महानुभावपंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य चरित्र
आजपासून सुमारे ८०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरी असलेल्या पुरी (पांढरी) नावाच्या गावात माधवभट आणि आबाईसा हे ब्राम्हण दाम्पत्य राहत होते. माधवभटांचे वडीलांचे नाव ‘महेश्वरपंडित’ होते, जे पराकोटीचे विद्वांन होते. वेदांचे चांगले जाणते अभ्यासक होते. महेश्वरपंडित यांनी त्यांचे वडील वामनाचार्य आणि आई महादाईसा यांच्या देखरेखीखाली वैदिक शिक्षण घेतले होते. वामनाचार्य राजदरबारात पुरोहीत होते. महेश्वरपंडितांची आई महादाइसाही चांगल्या विद्वान होत्या. त्यांनी चारी वेद षड्शास्त्रांचा अभ्यास केला होता. त्यांना ज्योतिष विद्या अवगत होती. त्या काळातील प्रसिद्ध ज्योतिषी होत्या. लोकांचा असा विश्वास होता की त्यांच्यावर देवी महालसाची अलौकिक कृपा आहे. त्याच्या तोंडून निघालेली प्रत्येक भविष्यवाणी कधीही असत्य ठरली नव्हती. महदाईसाने एकदा राज दरबारी वादविवादात अनेक विद्वानांचा पराभव केला आणि राज्याकडून बक्षीस म्हणून रावसगाव, पाडळी, कारंजा, पुरी आणि हिवरळी ही पाच गावे मिळवली. पुढे ती महादाइसा दिवंगत झाली. तिचे पुत्र महेश्वरपंडित, महेश्वर पंडितांचे पूत्र माधवभट ; माधवभट आणि आबाइसा हे श्रीनागदेवाचार्यांचे माता पिता होत. माधवभटांचे एक भाऊ होते त्यांचे नाव वायनायक, ते आपली पत्नी कामाईसासह पाडळीला राहत होते.
माधवभट यांना तीन मुलं आणि एक मुलगी होती, थोरल्या मुलाचे नाव सारंगपाणिभट, त्यानंतर श्रीनागदेवाचार्य, आणि त्यापेक्षा लहान मुलगा त्याचे नाव वैजोबा आणि सर्वात लहान मुलगी तिचे नाव उमाईसा. या पैकी मध्यम पूत्र श्रीनागदेवाचार्य हेच आपले कथानायक आहेत.
माधवभटांचे भाऊ वायनायक त्यांना आठ मुली आणि एक मुलगा होता. ज्यांची नावे होती - रूपाइसा, सावित्री, मदळसा, लळिताईसा, वेल्हाइसा, गायत्री, महालसा, जाखाइसा आणि सर्वात लहान भाऊ त्याचे नाव आपलो.
या आठही भगिणींमध्ये सर्वात थोरली रूपाइसा अर्थात महादाइसा त्या बाळविधवा होत्या, त्यांनी आपले संपूर्ण जीवन श्रीचक्रधरप्रभू आणि श्रीगोविंदप्रभू यांच्या श्रीचरणी समर्पित केले होते. आणि त्या शेवटपर्यंत देवधर्मात तल्लीन होत्या. त्या मराठी भाषेच्या आद्य कवयित्री म्हणून विख्यात झाझ्या. महादाइसा कविता रचनेत पारंगत होत्या. परमेश्वराच्या स्तुतीमध्ये रचलेले अनेक श्लोक, विशेषतः ‘धवळे’ नावाचे आद्य मराठी काव्य हे त्यांच्या क्षमतेचा, भावोत्कटतेचा आणि काव्य गंभीरतेचा एक ज्वलंत पुरावा आहे. म्हणूनच रूपाइसांची तुलना त्यांची विद्वांन पणजी महदाईसाशी केली गेली. आणि शेवटी रूपाइसा देखील ‘महदाईसा’ म्हणूनच प्रसिद्ध झाल्या. त्यांना आद्य मराठी कवयित्री ही मानाची पदवी प्राप्त झाली.
माधवभट्ट आणि आबाईसा यांचे सहजीवन फार काळ टिकू शकले नाही. मुले लहान असतानाच माधवभटांनी या जगाचा निरोप घेतला. आबाइसांचा संसार उद्ध्वस्त झाला. आयुष्य ओसाड झाले. कुटुंबाला एकप्रकारे अभिशाप प्राप्त घाला. आपल्या भावाच्या कुटुंबावर ही आपत्ती पाहून, वायनायक शांत राहू शकले नाहीत. ते पुरीला गेले आणि सर्वांना त्यांच्या गावाला घेऊन आले. आपुलकीने सर्वांची काळजी घ्यायला सुरुवात केली. वेळीच सर्व मुलांचे यज्ञोपवित संस्कार झाले. त्याचे वेदध्ययन शिक्षण पूर्ण केले. श्रीनागदेवाचार्य यांनी वेदांचे आणि सारंगपाणिभटांनी ‘रत्नपरीक्षा’ नावाच्या ग्रंथाचा अभ्यास केला. श्रीनागदेव, उमाइसा, महदाईसा यांचेही विवाहकार्य वायनायकानेच पूर्ण केले. पुरीतील माधवभटांची मालमत्ता वैजोबाला देण्यात आली. अशाप्रकारे, वायनायकाने बंधुत्वाच्या कर्तव्याचा उज्ज्वल आदर्श सर्वांसमोर ठेवला.
पण तरीही कुटुंबाच्या दुर्दैवाने हार मानली नाही. उमाईसा आणि महदाईसा या लग्नानंतर लवकरच विधवा झाल्या. दुर्दैवाच्या हातून पराभूत झाल्यानंतर त्या दुःखी बहिणी आपल्या माहेरी परत आल्या. फक्त आईच असते जी त्यांचं दुःख समजू शकते.
दरम्यान, आणखी एका हृदयद्रावक घटनेने कुटुंबाचा पाया हादरला. आबाइसाचा मोठा मुलगा सारंगपाणिभट दुसऱ्या शहरातून द्रव्यार्जन करून परत येताना वाटमाऱ्या लुटांरुंनी त्यांच्यावर हल्ला केला. व त्यांना उपद्रव केला. तरुण मुलाचे असे मरण पाहून आबाइसांना फार दुःख झाले. तिला असे वाटले की, यमाची काळी सावली आपल्या कुटुंबाला हळुहळु भक्षत आहे. आपल्या मुलांना कुशीत लपवून तिला काळाच्या क्रूर नजरेपासून कायमचे पळून जायचे होते. आणि या शापित जीवनापासून मुक्त व्हायचे होते.
आता आबाईसांना एकच सहारा उरला होता - श्रीनागदेव ; त्यांच्यावर उरलेला विश्वास तिला काही आधार देत होता. ती एकटे सुन्न बसून विचार करायची की, आता नागदेवच माझा एकमेव आधार आहे. तो माझ्या उर्वरित आयुष्यातील आनंदाचा किरण आहे.
कदाचित तिच्या आयुष्यात दुःखाचा अजून एक अध्याय शिल्लक होता. काळाच्या ओघात वडिल भावाच्या हत्येमुळे नागदेवांच्या मनावर खुपच विपरीत परिणाम झाला. त्यामुळे त्यांच्यात वेगळेच बदल दिसू लागले. वडील आणि मोठ्या भावाच्या सावलीअभावी दारिद्र्याने घरात राज्य केले. त्यामुळे त्या घरातल्या दुःखी उद्विग्नकारक वातावरणाला कंटाळून नागदेवभट जास्त काळ घराबाहेरच राहू लागले, आणि हळुहळु कुटुंबापासून दुरावले. मग त्यांनी विद्याभ्यास पूर्णपणे टाकून दिला आणि पत्नी गंगाइसाला घेऊन ‘पुरी’ या गावी राहू लागले. तिथे ते पूर्णपणे निर्भय होते. आबाइसांचे अनुभवाचे बोल, शिकवण कानावर पडणार नव्हती. त्यामुळे जीवन अधिकच बेताल झाले, ते सप्तदुर्व्यसनी ठगांच्या गटात सामील झाले. लूट करणे आणि वाईट व्यसनांमध्ये गुंग राहणे हा त्यांचा नित्यक्रम बनला. ते तलवारी घेऊन फिरत असायचे. कोणी समजावण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर नसायची. त्यांचा दरारा पंचक्रोशीत पसरला. हे सर्व ऐकल्यानंतर आबाइसाची शेवटची आशा जणू काही मावळलीच.
अनेक संकटांना सामोरे गेल्यानंतर अंतःकरणातून पूर्णपणे तुटलेली आबाइसा नागदेवभटांची नैतिक घसरण सहन करू शकली नाही. तिच्या तेजस्वी वंशामध्ये असे एक मूल असेल जे वंशाच्या नावाने एक डाग बनेल, ही कल्पनाही ती सहन करू शकत नव्हती. आता आयुष्यात काय उरले आहे, मी कोणासाठी जगावे? अशा निराशेचा विचार तिचा मनात चमकत राही. सारंगपाणि भटांचे दुःख, नागदेवभटांची व्यसने, त्यांचे पराक्रम ऐकून तिला खुप त्रास होत होता. असहाय मन दुःखाच्या भोवऱ्यात बुडू लागले होते. गृहस्थधर्मातून मन पूर्णपणे उडून गेले होते.
मग तिने निर्णय घेतला की, आता असे राहणे अशक्यप्राय होत आहे, म्हणून ती रामसगावाला आली. आणि तिथे क्षेत्रसंन्यास घेतला. सोबत आबाइसा आणि उमाइसा मासोपवास करीत राहू लागल्या.
अशा प्रकारे एकेक दिवस लोटत असताना श्रीचक्रधरप्रभुंचे शिष्य रामदेव उर्फ दादोस ते रामसगावाला आले. तेथे आबाइसांची आणि दादोसांची भेट झाली.
दादोस (रामदेव वडनेरकर). त्यांची आणि आबाईसांची भेट झाली. बाईसांनी दादोसांना नमस्कार केला दादोसही आबाईसांची नम्रता पाहून प्रसन्न झाले. आबाईसांचा भाव पाहून त्यांनी क्षेमकुशल विचारले? आणि आबाईसांनी आपली कर्मकहाणी त्यांच्यापुढे सांगितली. त्यांना आबाईसाच्या हृदयाची व्यथा समजली. त्यांना वाईट वाटले, आबाईसांच्या धैर्य पूर्ण जीवनाची, आणि त्यांनी सहन केलेल्या हालअपेष्टांची कल्पना देखिल करवत नाही. त्यांनी आबाईसांना निरूपण केले. त्यांचे मन शांत करण्याचा प्रयत्न करून उपदेश केला, “अनेक जन्मे भटकल्यानंतर हा मनुष्य जन्म मिळतो, सुकृत कर्मांनी मिळालेल्या या अमूल्य मानव देहाला परमेश्वराच्या चरणी समर्पित करा. एकाग्र मनाने परमेश्वराचे ध्यान करा. तरच तुमचे मन शांत होईल, ही सांसारिक सुखे क्षणिक आहेत. आणि या मुळे नरकच प्राप्त होतात.
दादोसांचे निरूपण ऐकून अबाईसाचे पुत्रविरहाने दग्ध चिंताग्रस्त मन थोडे शांत झाले. दादोसांना श्रीचक्रधर प्रभुंनी वरदान दिले होते की तुमच्या पासून स्थीती होईल. सर्वज्ञांच्या चिंतनाने आबाईसांना दादोसापासून स्थीती सुख झाले. परिणामी, त्याने आपल्या हरवलेल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. त्यांच्या अंधकारमय जीवनात जणुकाही आशेचा एक किरणच गवसला. रावसगावात त्यांच्या पर्णकुटीकेत त्यांनी दादोसांना आमंत्रित केले. दादोस रोज निरूपण करण्यासाठी तेथे येऊ लागले.
तिथे आबाईसांसोबत महदाईसा आणि उमाईसाही राहत असत. त्या तिघीही आपल्या जीवनाचे उर्वरित दिवस देवाच्या उपासनेत जावे म्हणून तेथे येऊन राहिल्या होत्या. तेथे श्रीनागदेव भट दोन चार दिवसांनी येेत आणि विचारपूस करून जात.
काही दिवसांनी पुरी येथे श्रीनागदेवभटांच्या घरी मुलगा झाला.
श्रीनागदेव भटांनी त्याचे नाव महेश्वर पंडित असे ठेवले.
दादोस प्रतिदिनी आता आबाईसाच्या पर्णकुटीकेत येत होते. ते श्रीचक्रधरप्रभूंच्या लीळा त्यांना सांगत आणि त्यांनी निरूपिलेले शास्त्रश्रवण करवित. स्वामींच्या दैवी सौंदर्याचे वर्णन करीत त्यामुळे तिघींच्या मनाला आनंद सौख्य वाटत होते. आणि श्रीचक्रधरप्रभूंचे दर्शन व्हावे अशी इच्छा दृढावत होती. अशा प्रकारे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळुहळु बदलू लागला. दिवसामागून दिवस सरत होते.
एके दिवशी नागदेवभट रामसगावाला आबाइसांना पडताळायला आले. पर्णकुटीकेच्या बाहेर पादत्राणे काढतांना त्यांचे लक्ष गेले. की इथे एका पुरुषाचे पादत्राणे आहेत. त्यांना आश्चर्य वाटले की इथे कोण पुरुष आला असेल? इथे पुरुषांच्या चपलांचा काय उपयोग! दरवाज्यात बाहेर उभे राहून ते विचार करू लागले. त्यांच्या मनोवृत्तीनुसार अनेक प्रकारच्या अनावश्यक निरर्थक शंका मनात आल्या. नागदेवभट अस्वस्थ झाले. आणि त्यांनी तसाच वेगाने आत प्रवेश केला. त्यांनी पाहिले, एक महात्मे आसनावर बसलेले आहेत आणि तरुण बहिणी आणि आबाईसा त्यांच्या समोर बसून तल्लीन होऊन, काही चर्चा निरूपण ऐकत आहेत, पाहून ते क्रोधाने लालबुंद झाले. त्यांनी बहिणींकडे आणि आईकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. नंतर दादोसांकडेही रागाने पाहिले. ते सर्वजण नागदेवभटांकडे पाहू लागले. त्यांचे अचानक आगमन आणि त्यांच्या चेहऱ्यावरील क्रोध पाहून आबाईसा काहीशा आश्चर्यचकित झाल्या. उमाईसा महादाईसा घाबरल्या व माजघरात पळाल्या.
नागदेवभट खुप चिडले. आणि काहीही सारासार विचार न करत, दादोसांची घोंगडी, कमंडलू आणि पादत्राणे उचलले आणि बाहेर फेकून दिले. त्याचा श्वास रागाने फुगू लागला.
आतापर्यंत शांत असलेले दादोस नागदेवभटांचे हे तिरस्कारपूर्ण वर्तन काही क्षण पाहत राहिले, आणि त्यांनाही थोडे भय वाटले, पण त्यांनी आपली चर्या तशीच शांत ठेवत तिथून उठले आणि बाहेर आले.
दादोसांनी आपले घोंगडे कमंडलू वगैरे मात्रा उचलली आणि समोरच असलेल्या एका झाडाखाली शांतपणे बसले, सहज पाऊल उचलले. त्यांची निरुद्विग्न सात्विकता झाडाच्या गडद सावलीशी एकरूप झाली.
इकडे पर्णकुटीकेत मात्र जणु वादळ घोंघावत होते. रागाच्या भरात नागदेवभट आपल्या आईला फटकारत होते. त्यांच्या मनात ज्या काही कुशंका मनात आल्या होत्या त्या सर्व त्यांनी बोलून दाखवल्या. आपल्या मनातले राजस तामस भाव त्यांना आई बहिणींच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होताना दिसत होते. त्याच आवेशात ते बोलले “तुम्हाला लोकांमध्ये अजिबात लाज राहिली नाही, तुमच्या अंतःकरणात ला सारासार विचार मावळला आहे की काय? एक अनोळखी उपरा माणूस तुमच्या घरात एकटाच बसला आहे, हे समाज विरुद्ध वर्तन आहे, हे पाहिल्यावर लोक काय काय अन्यथा आक्षेप घेतील याची तुम्हाला कल्पना आहे काय? हा साधा विचारही तुम्ही केला नाही.
तुम्ही इथे क्षेत्र संन्यास घेतला म्हणून कुटुंबाच्या प्रतिष्ठेशी तुमचे काहीच कर्तव्य उरले नाही का?” असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. आणि ते महादाईसा उमाईसा वरही रागावू लागले. नंतर आबाईसांना म्हणाले, “आई, सगळी चूक तुझीच आहे. तुच यांना ही सूट दिली आहे. म्हणून याही त्या परपुरुषाला समोर काही ही लज्जा न बाळगता बसल्या होत्या.”
त्यांचे अवास्तव आणि गैरसमजाने माखलेले शब्द ऐकून आई घाबरली. आणि त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाली, “अरे, अविवेकी माणसा! काहीतरी विचार करून बोल, तू काय बोलतो आहेस याची तरी तुला कल्पना आहे काय? उचलली जीभ लावली टाळ्याला आई बहीणींविषयी हे असले बोलणे तुला शोभते काय? तुझ्या या सगळ्या शंका निराधार आणि निरर्थक आहेत याला काहीही अर्थ नाही, ते दादोस ज्ञानी पुरुष आहेत, खरे महात्मा आहेत सिन्नर येथे राज्य करत असलेले स्वामी श्रीचक्रधरांचे विद्वान शिष्य आहेत. तो आमच्या प्रार्थनेनेच येथे येतात व आम्हाला अध्यात्मविषयक निरूपण करतात. त्यांचे ते निरूपण ऐकून आम्ही आमचे सगळे दुःख विसरतो आणि आमच्या मनाला शांतता प्राप्त होते म्हणून त्यांच्याविषयी असे अपवित्र उद्गार काढून पापाचा भागीदार बनवू नकोस.
नागदेवभट अजूनही रागाच्या भरात हातवारे करत बोलले , “मला सगळं समजतं. मला मूर्ख बनवू नका.” ते गैरसमजामुळे पुन्हा पुन्हा असेच बोलत होते. आबाईसांनी त्यांना पुन्हा समजावून सांगितले तेव्हा कुठे त्यांचा राग थोडासा कमी झाला मग अभय सांनी त्यांना समजावले की तू त्या महात्माजींचा अपमान करून चांगली केले नाही त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याऐवजी तू त्यांना अपमानित केले हे फार वाईट झाले ते आमच्या बद्दल काय विचार करत असतील म्हणून बेटा, अजूनही उशीर झालेला नाही, ते महापुरुष इथेच पलिकडे बाहेर झाडाखाली बसलेले आहेत. तिथे जाऊन त्यांची माफी मागतो आणि त्यांना आदराने घेऊन ये”
नागदेवभट लगेच म्हणाले, “इतका अपमान होऊनही ते माझी विनंती मान्य करतील का? आणि परत येतील का? आणि ते जर खरोखर महात्मा असतील तर नक्कीच परत येतील!”
असे म्हणून नागदेवभट बाहेर आले व त्या दिशेने जाऊ लागले. मग थबकले. विचार करू लागले, मी आता त्यांना स्वतः आमंत्रित करायला जावे का! त्यांचा इतका अपमान केल्यानंतर, मी त्यांना आमंत्रित कसं करू? अरेरे, माझ्यामध्ये धैर्य नाही.
बऱ्याच दिवसांनंतर, नागदेवभटांच्या मनात अपराधीपणाची भावना जागृत झाली होती, आपण जे केले ते चुकीचेच आहे असे प्रकर्षांने जाणवले होत्. आपल्यातला बदल जाणवला, आबाईसांच्या शब्दातले सामर्थ्य प्रत्ययाला आले होते, आणि आबाईसांचे शब्द या दादोसांच्या निरूपणामुळेच तर एवढे भारदस्त आहेत' असा विचार करत करत ते दादोसांपर्यंत पोहोचले' दादोसपासून थोड्या अंतरावर थांबून म्हणाले , “माझी आई आबाईसा तुम्हाला जेवणासाठी बोलवत आहे.”
दादोसच्या स्थीर गंभीर चेहऱ्यावर हास्य उमटले.
ज्याने आधी आपला एवढा अपमान केला आता तीच व्यक्ती एवढ्या नम्रतेने आपल्याला बोलवायला आली आहे, हा अद्भुत बदल पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ते अनाकलनीय नजरेने तो नागदेवभटांकडे पाहू लागले. दादोस जणुकाही घडलेच नाही अशा पद्धतीने हळूच उठले आणि पर्णकुटीकेच्या दिशेने निघाले. नागदेवभट दादोसांचे महात्म्यपण पाहून तिथेच उभे राहून आश्चर्याने दादोसांना झोपडीत प्रवेश करताना पाहत होते. त्यांना आपल्या वागण्याचे अधिकच वाईट वाटले व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज ते पूर्णपणे पराभूत झाले होते. खाली वाकून त्यांनी दादोसांची घोंगडी आणि कमंडलू उचलला आणि हळूहळू त्यांच्या मागे झोपडीच्या दिशेने निघाले.
जेवण आटोपल्यावर दादोस गोदावरी किनाऱ्याच्या दिशेने गेले. संध्याकाळी आईच्या सांगण्यावरून नागदेवट पुन्हा दादोसांना भेटायला गेले. नागदेवभटांच्या मनात दादोसांविषयी श्रद्धेची आणि विश्वासाची भावना होती. ते दादोसाजवळ गेले. लवून नमस्कार केला. आणि एखाद्या निरागस लहान मुलाप्रमाणे सहज निर्मळ अंतःकरणाने त्यांनी प्रश्न केला, “माझी आई म्हणत होती, तुमच्यापासून अलौकिक आनंद होतो. तसाच आनंद मला पण होईल का?”
दादोसांना आश्चर्य वाटले. पूर्णपणे बदललेले नागदेवभटांचे व्यक्तिमत्व पाहून त्यांना हर्ष झाला. तटस्थपणे म्हणाला, “तुम्हाला माझ्याकडून आनंद होणार की नाही हे मी सांगू शकत नाही पण आमचे गुरु सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंपासून तुम्हाला नक्कीच स्थिती सुखानंद होईल.
परमेश्वर श्रीचक्रधरप्रभूंचे हे पवित्र करणारे नाम कानी पडल्याबरोबर नागदेवभटांना स्थिती सुखानंदाचा अलौलिक अपूर्व अनुभव येऊ लागला. जीवनात पहिल्यांदाच खरा निर्भेळ आनंद मिळत होता. त्यात ते तल्लीन झाले. तो अत्यंत शांततेचा अनुभव होता. ते बराच वेळ तो आनंद अनुभवत होते.
थोड्या नागदेवभटांची स्थीती भंगली. मग दादोसांनी विचारले, नागदेवभटो, तुम्हाला काय वाटले? ' तेव्हा नागदेव गद्गदीत होऊन भरल्या आवाजात म्हणाले, 'महात्मन्, मला तुमचे गुरू श्रीचक्रधरारायाचे दर्शन घडू द्या. माझ्या मनात त्यांना पाहण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे. नागदेवभटांच्या आवाजात उत्साह होता.
दादोसाला त्यांच्या दर्शनाभिलाषेची तीव्रता समजली. मग दादोस त्यांना म्हणाले, 'परवा' दवणापर्व आहे. आम्ही श्रीचक्रधरस्वामींच्या दर्शनासाठी जात आहोत , तुम्हीही आमच्यासोबत स्वामिंच्या दर्शनाला चला. '
नागदेवभटांना आनंद झाला. म्हणाला, “तुम्ही माझ्या आई आणि बहिणींसोबत साडेगावला या. मी पण तिथे येतो. तेथून आपण सर्वजण मिळून श्रीचक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी जाऊ.”
ठरलेल्या दिवशी सर्वांसोबत दादोसांनी साडेगाव गाठले. नागदेवभटही तिथे पोहोचले होते. मग सर्वजण सिन्नरच्या दिशेने गेले. सिन्नरला पोहोचल्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी सर्वांनी फळे फुले खरेदी केली. नागदेवभट देवाच्या भेटिविषयी त्यांच्या मनात अनेक कल्पना करत होते. त् खुपच उत्साहित होते.
स्वामींपर्यंत पोहोचल्यावर सर्वांनी दंडवत घातले श्रीचरणावर मस्तक टेकवले. श्रीचक्रधरप्रभूंनी सर्वांना क्षेमकुशल विचारले.
नागदेवभट स्वामींची दैवीने युक्त अत्यंत तेजस्वी ३२ लक्षणी सुंदर श्रीमूर्ती पाहून अत्यंत प्रभावित झाले. त्यांचे हात आपोआप स्वामींच्या पायाकडे आकर्षित झाले. फळफुल अर्पण केल्यानंतर आणि तेथे नतमस्तक झाले.
स्वामींच्या तांबुळाचा प्रसाद बाईसांनी सर्वांना दिला. प्रसन्न म्हणून नागदेवभटांनाही दिला. तो तांबुळ प्रसाद हातात घेऊन नागदेवभट विचार करू लागले, 'मी प्रसाद घ्यावा की नाही, आपण मागितला नाही तरीही मला ते उत्स्फूर्तपणे मिळत आहे. असतील पुरुष तर होईल गोमटे नाहीतर आम्ही असे कित्येकांची गोष्टी अन्य खाल्ली आहेत' अशा प्रकारे स्वतःला विचारांच्या गोंधळापासून मुक्त करून त्यांनी तो प्रसाद घेतला. प्रसाद घेताच नागदेवभटांना स्थीती झाली परम सुखाचा अनुभव येऊ लागला. ते अलौलिक अपूर्व आनंदात लीन होतो. ते आपपर विसरले आणि स्वतःचेही भान राहिले. सर्वकाही विसरून ते आनंदाच्या सागरात गटांगळ्या खाऊ लागले.
नागदेवभटांची स्थीती भंगल्यावर , श्रीचक्रधरप्रभूंनी स्मित हास्य करत विचारले, '“भटो, दादोसांकडूनही तुम्हाला जे सुख झाले, त्या आणि यात काही फरक आहे का की सारखेच आहे?”
नागदेवभट म्हणाले, “जी जी, दादोसांकडून सुख होते, पण त्यात इतका आनंद नाहीये, जितका आज झाला आहे! हा आनंद वर्णनापलीकडचा आहे.”
स्वामी म्हणाले, “होय, आमचा आनंद काही श्रेष्ठ प्रकारचा आहे, सर्वात वेगळा आहे!”
अशा प्रकारे नागदेवभटांची आणि श्रीचक्रधरप्रभूंची पहिली भेट झाली. स्वामींच्या दैवी प्रभावाची छाप त्यांच्या मनात खोलवर रुजली.
श्रीनागदेवाचार्यांची पहिली भेट झाल्यावर ते सिन्नर वरून परत आपल्या गावी गेले. पण स्वामींची ती दैवी श्रीमूर्ती त्यांच्या डोळ्यापुढून जात नव्हती त्यांना पुन्हा स्वामींच्या दर्शनाला जावे, पुन्हा ती सुंदर ३२ लक्षणयुक्त श्रीमूर्ती पाहायला मिळावी अशी उत्कंठा त्यांच्या मनात वाढत होती. आणि वाढणारच!! कारण एक वेळ ज्याने ईश्वरीय दर्शनाचा त्यांच्या अलौकिक सुखाचा अनुभव घेतला तो शांत कसा काय राहू शकतो!! त्याला वारंवार तो आनंद आपल्याला मिळावा असे वाटणारच.
अशाप्रकारे जेव्हाही अवसर मिळेल ते श्रीचक्रधरप्रभुंच्या दर्शनाला येत असत शेवटी नागदेवभट श्रीचक्रधर स्वामींचे झालेच. आणि अनुसरले. श्रीचक्रधर स्वामींनी त्यांना आचार्य पदी स्थापन केले आणि यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। या श्लोका प्रमाणे लोप पावलेला आपला सत्य सनातन धर्म, मोक्षमार्ग चालता केला.
पहिल्या भेटीनंतर नागदेवभट घरी परतले. पण मन मात्र स्वामींच्या श्रीचरणाजवळ होते. प्रत्येक क्षण ते स्वामींबद्दलच विचार करत होते. त्यांच्या अंधकारमय जीवनात जणूकाही आनंद प्रकाशाचा सूर्य उगवला होता. नवीन धारणा, नवीन विश्वास, नवीन प्रतीती, नाविन्यपूर्ण आनंद, या सर्वांनी त्यांच्या मनात अक्षरशः सुखाचे वादळ निर्माण केले होते. सतत स्वामींच्या चिंतनाने, स्मरणाने त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. त्यांचे सप्त व्यसनी सांगाती त्यांना बोलावत, पण ते त्यांना टाळत असत. पुन्हा ते त्यांच्याकडे गेलेच नाही. मग कालांतराने त्यांनीही बोलावणे सोडले. नागदेवभटांची जीवन सरिता परम सत्याकडे वाहत होती. आता कोणीच त्यांना थांबवू शकत नव्हते.