कथा - पारमार्थिक युद्धकथा (रूपकात्मक)
योगी पुरुषांचे मना इंद्रियांशी चाललेल्या युद्धाचे वर्णन
प्रवृत्ति व निवृत्ति-पुत्रांचें घोर रणकंदन
(लेखक-श्रीगोपालमुनि गुरु लखापति महंत कवीश्वर)
एकदा प्रवृत्तिपुत्र मोहराजा, काम, क्रोध, मद, मत्सरादि आपल्या बांधवांसह सभास्थानी बसला असता, त्यांनी निवृत्ति-पुत्र जे बोधराज व वेध, ज्ञान, भाव, वैराग्यादि यांचा पाडाव करण्यासंबंधी विचार केला. पण तेथे गुप्तपणे वावरणाच्या निवृत्ति-दूतांनी ते ऐकून लगेच बोधराजाच्या सभेत येऊन सर्व वार्ता निवेदन केली. त्यांनी सांगितलें
"बोधराजाला निर्गुणाने राजप्रतिष्ठा अर्पण केली ही वार्ता ऐकून प्रवृत्तिपुत्रांनी आपले सुहृद् बोलावून आपला पाडाव करण्याचे योजलें आहे. अहंकारादि हे मूळचेच गर्वाचे मूर्तिमंत पुतळे; त्यांत त्यांनी प्रपंचाचे बळ स्वीकारल्यामुळे ते कुणाचीच भीड धरतील असे वाटत नाही."
राजदूतांचे हे शब्द ऐकून बोधराजा व सर्भेतील सर्व निवृत्तिपुत्र चिंताक्रांत झाले. त्यावेळी निवृत्ति म्हणाली- तुम्ही सर्व शांत रहा. मी त्या अज्ञानाचा क्षणार्धात संहार करीन. माझे नयनास्त्रासमोर कोण जगू शकेल बरे?"
भाव म्हणाला- ‘‘बंधूंनो! माझी एक विनंति ऐका. त्या बापुड्यांमध्ये मी माझ्या भोळ्या शक्तीची प्रेरणा करून सर्वांना भोळे करून टाकीन, मग ते काय करतील?’’
लगेच वैराग्यहि अत्यंत क्रोधान्वित होऊन म्हणाले- ‘‘मी सर्वांना निराहारी करून एकटाच सर्वांचे निर्दालन करतो. ती प्रवृत्तीची पोरं माझ्यापुढ काय टिकू शकतील ? ’’
- अशाप्रकारे प्रत्येक जणच आपल्या पुरुषार्थाचे वर्णन करूं लागल्याचे पाहून, भारवि कवीने म्हटल्याप्रमाणे
सहसा विदधीत न क्रियामविवेक परमापदा पदम् । अर्थात् एकदम अविचाराने कोणतेहि काम करूं नये, ही गोष्ट जाणून निवृत्ति बोधराजाला म्हणाली-" प्रथम शिष्टाई करण्याकरिता चांगल्या बुद्धिमन्ताला पाठवून सामोपचारानेच हा प्रश्न मिटवून पाहूया. जर त्यांनी तें ऐकले नाही तर मग दंडण करावेंच लागेल. पण शिष्टाई करण्याकरिता पाठवायचे तरी कुणाला ?"
निवृत्ति विचारांत पडली. तिला प्रत्येक जण एकेका गुणाने श्रेष्ठच आहे असे दिसून आले. पण अंतर्मुख दृष्टीने विचार केल्यावर 'विवेकापेक्षा कोणीहि श्रेष्ठतर नाही व तोच खरे नीतिविचार मांडूं शकतो' असा तिचा निर्धार झाला. लगेच तिने विवेकाला आज्ञा केली की, "हे विवेका! ताबडतोब तूं मोहाच्या सभेत शिष्टाई करण्यासाठी जा."
ज्ञान म्हणाले. - "विवेका! त्यांना सांग की, एकतर राज्य द्या किंवा युद्धाला तयार व्हा ! या दोन्हीतून एक निश्चित निर्णय घेऊनच तूं ये."
मग विवेकाने ज्ञानाची आज्ञा घेऊन व बोधराजाला नमस्कार करून स्थिरगतीने मोहसभेकडे गमन केले. इतरांशी बोलण्याच्या भरीस न पडता त्याने एकदम मोहासच गाठले. आपल्या बंधूस पाहून मोहाने फार सन्मान केला व ‘‘या या, कुणीकडे आलांत?’’ म्हणून विचारणा केली. अहंकार मात्र गर्वाने उन्मत्त झाल्यामुळे आपल्याच ताठ्यांत राहिला. तो काहीच बोलला नाही.
विवेक रसाळ वाणीने मोहास म्हणाला - ‘‘तुम्ही-आम्ही सापत्न बंधु. तेव्हा आपसांत वितुष्ट येऊ नये म्हणून बोधराजाने शिष्टाई करण्याकरिता मला पाठविलें. मनराजाची पहिली पत्नी निवृत्ति असल्याने, तिच्या बोध नामक ज्येष्ठ पुत्राला राज्य द्यावे हीच राजनीति व शास्त्रनीति आहे.’’
स्वार्थावरच आघात झाल्याने मोहाचा तोल सुटला. तो चिडून गेला आणि आपल्या प्रधानास म्हणाला- ‘‘अहो, हा पहा माझा सापत्न बंधु. वास्तविक आवडत्या राणीची मुले तीच श्रेष्ठ मुले ठरायला हवी. त्यांनाच खरा राज्याचा अधिकार! शिवाय ज्याच्या अंगी कर्तबगारी तोच थोर. मीच तर तिन्ही लोकांचा राजा मोह. या तिन्ही लोकांत सर्वत्र माझी सत्ता गाजत आहे आणि म्हणे आम्हांला राज्याधिकार नाही! यांच्या सारख्या भेकड पामरांनी मला हे शिकवावं काय ?’’
अहंकार तर अत्यंत कोपायमान झाला होता. तो म्हणाला"कोणाची ताकद आहे आमच्या पासून राज्य घेण्याची? या दुष्ट विवेकाला चांगलें पिटून इथून हाकून लावा.’’
हे अहंकाराचे अत्यंत बोचक शब्द ऐकून विवेक म्हणाला ‘‘मोहराज ! काम-क्रोध-अहंकारादि तुझे बंधु अत्यंत अविचारी आणि महान् दुष्ट आहेत. यांच्या म्हणण्याप्रमाणे तूं वागशील तर स्वतःची फजीती करून घेशील. युद्धाचा अभिमान तूं बाळगू नकोस. आशा, तृष्णादि अष्ट भगिनींची रणरवंदळ झाली म्हणजे तुझे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत. ज्ञान व बैराग्याचे तीव्र बाण जेव्हा सुटतील तेव्हा तुमचे सर्व कार्य शून्यवत् होईल, लक्षात ठेवा !’’
मोहाने चवताळून उत्तर दिले - ‘‘विवेका! फार बाळू नकोस. ताकद असली तर रणभूमीवर ती दाखव, जा नीघ इथून.’’
हे ऐकून विवेक चदिशी उठला व आपल्या बंधुवर्गात परत आला.
विवेकाने ज्ञानास सुचविले की- ‘‘ते महान् आसुरी बुद्धीचे आहेत. त्यांना शिक्षा लावल्यावाचून आपले हाती राज्य येणार नाही.’’
विवेकाचे हे भाषण सास पटले, मग बोधराजाने सर्व वीरांना पाचारून दळभार सज्ज केला. परमार्थाला सेनापति करून दूतांना मोहराजास युद्धाची सूचना देण्यासाठी रवाना केलें. मोहाचे दरबासंत दूतांनी युद्धाचे निमंत्रण देतांच सर्वांचे पित्त खवळले. लगेच मोहाने प्रपंचाला सेनापतिपद देऊन आपलें सैन्य रणमैदानावर आणले. निवृत्तीच्या पुत्रांनी देखील आपल्या सैन्यासह रणक्षेत्रावर पाऊल ठेवले.
दोन्ही सैन्य रणभेरींच्या तुमुल नादांत परस्परांना भिडली. काम वैराग्याशी, क्रोध विचाराशी आणि दंभ, मद, मत्सर व भ्रम हे चौघे विवेकाशी युद्ध करूं लागले. तसेंच, प्रपंच परमार्थाशी, लोभ त्यागाच्या आनंदाशी व अहंकार हे ज्ञानाशी आणि स्वतः बोधराजा मोहराजाशी आपल्या आयुधानिशी लढू लागले.
वैराग्याने कामाच्या अंगावर पहिला वार करतांच तो खवळून ओरडला-- ‘‘अरे दुष्ट वैरागड्या ! स्वत:च्या रुक्ष वृत्तीने साऱ्या जगातल्या सौंदर्याचा अपमान करण्याचा तूं मक्ता घेतला आहेस. फुलांचा सुगंध येण्याऐवजी त्याच्या मुळाशी घातलेल्या सोनखताचा दुर्गंध तुला जाणवतो नि त्याच्या चुरगळलेच्या पाकळ्यांचं शेवटचं स्वरूप तुला आठवू लागते, असा तूं दळभद्र कपाळकरंटा आहेस. पण तुझ्या नादी लागलेल्यांची आजवर मी कशी भंबेरी उडविली ते लक्षात आण. याच कामाने चंद्राला कलंक लावला, इंद्राला भगं पाडली, विश्वामित्राला उर्वशीच्या समागमें भुलविले नि नारदाची नारदी केली. माझा हा प्रताप पाहून तिन्ही लोक चळचळा कापतात हे तुला माहित नाही का ?" वैराग्य हसून कामाला म्हणाले - अरे निर्लज्ज पिसाटा कामा ! स्वतःचा बडेजाव सांगण्याच्या नावाखाली तूं जी स्वतःची दुष्ट कृत्ये सांगत सुटलास त्याची थोडी तरी लाज धर. कृतयुगात सनकादिक, त्रेतायुगात यदुराजा, द्वापारयुगात अर्जुन, कलियुगात श्रीनागदेवाचार्य, केशराजबासादिक महान ज्ञानिये आणि साम्प्रत प.म.श्रीअंकुळनेकर बाबा(जाधववाडी) यांच्या पायाखाली तूं गडबडा लोळत असता चेंगरला जात होतास हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. अरे दुष्टा! श्रीकृष्णभगवंतांचं सौंदर्य पाहून तू बेशुद्ध पडला होतास, कैलासीच्या हरानं एकदा तुला चांगलं भाजून काढलं, त्याचीहि आठवण तूं विसरलास काय ! तूं कितीहि बढाया मारल्यास तरी मी आता तुला मोकळा सोडायचा नाही, लक्षात ठेव !"
वैराग्याचे हे अत्यंत तीव्र शब्द ऐकून कामास अनिवार क्रोध चढला व त्याने पंचबाण सोडले. त्या कामबाणांनी सर्व बोधसैन्याला तर वेढा घातलाच पण तिन्ही लोकांना सुद्धा व्यापून टाकले. त्यामुळे घाबरून जाऊन कित्येक तर पर्वताच्या गुहेमध्ये दडून बसले. सर्व बोधसैन्यांत असा हाहाकार उडाला की, कामबाणांनी तिन्ही लोक जर्जर झाले आहेत, तेव्हा आता बोधसेनेचा पाड कसा लागणार ! हे पाहून वैराग्य हट्टास पेटले आणि त्याने अघोर शरसंधान योजलें. परंतु कामबाण अंगांत घुसल्याने त्याला एकदम मुर्छी येऊ लागली. हे पाहताच विचार धावून आला व त्याने वैराग्याला थोपटून सावधान केलें. वैराग्याने विचाराच्या सहाय्याने गर्जना केली की, ‘‘अरे दुष्ट कामा ! हुशार रहा. माझे दिव्य विरक्तिबाण तुझा कंठनाळ छेदण्यासाठी येत आहेत.’’
वैराग्याने खरोखरच विरक्तिशक्तीचे बाण कामावर सोडले व कडकडाट करीतच ते निघाले. त्यांनी कामाचे सर्वांग भेदून टाकल्यामुळे काम मुर्छित होऊन जमीनीवर पडला. त्याचे मायावी कामशर अदृश्य होऊन गेले व वैराग्याने केश धरून त्याला करकचून बांधून टाकले.
आपला बंधु काम हा बांधला गेला असे पाहून, क्रोध विक्राळ रूप धारण करून वैराग्याच्या अंगावर धावून आला. परंतु महावीर क्रोधाला मोठ्या वेगाने विचार आडवा झाला आणि वैराग्यबंधूस पाठीशी घालून म्हणाला- ‘‘अरे नंग्या ! असा सैरावैरा का पळतोस? प्रथम मजबरोबर युद्ध कर आणि नंतर वैराग्याशी लढून आपल्या भावास-कामास-सोडवून ने.’’
त्यावेळी क्रोध विचारासमोर उभा ठाकून म्हणाला-- ‘‘मी क्रोध जर संतप्त झाला तर तुझा माझेसमोर टिकाव लागायचा नाही. माझ्या शस्त्रांच्या घावांनी किती तरी लोक गतप्राण झाले आहेत. गौतमाच्या हृदयांत शिरून मीच अहिल्येला पाषाणवत् बनविलें; बृहस्पतीच्या शापाने इंद्राला संपत्तिहीन करून सोडलें ; दुर्वासाचे हातून अंबऋषि शापविला आणि शंकराचे हृदयांत शिरून मदनास भस्म केलें ; असा माझा पुरुषार्थ आहे. माझ्या नेत्रकटाक्षाने जगांत दररोज किती उत्पात नि अनर्थ होत आहेत याची तुला कल्पना तरी आहे का?’’
यावर विचाराने हसून उत्तर दिले- ‘‘अरे मूर्खा ! तुला सन्निपात तर झाला नाहीना? आपला महिमा तूं आपल्याच मुखाने बोलतोस परंतु अपमान मात्रा सांगत नाहीस, हे तुझ्या मूर्खपणाचेंच द्योतक आहे. दुष्टा! अरे श्रीकृष्णभगवंतांपासून तूं बारा योजनें दूर पळत होतास; धर्मराज युधिष्ठीर तुला जवळसुद्धा बसू देत नव्हता ; आणि परमेश्वरभक्त तर तुला नेहमीच कैदेत ठेवीत आले आहेत. मग उगीच बढाया का ठोकतोस! तुझ्या हिंसकपणाने हजारो निरपराधी जीव दररोज चिरडले जात आहेत, यालाच पुरुषार्थ म्हणायचा काय? पण लक्षात ठेव, तुझा तो क्रूरपणा आता चालणार नाही. तुला ताबडतोब बोधाच्या बंदीशाळेत घातल्याखेरीज मी आता सोडीत नाही.’’
विचाराचे हे आवेशाचे बोलणे ऐकून क्रोधाने ताम्र डोळे करून धनुष्याला तमात्मक बाण जोडले आणि विचारावर त्याचा वर्षाव सुरू केला. एकदम ते बाण जिव्हारी लागल्याने विचाराला मुर्छा आली आणि ते दृश्य पाहतांच शांतीने धावत येऊन विचाराला सांभाळून सावध केलें. विचाराच्या अंगांत आता जणु नवें बळ संचरलें होतें. तो नव्या जोमाने उभा राहून क्रोधास म्हणाला- ‘‘क्रोधा ! अरे सावधान ! माझी प्रखर शाक्ति तुझेवर येत आहे.’’ विचाराने खरोखरच आपली धगधगीत प्रखर शक्ति अभिमंत्रून बाण सोडला. त्यायोगें क्रोधाच्या हृदयाला धक्का बसून तो बेहोशपणे धरणीवर लोळू लागला. विचाराने त्याला चटकन पकडले आणि क्षमेने त्याला बळकट बांधून बोधराजाच्या बंदीशाळेत घातले. त्यामुळे मोहराजाच्या सैन्यांत एकच हाहाकार झाला व क्रोधास नेल्याचे ऐकून भ्रम, मद, मत्सर व दंभ हे निवृत्तिपुत्रांचा संहार करण्यासाठी वेगाने धावले.
विवेक म्हणाला- ‘‘अरे, असे पिसाळल्यासारखे काय धावता ? इकडे या, तुमचा पुरुषार्थ मला दाखवा.’’ हे ऐकतांच सर्वजण चवताळून विवेकावर तुटून पडले. भ्रमाने भ्रांतिबाण, दंभाने गर्ववाण, मत्सराने मत्सरास्त्र व मदाने अहंवृत्तिशर सोडताच बोधाचे सैन्य खिळल्यासारखे झाले आणि तिन्ही लोक जर्जर होऊन गेले. सर्वत्न व्यापलेल्या या परिस्थितीमुळे तारक देवधर्माचा सर्वांना विसर पडला आणि सर्वांची अत्यंत दैना झाली. हे पाहतांच महापराक्रमी विवेकाने निर्गुणाची आराधना करून मिळविलेलें अत्यंत तेजोमय असें युक्तिअस्त्र तत्काळ सोडले. त्यामुळे मोठमोठे वीर मुर्छित पडले, त्यांची अपूर्व स्फूर्ति निघून गेली आणि मोहाचे सैन्य अगदी जर्जर होऊन वेडावून गेलें. ‘‘माता कसे युद्ध करावें ’’ हाच प्रश्न सर्वांना पडला.
विवेकवीराच्या युक्तिअलाच्या अचूक संधानाने भ्रम जमीनीवर उताणा पडला; ती शक्ति दंभाच्या तर मस्तकावरच जाऊन आदळली; मदाच्या सर्वांगास छिद्रे पडली आणि मत्सराचे हृदय फाटून गेले. अशा प्रकारे चौघेहि मृत्युपंथास लागली, हे पाहून मोहराजास अतोनात दुःख झाले. मोहराजा प्रधानाला म्हणाला- ‘‘आता करावें तरी काय !’’ तेव्हा प्रपंच म्हणाला-- ‘माझी शक्ति असाधारण आहे. तुम्ही मुळीच चिंता करू नका. मी आणि अज्ञान मिळून काय करूं शकणार नाही!’’ आणि त्याने अज्ञानासह लगेच रणक्षेत्रांत पाऊल ठेवले. त्याने परमार्थाला आव्हान दिले आणि परमार्थ त्यांच्या समोर दंड थोपटून उभा राहिला.
प्रपंच म्हणाला-- ‘‘अरे मूर्खा परमार्था ! तूं माझ्या समोर युद्ध करण्यासाठी आला आहेस, पण अजून विचार कर. मी महान सिद्धि-साधकांना पहाडाच्या गुहेत सुद्धा जिवंत सोडले नाही. त्या निवृत्तीला अरण्यवासी करविणाराहि मीच आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रवृत्तींचें कोणाकडून काहीच व्हायचे नाही, हे लक्षात ठेव. भिकारड्या ! माझ्या हाताने तूहि लौकरच फजीत होशील यात शंका कसली?’’
त्यावेळी परमार्थ म्हणाला-- ‘‘अरे चांडाळा ! या अज्ञानाच्या बळाने तूं काहीतरी बरळत आहेस. वास्तविक तुझी कोमतीहि गोष्ट साधुलोकांना रुचत नाही. सर्व शास्त्रे व पुराणे तुझी निंदा करून जागजागी तुझ्या अवगुणांचेच वर्णन करतात. तथापि तुला घमेंड चढलीच असेल तर जरा हुशारीने युद्ध कर; आणि पहा मी तुला एका क्षणांतच बोधराजाचे कैदेत टाकतों की नाही ते!’’
हे शब्द ऐकून प्रपंच अतिशय खवळला आणि त्याने खेद व विषाद हे दोन विनाशकारी बाण धनुष्याला लावून परमार्थावर सोडले. ते पाहतांच परमार्थीने मोदास्त्र सोडून त्यांना चूर्ण-विचूर्ण करून टाकले आणि एका नाणांतच त्याचेंहि मस्तक फोडले. तो घाव बसताच प्रपंच मुछित होऊन धरणीतलावर पडला आणि लगेच परमार्थाने त्याला पकडून बोधराजाचे बंदीशाळेत कोंडून टाकले.
त्यावेळी मोहाचे दलांत एकच हाहाकार उडाला की, अहो, महावीर प्रपंचाला देखील कैद करण्यांत आले. ‘‘धावा धावा, सर्वा मिळून त्यांचा फडशा पाडा' अशी हाक देऊन अहंकार पुढे सरसावला. अज्ञानानेहि त्याला साथ दिली. हे पाहतांच ज्ञानाने पुढे पाऊल टाकून त्यांना पाचारले की, ‘‘अरे दुष्टांनो ! माझ्या समोर या आणि दाखवा तुमची वीरश्री.’’
अहंकार मोठ्या आढ्यतेने म्हणाला- ‘‘अरे मूर्खा ! मला तुं जाणत नाहीस. तुलाच मी या रणक्षेत्रांतून मोकळ्या केसांनी पळवीन. मी ब्रह्मा, विष्णु व महादेवाला सुद्धा मोकळे सोडलें नाही, तेथे तूं माझ्या समागमें लढूं पाहतोस ? अरे वेड्या ! मी या चराचर विश्वामध्ये ओतप्रोत भरलो आहे आणि माझेबरोबर असलेले हे अज्ञानहि महान शूर आहे. त्यापुढून तूं एका क्षणांत पळ काढशील. आम्हा दोघांसमोर तूं जिवंतच राहणार नाहीस हे लक्षात ठेव."
त्यावेळी ज्ञान म्हणालें- ‘‘अरे मुढांनो ! तुमचा प्रताप मी ओळखून आहे. या संसाराचें मूळ तुम्हीच आहांत आणि तमच्या समागमें सर्व विषयांचा कोल्हाळ आहे, यांत शंका नाही. परंतु हा बडेजाव माझ्या नुसत्या प्रखर नेत्राग्नीने भस्मसात् होऊ शकतो याची आठवण असू द्या. माझ्या बळाने तिन्ही लोक पावन होतात आणि शेवटी परमेश्वराचा नित्यमोक्ष सुद्धा मिळतो, ही गोष्ट अनेक संतमहानुभावांनी सिद्ध केली आहे. परंतु तुम्ही मात्र अधोगतीस नेणारे आहांत, जगाला. मार्गभ्रष्ट करणारे आहात; आणि म्हणूनच तुम्हांला शासन करून त्वरित बोधाच्या बंदीशाळेत मी घालणार आहे. जास्त गोष्टी कशाला सांगतां ? ताकद असली तर दोन-दोन हात करून पाहाच!"
ज्ञानाचे हे प्रखर भाषण ऐकून अज्ञान व अहंकार हे दोघेहि खवळले आणि ते ज्ञानावर बाणवृष्टि करू लागले. अहंबाण व अज्ञानास्त्र यांनी बोधसैन्याचे डोळे दिपून त्यांना झापडी बसली आणि सर्वच सैन्य गोंधळून गेले. हे पाहून ज्ञानाने तीव्र वाग्बाण सज्ज करून सत्यमंत्राने अभिमंत्रन ते अहंकार व अज्ञान यांवर सोडले, त्यावेळी त्यांचा कोटी सूर्याइतका प्रकाश पडला. तेणेंकरून अहंकार व अज्ञान जागच्या जागीच होरपळून निघाले आणि सर्व बोध-सेनेला नवा प्रकाश दिसू लागला. ज्ञानाने दोघांनाहि जागचे जागीच खिळाटून टाकून लगेच बोधराजाचे बंदीशाळेत बंद केले.
हे दृश्य पाहतांच लोभ व द्वेष दातओठ चावीत ज्ञानास मारण्यास धावले; तोच त्यांचे समोर भाव येऊन उभा ठाकला. त्याला लोभाने आपल्या एकाच लोभ-बाणाने आकाशांत गरगरा फिरवून आदळले. तो मुर्छित होऊन धाडदिशी जमिनीवर आदळला; तेव्हा निवृत्ति वायुवेगाने धावत आली आणि तिने त्याला सावध केलें. सावध होताच निर्धारभाला हाणून त्याने लोभाला लोळवलें आणि द्वेषाच्या मस्तकावरहि समशेरीचा तडाखा देऊन त्याला चीत केले. त्या दोघांचीहि रवानगी बोधराजाच्या बंदीशाळेत करण्यात आली हे सांगायला नकोच.
आपल्या सर्व वीरांची अशी वाताहात झालेली पाहून स्वतः मोहराजा दोन्ही भुजा पिटून मोठ्या आवेशाने पुढे सरसावला व बोधराजास म्हणाला- ‘‘अरे जोगड्यांनो ! लहानसहान वोरांवर हात टाकून तुम्ही खूप फुशारकी मारली; परंतु माझा पराक्रम तुम्हाला ठाऊक नाही, या महावीर मोहानेच सर्व विश्व दुमदुमित भरून टाकले आहे. माझ्या समोर ज्ञान, ध्यान, आचार, विचार, आनंद नि बोध हे तेव्हाच पळ काढतात. माझी नुसती गर्जना ऐकून दया, क्षमा, शांति, ध्याया, निवृत्ति आदि जागचे जागी प्राण सोडतात. अर्जुनासारख्या शंकरास जिंकणाच्या महान नरवीराच्या हातून भारतीय युद्धांत धनुष्य गळून पडले ते कोणामुळे ? ब्रहादेवाला मुलीच्या मागे कोणी पळायला लावले? पाराशरासारख्या मोठमोठ्या ऋषिमुनींची त्रेधातिरपीट कुणी उडवली ! अशा या मोहराजासमोर तुझ्यासारख्या पामराचे काय चालणार आहे ! हुशार रहा, मी आता तुला जिवंत सोडायचा नाही ! ’’
त्याप्रमाणे अत्यंत अभिमानाने व क्रोधाने घोषणा करून मोहराजाने बोधराजावर आपले मोहिनी अस्त्र सोडले. परंतु बोधाने त्वरित बोधास्त्र सोडून जागचे जागीच त्याचा नाश केला. नापते अगदी निर्वाणीचे अस्त्र नष्ट झालेले पाहून मोहराजा पार थिजून गेला. तें विस्मयकारक दृश्य पाहतांच त्याला पूर्णपणे कळून चुकले की- ‘आता माझें कोणतेंहि आयुध यावर चालू शकणार नाही. अशा प्रसंगी शरणागत होऊन प्राण वाचविणेच बरे ! ’
अशा विचाराने बोधराजाचा गहन महिमा हृदयीं भरून का दोन्ही हात जोडून तो बोधराजाला शरण आला आणि म्हणाला- " हे निवृत्तिपुत्रा! आता माझें रक्षण कर. मला मारूं नकोस, मी तुझी सेवा करीन."
आपला पुत्रा युद्धात हरला हे पाहून प्रवृत्ति देखील निवृत्तिसमोर हात जोडून उभी राहिली आणि हे दृश्य पाहून ज्ञानास अत्यंत हर्ष झाला. प्रवृत्तिपुत्रांच्या हातून संपूर्ण स्वराज्य निवृत्तिपुत्रांच्या हातांत आले. परंतु, आशातृष्णादि सापत्न भगिनी आणि मोहादि सापन्न बंधु यांना प्राणदंडाची शिक्षा न देतां त्या सर्वांना नजरकैदेत ठेवून त्यांचे योग्य नियमन करावे व त्यांना विचाराच्या तंत्राने ज्ञानाच्या आज्ञेत सर्वकाळ वागवावे, हे विवेकाचे म्हणणे सर्वाना पसंत पडलें.
शेवटीं मनराजास बोलावून अत्यंत गंभीर वाणीने ज्ञानाने त्याला हितोपदेश दिला की
मना सज्जना! भक्तिपंथेचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडुनि द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावें करावें ॥
याप्रमाणे पुष्कळसा उपदेश ऐकून मनाची अशांति नष्ट झाली आणि त्याने बोधाच्या अधिकारांत पुढे राज्य चालविण्याचा व सुखसमृद्ध करण्याचा आदेश दिला. मन उन्मन होतांच निवृत्तीचे राज्यसुख पुढे सर्वांच्या अनुभवास येऊ लागले, हे वेगळे सांगायला नकोच!