सावधान!! भगवंत क्षमा करतील पण कर्म क्षमा करणार नाहीत
समाजात काही दुष्ट, चांडाळ, महामुर्ख पुरूषांचा स्त्री जातिवर घोर अत्याचार करतात , त्याचा भयानक परिणाम
एक शिक्षाप्रद खरी घटना
आताच थोडे दिवस झाले. आम्ही पंजाबच्या दिशेने धर्म प्रचारासाठी गेलो होतो, तेंव्हा एक धनवान सुशिक्षित, सुंदर, शितल स्वभाव, भगिनीने आपले दु:खी अंत:करणाने रडून सांगितले कि, माझ्या पतिचे मी असतांनाही दुसऱ्या मुली सोबत प्रेम आहेत. जे मला सहन होत नाही. माझ्या माहेरी सुध्दा खूप श्रीमंत आहेत, काहीही देण्या करण्यात चिकटपणा करत नाही. मी पतीदेवास खूप समजावले परंतु ते माझ्या बोलण्याची काहीही पर्वा करत नाही. बाईजी मी तर एखाद्या दिवशी विष घेऊन आत्महत्या करील. परंतु कित्येकदा विचार करते कि जो माझा चार वर्षाचा मुलगा आहे त्याच काय होईल.
आम्ही त्या भगिनीस खूप समजावले जसे पण होईल आपली वेळ घालवून घ्या, परंतु आत्महत्या करू नका. कारण मृत्युच्या नंतर खूप मोठे हजारो वर्षापर्यंत नर्क भोगावे लागतात. परंतु खूप दुःखाने लिहीत आहोत कि, थोडेच दिवस झाले त्या मुलीने विष पिऊन आत्महत्या केली. तसे आपल्या मुलासही विष पाजून मारून टाकले. त्या भगिनीने आपल्या आई-वडिलांना सांगितले होते कि, मी आपल्या पतिमुळे खूप दु:खी आणि चिंतीत आहे. त्या भगिनीच्या आई-वडिलांनी पोलिसात रिपोर्ट दिला. पोलिस त्या भगिनीच्या पतिस पकडून घेऊन गेली. केस कोर्टात गेली. न्यायाधिशाने त्याला २० वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. आणि त्या व्यक्तिचा अजून एक महान मूर्खपणा असा की त्या बिचाऱ्या पहिल्या धर्मपत्नीची चिता अजून थंड झाली नव्हती कि त्या मुर्खाने लगेच दुसरे लग्न पण केले. आता ती आपल्या पतिस २० वर्षांची शिक्षा ऐकूण आपल्या कर्मावर रडत आहे.
माझ्या बंधुंनो पुरूष तर अशा प्रकारचे घोर पाप करतात जे कधीही क्षमा होऊच शकत नाही. एका पुरूषाच्या चुकीमुळे तिन जीवाचे जीवन संपले.
आपण काम क्रोधास आधीन होवून कसे घोर पाप करतो. स्त्री जाती तसेच आपल्यापेक्षा कमजोर व गरीब लोकांवर अन्याय अत्याचार करतो, विश्वासघात करतो तसेच मन दुखावतो. कोणतेच पाप कर्म करतांना घाबरत नाही. परंतु जेंव्हा दंड भोगण्याची वेळ येते तेंव्हा भगवंताला बर-वाईट ऐकवतो. स्मरण करुन सुध्दा हे कष्ट का आले.
माझ्या बंधुंनो भगवंताच्या घरी कदापि अन्याय नाही. तसेच भगवंत कोणाला दंडही भोगवत नाही. चांगल्या वाईट पाप कर्माचे फळ भोगवणारे ८१ कोटी सव्वा लक्ष देवी देवता आहेत. जे कधी दंड भोगवतांना सोडत नाही. म्हणुन प्रत्येक काम विचार करूनच करा.
लक्षात ठेवा ज्वारी पेरल्यावर गहू उगवणार नाहीत तसेच आपण पापकर्मे केल्यावर आपल्याला कोणी पाहत नाही हा विचार मनातून काढून टाका माणसाने केलेल्या एकूण एक कर्मांचा हिशोब देवतांकडे ठेवलेला आहे. आणि आपल्याला येणारी सुखदुःखे हे त्याच कर्माचे भोग आहेत.
भक्ति करण्याची एकदम चुकीची पद्धत
पुष्कळ लोक म्हणतात की, जसे आमचे आई- वडिल-पति सासू किंवा आजी-आजोबा भक्ति करत होते, करतात तशीच भक्ती आम्ही पण त्यांना पाहून करतो. तर बंधुंनो! हे एकदम चूकीचे आहे. कारण त्यांनी शास्त्राचा अभ्यास केलेला नाही आणि तुम्ही पण केलेला नाही. म्हणून गुरुजनांना विचारून साधुसंतांना विचारून ब्रह्मविद्या आणि गितेचा अभ्यास अधिकर्णाच्या किंवा साधूंच्या सान्निध्यात राहून केला पाहिजे. धर्माचे यथातथ्य ज्ञान समजून घेतले पाहिजे. तरच आपल्याला देवता भक्ति, गुरूभक्ति व ईश्वर भक्तिमध्ये भेद चांगल्या प्रकारे समजतील. आणि अशी ज्ञान पूर्वक केलेली भक्ती परमेश्वराच्या पूर्णपणे लेखी लागते परमेश्वर प्रसन्न होतात.
आणि धर्म प्रचार करण्यासाठी प्रत्येक धर्माचे ज्ञान आवश्यक पाहिजे म्हणून पंथीय पुस्तक वाचणे प्रश्न साधुसंतांना विचारणे रोज काही ना काही नवीन विषय पंथीय अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे. हे अगत्याने केलेच पाहिजे.
आम्ही महानुभाव पंथात येण्या अगोदर सर्व पंथ पाहिले, त्यांचे उपदेश घेतले, त्यांच्या उपदेशाचा अर्थ काय आहे? कोणाची भक्ति करतात? (कोणत्या देवताची / ईश्वराची भक्ती करतात) हे सर्व जाणून घेतले. शेवटी ईश्वर भक्ति शिवाय दुःखरूपी संसारातून, पशु-पक्षीच्या योनीतून, नरकापासून सुटका नाही.
मौज मस्ती
संसारात खाणे-पिणे, औषधे, सिनेमा आणि मौजमस्तीवर हजारो रूपये खर्च करता तिथे धर्म कार्यात १५-२० रूपये पुस्तकावर खर्च करण्याविषयी संकोच करू नका पंथिय पुस्तके घ्या पुस्तके वाचा शक्यतो गुरु जणांकडून ज्ञान अभ्यासण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त प्रश्न विचारा. दिवसातून किमान एक तास तरी ब्रह्मविद्येचा अभ्यासाला द्या. कारण हेच सोबत येणार आहे मौज मस्ती पैसाअडका हे सर्व नश्वर आहे. एक दिवस नष्ट होणार आहे. पण आता चाललेला धर्म तो पुढे अनंत जन्मात उपयोगी येणार आहे किंवा तुम्ही धर्माचरणात जास्तीत जास्त वेळ दिला, पुढे चालून अनुसरणाचा निर्णय घेतला तर या अनंत जन्मापासून सुटकाही होऊ शकेल. शेवटी आपला प्रयत्नच आपल्याला या दुःखांपासून सोडू शकतो.
पैसा - तारूण्य - उच्च शिक्षण - सुन्दरता - पती-पत्नी,
ऋणानुबंध रूपेन पशु पत्नी सुतालया ।
मागील कर्मामुळे ऋणानुबंध मुळेच गुरू ढोरं नोकर-चाकर, शेती, सुंदर पत्नी, फार मोठा बंगला आणि गुणवान मुलगा या गोष्टी मिळत असतात. तसेच समाजात मान सन्मान तसेच मनाची शांती व प्रसन्नता ह्या सर्व वस्तु मागील कर्मानुसार मिळतात खुप पुरुषार्थ केल्यानंतर सुद्धा कर्मापेक्षा जास्त काहीही मिळत नाही. स्वतः प्रयत्न केले तरच ईश्वर त्याची मदत करतो. पण ह्या माणसाला असं वाटते की “हे सर्व मीच करत आहे माझ्याच प्रयत्नांनी मी हे सर्व पैसाअडका मिळवत आहे, पण त्या अज्ञान मनुष्याला हे कळत नाही की, 'इतरही प्रयत्न करताना दिसतात त्यांना का मिळत नाही? सगळेच अंबानी अडाणी का नाहीत? प्रत्येकाचा जन्म टाटा बिर्ला यांच्या घरात का झाला नाही? आणि मीही करोडपती होण्यासाठी प्रयत्न केले पण शेवटपर्यंत मी लखपती राहिलो करोडपती झालोच नाही तर का झालो नाही? प्रयत्न तर मी पुरेसे केले होते? याचाच अर्थ ते माझ्या कर्मातच नव्हते तर मिळणार कुठून” हा विचारतो निर्बुद्ध मनुष्य करत नाही.
म्हणून बंधुंनो आत्ताच सावधान व्हा द्रव्याच्या सुखाच्या इच्छेपोटी अनितिरुप कर्मे करून पैसा कमवू नका.
हिंदी भाषेत एक म्हण आहे
समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नही मिलता
हे शब्द ईश्वराचे अवतार श्रीचक्रधरस्वामींनी जगातील सुख वस्तु प्राप्त करण्यासाठी सांगितलेले नाही तर केवळ ईश्वर भक्तीमध्ये आपण एकरूप व्हावे म्हणून सांगितले आहे.
आता काही १००% सत्य घटना वाचून आपणाला समजेल व मनाची शांती सुद्धा मिळेल.
माझ्या भावांनो आणि बहिणींनो जेंव्हा आम्ही धर्माचा प्रचारासाठी जातो तेंव्हा दिवसातून पाच-सहा कुटूंबास भेटण्याचा शुभ योग मिळतो. क्वचित एखाद्या घरीच सुखाची, आनंदाची बातमी मिळते मात्र जास्तीत जास्त घरात दुःख, दारिद्र्याच्या गोष्टी ऐकावयास मिळतात.
आता ऐकायला मिळालेल्या कुटुंबाची दुःखाची कहाणी :-
एका भक्ताने सांगितले की बाईजी मी एम.ए. पर्यंत शिकलेलो आहे, माझी शारीरिक अवस्था सुद्धा चांगली आहे. मोठमोठ्या लोकांशी माझे भेटणे चालू आहे. तसेच मी मंत्र्यांना सुद्धा भेटतो. कोणी मित्राचे अनेक दिवसांचे थांबलेले काम असेल तर मी ताबडतोब करून देतो. कोणाचे परमीट कोणाचे रेशनकार्ड तर कोणाचे इंपोर्ट लाइसन्ससुद्धा. जे कोणी काम सांगतील ते कसल्याही प्रकारची मनात लालसा न ठेवता किंवा लाच न घेता करून देतो. परंतु माझ्या घरात भाकरी सुद्धा खायला नाही. ज्या कामाला मी सुरूवात करतो त्यात सुद्धा मला तूट (तोटा) येतो. घरातील रोजीरोटी सुद्धा चालत नाही. सकाळी जर काही खाल्ले तर रात्रीची चिंता असतेच. मुलांच्या शिक्षणाने आणि औषधाने सुद्धा मी चिंतीत असतो. मनात कधी कधी येते की गाडीखाली जाऊन आत्महत्या करावी.
माझ्या बंधुंनो आणि बहिणींनो देव कोणालाही गरीब किंवा श्रीमंत करीत नाही पैसा असूनसुद्धा ह्या भक्ताने मागील जन्मात कोणी संत, महंत, ज्ञानी किंवा दुःखी आजारी यांची सेवा केली नाही. सर्व धन केवळ स्वतःच्या खाण्या - पिण्यासाठी, ऐश-आरामासाठी वापरले ज्यामुळे त्यावर दंड ओढवला आहे व देवता त्यांना शिक्षा करीत आहेत.
आता एका दुसऱ्या भक्ताची कथा ऐका तो लिहितो की, बाईजी माझ्या सहा मुली आहेत. मुलगा एकही नाही अनेक उपाय केल्यानंतर देवाने एक मुलगा दिला मनात खूप इच्छा होती की याला खूप शिकवून डॉक्टर किंवा इंजिनिअर बनऊ, पैशाची सुद्धा काहीही कमी नव्हती. गाडी घर होती देवाने काहीही कमी केली नव्हती. परंतु दुःख आहे की माझा मुलगा पाचवी पर्यंत सुद्धा शिकू शकला नाही. अनेक शाळा बदलल्या, अनेक शिक्षक बदलले परंतु कधीही यश मिळाले नाही. माझ्या मुलाची बुद्धी केवळ खेळणे आणि मित्रांबरोबर गप्पा मारणे यातच तो वेळ घालवित आहे. तुम्हीच यावर काही उपाय असेल तर सांगा ?
आणखी एका बहिणीने मोठ्या दुःखाने सांगितले की माझी मुलगी शिकून २८ वर्षाची झालेली आहे तीचे लग्न होत नाही. जे कोणी मागणे येते ते काही कारणास्तव परत जाते. आम्ही जास्तीत जास्त हुंडा सुद्धा द्यायला तयार आहोत.
माझ्या बहिणींनो हा तर जगातील त्रास आहे कोणी मनाने दुःखी तर कोणी शरीराने दुखी तर कोणी पैशाने दुःखी तर कोणी मुलं नसल्यामुळे दुःखी. सगळीकडे केवळ दुःखच दुःख आहे. आपण पैसा - तारूण्य आणि सुंदरतेच्या भरात अनेक लोकांचे मन दुखवितो. एखाद्या गरीब आजारी मनुष्याशी तर साधं बोलत सुद्धा नाही. शरीराने सुद्धा सेवा नाही मनाने सुद्धा सेवेला आपण तयार होत नाही. देव करील तरी काय करणार. आणि शेवटी देवाचे एकाही नियमाचे पालन न केल्यामुळे शिक्षा मिळाल्यानंतर रडू येते.
पुरुषार्थ केला तरच आपण ईश्वर भक्तिमध्ये पुढे जाऊ शकतो. पुढे जाऊन देवाची खरी शांती आणि आनंद घेऊ शकतो. परंतु जगातील कोणताही पदार्थ हा नशीबाविना मिळू शकत नाही. सूचना - आपल्यातील बरेचसे लोक मुलं शिकत नसतील तर त्यांना खूप मारतात अशा मारहाणीमुळे मुले शिकू शकत नाही कारण मुले तर प्रेमाचे भुकेले असतात. थोडीशी भीती पण दाखवा परंतु नशीबात असल्याशिवाय शिकू शकत नाही.
नशीबाशिवाय पुरुषार्थ निष्फळ आहे २४-२४ तास जरी काम केले तरी जे नशीबात असेल तेच मिळणार.
म्हणून दिवस-रात्र पैशाच्या मागे पळणे सोडून द्या. २४ तासातील ८ १० तास काम धंदा करण्याचीच देवाने परवानगी दिली आहे. तसेच एक प्रहर म्हणजेच ३ तास ईश्वराची भक्ती करण्याची आज्ञा आहे आणि हे नियम सदैव आठवणीत ठेवा. जे मिळायचे असते ते ८ तासातच मिळेल.
आणखी एक खूप मोठी चिंता की जी ब्रह्मविद्या शास्त्र तसेच लीळा चरित्र वाचूनच समजेल. श्रीचक्रधर स्वामीजी हे आसनावर बसलेले होते. कोणी एक दायंबा नावाचा भक्त त्यांचे दर्शन करण्यासाठी आला. महाराज हे मनातील ओळखणारे होते त्यांनी त्याचे मागील पाप कर्मे ओळखून त्याला सांगितले की तुम्ही लवकरच दिक्षा घ्या नाहीतर ज्याप्रमाणे शेजारील वृक्ष हा दुःख भोगत आहे तसेच आपणालाही वृक्षाचा जन्म मिळेल आणि दुःख भोगावे लागतील.
माझ्या भगिनींनो, मलाही कधी वृक्षाच्या जन्माच्या बाबतीत लोकांना समजविण्याचा विचार आला नाही. लीळा चरित्र वाचल्यानंतरच हा विचार मला लोकांना समजावून सांगावसा वाटला. माझ्या बहिनींनो पशु-पक्षाच्या जन्माअगोदर जीवाला अनेक वर्षासाठी वृक्षाच्या जीवामध्ये टाकले जाते. वृक्ष जन्मात किती वाईट दुःख, क्लेश भोगावे लागतात ते वाचा.
जेष्ठ महिन्यातील कडक उन्हात त्या जीवाला भूक आणि तहान यांच्याशिवाय जगावे लागते. जसे आपण दहा वेळा थंड पाणी पितो व तहान लागते. परंतु त्या वृक्षाला कोण पाणी देईल.
शरबत पीतो तर कधी लिमका पितो त्याचप्रमाणे त्या वृक्ष जीवाला सुद्धा पशु पक्षी तरी घाण नाल्याचे पाणी पिऊन आपली तहान भागवितात परंतु वृक्ष बिचारा कुठे जाईल.
ज्यांचे कर्म काही चांगले आहे त्यांना मोठमोठ्या श्रीमंत माणसाच्या बगीचातील वृक्ष किंवा बीजामध्ये टाकले जाते. जेथे त्यांना जेवणाबरोबरच खाद्य व पाणी सुद्धा मिळत राहते. परंतु रस्त्यावर व जंगलात त्यांची आवाज कोणीही ऐकत नाही. झाडाच्या आतमध्ये जो जीव दु:ख कष्ट भोगत असतो, तडपत असतो त्यांना जर आपण विचारले तरच आपले डोळे उघडतील अन्यथा नाही.
माझ्या भावांनो! आम्ही पंजाबचे राहणारे आहोत. अनेकांनी मागील वाचले असेल की कशाप्रकारे वाईट, दुष्ट अतिरेक्यांनी हजारो लोकांना काहीही अपराध नसतांना हत्त्या केलेली आहे. रस्त्याने जात असलेली बस थांबवून पुरुषांना खाली उतरविण्यात आले आणि एका रांगेत उभे करून गोळ्यांनी उडवून दिले तसेच नंतर त्यांना तडफडत असतांना पळून जातात.
रात्री एक दोन वाजता छोट्या छोट्या गावात लोकांचे घराचे दरवाजे तोडून आत घुसतात आणि झोपेमध्ये असलेल्या पुरूषांना मारले जाते व आई - बहिणींबरोबर वाईट व्यवहार केला जातो.
बराच काळ असे लोक डॉक्टर, वकिल, मॅजिस्ट्रेट तसेच पुढाऱ्यांची हत्त्या करतात. अशा जीवांना पशू-पक्षी जन्मानंतर वर्षानुवर्षे झाडाच्या जन्मात टाकले जाते. अशा प्रकारच्या पापाचे प्रायश्चित जरी केले तरी क्षमिले जात नाही. खूपच पिडा भोगावी लागते.
पुजा, पारायण स्मरण प्रायश्चितकरतांना सुद्धा आपणाला कष्ट रोग चिंता का सोडत नाही. याचे महत्वाचे कारण हेच आहे की अशा प्रकारचे पाप भोगावे लागतात. देव तर दयाळू आणि कृपाळू आहे. परंतु विधानानुसार अशा प्रकारचे पाप क्षमा करण्याच्या लायकीचे नाही.
पशु- पक्षांचा बदला घेणे एक मुर्खपणा !
काही दिवसांपूर्वीची घटना आहे. एका मुलाला मोहळाची माशी (मधमाशी) चावली. त्याचे वडिल आले आणि मुलाचे रडणे ऐकून त्यांनी एका काठीला कपडा बांधला तसेच त्याच्यावर रॉकेल ओतले घराच्या काही अंतरावर असलेल्या मधमाशीच्या पोळे जाळून टाकले.
ज्यामुळे पाच दहा मिनिटांतच हजारो माशा मारल्या गेल्या. माझ्या बहिनींनो, माशांचे कामच चावा घेणे आहे, डंक मारणे आहे. कारण तीला तर ज्ञान नसते परंतु जीवाला तर देवाने थोडीफार बुद्धी दिलेली आहे. पाप-पुण्य, शुभ-अशुभ सगळ्या गोष्टींचा तो विचार करू शकतो. आपण बुद्धीचा वापर योग्य करीत नाही. रागाच्या भरात पशु - पक्षाचा सुद्धा बदला घेतो. अशा प्रकारचे पाप कधीही क्षमा करण्यायोग्य नाही.
एक वेळ जेव्हा कुत्रा आउसा बाईच्या जेवणाची झोळी उचलुन पळाला तेव्हा आउसा बाईने त्याला दगड मारला. महाराज अन्तरयामी आहे, ते आतमध्ये भक्तजनांना निरूपण करत होते आणि देवाने लगेच आपले डोकं (श्रीमुकुट) धरले. तेव्हा भक्त जनांनी विचारले, "जी जी आपण डोकं का पकडले? देव म्हणाले, आउसा बाईने कुत्र्याला दगड मारला त्यामुळे आम्हाला दुख झाले देवाने आउसा बाईला बोलावून सर्व भक्त जनांसमोर समजाऊन सांगितले की, कुत्र्याला आई- बहिण नाही की जी त्याला ताट वाढून पुढे ठेवील तर ते आमचे तुमचे उचलून खाणार. तुम्ही आपला सामान सांभाळून ठेवा ज्यामुळे पशू पक्ष्यांना मारणे हा खूप मोठा दोष आहे. देवाने समजावून सांगितल्यानंतर आउसा बाईने माफी मागितली.
एक गोष्ट लक्षात घ्या की केलेल्या कर्मांची फळे भोगावीच लागतात मग तो कुणी का असेना.
महाभारत युद्धात कुरुक्षेत्रावर बाणांच्या शय्येवर पहुडलेल्या पितामह भीष्मांनी श्रीकृष्ण भगवंतांना विचारले हे भगवंता मी असे काय पाप केले होते जेणेकरून मला एवढी भयानक शिक्षा मिळाली तेव्हा भगवंतांनी भीष्माला सांगितले की तुम्ही तुमचे पूर्वजन्म पहा यावर पितामह भीष्म उतरतात.
“हे जगन्नाथा !! मी इथं पडल्यापडल्या आतापर्यंत माझे शंभर जन्म पाहिलेले आहेत पण त्या कोणत्याही जन्मात मी असं पाप केलेलं नाही की, ज्यामुळे मला एवढी भयानक शिक्षा मिळेल”
तेव्हा भगवंत म्हणतात “आणखीन एक जन्म मागे जा”
भीष्माने तसे केले आणि त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्या जन्मात तो एक राजा होता व रस्त्याने जात असताना समोर एक सर्प आडवा जात होता. राजाने सगळ्यांना थांबवले व त्या सर्पाला काठीने पकडून झाडाझुडुपांमध्ये फेकायला लावले नोकरांनी तसेच केले. पण तो सर्प एका काटेरी झुडपावर पडला आणि सगळे काटे त्याचा अंगात शिरले आणि तो मरण पावला त्या पापाचे फळ म्हणून भीष्म आज बाणांच्या शय्येवर निजलेला होता तात्पर्य कर्म कोणालाही सोडत नाहीत कर्मा पासून तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही. म्हणून चांगलेच कर्म करा वाईट कर्म करू नका.
लेखक :-
पू. श्री. तपोनिधी रूपाबाई गीताबाई पंजाबी