महानुभाव कविंचे उपदेशपर काव्य
॥ अथ उपदेश पंचविशी प्रारंम्भ ॥
आता नमो श्रीगुरुदेवदत्ता । जो दाखवी श्रीपद मोक्ष दाता ।
त्या सांडुनी दैवत भक्ति ज्याला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१॥
निंदा मुखी ज्या बहुसाल अंगी । विवादवादी लटिका विढंगी ।
मांसा आहारी मद्यपी तयाला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥२॥
नेणे कदाही नच देव धर्मा । कुवेसनीया अती चोरीकर्मा ।
तंत्रादी मंत्र पूजीतो भुताला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥३॥
नित्यानी मागे परि शांती नाही । सेंडा बसोनी मुळ तोडु पाही ।
पशुवा समाने नर देही आला, उपदेश कैचा अशीया मुढाला ॥४॥
धेनूस्तनी गोचीड तोंड खोवी । तो रक्त प्राशी बहु मस्त जीवी ।
गोडी क्षीराची न कळेची त्याला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥५॥
बांधोनिया मर्कटु ओंगळ्याला । मुक्ताफळे गुंफुनि माळ घाला ।
तोडोनी टाकी रुची नाही त्याला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥६॥
आणौनीया रासभु न्हानीयेला । सुगंधीरे तो बहु चर्चीयेला ।
जाणौनी लोळे धरणी धुळीला । उपदेश कैचा अशीरा मुढाला ॥७॥
घालोनिया पै नळि श्वनपुच्छे । सहा मास ठेवी आपुल्या स्वइच्छे ।
काढोनी पाहा तव वक्र त्या । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥८॥
पाळीयला वायसु पिंजऱ्याशी । घालौनी चारा पक्वान्न त्यासी ।
सोडोनी देता प्रिय विष्टु त्याला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥९॥
बालादशे बोकड पोसीयेला । नाना परीचा गुण शिकविला ।
मातेसी भोगी नच लाज त्याला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१०॥
पाळोनि पाजा पर त्या भुजंगा । तो डंकल्याने विष येत अंगा ।
निर्विष दुग्धे परि तो न जाला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥११॥
पाषाण तो पै उदकांत महा । घालौनिया ठेवी सुनम्र पहा ।
तो फोडिता अंतरी ना भिजेला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१२॥
तो कोळसा धुवूनिया दुधाने । घोळीयला कर्पुर साकराने ।
काळाची राहे नये शुभ्र त्याला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१३॥
तो कोश कीडा घर युक्ती बांधी । बुझौनि दारा बसला कुबुध्दि ।
कोंडोनि त्याचा मग मृत्यू झाला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१४॥
मलैगिरी चंदन वृक्ष वेधी । वेळू हृदयी पोकळु तो न वेधी ।
तैसाचि तो अंतरी शून्य झाला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१५॥
दृष्टांत ऐसे वदता शताब्दी । दृष्टे खळेही पडिले भवाब्धी ।
दुःखार्णवी ते मुकले सुखाला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१६॥
नानापरी त्या यम गांजीताती । असंत दु:खे बहु काळ जाती ।
चौऱ्यांशी लक्ष पुनःयोनी त्याला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१७॥
भोगीत नर्का युग काळ जाती । विश्रांती नाही क्षण दिसराती ।
त्या कुंभिपाकि रमी आवळीला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१८॥
कृतांतगेही किती एक बंदी । कित्रेक पहा पडिले अमेध्यी ।
कित्येक येती पुढती महीला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥१९॥
कित्येक पै जीव जडत्वी पाहा । भोगीत नर्का किती जाच महा ।
दु:खासी नाहि परि पार त्याला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥२०॥
भोगीत एकु सुख स्वर्ग लोकी । ते पुण्र सरल्रा मग मृत्यूलोकी ।
जन्मौनी मोहे भव भोग प्याला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥२१॥
दृष्टांत ऐसे वदता मूढाचे । संख्याच नाही दु:खे या भवाचे ।
नाना मताने समूळी बुडाला । उपदेश कैचा अशीया मुढाला ॥२२॥
या लागी बा सद्गुरु पार सेवी । जो ईशभक्ती श्रुती भेद दावी ।
ज्ञानासी बोधी बहूसार जो का । नाहीं भवाचा मग विघ्न धोका ॥२३॥
अज्ञान नासौनी सुज्ञान दावी । जो देवधर्मा भजनासी लावी ।
सद्भक्तीवीणे न गती जीवासी । त्या लागी श्रीदत्त स्मरे निजासी ॥२४॥
पुर्वील भाग्य कवी राघवाचे । सन्नीधी आले परमार्गिकाचे ।
बोधोनी तेणे उपदेश केला । संसार धोका समूळी हरीला ॥२५॥
श्रीरामचंद्र महानुभाव कृत उपदेश पंचविशी संम्पूर्ण
दंडवत प्रणाम 🙏🏽
ReplyDelete