंगवै राजा घाबरला साक्षात श्रीकृष्णाबरोबर संग्राम करावा लागणार व ह्यात आपला निभाव लागणारच नाही म्हणून चिंताग्रस्त झाला. त्या दुताला त्याने खोटेच सांगितले की, माझ्याकडे काई घोडी वगैरे नाहीये. पण त्या दुताने त्याला समजावले, ‘‘तु कितीक दिवस लपवून ठेवशील? कुठेही लपवशील ते ते शोधूनच काढतील. त्या पेक्षा तू ती घोडी आम्हाला देऊन दे’’ : पण राजाने पुन्हा तेच सांगितले, ‘‘मेहबानी करा आणि श्रीकृष्णदेवाला सांगा की आमच्याकडे काइ घोडी वगैरे नाही.’’
डंगवै राजा घोडी देत नाही असा वृत्तांत दूताकडून कळल्या यादवांनी डंग देशावर चढाईची तयारी केली. ती वार्ता हेरांनी डंगवै राजाला येऊन सांगितली. आणि प्रधान व ज्येष्ठ पुत्र यांवर राज्यकारभार सोपवून अश्विनीसह राजा देशाबाहेर पडला. अनेक राजांना साहाय्यार्थ येण्यासाठी डंगवै राजाने विनंती केली पण कुणीही यादवांच्या विरोधात युद्ध करायला तयार झाले नाही. मग राजा समुद्राकडे गेला, साहाय्यार्थ याचना केली. तेव्हा समुद्र ब्राम्हणाचे रूप घेऊन राजासमोर प्रकट झाला.
त्याने राजाला समजावले, ‘‘ हे राजा! स्वतः या चराचर जगाचा मालक जर तुझ्याकडे घोडी मागतोय तर देऊन टाक आणि भगवंताच्या श्रीचरणाला लागून क्षमा माग, तरच तु वाचशील. कारण श्रीकृष्णाशी युद्ध करील असा या जगात कुणीही नाही. मी जर तुला सहाय्य केले तर ते माझ्यावरही कोपतील आणि सर्व जळचरांचा संहार करतील.’’ याप्रकारे समजावून डंगवै राजाच्या साह्यास येण्याविषयीची असमर्थता समुद्राने दर्शविली.
मग डंगवै राजा वासुकीकडे गेला व साहाय्याची याचना केली. तेथेही त्यास हाच अनुभव आला व अश्विनी हरीस देण्याचा उपदेश केला. मग डंगवै राजा यम-कुबेराकडे गेला. परंतु कुबेरानेही त्यास आश्रय दिला नाही.
कुबेर म्हणाला, ‘‘श्रीकृष्ण माझा स्वामी आहे, तुला आश्रय दिला तर तो माझी सर्व संपत्ती हिरावून नेईल. म्हणून बाबा रे मी तुला आश्रय देऊ शकत नाही.’’ अशी आपली असाहाय्य स्थिती डंगवै राजास कुबेराने निवेदन केली. सर्व बाजुंनी निराश झाल्यावर डंगवै राजाने विचार केला की, कुणीच मदतीलां येत नाही त्यापेक्षा आपण असं करू चिता तयार करून या घोडीसह स्वतःला अग्नित झोकून देऊ. पण यादव घोडी हिसकावून घेऊन जातील हा अपमान मी सहन करू शकत नाही. म्हणून तो नदीच्या किणारी आत्मदहनाची तयारी करू लागला.
त्या दिवशी एकादशी होती. त्याच वेळेला श्रीकृष्ण देवाची बहीण अर्जुनाची पत्नि सुभद्रा नदी किणारी आलेली होती. ती धार्मिक विधी करत होती. तिने पाहिले की, कुणीतरी मनुष्य दिसतोय, त्याच्यासोबत एक घोडी आहे, आणि तो सरण रचतो आहे, काय प्रकार आहे हा? म्हणून तिने सेवकाला पाठवले, त्या माणसाला बोलावून आण.
राजा आला. सुभद्रेने विचारले,
‘‘हे काय करत आहेस तू?’’
‘‘विचारून काय करणार आपण?’’
‘‘काय झालंय सांग’’
डंगवै राजाने सगळी हकीकत सांगितली. ‘‘आपल्या भावजै सत्यभामेने ही घोडी पाहिजे म्हणून हट्ट घेतलाय. आम्हाला निरोप आलाय घोडी हजर करा. आम्ही या अपमानाला सहन करू शकत नाही, म्हणून आत्मदहनाची तयारी केलीये’’
सुभद्रेला वाईट वाटले, हे चुकीचे होत आहे, हा अन्याय आहे. तिने राजाला म्हटले, ‘‘राजा तू चिंता करू नकोस, तू इंद्रप्रस्थाला आश्रयाला जा, राजा युधिष्ठीराला सांग की, मला सुभद्रेने पाठवले आहे.’’ राजा गेला त्याने सर्व हकिकत धर्मराजाला सांगितली. आणि आश्रय देण्याची विनंती केली.
युधिष्ठिर राजाने नकार देत म्हटले, ‘‘हे आमच्याकडून होणार नाही. तू दुसऱ्या कोण्या राजाच्या आश्रयाला जा. आम्ही तुला आश्रय देऊ शकत नाही.’’ त्याने अर्जुनाला म्हटले, अर्जुनानेही नकार दिला. ‘‘श्रीकृष्ण आमचा सखा आहे, मित्र आहे, आणि आमचं उपास्य आहे, आम्ही त्यांना विरोध करू शकत नाही. हित यातच आहे की, सगळा मानापमान बाजुला ठेवून देवाजवळ जा आणि घोडी अर्पण कर’’
तेवढ्यात तिथे सुभद्रा आली. तिने ते सर्व ऐकले आणि भीमाला बोलावले की, ‘‘ही गोष्ट काही चांगली नाही, हा अन्याय आहे. तुम्ही क्षत्रिय आहात, राजे आहात, शरण आलेल्याचे रक्षण करणे तुमचे कर्त्तव्य आहे आणि तुम्ही क्षात्रधर्मापासून पराङ्मुख होत आहात, हे तुम्हाला शोभते का? हा राजधर्म नाहीये.’’
भीमसेनाला तिचे म्हणणे पटले, गोष्ट तर खरीच आहे. त्याने धर्मराजाला म्हटले, ‘‘तुम्ही याला मदत करा अथवा न करा मी मात्र याचे रक्षण करणार, यादवांशी मी युद्ध करीन’’ अर्जुन म्हणाला, ‘‘आपल्या मित्राशीच आपण कसे युद्ध करणार? आणि सुभद्रे! ते तर तुझे बंधू आहेत आणि तू त्यांच्याशीच युद्ध करायला सांगत आहेस?’’
सुभद्रेने अर्जुनाला समजावले. क्षात्रधर्माची पुन्हा आठवण करून दिली. आणि श्रीकृष्णांचीच धर्मरक्षणार्थ आपल्या सख्ख्या मामाचा वध केला हेही सांगितले. मग हळुहळु अर्जुनालाही पटले. त्याने मान्य केले. व द्वारकेत निरोप पोहचला की डंगवै राजा पांडवांच्या आश्रयाला गेला. व पांडवांनी आश्रय दिला आहे.
यादवांनी इंद्रप्रस्थाकडे मोर्चा वळवला. पांडव सैन्यही सज्ज झाले. अर्जुनाच्या रथावर हनुमान येऊन बसले. आणि युद्धाचे शंख वाजले आणि युद्ध सुरू झाले. श्रीकृष्ण भगवंत व अर्जुन एकमेकांशी आवेशाने युद्ध करू लागले. घमासान युद्ध सुरू झाले. पांडव काही मागे हटेनात, मग श्रीकृष्णदेवाने विचार केला की हे असे हटणार नाहीत, आता इथे सुदर्शन चक्राचाच प्रयोग करावा लागेल.
श्रीकृष्णदेवाने त्या राजावर सुदर्शन चक्र चालवले. ते पाहून भीमाने आपली गदा गोल गोल फिरवून त्या चक्राच्या दिशेने फेकली. गदा आणि चक्राचा टकराव सुरू झाली. ऋषिमुनींनी पाहिले की हे काही बरोबर होत नाहीये यामुळे संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होईल. हे दोन्ही वज्र मागे हटण्यास तयार नाही. यामुळे अग्नि उत्पन्न होईल आणि सगळे जळून भस्म होतील. त्या ऋषिंनी हनुमानाला म्हटले की, ‘‘या दोन्ही वज्रांचा टकराव तुच थांबवू शकतो. तुही एक वज्रच आहेस. तु या दोघांना वेगळे कर.’’
हनुमानाने सुक्ष्म रूप धारण केले, व चक्राच्या आणि गदेच्या मध्ये गेला. त्याने दोघांना पकडून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. परंतु हनुमंत त्या दोघांचे तेज सहन करू शकला नाही. व ते तिन्ही वज्र खाली जमिनीवर कोसळले. मग श्रीकृष्णदेवाने भीमाला आज्ञा केली की ‘‘तू या तिन्ही वज्रांना वेगळे कर’’
‘‘मी तिथे गेलो तर जळून भस्म होईन’’ भीम म्हणाला.
श्रीकृष्ण देव म्हणाले. ‘‘तु अर्धा वज्र आहेस, म्हणून तुला काहीच होणार नाही, हे तत्काळ वेगळे कर नाहीतर ही भुमी नष्ट होईल.’’
भीम गेला व ते तिन्ही वज्र वेगळे केले. अशाप्रकारे आऊठ वज्र एकत्र येऊन उर्वशी शापमुक्त झाली. आकाशमार्गे स्वर्गात जायला निघाली. सगळे आवासून पाहत राहिले. पांडवांनी आणि डंगवै राजाने श्रीकृष्णदेवाजवळ येऊन क्षमा मागितली.
श्रीकृष्णदेवाने सर्व मेलेल्या सैन्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि सर्व सैन्य पुन्हा जिवंत झाले. आणि सगळे आनंदीत होऊन आपापल्या राज्यात निघून गेले.