विरक्तांची कसवटी विदुषी तपस्विनी हिराइसा
‘धर्मसंस्थापनार्थाय:’ अवतरलेल्या परमेश्वर सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या अभिनव तत्वज्ञानामुळे समतेच्या उच्च मूल्यांवर आधारलेली एक नवीन वर्ण-विरहीत अशी समाजरचना साकारू लागली.
‘स्त्रीयो वैश्यास्तथा क्षुद्रास्तेऽपि यान्ति पराम् गतिम्। या ब्रम्हविद्या तत्त्वज्ञानाने स्त्री पुरूष समतेचा पुरस्कार केला. स्मार्त आणि श्रोत काळात धर्माच्या नावाखाली तथाकथित धर्म मार्तंडांनी 'स्त्री अनृता' ‘अभंगा' ‘स्त्री स्वातंत्र्यम् न अर्हति‘ अशी बन्धने घालून, दुषणे देऊन स्त्री जातीचा घोर अपमान केला होता. स्त्री-शूद्रांना संन्यास दीक्षेचे अधिकार देऊन सर्वज्ञांनी सर्वांगीण समतेचे एक नवे दैदिप्यमान युग प्रवर्तित केले.
जीवोद्धाराचं कार्य सर्वज्ञांनी प्रकटरित्या आरंभलं. श्रीकृष्णभगवंतांनी स्थापिलेला धर्म चार हजार वर्षांनी लोपला. तो लोपलेला सत्य सनातन धर्म पुन्हा संस्थापि केला. सत्त्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णुता, सदाचार व नैष्ठिक वैराग्य अशा शुद्ध सत्वशील तत्व-मूल्यांवर आधारलेला हा प्रतिती पंथ देव उत्तरापथाकडे गेल्यानंतर अधिक प्रसर पावला. सर्वज्ञांच्या उत्तरापथें गमनानंतर श्रीभट्टोबास नागदेवाचार्यांच्या विशाल गरूकूलातील तपस्विनींनी सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी प्रणीत ज्ञानयज्ञ कार्याच्या कक्षा अधिक विस्तृत केल्या. महदाइसा, हिराईसा.
साकाइसा, उमाइसा, नागाइसा, गौराइसा, कमळाइसा अशा अनेक तपस्विनी, विदूषी, कवयित्री त्या नवयुगनिर्मितीच्या 'धुरा' बनल्या. त्यांत नाति नागाइसांनी न भुतो न भविष्यति असे वैराग्य करून समग्र पुरुष जातीलाच जणु खाली मान घालावयास भाग पाडले.
श्रीनागदेवाचार्यांच्या पाचशते शिष्यांमध्ये हिराइसा ह्या त्याच तेजस्वी प्रभावळीतील अंक दैदिप्यमान, अनमोल असं रत्न. उच्च पराकोटीचे वैराग्य, श्रीचक्रधराप्रभुंच्या अस्तेय आचार धर्मावर अचल निष्ठा, संग्राहकता, विद्वत्ता या वैशिष्ट्यांमुळे श्रीनागदेवाचार्यांच्या विशाल गुरूकुलात ही तपस्विनी सर्वांच्या श्रद्धा आदराला पात्र झाली.
पूर्वाश्रमी असता पंडित श्रीदामोदरव्यास ह्या प्रतिभासंपन्न महाकवी व व्युत्पन्न पंडिताची ही धर्मपत्नी होत्या. ह्या विद्वान दंपत्तीकडे श्रीनागदेवाचार्यांचे अधुनमधुन जाणं होत असे. श्रीपंडितव्यास जिज्ञासू व तत्त्वचिंतक विद्वान होते. चर्चा जिज्ञासेतून उभय पतिपत्नीस परब्रम्ह परमेश्वराच्या ब्रम्हविद्या शास्त्राचं श्रवण झालं. ते देखील श्रीभट्टोबासांसारख्या ईश्वराधिष्ठित अधिकरणाकडून. त्यामुळे मुमुक्षु हिराइसांची वितराग भावना दृढावली. संसारात राहूनही ही साध्वी वासनिकाचा संयमशील आचारधर्म आचरू लागली. प्रापंचिक कर्मे केवळ कर्तव्य भावनेने परंतु सर्वस्वी ‘पद्मपत्रमिवाम्भसा’ वत् अलिप्ततेने करू लागली, गृहस्थाश्रमात असतांनाच विरक्तीत परिणत होणारी धर्मनिष्ठा दृढावली.
भ्रमत भ्रमत एकदा श्रीनागदेवाचार्य भेटीसाठी हिराईसांकडे आले. प्रत्यक्ष परमेश्वर आल्यासम ती बोधवती मनोमनी आनंदली. तिने आचार्यांचे यथोचित आदरातिथ्य केले. मात्र त्यावेळी हिराईसांची कन्या अत्यवस्थ होती. अभ्यागतांना पाने वाढली आणि दुर्दैवाने त्याचवेळी ती कन्या हा ईहलोक सोडून गेली. परंतु हिराइसांनी ते कुणाला कळूही दिले नाही. प्रेत तसेच वस्त्रात गुंडाळून ठेवले. भावनाच जणु आच्छादून टाकली ! आणि प्राप्तःकर्तव्य (धर्मबुद्धीने) आचरू लागली. भटोबासांनी हिराईसांना देखील आपल्याच पंक्तीस बसववून घेतले. हिराईसांच्या अंतर्मनात एक विलक्षण द्वंद्व पेटलं होतं. सांसारिक हिराइसाच्या मातृहृदयातील वात्सल्य मूक रुदन करीत होतं, तर मुमुक्षवासनिक हिराईसांचं धर्मदृढ मन आत्यंतिक श्रेयाकडे नेणाऱ्या धर्माचरणाच्या आड ती अविद्यात्मक मोहवशात येवू द्यायला निर्धारपूर्वक नाकारत होतं. मोह आणि मुमुक्षा, वासना आणि वासनिक धर्मश्रद्धा यांच्या संघर्षात शेवटी धर्मनिष्ठ हिराईसांची जाणीवपूर्वक अभ्यासलेली, जोपासलेली धर्म-बुद्धीच प्रबल, श्रेष्ठ ठरली. त्यांनी नश्वर माया ममता आपल्या शाश्वत ईष्टांच्या आड येवू दिली नाही. दृढतापूर्वक निग्रहपूर्वक त्यांनी धर्मकर्तव्य पार पाडलं. सर्वांची भोजने आटोपल्यावर मात्र -
‘‘आत्तांतर होती वोऽऽऽ’’
म्हणून हिराईसांनी हंबरडा फोडला. पण तेही लोक संग्रहानेच रुदन केलं.
अनुसरणांत, विरक्तीत परिणत होणारं वासनिक धर्माचं असं दृढतापूर्ण पालन सर्वसामान्य स्त्रीमनाला अशक्यच. गृहस्थाश्रमात देखील हिराईसांच्या मनात वैराग्यबुद्धी अशी सतत जागत असायची.
हिराईसांच्या वितराग जीवनाचा, अनुसरणाचा शुभारंभ देखील असाच आगळा वेगळा आहे. वैराग्याचा नवा आदर्श निमिणारा वैशिष्ट्यपूर्ण. एकदा त्यांनी निश्चयपूर्वक आपल्या पतीला सांगून टाकलं.
‘‘पंडितो! तुम्ही संन्यास घ्या : किंवा मला घेऊ द्या’’
पंडितव्यासांना मात्र पितृऋणातून मुक्त झाल्याशिवाय संन्यास घेणं हे निहीत कर्तव्यापासून पराङ्गमुख होण्यासारखं वाटलं. त्यांच्या अंतरीही धर्म, श्रद्धा-मुमुक्षा आणि प्रापंचिक ऋणानुबंधात्मक जबाबदारी यांचा संघर्ष पेटला. आपल्या संन्यास ग्रहणाबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘‘मी पुत्राचा विवाहो करीन मग भिक्षा करीन’’
परंतु पत्नीच्या ईष्टाआड येणं त्या सूज्ञास रूचलं नाही. तो त्यांना अधर्मच वाटला. म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला सर्वसंगपरित्याग करण्याची अनुमती दिली.
‘‘तुम्ही भिक्षा करा’’
आपल्यासाठी आपल्या पत्नीच्या पारमार्थिक कल्याणास विलंब होऊ नये म्हणून अनुज्ञाही देवून टाकली.
‘‘तुम्ही जा ! गुरूकुळात जावून आचार्याकडून दीक्षा घेवून घ्या. कशाला विलंब करता माझ्यासाठी?’’
त्यानंतर लगेचच हिराईसांनी निंब्याला गुरुकुळात येऊन श्रीनागदेवाचार्याकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली व गुरुकुळात राहून शास्त्राभ्यासासोबत ब्रम्हविद्येच्या आचार धर्माचं निष्ठापूर्वक पालन करू लागल्या.
पुढे काही दिवसांनंतर मुलाचा विवाह करून दिल्यावर देखील पंडितव्यास प्रपंचातून विरक्तीकडे वळले नाहीत तेव्हा हिराईसांनीच त्यांच्याकडे निरोप पाठविला.
‘‘जे पंडिताते ऐसे म्हणावे : जिये चुलीची खीर खादली : आता तिये चुलीची काई राख खाल?’’
संसार सुखाचा मनःपुत उपभोग घेतलात. आत्ता तिथेच कशासाठी रमला आहात? अनिष्ठासाठीच ना? संन्यास धर्मासाठी विहीत वयोमर्यादा अतिक्रमून जाईल मग याल का? आता प्रपंचाचा मोह आवरा म्हणावं. आता तो मोह म्हणजे अनहित.
निरोप सांगणाऱ्यानेही अक्षरशः जसाचा तसाच पंडितव्यासांना सांगितला.
‘‘‘जे हिराईसे असे म्हणीतले की, जिये चुलीची खीर खादली, तिये चुलीची काई राख खाल ?’’
पंडितव्यासाना देखील हिराईसांबद्दल श्रद्धा आदर होताच त्यांनी पाठविलेल्या निरोपात त्यांना आपल्या अध्यात्मिक हिताची हिराईसांना लागलेली तळमळ स्पष्टपणे जाणवली. या जाणीवेमुळे हिराईसांबद्दलची त्यांची श्रद्धा अधिकच उंचावली.
‘‘आता कोपली : आता निगावे लागेल’’
त्या संदेशातून व्यक्त झालेल्या सात्त्विक क्षुब्धतेची पंडितव्यासांनाही आदरयुक्त भीती वाटली. ती धर्माज्ञा मानून ते श्रीनागदेवाचार्याच्या गुरुकुलात समाविष्ट होण्यासाठी तत्क्षणीच बाहेर पडले. हिराईसांचे अनुकरण करण्यासाठी, धर्माचे अनुसरण करण्यासाठी.
ते निंब्याला आले तेव्हा श्रीभटोबास स्वतः गुरुकुळासह त्यांना सामोरे आले. भेट झाली. आचार्यांनी त्यांना जवळ बसवले, पंगती भोजने झाली. व त्याच दिवशी दुपारी, तिसऱ्या प्रहरी पंडितव्यासांनी श्रीनागदेवाचार्यांकडून संन्यास घेतला व ते त्या विशाल पाचशे गुरुकुळात समाविष्ट झाले. आता उभयतांचं श्रीगुरुसान्निध्यातच वास्तव्य होते परंतु वेगळ्या नात्याने, वेगळ्या वृत्तीने, संन्यास ग्रहणाच्या क्षणीच पूर्वाश्रमीचं पतिपत्नीचं नातं संपुष्टात आलं होतं. आता त्यांनी गुरु बंधु भगिनी अशा वृत्तीने वितराग धारण केला होता. धर्मनात्यात परावर्तित झाले होते. आपल्या कडकडीत वैराग्याचरणाने त्यांनी श्रीचक्रधर निरूपित अस्तेय आचार धर्माचं जणु प्रात्यक्षिकच पाचशे गुरुकुळाला सादर केलं होतं. विकार विकल्प शून्यतेचा एक जाज्वल्य आदर्श निर्धारून दिला होता.
सर्वज्ञांच्या श्रीमुखातून उद्गत झालेल्या अमर तत्वमूल्यांचं सतत चिंतन मनन करणारे पंडितव्यास श्रीकेशराजव्यासांसोबत शास्त्रचर्चेत सतत रत असत. ते स्वत:तर आचारधर्माचं निरपवाद पालन करीतच करीत सोबत अन्य मुमुक्षांच्या आचार विचारावर देखील जागरूकतेने लक्ष ठेवीत. सूक्ष्म सात्विक दृष्टीने त्यांच्या ‘उठ बसी’च निरिक्षण करीत असत. अशा डोळस दक्षतेमुळेच श्रीकेशराजव्यासांना व पंडितव्यासांना ‘‘तुम्ही माझे डोळे किं गा.’’ असं श्रीनागदेवाचार्य गौरवीत असत.
कोणी एक स्त्री पुरुष आचार्यांकडे संन्यास घेण्यासाठी आले. आचार्यांनी त्यांना संन्यास दिला. पण त्यांची वर्तणूक संन्यासधर्मानुरूप नव्हति. पंडितबासांनी व केशराजबासांनी आचार्यांकडे तक्रार केली, ‘‘भटो! यांना बाहेर काढा’’ : हे इथे राहण्याच्या पात्रतेचे नाही. एकमेकाते देखोनि सुरंग मिरविती : घोळीती :’’ : आचार्यांनी ते ऐकले पण कधीतरी गुणावर येतील म्हणून त्याना ‘जा’ असे म्हणाले नाही. दोन-तीन दिवसांनी पुन्हा त्यांनी आचार्यांना म्हटले. ‘‘भटो! यांना काढा, नाहीतर आम्ही सर्व जातो’’ : आणि निघालेही : ५०० गुरुकुळ असल्यामुळे आचार्यांना त्यांचे सुरंग घोळवणे मिरवणे लक्षात येत नव्हते. पण सर्व गेल्यानंतर आचार्यांच्या लक्षात आले व आचार्यांनी त्यांना तिथून जायला सांगितले. ते गेले. असे श्रृंगारिक चाळे करणाऱ्या विलक्षण उठीबसीच्या विकारवंत दंपत्तीस त्यांनी दवडायला लावलं. घालवून दिलं. गेले दोघे गेले असं कळल्यावर सर्व शिष्यगण पुन्हा आचार्यांजवळ आले. व सर्वांनी क्षमा मागितली. तेव्हा आचार्य म्हणतात, ‘‘ पंडिता केशवदेया तुम्ही माझे डोळे किं गा. सर्वांगाला काइ देखणे असते का? देखणे ते डोळ्यांनाच असते’’
अशा विद्वान तपस्यास डोळस श्रद्धावंतास संन्यास ग्रहणासाठी उद्युक्त करण्याचं श्रेय हिराईसांचं. त्यांनी कोपून निकराचा निरोप धाडला म्हणूनच त्यांना लवकरच सर्वसंगपरित्याग घडला.
वचनरूप परमेश्वराचं तन्मयतेने सेवा दास्य करणऱ्या त्या वितरागिनीचं तपाचरण असं नैष्ठिक अन् निरपवाद होतं की निवृत्तीचा तो निकषच ठरला होता. परंतु केवळ स्वतःपुरतं आत्यंतिक वैराग्य एवढीच त्या तपस्विनीची थोरवी नव्हती तर, गुरुकुळातील अनुसरलेल्या बंधु-भगिनींच्या आचारात जराही कुठे वैगुण्य आढळलं तर ते त्यांच्या निवृत्ती-निष्ठेस मानवत नसे. असल्या एखाद्या ‘भलतिये क्रियेस’ ती आचारनिष्ठ बोधवती ‘थोर कसकस’ करी, चुकले त्यांना चुकीबद्दल समजावून सांगून तिथल्या तिथेच आचार वचनांचं निरुपण करीत असत हिराइसा.
एकदा त्या तपोनिधीने निषेधाचारणाच्या विळख्यातून प्रत्यक्ष पंडितव्यासांना देखील वाचविलं होतं. तसा शास्त्रामध्ये पंडितांचा अधिकार मोठा, त्यांच्याशी चर्चा केल्यावर आचार्यांचंही स्वतःचं शास्त्र उजळावं असा त्यातून दक्ष अविचल आचार निष्ठा. कडकडीत वैराग्य पालन. त्यामुळे जिज्ञासु अभ्यासू शास्त्रचर्चेसाठी, शंका समाधानासाठी मोठ्या श्रद्धेने त्यांच्याकडे जात, असंच एकदा हिराइसाही त्यांच्याकडे गेल्या पंडितव्यास ज्या चौघडी आसनावर बसले होते, त्या वस्त्राचीच चौघडी मोडून त्यांनी पसरली आणि हिराइसांना श्रद्धेने विनवलं.
‘‘बैसा’’
परंतु आचार धर्माचं अत्यंत सूक्ष्म जाणिवेने व अत्यंतिक निष्ठेने परिपालन करणाऱ्या हिराइसांनी तशा आसनावर बसण्यास स्पष्टपणे नाकारलं.
‘‘तुम्ही बैसा : कां मज बसो देयाः’’ (तुम्हीच बसा किंवा मला बसू द्या)
अनावधानाने म्हणा कां हिराइसांबद्दलच्या आदरामुळे म्हणा पंडितांसारख्या थोर तत्वज्ञ चर्यावंताला देखील. विधि-निषेधाचं भान न राहून त्यांनी दाक्षिण्यपूर्वक त्या तपस्विनीस आपल्याच आसनावर बसण्याची विनंती केली होती तो केवळ शिष्टाचार मात्र होता. विकाराचा त्यात लवलेशही नव्हता. हे सारं खरं तरी देखील अशा बोध चिंतनशील, दक्ष, ज्ञानियाला सूत्र-वचनांचं त्यातील विधी-निषेधाचं क्षणमात्रही विस्मरण होणे अनपेक्षितच, निषेधाचरण क्षुल्लकसं देखील अशा आचरत्या बोधवंतासाठी मरणप्रायच, परंतु त्या प्रबोधिनीने पंडितांच्या ज्ञान स्फुल्लंगावरील राख त्या नकाराच्या फुंकरीने उडविताच तो पुन्हा प्रज्वलीत झाला अन् पंडितव्यासांना ‘आपण अनावधानतेने केवढे अनिष्ट जोडणार होतो’ याची जाणीव झाली. या चर्यावंत बोधवतीनेच आपलं अनिष्ट टाळलं या जाणिवेमुळे हिराइसांबद्दलच्या कृतज्ञतेने पंडितव्यास भारावून गेले. त्याचवेळी त्या तपास्विनीच्या पुढाकारानेच आपणास अनुसरण घडलं यांची देखील त्यांना आठवण झाली. आणि पंडितव्यास ताडकन त्या आसनावरून उठून अभे राहिले. श्रद्धा-विनयाने त्या थोर तपस्विनीस त्यांनी विनवलं.
‘‘या आई! तुम्हीचीचि बैसा’’
म्हणूनच श्रीनागदेवाचार्य या श्रद्धेय तपोनिधीबद्दल हिराइसे विरक्ताची कसवटी गा : इचां कसी उतरला तो खरा विरक्त : " असे यथार्थ गौरवोद्गार काढीत असत. जसं सोन्याचे खरेपणे कसवटी नावाच्या पाषाणाने तपासले जाते, तसं विरक्तीचे प्रमाणपत्र हिराइसाकडून घेतले तरच तो खरा विरक्त ठरेल.
गुरुसान्निध्याचं भाग्य संपुष्टात येण्याचे दैव ओढवलं. श्रीनागदेवार्यांना ताप आला. तीन दिवस झाले. आचार्यानीं सर्वज्ञाच्या अमृतस्त्राविणी अमोघ लीळांचं मनन करून ज्वरनिवृत्ति तर केली परंतु त्यांचा देहावसानकाळ समीप ठाकल्याची दुःखद जाणीव अवघ्या गुरुकुळाला झांकोळून गेली. एरव्ही मनोविकारांवर अभ्यासपूर्ण असं प्रभावी नियंत्रण ठेवणाऱ्या हिराइसांचं मन देखील एका चिंतेने ग्रासलं गेलं. स्पष्ट दिसणाऱ्या गुरुवियोगाच्या विव्हलते मधूनच निराधारतेची जाणीव त्या दृढमानस वितरागिनीच्याही मनाला स्पर्शून गेली. न रहावून त्यांनी शेवटी आचार्याना विचारलंच.
‘‘भटो मज कवणसी निरोविले?’’ (मला कोणाच्या सांभाळी घातले?)
आचार्यानी थोडावेळ विचार केला. अन् पंडितव्यासांना जवळ बोलावून त्यांना आग्रहाने म्हटलं.
‘‘पंडितो मी मागेन ते द्यावे’’
आचार्य अवघ्या गुरुकुलाचं भज्यपूज्य असं श्रद्धास्थान धर्मसिद्धीसाठी सर्वज्ञांनी अवघ्यांना ज्यांच्याकडे निरोविलं असं छत्र धर्माश्रय त्या पृच्छेतून त्यांच्या देहावसानकाळाच्या कल्पनेने - जाणिवेने त्या ज्ञानी व्यक्त होणाऱ्या पंडिताचं हृदय हेलावून गेलं. गहिवरल्या अंतःकरणानेच त्यांनी होकार दिला -
‘‘हो भटो, आज्ञा करा’’
त्या होकाराने संतुष्ट होवून आचार्य त्यांना म्हणाले ‘‘हो कां? तुज देहपर्यंत हिराइसाची निरोवण आहे हो :' अंतिम गुरु आज्ञा पंडितव्यासांनीही शिरोधार्य मानून स्वीकारली. आता पुन्हा वेगळं नातं, गुरुशिष्यासम. आगळी जबाबदारी धर्म सिद्धीची, धर्मरक्षणाचोची आणि ती देखील देहपर्यंत.
पंडितव्यासांनी तें उत्तरदायित्व मोठ्या जाणिवेने सांभाळली. दक्षतेने जोपासली. अटन विधीला निघतांना देखील ते आधी हिराइसांना विचारीत.
एकदा श्रीकवीश्वरबासांनी त्यांना विनविलं.
‘‘पंडितो! चला अटणाला जाऊया’’
गुरुआज्ञेने सोपविलेल्या हिराइसांच्या निरोवणाची सतत जागृती जाणीव बाळगणारे पंडितव्यास त्यांना म्हणाले -
‘‘हिराइसाते पुसा ’’
कवीश्वरबासांपी हिराइसांने विचारले.
हिराइसांनी ‘‘जा’’ अशी अनुमती दिल्यावरच ते दोघे अटण विधीसाठी निघाले.
आपल्या गगुरुवर्याप्रमाणेच पंडितव्यासांना देखील आपल्या देहावसानाची चाहुल अगोदरच लागली, आणि त्यांनी मनोमनी निश्चय केला आता आम्हास गंगातिराला वास्तव्य बोलिले नाही. म्हणन ते बुद्धी पुरस्करच लांब लांजी वैरागडकडे निघून गेले आणि तिथेच त्यांनी आपले देह क्षेपले. पंडितव्यासांच्या ह्या अंतीम प्रयत्नशीलतेमधील वैराग्यपूर्णतेची हिराइसांनी प्रशंसाच केली.
‘‘भले केले पंडिती मरो जाणितले : देहांती मज वेगळे जाले :’’ अंतीही पंडितव्यास हिराइसाच्या विरक्तांच्या कसवटीस उतरलेच !
पुढेत्यांचा पुत्रही अनुसरला. त्याला हिराइसांनी धर्मोपदेश करून अत्यंत दृढ केले. त्यानेही असतिपरी आचरून देह शुष्क केले. व हिराइसांदेखतच त्याचे देहावसान झाले. तेव्हा हिराइसा म्हणाल्या, ‘‘आता मी निश्चित झाली, आता धायेवरी निजैन’’
अशी महान तपस्विनी विदुषी आपल्या महानुभाव पंथात होऊन गेल्या. त्यांचे नुसते चरित्र वाचले तरीदेखिल आपल्या पापांचे क्षाळण होते.