ती आठवा स्मृती थोर पूर्वजांची.....!!

ती आठवा स्मृती थोर पूर्वजांची.....!!

 ती आठवा स्मृती थोर पूर्वजांची.....!!



आपल्या पूर्वजांनी आपल्या आचरणाने तपाने महानुभाव पंथाला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवले त्या पूर्वजांची स्मृती आठवण यांनीदेखील आपल्या पापांचे पुरश्चरण होते. त्यांचा त्याग, त्यांची चर्या, आचरण,  उच्च पराकोटीचे वैराग्य, त्यांची स्मरणनिष्ठा, परमेश्वराविषयी आवडी, इत्यादी अगणित गुणांचा समुद्रच असलेल्या आपल्या पूर्वजांचे चरित्र ऐकून अंतःकरणी भरलेपणा निर्माण होतो. परमेश्वर भक्तीची आवड निर्माण होते. त्या पूज्य पवित्र अशा पूर्वजांचा इतिहास स्मृति स्थळात, अनेक काव्य, अभंग, ओव्यामध्ये अन्वय स्थळांमध्ये आलेला आहे. तसेच अलिकडच्या कविवर्यांनी ती आठवा स्मृती विरांची असे गीत लिहिले. ते पुढील प्रमाणे :-

पूर्वज प्रशंसा स्मृती गीत 

 (चाल :- ऐ मेरे वतन के लोगो ..)

हे माझ्या धर्म बंधुनो । जरा अश्रु येऊ द्या नयनी ।

ती आठवा स्मृती वीरांची । कसे देह क्षेपीले त्यांनी ॥धृ.॥

कुणी नराधम तो आला । दामोदर पंडीताला ।

करुनी लक्ष अचानक । घातला तयाने घाला ।

पुढे होऊनी वार तयाचा । झेलीला केसोबासानी ॥१॥

श्रीदामोदर पंडितबास आणि श्रीकेशराज बास अटनात होते. एके दिवशी ते एका गावी जात होते तेव्हा समोरून एक दारू प्यायलेला नराधम मनुष्य आला त्याने पंडित बासांवर शस्त्र चालवले ते पाहून श्रीकेशराज बासांनी ओडवण केली, मध्येच आड पडून तो घाव स्वतःवर घेतला आणि देवाचे परमेश्वराचे दुर्लभ असे प्रेम जोडून घेतले. 


एक दिवस भटोबासानी । कोथळोबा मुख्य करोनी ।

देशावर जाईल कोणी । म्हणीतले परा वाचेनी ।

कोथळोबास देशावर । निघाले खांडे काढोनी ॥२॥

एके दिवशी महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य आपल्या शिष्यांना वैराग्याचे निरूपण करीत होते. निरुपणाचा आशय असा होता की संपूर्ण आलंबन टाकून परमेश्वराने सांगितलेला आचार करण्यासाठी, देशाचा शेवटी जाऊन जन्म क्षेपणारा क्वचितच असतो, सर्वांना काही ना काही आलंबन आहेच, आलंबनावेगळा मला कोणीच दिसत नाही. तेव्हा श्रीकोथळोबासही ते निरूपण ऐकत होते. आचार्यांचे असे बोलणे ऐकताच कोथळोबा भर सभेत उठून उभे राहिले आणि म्हणाले, “नाही कैसा! मी आहे ना, मी जाईन देशाच्या शेवटी जन्म क्षेपायला, देवाचे म्हटलेले करायला.” असं म्हणून त्यांनी आचार्यांना दंडवत केला. आणि झोळी पात्र पोथी एक वस्त्र इतकंच घेऊन निघाले देह क्षेपण्यासाठी देशाचा शेवटी गेले. पुन्हा ते कधीच परत आले नाहीत. आचार्यांनी ही त्यांची खूप प्रशंसा केली. 


एकदा कविश्वर बास । सह दंते गोपाळबास ।

दुष्काळी निघून गेले । नित्य नेम विधी अटनास ।

अन्नछत्री भिक्षा न मिळता । मग देह पाडी सुकवोनी ॥३॥

एकदा कविश्वर बास आणि दंते गोपाळबास हे दोघे अटणाला निघाले त्यावर्षी खूप दुष्काळ होता. तरीही ते अटन करीतच होते. आहार पर्याप्त भिक्षा मिळत नव्हती. पण त्यांनी आपला आचार भंगला नाही. मग एके दिवशी गोपाळबास कवीश्वरबासांना म्हणाले कि, “आता आपण विभाग करू.” कवीश्वर बास म्हणाले “दुष्काळ आहे, अन्नाचे वस्त्राचे साह्य नाही.” तरीही गोपाळबास एकटेच अटणाला निघाले आणि अटन करीत करीत सातारा जिल्ह्यात चंदन-वंदन येथे आले. तोपर्यंत दुष्काळ खूप वाढला होता. भिक्षाही मिळत नव्हतीच. आणि तिथल्या राजाने अन्नछत्र घातले होते. कोणीही या आणि जेवण करून जा. 

पण त्या अन्नछत्राचा एक नियम होता. तिथेच बसून जेवावे लागत होते. तिथून शिदोरी बांधून नेता येत नव्हती. मग गोपाळबासांनी विचार केला. इतरत्र भिक्षा मिळतच नाहीये. गावातले लोकही अन्नछत्रालाच जेवायला जातात. आपणही विधिमात्र तिथे भिक्षा करू. म्हणून ते तिथे भिक्षेला गेले. पण त्यात छत्र चालकाने सांगितले, तुम्हाला येथेच बसून जेवावे लागेल. गोपाळबासांनी त्यांना म्हटले, “माझ्या झोळीत अन्न वाढा मी गंगेवर जाऊन जेवण करीन, माझा नियम मी भंगू शकत नाही” : छत्र चालकाने अन्न वाढण्यास नकार दिला. गोपाळबास तसेच माघारी फिरले. झोळीत अन्न जरी आले नसले, तरी त्यांचा भीक्षाविधी झाला होता. आणि ते विधीपाळण्यासाठीच भिक्षा करत होते. असेच दोन तीन दिवस झाले. मागील अनेक दिवसांपासून पुरेसे अन्न न मिळाल्याने गोपाळबासांची शरीर क्षीण झाले होते. आणि आता तर तीन-चार दिवसांपासून पूर्ण उपवास पडला होता. इतक्या मोठ्या महापात्राच्या ठिकाणी अन्न प्रवेशन व्हावे असे भाग्य जोडलेला एकही जीव त्या भागात नव्हता. शेवटी परमेश्वराला त्यांना घेऊन जाण्याची प्रवृत्ती झाली. आणि त्या डोंगरातच दोन मोठ्या मोठ्या दगडांच्या मध्ये त्यांनी स्मरण करतच आपले देह सोडले. आणि परमेश्वर प्राप्तीला गेले. त्यांनी देह ठेवले तिथे खूप तेजपुंज असा प्रकाश निघाला. आणि तो आकाशाला भिडला. त्या प्रांतातला राजा रात्री आपल्या राजवाड्याच्या माडीवर उभा राहून प्रदेशाचे अवलोकन करीत होता. त्याला तो प्रकाश दिसला. त्याला खूप आश्चर्य वाटले, हा प्रकाश कुठुन निघत आहे? रात्रीची वेळ होती. तो कळदिवी(कंदील) लावून प्रकाशाच्या दिशेने निघाला. तसा तसा तो प्रकाश नाहीसा होऊ लागला. तू तेथे पोहोचला आणि प्रकाश संपूर्ण नाहीसा झाला. आणि त्याने पाहिले तर येथे एका संन्यासी सत्पुरुषाने प्राणत्याग केला आहे. तो विचार करू लागला हे फार मोठे महान साधू दिसतात. आणि यांचे शरीर पूर्ण सुकलेले आहे, याचा अर्थ यांना अन्न मिळाले नाही आणि मी तर या पूर्ण राज्यासाठी अन्नछत्र लावलेले आहे, मग यांना अन्न का मिळाले नाही? त्याने छत्रकाराला बोलावले व विचारले. त्याने सांगितले, “हो हे येत होते. पण हे रोज असंच म्हणायचे की, मी गंगेवर जाऊन जेवीन म्हणून आम्ही यांना अन्न वाढले नाही” 

     ते ऐकून राजा खूप उदास झाला व म्हणाला, “अरे पाप्यानो! ज्या महापात्रासाठी मी हे अन्नछत्र घातले होते, माझा हाच हेतू होता की कोणी सिद्ध साधक पुरुष यावा व येथे भोजन करून जावा. त्याच पात्रासाठी जर हे अन्न उपयोगी गेले नाही तर हे अन्नछत्र काय कामाचे” असे म्हणून त्याने खूप दुःख केले. आणि दुसर्‍या दिवसापासून अन्नछत्रच बंद केले.

    गोपाळबासांनी ज्या दोन मोठ्या दगडांमध्ये देह ठेवले, ते दोन दगड आजही तेथे गोपाळबासांच्या वैराग्याची साक्ष देण्यासाठी तेथे उभे आहेत. त्या दिवसापासून त्या पाषाणांना अधिकच कठोरत्व आले.


ती नाती नागाईसा । गेली सप्त शृंगासी ।

पहा कैसे देह क्षेपीले । लाजविले तिने आम्हासी ।

छीनस्थळी आणिले शोधूनी । तेथुनी कविश्वरानी॥४॥

श्री नाती नागाईसा या श्रीनागदेवाचार्य यांचे पुत्र महेश्वर पंडित यांच्या कन्या. त्या भटोबासांजवळ अनुसरल्या होत्या. भटोबासांजवळच तिने सर्व ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास केला. त्या महाज्ञानी पंडीत विद्वान होत्या. भटोबास देवदर्शनाला गेल्यानंतर त्या नाशिक जवळ सप्तशृंगी येथील डोंगरात एकट्याच देह क्षेपायला गेल्या. व त्यांनी तिथेच देह क्षेपले आणि देह सोडताना एका दगडाखाली छिन्नस्थळीचा विशेष ठेवून, त्या दगडावर लिहिले “येथ छिन्नस्थळी असे” आणि त्या परमेश्वर दर्शनाला गेल्या. नंतर कवीश्वरबासांनी तेथे जाऊन, नागाईसांचा शोध घेतला. पण नागाईसा त्यांना भेटल्या नाही. तपास करत करत त्यांना ते दगडावरील कोळश्याने लिहिलेले वाक्य दिसले आणि त्यांना फार दुःख झाले. आणि तो छिस्थळीचा विशेष घेऊन निघाले.

नागाईसा तिथे असताना गावात फक्त भिक्षेला जात असत. पण त्या भागातल्या लोकांना त्यांनी हेही कळू दिले नाही की, त्या स्त्री होत्या की पुरुष होत्या? आपले देह त्यांनी इतके सुकवून टाकले होते. 


ते रामदेव ज्वरी पिडले । भटोबासी त्या आडविले ।

तेही ना त्यांनी ऐकीले। अन प्रेम पद मिळविले ।

रामदेव रणामध्ये पडले । वाणीले भट्टोबासानी ॥५॥

श्रीरामदेव हे श्रीनागदेवाचार्य यांचे शिष्य. त्यांचे वय १५-१६ वर्षाचे होते एके दिवशी त्यांना ताप आला. व ते तापातच आचार्यांना म्हणाले की, “मी अटनाला जाणार” आचार्यांनी प्रसन्नतेने अनुज्ञा दिली. पण निघताना क्षेमालिंगन देताना आचार्यांच्या लक्षात आले की हे तापाने फणफणत आहेत. आचार्य त्यांना म्हणाले “तुला ताप आहे मग तू कसा जाणार?” यावर ते उत्तर देतात “भटो ताप आहे म्हणूनच जात आहे” आचार्यांनी त्यांना खूप समजावले पण त्यांनी ऐकले नाही. आणि ते अटणाला निघाले. मागाहून आचार्यांनी पंडित बास आणि केशराज बासांना आज्ञा केली की “तुम्ही याच्या मागे जा वसित पथ्य करा” पंडितबास व केशराजबास त्यांच्या मागे मागे अटणाला निघाले व त्यांनी यथोचित सित पथ्य केले. पण रामदेवांची ती शेवटची चर्या होती. त्या अटनातच त्यांचे देहावसान झाले. वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी ते परमेश्वर प्राप्तीला गेले.


हे शास्त्राचे भांडार । देईल धर्मा आधार ।

भटोबासांचे आभार । मानीतसे आज मी थोर ।

थोडा तरी दीन दयाळ । घे बोध तया पासौनी ॥६॥

 गेल्या ८०० वर्षात अशा अगणित संता महंतांनी आपले देह  क्षेपून परमेश्वराचे अच्युत असे पद प्राप्त केले आहे. अशा पूर्वजांचा पुण्य पावन पवित्र असा वृद्धाचार ऐकूनच आपल्या अनेक पापांचा नाश होतो

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post